उद्धवहंसाख्यान - पूजापुरश्चरण

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमत्सच्चिदानंद श्रीगुरु हंस । मूळारंभ वा परमार्थास । उद्धवस्वामी तयाचा अंश । ध्वजचि हा उभारिला ॥१॥

समर्थ ह्मणती एके दिनीं । आम्हां जाणें असे कृष्णातीरालागुनी । तुवां निवांत असावें यया स्थानीं । मारुतीपाशीं ॥२॥

तंव तें बाळ बोले हात जोडोनी । स्वामि ! जाऊं नये मज टाकुगी । जाणेंच तरी मज समारामें घेउनी । सुखें विचरावें ॥३॥

माझे मायबाप गणगोत । बंधु गुरु तुंचि दैवत । स्वामीविण या ब्रह्मांडांत । मजला कोण आहे ॥४॥

नेत्रीं अश्रूचिया धारा । गात्रें कांपताती थरथरा । शब्द न फुटेचि बाहिरा । चरणीं लोळण घाली ॥५॥

तेव्हा समर्थं उचलोनि घेतलें । आवडीनें मुखासी चुंबन दिधलें । बाळा तुजसी न जाय उपक्षिलें । कल्पांतीही ॥६॥

तरी आम्हीं वारंवार येऊं । तुझी भेट घेत जाऊं । तुजला साह्म असे सर्व गावु । आणि मातापिता ॥७॥

उद्धव ह्मणे स्वामीवांचुन । मज ओस वाटे त्रिभुवन । काय करावे हे सर्व जन । आणि मातापिता ॥८॥

समर्थ मागुती तया बोलती । बापा न करावी कांहीं खंती । मीच असे या सर्व भूतीं । तुज रक्षावया ॥९॥

येथे मजवांचून कोण असे । मी एकलाचि सर्वीं विलसतसें । तुजमाजीही मीच मानी विश्वासें । अगा हे दृढमति ॥१०॥

ऐसें ऐकून हंसून बाळ बोले । सर्व तुह्मीच ऐसें मज नाहीं जालें । मजशी कोण खेळवील वहिलें । मांडीवरी घेउनी ॥११॥

म्यां कवणाशी बोलावें । कवणापुढें म्या निजावें । कवणासी काय म्यां मागावें । कांहीं लागला ॥१२॥

समर्थ म्हणती तुज काय उणें । सर्व घडेल आमुच्या आशीर्वचनें । ज्ञान नाहीं जें म्हणती मुखानें । तरी तें पुढें उपदेशुं ॥१३॥

तुज कर्मणुक मारूतीचें पूजन । आणि मंत्राचें करी पुरश्चरण । आम्हीं सत्वरचि तुजला येऊन । भेदूं मागुती ॥१४॥

तंव बाळ बोले आतांचि जावें । परी आतांचि मागुती यावें । परी आधीं मजला सांगावें । विधिविधान मंत्राचें ॥१५॥

मग समर्थं न्यासध्यानादिक । विधान सांगितलें सकळिक । आतांच येऊं गा आवश्यक । आम्ही न विसंबूं कदा ॥१६॥

ऐसें बोलोनी समर्थ गेले । बाळ एकटचि तेथें बैसले । आतां येतील मुखें बोले । कोणें पुसतांही ॥१७॥

मातापिताही येऊन ह्मणती । चाल बाळा घराप्रति । येरू बोले समर्थ आतां येती । मी न ये घरा ॥१८॥

मी काय येथें पडिलों रानीं । कीं म्यां यावें घरालागुनी । माझा गुरु जनीं विजनीं । भरला असे ॥१९॥

भरला तोचि व्यक्ति धरिल । श्रीगुरुसमर्थ आतां येईल । ऐसें ऐकतां लेंकुराचे बोल । कोणी आग्रह न करिती ॥२०॥

परी जैसें जयासी सुचलें । तैसें तैसें बोलूं लागले । लेंकरासी कैसें टाकून गेले । निदयपणें ॥२१॥

एक म्हणती त्या कैची माया । एक म्हणती येती लवलाह्मा । ऐसें नानापरी मिळुन पुरुषबाया । कोलाहल करिती ॥२२॥

असो इकडे समर्थ मार्गीं चालतां । बालक आठवतसे चित्ता । तेणें त्यागून मातापिता । मजपाशीं राहिलें ॥२३॥

काय आश्चर्य हो त्या बाळकाचें । गोड गोड बोलतसे वाचें । परंतु कोड माझिया मनाचें । पुरलें नाहीं ॥२४॥

मी काय हो निर्दय असे । बाळासी एकट वनीं टाकुनी जातसे । अहा प्रारब्ध वोढवलें कैसें । जानें दूर ॥२५॥

नेत्रीं जीवन सद्गद कंठ । पुढें किमपि चालवेना वाट । अरे मारुति हें कैसें वोखट । जालें न कळे ॥२६॥

ऐसें संकट भाकिता क्षणीं । मारुती प्रगट जाले त्या वनीं । बापा सखया बोलतसे वाणी । खेद कां करिसी ॥२७॥

तुवां जावें गा निःसंशयी । कांहीं चिता न करी हृदयीं । तें बाल माझें मी त्याची आई । हरप्रकारें रक्षीन ॥२८॥

ऐसें मारुतीचे शब्द ऐकतां । हर्षोनि घालिती दंडवता । आह्मालागीं कोन तुजपरत । असे त्रिभुवनी ॥२९॥

आपण बोलिलियापरी । सत्याचि कराल निर्धारी । परी मज कैसा विसर पडेल अंतरी । तया बाळकाचा ॥३०॥

असो मी जातसें दूर देशीं । तुवां रक्षावें बाळकासी । मारुती ह्माणे जावें वेगेंसी । मीच पिता जगताचा ॥३१॥

ऐसें बोलोनि गाय वनीं । जातां आठवी वत्सालागुनी । कीं पिलियांते आठवी पक्षिणी । चारा घेऊं जातां ॥३२॥

वासरा टाकुनी गाय वनीं । जातां आठवी वत्सालागुनी । कीं पिलियांते आठवी पक्षिणी । चारा घेऊं जाता ॥३३॥

तयाचिपरी जालें समर्थासी । अंतरी आठविती बाळकासी । पावते जाले कृष्णातीरासी । गुरुआज्ञेस्तव ॥३४॥

इकडे बाळ टाकळी आंत । राहिलें समर्थ आतां येतील ह्मणत । व्यक्ति आठवीतसे मनांत । जेवी चकोर चंद्रा ॥३५॥

वासरूं जैसे आठवी गाय । तान्हुलें आठवी जेवी माय । बहुत भोंवतीं अस तांही समुदास । परी विसर न पडे समर्थाचा ॥३६॥

तिकडे समर्था ध्यान लेंकुराचें । इकडे बाळका ध्यान माउलीचें । जेंवी चक्रवाकां ध्यान एकमेकांचे । परी भेटी नाहीं ॥३७॥

उभय तीरीं जलाशयाचे एकमेका ध्याती साचे । तादात्म्य लाहती अंगें साचें । भेटी नसतांही ॥३८॥

तैसेंचि बाळका गुरुचें ध्यान । गुरुरूपाचि जाहला आपण । परी भावीतसे अनन्य शरण । श्रीसद्‌गुरुचें ॥३९॥

समर्थे आज्ञा केली असे । कीं मी जाउनि आतां येतसे । तों काल पुरश्चरणा करी अपैसे । आणि मारुतीपूजन ॥४०॥

तरी मी आज्ञा करीन वेगें । पूजापुरश्चरण करीन अंगें । समर्थ येतील लागवेगें । आतां मजसाठी ॥४१॥

चिमणें बाळ करील पुरश्चरण । मारुती संरक्षील आपण । तेंचि कथारूप अनुसंधान । पुढिलिये प्रकरणीं परिसीजे ॥४२॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्याक्ति । उद्धबहंसाख्यान निगुती । तृतीय प्रकरणीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP