समर्थहंसाख्यान - चिमणकवीस आदेश

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रोते सज्जन पुसताती । काय आरंभिलें हो निश्चिती । तरी हे जाणावी हंसपद्धति । यथामति बोलिजे ॥१॥

याचें काय असे प्रयोजन । तरी अवधारा सावधान । सद्‌गुरु हंस करी प्रेरण । कीं प्रगट करी पद्धति ॥२॥

एकें दिनीं आपुलें सदनीं । निजेलों होतों सुखें शयनीं । हांका मारी स्वप्नीं कोणी । अगा चिमण्या उठि उठी ॥३॥

कोणी येथें पाचारिले । ऐसें मन जों सकोचलें । तंव असस्मात् रूप देखिलें । हंस पक्षियाचें ॥४॥

परम सुंदर तो हंस । देखां संतोषलें मानस । मग म्यां पुसिलें तयास । तुह्मी कोण असा ॥५॥

हंस ह्माणे मज न जाणसी । तरी पुढें कळेल तुजसी । परी मान देऊनि ममाज्ञेसी । अष्ट अष्टकें करीं ॥६॥

ऐसें बोलोनि तये क्षणीं । हंस पावला अंतर्धानी । पुढें मी बैसलों जागा होउनी । तेव्हा मन आश्चर्य पावे ॥७॥

काय हो सुंदर तो हंस । शब्द बोलतां हरलें मानस । अष्ट अष्टकें करी बहुवस । तो म्हणे काय मी नेणें ॥८॥

परी पुढें व्यापारही करितां । हंसचि ध्यान लागलें चित्ता । तंव दुसरे दिनींही मागुता । हंस तो स्वप्नीं आला ॥९॥

अष्ट अष्टकें करी ह्माणोनी । पूर्ववत्‌चि गेला बोलोनी । तैसेंचि मागुती तिसरे दिनीं । रागें भरोनि बोलत ॥१०॥

कांरे तूं उगा झोंप घेसी । अष्ट अष्टकें कां न करिसी । तुज न कळे तरी आपुलें गुरुसी । जाऊनिया पुसावें ॥११॥

मग मी घाबरून जालों जागा । तैसाचि निघालों सवेगा । सद् गुरुहंसा पुढें साष्टांगा । नमुनिया बैसलों ॥१२॥

तेव्हां कळवळोनि कृपापाणी । थापटूनि बोलती सुवचनीं । तुज आज्ञा जाली स्वप्नीं । काय ह्मणोनि न करिसी ॥१३॥

मग मियां चरण धरिले । जी म्यां न सांगतां विदित जालें । जया हंसें मज आज्ञापिलें । तो कोण असे ॥१४॥

आणि अष्ट अष्टौ करी । तें काय मज न कळे अंतरीं । तरी हें यथार्य निर्धारी । मज आज्ञापावें ॥१५॥

ऐसी माझी प्रार्थना ऐकोनी । स्वामी बोलते जाले सुवचनीं । ऐक बापा एकाप्र मनीं । तो हंस तो मीचि ॥१६॥

अष्ट अष्टकें माझी चरित्रें । तुवा बोलावी आपुल्या वक्त्रें । जेणें श्रोतियांची कर्णपात्रें । मनासहित धाती ॥१७॥

आदिनारायणापासोनी । मज पावेतों परंपराश्रेणी । हे हंसपद्धतीची सुवचनीं । अष्ट अष्टकेअं करी ॥१८॥

ऐसी आज्ञा होतां क्षणीं । म्यां लोळणी घातली चरणीं । जी जी मी मतिमंद जनीं । हें अपार कैसें घडेल ॥१९॥

सद्‌गुरु हंस कैसे कैसे । वर्तलें असती मज ठाउके नसे । तरी तें बोलणें घडे अशेषें । केवी मजप्रति ॥२०॥

तंव माझें मुख कुरवाळुनी । स्वामी सद्‌गुरु बोलती हसोनी । आमुची स्फूर्ति अंत करणीं । उठेल तुझिया॥२१॥

तुज कासया पाहिजे व्यत्पत्ति । अथवा ठाउक्या नसो नाना युक्ति । तुजसी बोलवील निश्चिती । आमुची कृपा ॥२२॥

कैसी कैसी तयांचीं चरित्रें । तें आपणचि प्रगटतील तुझ्या वक्‍त्रें । तेंतें लिहून ठेवी आदरें । ते मुमुक्षु सेवितील ॥२३॥

जे कोणी आदरें वाचिती । आणि प्रज्ञाबळें अर्थ घेती । ते भावार्थीं याचि देहीं पावन होती । अज्ञाननाशें मोक्षा ॥२४॥

आतां जावें तुवा वेगीं । करावें आताच या प्रसंगी । मग म्यां नमुन साष्टांगीं । आरंभ केला ॥२५॥

श्रोतयांसी वर दिधला । तरी श्रवण करा माझिया बोला । हेहि वचनोक्ति दिसे फोला । माझे काय सद्‌गुरुचे ॥२६॥

मुमुक्षुजनांचे कृपेसाठीं । बोलली सद्‌गुरुमाय गोमटी । बोलवितसे माझे ओठीं । तरी अवधारोत श्रोते ॥२७॥

आदिनारायणापासून । अंती श्रीगुरु हंस नारायण । या सर्व गुरुमुर्तींचें कथन । कैसें कैसें तें बोलिजे ॥२८॥

आदि अंतीं श्रीनारायण । मध्येंही एकचि नारायण । येहीं चिमण्या वोसंगा घेऊन । स्वकीय कथन स्वयें बोलती ॥२९॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानभिव्यक्ति । ग्रंथारंभनिरुपण उक्ति । द्वितीय प्रकरणी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP