नक्षत्रस्वामी - अध्याय सातवा

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


या जगी सारे चंचळ । चंचळ ते जाते सकळ ।

निश्चळ राहते निश्चळ । आत्माराम ॥१॥

स्वामींचा देह चंचल । निश्चये तो जाईल ।

परंतु कीर्तिरूपे उरेल । भक्त सिद्धाचा ॥२॥

म्हणोनि धरावा विवेक । विवेकबळे संकटे अनेक ।

स्मरता सिद्धराज एक । सुसह्य होती ॥३॥

ऐसा करोनि विचार । साधुसत्पुरुषांचा बडिवार ।

राखावा म्हणोनि निर्धार । केला ग्रामस्थांनी ॥४॥

उडाला कथाकीर्तनाचा कल्लोळ । नाम संकीर्तनाचा गदारोळ ।

पातला हरिनामाचा सुकाळ । प्रपदेपासोन ॥५॥

दीर्घसूचनेचे लोक आले । स्वामीकार्यार्थ लागले ।

जे जे करणे प्राप्त झाले । ते ते करू लागले ॥६॥

बालयोगे , ब्रम्हचारी । ईश्वरभक्त , अधिकारी ।

मातृभक्त आणि कैवारी । श्रीनक्षत्रस्वामी ॥७॥

प्रतिपदेस प्रातःकाळी । स्मरोनी शिवचंद्रमोळी ।

लोका म्हणती जे भाळी । लिहिले तैसे होईल ॥८॥

इहलोकीचे कर्य संपले । पुत्र होऊन मातृत्व दिले ।

मातामानस पुरवले । सिधराजाकारणे ॥९॥

आपणांस माझी विनंती । देवाकारणे वेचा मति ।

तेणे पावेल श्रीपति । मग काय उणे ? ॥१०॥

मज सिद्धराजे निरोपिले । ते ते सारे जाहले ।

सारे त्याच्या इच्छाबळे । चालते ॥११॥

विपत्ती स्मरावे पाय । सिद्धराज एकच उपाय ।

अन्य श्रद्धा अपाय । ऐसे जाणा ॥१२॥

आम्ही जरी गेलो । शरीररूपे अदृष झालो ।

तरी भावरूपे उरलो । आपुल्या चित्ती ॥१३॥

ऐसे सर्वा संबोधिले । कथाकीर्तन रसकल्लोळे ।

अन्न्संतर्पणे तोषविले । सकल जन ॥१४॥

श्रावण श्रुध नवमी तिथी । अपार आले भक्तातिथी ।

शिवलीलामृताची पोथी । श्रवण केली ॥१५॥

स्वामीराव आणि सत्यभामा । दुःखी मनी नसे उपमा ।

वियोग दुःखाच्या भ्रमा । भ्रमोन गेली ॥१६॥

डोळ्यास न लागे डोळा । अंतरी जीव झाला गोळा ।

विस्कटेल डाव सगळा । प्रातःकाली ॥१७॥

नक्षत्रस्वामी आणि माता । आवरोनी आपुल्या चित्ता ।

त्यागोनी सारी महत्ता । स्वस्थ झाले ॥१८॥

ब्रम्हमुहुर्ती स्नाने झाली । मायलेके पूजा केली ।

सिद्धराजाची स्मरली । नामावळी ॥१९॥

गळा रूद्राक्षाच्या माळा । भस्म रेखिले भाळा ।

स्वामीमुखावर्कळा । चैतन्याची पातली ॥२०॥

माता स्वये सिद्ध झाली । शुभ्र वसने ल्याली ।

प्रसन्न आभा दाटली ।मुखावरी ॥२१॥

गोठ्यामध्ये गायवासरू । पूर्वजन्मीचे सहचरू ।

वत्सा चाटे , लागे हंबरू । येणार आम्ही ॥२२॥

टाळ मृदुंगाचा ध्वनि । अंगणी हरिकिर्तनी ।

हरिहरांचा गजर करूनि । ग्रामवासी नाचती ॥२३॥

ग्रामस्थ येवोनि पाया पडती । गळा फुलांचे हार घालती ।

सुगंध पुष्पे अर्पिती । मातेसह ॥२४॥

होता होता वेळ आली । मायलेक दोघे उठली ।

वडिलजनांचे पाया पडली । आता येणे नाही ॥२५॥

तो स्वामीरावाचे बांध फुटले । योगियास कवटाळले ।

अश्रुपाते अवघ्राणिले । नक्षत्रस्वामी ॥२६॥

सत्यभामेने मिठी घातली । मातेच्या कुशी शिरली ।

जणू गंगा -सरस्वती भेटली । प्रीति संगमी ॥२७॥

योगी मुक्तांचा मेरूमणि । देवासन्मुख जोडोन पाणी ।

वदे ‘देवा चक्रपाणी । कृपा असावी ’ ॥२८॥

या स्थळी आमचा वास । नित्य राहील खास ।

यावे भेटण्यास । आषाढ -श्रावण मासी ॥२९॥

स्वामीरावाचे कुल रक्षावे । ग्रामस्थांसी अभय द्यावे ।

आपुल्या ब्रीदासी राखावे । अहर्निश ॥३०॥

तो सत्यभामा -स्वामीराव । जोडोन पाणी सद्‌भाव ।

जो सज्जनांचा स्वभाव । उद्गारिले ॥३१॥

" स्वामी ऐसा प्रसाद द्यावा । जेणे घडेल नित्य सेवा ।

माझ्या कुळीचा ठेवा । होऊन जावा ॥३२॥

नम्रभावे स्वामी वदले । "सिद्धराज किंकर मी ।

निश्कांचन , अकिंचन मी । काय देऊ प्रसादा ? ॥३३॥

‘ मागे प्रभू श्रीरामाने । पादुका दिल्या प्रेमाने ।

भरते पूजिल्या आस्थेने । नंदिग्रामी ॥३४॥

मग पायी खडावा । दिल्या त्यांनी स्वामीरावा ।

माझ्या कुळीचा ठेवा । झाला निरंतर ॥३५॥

तव प्रातःकाल पातला । भक्तसमुदाव जमला ।

भाविकांचा गळा दाटला । स्फुंदति जन ॥३६॥

नक्षत्रस्वामी निघे आता । सवे गायवासरू आणि माता ।

स्थिर करोनिया चित्ता । कैवल्यधामा ॥३७॥

वाद्यांचा कल्लोळ उडाला । हरिनामाचा गजर झाला ।

समुदाव अवघा निघाला । राऊळाकडे ॥३८॥

राऊळाचे उत्तरद्वारी । समुदाय जमला भारी ।

म्हणे कोपला श्रीहरि । आदिसिद्ध ॥३९॥

भीति , दुःख , उत्सुकता । ग्रामस्थांचे ग्रासे चित्ता ।

सत्पुरूषाची मूर्ति आता । दिसणार नाही ॥४०॥

चंचल वायू अचल झाला । जीवमात्र स्तब्ध झाला ।

क्षण ऐसा पातला । समाधीचा ॥४१॥

होता गमस्थीचा अस्त । चित्तवृत्ति होती सुस्त ।

अघाचलांची चाले गस्त । अनिर्बंदह ॥४२॥

आकाशी मेघ दाटले । वृष्टि करावया आले ।

देवलोकी सिद्ध झाले । स्वागता सुरगन ॥४३॥

तासे , मर्फे आणि कणे । ढोल , पखवाज , शहाजणे ।

नगारा , भेरी दशगुणे । शब्द करति ॥४४॥

स्वामी , माता , गायवासरू । सुजन ग्रामस्थांचा दळभारू ।

सुशब्दे अळवती हरिहरू । देवालयी पातला ॥४५॥

सिधराज भक्तांचा कैवारी । जागृत अखंड गाभारी ।

स्वामी त्यासी नमस्कारी । मातेसह ॥४६॥

म्हणे , ‘इहलोकी रक्षिले । तैसेच पाहिजे केले ।

परलोकी रक्षण , कृपाबले । आमचे देवा ॥४७॥

आता इच्छितो मुक्ति । स्वरूपतेची द्यावी गति ।

मातेची अनन्य भक्ति । वरद व्हावी , ॥४८॥

पुनरूपि साष्टांग वंदिला । तो गाभारी प्रकाश दाटला ।

प्रकाशरूपे पातला । श्रीसिद्धराज ॥४९॥

बालयोगी आणि माता । यांच्या धरोनिया हाता ।

प्रकाशरूपे निघे त्राता । समाधीस्थली ॥५०॥

बाहेर गाय वत्सा चाटे । भरली कास पान्हा फुटे ।

नेत्री अश्रुंचा पूर दाटे । ते मातृहृदय ॥५१॥

ऐसे दृष्य अवलोकून । समुदाय गेला हेलावून ।

हृदये आली गलबलून । कैसे वर्णू ? ॥५२॥

समाधीस्थानी मोठे विवर । सुगंधी द्रव्यांनी अपार ।

नाना फुलांनी सुंदर । सजविलेले ॥५३॥

समयांचा प्रकाश मंद । कापूर अर्गजाचा गंध ।

ऐसे सारे झाले धुंद । वातावरण ॥५४॥

दिनमणीचा उदय झाला । आणि योगी निघाला ।

हाती घेउनि ग्रंथ भला । शिवलेलामृत ॥५५॥

मातेसवे ब्रम्हचारी । उभे राहिले विवरद्वारी ।

ग्रामस्थांना नमस्कारी । अनन्यभावे ॥५६॥

आली वत्सा सह धेनू । योगीराजाची कामधेनू ।

गळा घंटिका रुणझुणू । वाजतसे ॥५७॥

पुढे नक्षत्रस्वामी , माता । मागे वत्स , धेनू जाता ।

निघे श्रीसिद्धराज त्राता । प्रकाशरूपे ॥५८॥

बसले सिद्धासन घालून । दृष्टि नासिकाग्र करून ।

ब्रम्हरंध्री प्राण शोषून । योगिराज ॥५९॥

सन्मुख बसली माता , गाय । वत्स बसले दुमडे पाय ।

भ्रांतिपलिकडे जाय । कुटूंब सारे ॥६०॥

विवरापासोन प्रकाश निघाला । गाभारी जाऊन निमाला ।

स्वस्वरूपी सामावला । नक्षत्रस्रामी ॥६१॥

मग विवरमुखी चिरे ठेवले । जडहृदये लोक भले ।

वियोगदुःखे व्याकूळलेले । परतले सावकाश ॥६२॥

श्रीनक्षत्रस्वामींचे चरित्र अद्‌भूत । मने सज्जनांची होती शांत ।

भक्त आनंदाने परिसोत । सप्तमोध्याय हा ॥६३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP