जानेवारी २४ - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.


नामाचे साधन कसे करावे? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल; त्याप्रमाणे, केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी, जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात; त्यांतले एक स्थिर राहून दुसर फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते; पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन, अशी दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे, आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरुपी खुंटा देहरुपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो, आणि मनरुपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा, आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे, याहून नामाचे साधन दुसरे काय ! हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दु:ख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही. विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले, तरी कधी समाधान होणार नाही.

नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुध्द वर्तन, शुध्द अंत:करण, आणि भगवंताचे स्मरण, इतक्या गोष्टी असतीलच तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल; आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा. ‘ घरी पोहोचल्यावर पत्र लिहा ’ असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. ‘ भगवंता, मी तुझा आहे ’ असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल; आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके ‘ मी ’ पणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल.

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP