जानेवारी १२ - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


‘ राम राम ’ म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की, ‘ राम राम ’ म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही. व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे. समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो, आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का? उलट, त्या गावातली माहिती काही नाही पण नाव ठाऊक आहे, तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल. म्हणजे, ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही; म्हणून नाम घेणेच जरुर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी.

भगवंताच्या नामाची गरज दोन तर्‍हेने आहे; एक, प्रपंचाचे स्वरुप कळण्यासाठी, आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला-प्यायला पोटभर, बायकोमुले, घरदार, वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुध्दा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ, दु:खाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे; नंतर, भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे; आणि शेवटी, भगवंताच्या दर्शनानंतर नाम संवयीने आपोआप येते. एकूण, आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना, जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवा.

भगवंताचे नाम हीच सच्चिदानंदस्वरुप सदवस्तू होय. भगवंताच्या नामात जो स्वत:ला विसरला तो खरा जीवन्मुक्त होय. जे काय साधायचे ते हेच. बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचीतीस येतात पण नसतात. देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेले आहे. याच्या उलट अभ्यास करुन भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल.

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP