पञ्चकोशविवेक - श्लोक २१ ते ४३

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


गू०- असे या जगामध्ये ज्या ज्या पदार्थाचे ज्ञान होतें, त्या त्या पदार्थाची उपेक्षा करुन बाकी राहिलेलें जे केवळ ज्ञान तेंच ब्रह्म व असे जें पक्कें समजणें त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ॥२१॥

शि०- जर घटादिविषयांची उपेक्षा करुन ब्रह्मनिश्चय करतां येतो, तर पंचकोशिविवेक जो तुम्हीं सांगितला त्याचा उपयोग काय ? गू०- त्याचा उपयोग फार आहे; नाहीं कसा, ब्रह्मच्या प्रत्यग्रुपाच्या ज्ञानावाचून संसार निवृत्ति होत नाहीं. व तसें ज्ञान पंचकोशांच्या विवेकावांचून होत नाहीं याकरतां तो विवेक अवश्य आहे, अन्नमर्यादि पंचकोशांचा बुद्धिने त्याग करुन बाकी राहिलेला जो त्याचा साक्षी, तोच स्वरुप ब्रह्म आहे, तो जरी दिसत नाहीं तरी त्यांचें अस्तित्व नाहींसे करता येत नाही. म्हणून त्याला कोणच्याही रीतीनें शुन्यत्य संभवत नाहीं, ॥२२॥

कारण स्वयं म्हणून कोणी तरी एक असलाच पाहिजे, त्याच्या अस्तित्वाविषयीच जर विवाद असेल तर तेथें प्रतिवादी कोणी व्हावें. ॥२३॥

शि०- आपलें नास्तित्व प्रतिपादन करणाराच येथें प्रतिवादी कोणीं व्हावें. गू०- आपण नाहीं, असे भ्रातिष्टावांचून कोणीही कबूल करणार नाही, म्हणूनच श्रुतीनें ही असत्ववाद्यांचा निषेध केला. ॥२४॥

शि०- ती श्रुति कोणती ? गू०- त्याश्रुतीचा अर्थ असा की , "ब्रह्म नाहीं म्हणणारा आपणच नाही. असे म्हणतो असें होतें कारण आपलें स्वरुप ब्रह्मच आहे" याकरिता साक्षीला जरी वेद्यत्व नसलें, तरी त्याचें अस्तित्व म्हणून कबूल केलेंच पाहिजे. ॥२५॥

शि०- मग तर आत्मा कसा आहे तो कृपा करुन सांगा. गू०- आत्मा अमुकच प्रकारचा आहे. असें सांगतां च येत नाहीं. "जो असाही नव्हे व तसाही नव्हे तोच तुझा आत्मा." कारण जो पदार्थ ज्ञानाला विषय आहे तोच पदार्थ असा किंवा तसा आहे असें सांगता येईल. परंतु आत्मा हा ज्ञानाला विषय मुळींच नाहीं तेव्हा तो असा किंवा तसा हें कसें सांगावें. ॥२६॥

शि०- आपल्या बोलण्याचा अभिप्राय नीट समजला नाहीं. तो स्पष्ट करुन सांगा. गू०- घटादिक जे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे पदार्थ त्यांस आह्मी तशा प्रकारचे असें म्हणतो. व जें इंद्रियांत असणारे पदार्थ त्यास आम्ही तशा प्रकारचे असें म्हणतों, व जें इंद्रियांआड असणारे पदार्थ त्यांस आम्ही तशा प्रकारचे असें म्हणतो. आतां आत्मा इंद्रियांस विषयच नाहीं म्हणून तो असा ( ईदृश ) असे म्हणतां येत नाही. ॥२७॥

या कारणास्तव आत्मा ज्ञानाला विषय नसून प्रत्यक्ष आहें म्हनुनच तो स्वप्रकाश आहे, व " सत्यं ज्ञानमनंतं " या श्रुतीनें जें ब्रह्मंचे लक्षण सांगितलें तें आत्म्यालाही लागू पडतें कारण आत्माही सत्यरुप ज्ञानरुप आणि अनंत आहे असें विचाराअंती सिद्ध होतें. ॥२८॥

शि०- तें कसें ? गू०- ज्याला बाध नाहीं तेंच सत्य आत्मा सर्व जगाच्या आभावाचा साक्षी आहे. त्याच्या अभावाला पाहणारा कोणीच नाहीं, व पाहाणारा वांचून तदभावास्विकारणे बरोबर नाहीं, म्हणून आस्मवस्तुचा अभाव कधीहीं होत नाही असे म्हटलें पाहिजे. सर्व जगाच्या अभावाचा अनुभव निद्रा मुर्च्छा व समाधी या अवस्थेमध्यें सर्वांस आहेच. तसा साक्षीच्या अभावाचा अनुभव घेणारा कोणीही नाही, म्हणून आत्मा हा सत्य आहे हें सिद्ध झालें ॥२९॥

यास दृष्टांत "घरातील सर्व मूर्त पदार्थ काढून टाकले असतां जसें बाकी अमूर्त आकाश रहातें. त्याप्रमाणें आपणाव्यतिरिक्त जितकें म्हणून देहेंद्रियादिक मूर्तामुर्त पदार्थ काढून टाकले असतां. जसें बाकी अमूर्त आकाश राहतें त्याप्रमाणें आपणाव्यतिरिक्त जितके म्हणून देहेंद्रियादिक मूर्तामुर्त पदार्थ आहेत, त्यांचे "नेतिनति" याश्रुतिने निराकार करुन बाकी जो बोधरुप साक्षी राहतो, तोच बाधरहित सत्य आत्मा होय ॥३०॥

शि०- प्रतीतीस येणार्‍या सर्व पदार्थाचा निषेध केला असतां बाकी कांहींच राहत नाही. मग बाकी जो राहतो तो आत्मा असें जें आपण म्हटलें, त्याचा अर्थ काय ? गू०- जें बाकी कांहीं राहत नाहीं म्हणतोस तेंच आमचें ब्रह्म, कांहीं नाहीं म्हणणें व कांहीं आहे म्हणणें. ह्मत भाषेचा मात्र भेद आहे. येर्‍हवी वास्तविक पाहिलें असतां बाधरहित साक्षिचैतन्य आहेच आहे. ॥३१॥

श्रुतीमध्येही असेच सांगितलें आहे. नेतिनेति याश्रुतीचा अर्थ असा आहे कीं जे जे पदार्थ बुद्धयादिकांस गोचर म्हणून आहेत, ते ते जड असे समजून त्यांचे निराकारण करुन बाकी राहिलेलें साक्षिचैतन्य जें निराकारण करण्यास अशक्य तेंच ब्रह्म होय ॥३२॥

शि०- नेतिनेति श्रुतीने बाधित होणारा पदार्थ कोणता व बाधित न होणारा पदार्थ कोणता ? गू०- जितके म्हणून हें हें अशा दर्शन नामास गोचर होणारे पदार्थ आहेत. त्यांचा निषेध करणे शक्य आहे. आणि जी वस्तु ही अमुकच अशा रीतीने दाखवितां येत नाहीं तिचा निषेध करणे अशक्य आहे. अशी वस्तु सर्वांचा साक्षीं जो बाधवर्जित आत्मा तो एकच आहे. ॥३३॥

याप्रमाणे ब्रह्मच्या लक्षणांत जें सत्यत्व सांगितलें, आत्मा कसे लागू पडतें तें येथे सिद्ध करुन दाखविलें. आत्म्याची ज्ञानरुपता तर "स्वयमेवानुभूतित्वात" इत्यादी श्व्लोकांतील वाक्यांनी पुर्वीच सिद्ध केली आहे. शि० सत्य आणि ज्ञान ही दोन लक्षणें आत्म्याच्याठायीं सिद्ध करुन दाखविलीं खरी, परंतु अनंत हें लक्षण आत्म्यास लागू पडेल कीं नाहीं, याचाच मला मुळीं संशय आहे. ॥३४॥

गू०- तें कसें लागू पडत नाहीं ? अरे ब्रह्म सर्वव्यापी असें श्रुतीत सांगितलें आहे. यावरुन अर्थातच त्याला देशपरिच्छेद नाहीं; ब्रह्म नित्य असे सांगितलें आहे म्हणून त्यास कालपरिच्छेद नाहीं; आणि ब्रह्म सर्व जगाचा आत्मा असें सागितले आहे. म्हणून त्यास वस्तुपरिच्छेदहा नाहीं, त्याप्रमाणे देशतः कालतः व वस्तुतः ब्रह्मस अंत नाहीं असे झालें. ॥३५॥

शि०- देश काल आणि वस्तु ही तिन्हीं प्रत्यक्ष असून त्याचा परिच्छेद ब्रह्मस नाहीं असे कसें म्हणतां. ? गूं - असेनांत बापडीं ती असलींतरी मायाकल्पित मिथ्या असल्यामुळे त्यांपासून ब्रह्मच्या अनंतपणास मुळीच हानी नाही, म्हणून ब्रह्म अनंत आहे असें जें म्हटले अगदी योग्य आहे. ॥३६॥

शि०- अहो ब्रह्मला जड जगताचा परिच्छेद नाहीं असे म्हटलें, तरी चेतनरुप जे जीव आणि ईश्वर त्यांचा तरी परिच्छेद असलाच पाहिजे. मग ब्रह्म अनंत आहे, हें म्हणणें कसें संभवले गू०- जें सत्यादि लक्षणांनीं युक्त असें ब्रह्म सांगितलें तेवढे मात्र सत्य आहे. त्याजवर ईश्वरत्व आणि जीवत्व ही दोन्हीं उपाधिकल्पित आहेत; म्हणून जडजगता प्रमाणें त्यांपासून ही ब्रह्मस परिच्छेद होत नाही;. ॥३७॥

शि०- त्या दोन्ही उपाधीची स्वरुपें कॄपा करुन सांगावीं. गू०- ष्टथिव्यादि सर्व वस्तुचें नियमन करणारी अशी कोनी एक ईश्वराची अनिर्वचनीच शक्ति आहे. शि०- तरमग तो कां दिसत नाहीं ? गू०- आनंदमयापासून सर्व ब्रह्मंडापर्यंत तो गूप्तरुपानें आहे म्हणून दिसत नाही. ॥३८॥

शि०- ती जर दिसत नाही तर ती आहे असें तरी कसें म्हणावे ? गू०- ती जर नसेल तर ष्टथिव्यादि तत्त्वाचें जे काठिन्यादि धर्म त्याची व्यवस्थाच लागणार नाहीं. इतकेच नव्हे तर त्या धर्मांचें परस्पर सांकर्य होऊन जगाची स्थितीच राहणार नाहीं. ॥३९॥

शि०-परंतु ती जड आहे असें तुम्हींच म्हणतां मग ती जगाचें नियमन तरी कसें करील. गू - ती जरी जड आहे तरी तिजमध्ये ब्रह्मंचे प्रतिबिंब पडल्यामुळे ती चेतनासारखी दिसते,म्हणून तिजमध्यें नियमन करण्याचें सामर्थ्यही संभवते, या शक्तिच्या उपाधीचा संयोग झाल्यामुळे ब्रह्मलाच ईश्वरपणा आला. ॥४०॥

आणि पूर्वी सांगितलेल्या कोशांच्या उपाधीमुळे ब्रह्मलाच जीवपणा आला. शि०- अहो पण एकाच ब्रह्मला जीवत्व आणि श्वरत्व हे विरुद्ध धर्म कसे आले. ? गू०- जसे एकच मनुष्य पुत्राच्या विवक्षेनें पिता होतो. आणि नातवाच्या विवक्षेणें पितामह म्हणजे आजा होतो. त्याप्रमाणें एकच ब्रह्म कोशविवक्षेनें जीव होतें आणि मायेच्या विवक्षेनें ईश्वर होतें. ॥४१॥

परंतु पुत्र आणि नातु यांची विवक्षा न केली तर ईश्वरही नाहीं व आजाही नाहीं. त्याप्रमाणें माया व कोश यांची विवक्षा न केली तर ईश्वरही नाहीं व जीवही नाहीं. ॥४२॥

या रीतीनें जो ब्रह्म जाणतो तो स्वतः ब्रह्मच होतो. आतां ज्या अर्थी ब्रह्मला जन्म नाहीं. त्या अर्थी त्यालाही पुनर्जन्म नाहीं हें सिद्ध झालें. ॥४३॥

इति पंचकोशविवेक समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP