पञ्चमहाभूतविवेक - श्लोक १ ते २०


'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


जग उत्पन्न होण्याच्या पूर्वी जगास कारणीभूत जें सद्रूप अद्वितीय ब्रह्म श्रुतींत सांगितलें आहे, ते स्वतः वाणीस व मनास अगोचर असल्यामुळें त्याचा साक्षात् बोध होणें अशक्य आहे; याकरितां त्यास उपाधिभूत जीं पंचभूतें त्यांचें विवेचन केलें असतां अधिष्ठानाचा बोध चांगला होईल म्हणून आम्ही पंचभूताचें येथें विवेचन करुन दाखवितों ॥१॥
शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध हे पंचभूतांचे गुण आहेत. यांचा क्रम असा कीं, आकाशाचा गुण केवळ शब्दमात्र वायूचे शब्द आणि स्पर्शः अग्नीचे शब्द, स्पर्श आणि रुप; आपाचे शब्द, स्पर्श, रुप आणि रस; आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध, याप्रमाणें समजावे. ॥२॥
आकाशाचा जो गुण शब्द म्हणून सांगितला तो प्रतिध्वनिरुप समजावा. वायुमधील शब्द सों सों सों असा जो होतो तो समजावा, त्याचा स्पर्श अनुष्ण आणि अशीत असतो. वन्हिचेठायीं भुक भुक असा होणारा ध्वनि, ॥३॥
ऊष्णस्पर्श आणि प्रभा रुप. जलाचे ठायीं बुल बुल ध्वनि; - शीतस्पर्श, शुक्लरुप, आणि माधुर्य रस. ॥४॥
भूमीचे ठायीं कडकडा शब्द; कठीण स्पर्श; निळें हिरवें इत्यादि रुप, मधुर आम्लादिक रस; आणि ॥५॥
चांगला आणि वाईट असे दोन गंध. याप्रमाणें आकाशापासून पृथ्वीपर्यत त्या त्या भूतांचे गुण समजावे. आतां या पंचभूतांची कार्ये सांगतों. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण हीं पांच ज्ञानेंद्रियें होत. ॥६॥
या इंद्रियांची स्थानें कर्णादिक छिद्रें होत; शब्दस्पर्शादिक जे वर सांगितलेले पंचभूतांचे गुण ते या श्रोत्रादिक इंद्रियाचे क्रमेंकरुन विषय होत. ही इंद्रियें अतिशय सूक्ष्म असल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचें अनुमान कार्यावरुन करावयाचें. हीं बहुतकरुन बहिर्मुख आहेत. ॥७॥
केव्हां केव्हां या इंद्रियांस शरीराच्या आंतील विषयही गोचर होतात. कान झांकलें असतां प्राणवायु आणि जठराग्रीतील होणारा शब्द ऐकूं येतो. जलपान व अन्न भक्षण करतांना शरीराच्या आंतील स्पर्श अनुभवास येतात. ॥८॥
डोळे झांकले असतां आंतील अंधकार दृष्टीस पडतो. आणि ढेंकर दिला असतां रस आणि गंध या दोन्ही विषयांचा अनुभव येतो. ॥९॥
हें ज्ञानेंद्रियांचें विवेचन झालें. आतां कर्मोद्रियें सांगतों. बोलणें, देणें - घेणें, चालणें, विसर्जन करणें आणि आनंद या पांच कर्मोद्रियांच्या क्रिया आहेत. कृषि, वाणिज्य, सेवा इत्यादि कर्माचा अंतर्भाव या पांच क्रियांतच होतो. ॥१०॥
या क्रिया वाचा, पाद, पाणी, वायु, आणि उपस्थ या पांच इंद्रियांपासून क्रमेंकरुन उत्पन्न होतात. मुख, कर, चरण, गुद, शिश्न, ही वागादि कर्मेंद्रियांचीं क्रमेंकरुन स्थानें होत. ॥११॥
मन हें या दहा इंद्रियांचा राजा आहे. हें हदय कमलांत वास करितें. यासच अंतः करण असें म्हणतात. कारण इंद्रियांचा साह्यावांचून बाह्य विषयावर याला स्वतंत्रतेनें जाता येत नाही. ॥१२॥
इंद्रियें विषयावर गेली असतां हें मन गुणदोषाचा विचार करितें. सत्व, रज आणि तम असे मनाचे तीन गुण आहेत. त्यांच्या योगानें हें वारंवार विकार पावतें. ॥१३॥
वैराग्य, ( विषय नकोतसे होणें ) क्षमा, औदार्य इत्यादि प्रकार सत्वगुणाचे आहेत. काम, क्रोध, लोभ, यत्न इत्यादि प्रकार रजोगुणाचे आहेत. ॥१४॥
आळस, भ्रांती, तंद्रा इत्यादि विकार तमोगुणाचे आहेत. सात्विक मनोविकारापासून पुण्यनिष्पत्ति होते, राजसापासून पापनिष्पत्ति होते. ॥१५॥
तामसापासून कांहींच न होतां व्यर्थ आयुष्याचा क्षय मात्र होतो. येथें मी मी म्हणणारा कर्ता असें समजावे. ॥१६॥
प्रत्यक्ष अनुभवास येणार्‍या शब्दस्पर्शादिक गुणांनीं युक्त असे घटादि पदार्थ पंचभूतांचें बनलेले आहेत, हें उघड आहे. परंतु इंद्रियें देखिल पंचभूतांचींच बनलीं आहेत असें कशावरुन समजावें ? अशी शंका कोणी घेऊं नये. " अन्नमयं हि सोम्यमनः, " " आपोमयः प्राणः " इत्यादि श्रुतिप्रमाणांवरुन व अनुमानावरुन त्याचें भौतिकत्व सिद्ध होतें. ॥१७॥
अकरा इंद्रियांसहित शास्त्र व युक्तीवरुन जेवढें म्हणून जग नजरेस येतें त्याचा बोध " सदेव सोम्येदमग्र आसीत् " या श्रुतीतील ‘ इदं ’ पदानें केला जातो. ॥१८॥
वरील श्रुतीचा अभिप्राय असा कीं, हें सर्व जग सृष्टीपूर्वी कांहीं नसून एकच अद्वितीय सद्रूप होतें; तेव्हां नामरुपें मुळींच नव्हती. असें अरुणाचा पुत्र उद्दालक याचें वचन आहे. " एकम्, एव, अद्वितीयं, " या तीन पदांनीं ब्रह्माचेठायीं येऊं पाहणार्‍या भेदत्रयाचें निरसन केलें. ते भेद स्वगत, खजातीय आणि विजातीय असे तीन प्रकारचे आहेत. यास उदाहरणार्थ एक वृक्ष घेऊन त्यांत हे तीन भेद कसे होतात तें आम्ही दाखवितों. ॥१९॥
वृक्षाची पानें व पुष्पे यांपासून होणारा जो भेद तो स्वगत भेद होय; दोन निरनिराळ्या वृक्षांमधील जो भेद तो सजातीय; आणि दगड, माती आणि वृक्ष यांमधील जो भेद तो विजातीय समजावा. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP