अध्याय चवथा - श्लोक १ से ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

चतुर श्रोते करिती प्रश्र्न ॥ तृतीयाध्यायीं हनुमंतजनन ॥ सांगितलें तुवां संपूर्ण ॥ कथा अद्भुत नवलचि ॥१॥

आणिके पुराणीं साचार ॥ हनुमंतजन्मकथाप्रकार ॥ वेगळाचि असे विचार ॥ पृथक् कथियेला ॥२॥

तरी पुराणांतरी विपरीत ॥ कथा पडावया काय निमित्त ॥ याचें प्रत्युत्तर यथार्थ ॥ सांग समस्तां कळावया ॥३॥

ऐसें श्रोतयांचें वाग्जाळ ॥ परिसोनियां कवि कुशळ ॥ शब्द बोले अति रसाळ ॥ परिसा सकळ श्रोते हो ॥४॥

अनादिसिद्ध अवतारमाळा ॥ जगदीशें गुंफिल्या अवलीळा ॥ जैसें तरंगापूर्वीं जळा ॥ व्यापोनियां असणें कीं ॥५॥

जैशी रहाटघटमाळिका ॥ तेंविं हें अवतारचरित्र देखा ॥ कीं भगणें मित्र मृगांका ॥ प्रदक्षिणा करणें मेरूची ॥६॥

कीं जपमाळेचे मणी ॥ तेचि येती परतोनि ॥ तैसे अवतार ब्रह्मांडभुवनीं ॥ फिरती माळेसारिखे ॥७॥

तरी कल्पपरत्वें अवतार ॥ जे जे वेळे जें जें चरित्र ॥ तैसेंचि बोलिला सत्यवतीकुमर ॥ कथा साचार तितुक्याही ॥८॥

एके अवतारीं वर्तलें एक ॥ तों दुसरे अवतारीं विशेष कौतुक ॥ तरी तितुकेंही सत्य देख ॥ विपरीतार्थ न मानिजे ॥९॥

रणामाजी एकांग वीर ॥ तैसा जाणिजे कवीश्र्वर ॥ बहुत श्रोतयांचे भार ॥ परम चतुरसागर जे ॥१०॥

सभानायक प्रवीण अत्यंत ॥ करीं संदेहधनुष्य घेत ॥ प्रश्र्नावर शर सोडित ॥ आशंकासमय लक्षोनियां ॥११॥

मग कवीनें धैर्यठान मांडून ॥ चढविलें स्फूर्तीचें शरासन ॥ शास्त्रसंमताचे बाण ॥ सोडी अभंग अनिवार ॥१२॥

सत्त्व ओढी काढूनि सत्वर ॥ क्षमावेशें सोडी शर ॥ परम कौशल्यें साचार ॥ प्रश्र्नबाण छेदित ॥१३॥

श्रोत्यावक्त्यांचें संधान ॥ तटस्थ पाहती विचक्षण ॥ धन्य धन्य रे म्हणोन ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥१४॥

आवेशा चढले दोघेजण ॥ सप्रेम करित नामस्मरण ॥ तो घनघोष ऐकून ॥ आशंकाश्र्वापदें दूर पळती ॥१५॥

वक्त्यांचे वाग्बाण अत्यंत ॥ अर्थगौरवमुख लखलखित ॥ पद्यरचना पक्षमंडित ॥ सुरंग मिरवत साहित्य ॥१६॥

ऐसे शर सुटतां अपार ॥ भेदलें श्रोतयांचें अंतर ॥ डोलविलें तेणें शिर ॥ सुखोर्मीचेनिभरें पैं ॥१७॥

वैरभाव नसतां किंचित ॥ हें आनंदाचें युद्ध होत ॥ क्षीराब्धीच्या लहरी मिळत ॥ जैशा एकमेकांसी ॥१८॥

निष्कपट श्रोता पुसत ॥ निरभिमान वक्ता बोलत ॥ शब्दकौशल्य युद्ध सत्य ॥ जाणती पंडित विवेकी ॥१९॥

देवभक्तांचा अनुवाद ॥ तेथें काय आहे वैरसंबंध ॥ कीं गुरुशिष्यांचा संवाद ॥ आनंदयुक्त शब्दांचा ॥२०॥

असोत ह्या बहुत युक्ती ॥ चातुर्यसिंधुमंथनपद्धती ॥ वर्म जाणिजे पंडितीं ॥ चातुर्यरीती कळा ज्या ॥२१॥

कवीची घडामोडी बहूत ॥ युक्तिसागरींचीं रत्नें काढित ॥ एक गव्हांचे प्रकार बहुत ॥ करी जैसी सुगरिणी ॥२२॥

एके मृत्तिकेचे घट अपार ॥ एका तंतूचे पट विचित्र ॥ एक हेम बहुत अलंकार ॥ हाटकघडणार करी जैसा ॥२३॥

एके काष्ठीं शिल्पकार ॥ युक्ति दाखवी अपार ॥ जैसा जो कवि चतुर ॥ शब्दसाहित्य विवरी पैं ॥२४॥

असो हें चातुर्यं कारणें ॥ बोलावें लागलें श्रोतियांकारणें ॥ पुढें रघुनाथकथा परिसणें ॥ श्रीधर चतुरां विनवीतसे ॥२५॥

मागील कथानुसंधान ॥ तृतीयाध्यायीं निरूपण ॥ सांगितलें हनुमंतजन्मकथन ॥ मूळग्रंथआधारें ॥२६॥

सिंहावलोकनें तत्वतां ॥ श्रोतीं परिसिजे मागील कथा ॥ तिघी राण्या जाहल्या गर्भस्था ॥ कौसल्या सुमित्रा कैकयी ॥२७॥

जैसा शुद्ध बिजेचा मृगांक ॥ दिवसेंदिवस कळा अधिक ॥ कीं पळोपळीं चढे अर्क ॥ उदयाद्रीहूनि पश्र्चिमे ॥२८॥

कीं करितां संतसमागम ॥ दिवसेंदिवस वाढे प्रेम ॥ कीं औदार्येंकरूनि परम ॥ किर्ति वाढे सत्वर ॥२९॥

तैसे राणियांचे गर्भ वाढती ॥ तों वसिष्ठ बोले दशरथाप्रति ॥ राया धर्मशास्त्रीं ऐशी रीति ॥ डोहळे स्त्रियांसी पुसावे ॥३०॥

ऐसें बोलतां ब्रह्मऋृषि ॥ हर्ष वाटला रायासी ॥ नमोनि वसिष्ठचरणांसी ॥ राजेंद्र तेव्हां चालिला ॥३१॥

जैसा शचीचिया मंदिरांत ॥ वृत्रासुरशत्रु प्रवेशत ॥ तैसाचि अजपाळसुत ॥ कैकयीसदनीं प्रवेशे ॥३२॥

पिंडप्राशनाचे काळीं ॥ कैकयी होती रुसली ॥ म्हणोनि राजेंद्र ते वेळीं ॥ तिचे सदनीं प्रवेशला ॥३३॥

दूती जाणविती स्वामिनीतें ॥ डोहळे पुसावया तुम्हांतें ॥ नृपती स्वयें येतसे येथें ॥ सुमुहूर्त पाहोनियां ॥३४॥

सुंदरपणाचा अभिमान ॥ त्याहीवरी कैकयी गर्भिण ॥ जैसी अल्पविद्या गर्व पूर्ण ॥ तैसें येथें जाहलें ॥३५॥

जैसी गारुडीयांची विद्या किंचित ॥ परी ब्रीद्रें बांधिती बहुत ॥ कीं निर्नासिक वाहत ॥ रूपाभिमान विशेष पैं ॥३६॥

बिंदुमात्र विष वृश्र्चिका ॥ परी पुच्छाग्र सदा वरुतें देखा ॥ किंचित ज्ञान होतां महामूर्खा ॥ मग तो न गणी वाचस्पतीतें ॥३७॥

खडाणे धेनूसी दुग्ध किंचित ॥ परी लत्ताप्रहार दे बहुत ॥ अल्पोदकें घट उचंबळत ॥ अंग भिजत वाहकाचें ॥३८॥

तैसें कैकयीस जाहलें तये वेळीं ॥ प्रीतीनें दशरथ आला जवळी ॥ आपण सेजेवरी निजली ॥ नाहीं धरिली मर्यादा ॥३९॥

स्त्री सेवक अपत्य दासी ॥ श्र्वान मर्कट कूरूपियासी ॥ मर्यादा तुटतां मग सकळांसी ॥ ते अनिवार जाणिजे ॥४०॥

म्हणोनि मर्यादा कांहीं तेथ ॥ कैकयी न धरी देखतां दशरथ ॥ तिसी डोहळे पुसे नृपनाथ ॥ उभा समीप राहोनि ॥४१॥

म्हणे कैकयी बोले वचन ॥ तुज जें आवडे मनांतून ॥ तें मी समस्त पुरवीन ॥ सत्य जाण प्रियकरे ॥४२॥

मग काय बोले ते वेळे ॥ तुम्ही काय पुरवाल डोहळे ॥ माझे मनींचे सोहळे ॥ पूर्णकर्ता दिसेना ॥४३॥

मग बोले अजनंदन ॥ तुजकारणें वेंचीन प्राण ॥ परी तुझे डोहळे पुरवीन ॥ सत्य जाण सुकुमारे ॥४४॥

मग ती म्हणे जी नृपवरा ॥ डोहळे हेचि माझे अवधारा ॥ कौसल्या सुमित्रेचिया कुमरां ॥ दिगंतरा दवडावें ॥४५॥

पाठवावे दूर कानना ॥ त्यांचा समाचार पुनः कळेना ॥ आमचें वर्तमान त्यांचिया कर्णा ॥ सहसाहि न जावें ॥४६॥

राज्य द्यावें माझियां पुत्रा ॥ हेचि डोहळे होती राजेंद्रा ॥ तुम्ही म्हणाल अधर्म खरा ॥ तरी तो दोष मजवरी घालिजे ॥४७॥

मज निंदतील सकळ लोक ॥ तों तों वाटेल परम सुख ॥ समस्त जनां व्हावें दुःख ॥ हेंचि मजला आवडे ॥४८॥

ऐसें कैकयी वदे ते अवसरीं ॥ ऐकतां नृप खोंचला अंतरीं ॥ कीं काळिजी घातली सुरी ॥ कीं अंगावरी चपळा पडे ॥४९॥

वचन नव्हे तें केवळ ॥ दुःखवल्लीचें श्रेष्ठ फळ ॥ कीं संचरलें हाळाहाळ ॥ हृदयीं वाटे दशरथा ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP