अध्याय दुसरा - श्लोक ५१ से १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


निद्रा मरणाची सांगातिणी ॥ निद्रा रात्रीची ज्येष्ठ भगिनी ॥ निद्रा जीवाची विश्रांतिकारिणी ॥ आयुष्य हरोनी नेतसे ॥५१॥

स्थूळ सूक्ष्म कारणें पाहीं ॥ बुडोन जाती सुषुप्तीडोहीं ॥ असो कुंभकर्णास शुद्धि नाहीं ॥ जागा कदा नोहेचि ॥५२॥

कुंभरकर्ण निद्रासागरीं ॥ बुडोन गेला अहोरात्रीं ॥ पिता देखोन चिंता करी ॥ म्हणे व्यर्थ जन्म याचा ॥५३॥

मग तेणें प्रार्थिला कमळासन ॥ मागतसे हें वरदान ॥ षण्मास जाहलिया एक दिन ॥ सर्व सुखभोग यातें असो ॥५४॥

मग बिभीषणासी चतुर्वक्र ॥ म्हणे माग इच्छित वर ॥ तंव तो सत्त्वशीळ पवित्र ॥ काय बोलतां जाहला ॥५५॥

म्हणे सत्समागम सच्छास्त्रश्रवण ॥ दया क्षमा उपरति भजन ॥ निंदा वाद द्वेष गाळून ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५६॥

आशा तृष्णा मनसा कल्पना ॥ भ्रांति भुली इच्छा वासना ॥ ममता अअविद्या सांडूनि जाणा ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५७॥

काम क्रोध मद मत्सर ॥ मोह लोभ अहंकार ॥ हे दूर करोनि साचार ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५८॥

धन्य बिभीषणाची स्थिती ॥ केवळ ओतिली सुखाची मूर्ती ॥ कीं भक्तिरूप श्रीरामकीर्ती ॥ विस्तारिली आधीं पुढें ॥५९॥

सूर्याआधीं उगवे अरुण ॥ कीं ज्ञानाअगोदर भजन ॥ कीं भजनाआधीं वैराग्य पूर्ण ॥ तैसा बिभीषण जन्मला ॥६०॥

तपाअगोदर शुचित्व पूर्ण ॥ कीं बोधाआधीं सत्त्वगुण ॥ कीं सत्त्वाआधीं अद्भुत पूर्ण ॥ पुण्य जैसें प्रगटतें ॥६१॥

कीं साक्षात्काराआधीं निजध्यास ॥ मननाआधीं श्रवण विशेष ॥ कीं श्रवणाआधीं सुरस ॥ आवडी पुढें ठसावे ॥६२॥

कीं शमदमाआधीं विरक्ती ॥ कीं आनंदाआधीं उपरती ॥ कीं आत्मसुखाआधीं शांती ॥ पुढें येऊन ठसावे ॥६३॥

तैसा आधीं जन्मला बिभीषण ॥ जैसें फळा अगोदर सुमन ॥ विधी संतोषला ऐकोन ॥ म्हणे वंश धन्य याचेनि ॥६४॥

रामउपासक जे संत ॥ तयांचीं लक्षणें हींच निश्र्चित ॥ अमानित्व अदंभित्व ॥ अहिंसादि सर्व गुण जेथें ॥६५॥

अंतरीं निग्रह करून ॥ शांतिरसें भरले पूर्ण ॥ आत्मस्तुति मनांतून ॥ स्वप्नीं जयांसी नावडे ॥६६॥

दुज याचे दोषगुणरीती ॥ हें कधीं नावडे जयांचे चित्तीं ॥ पराचे उत्तम गुण वनिती ॥ न विसरती कदाही ॥६७॥

गर्व नेणती अणुमात्र ॥ कोणसी न बोलती निष्ठुर ॥ आपुली निंदा ऐकतां साचार ॥ तिरस्कार नुपजेचि ॥६८॥

जैसे मेघ क्षारजळ प्राशिती ॥ परी पृथ्वीवरी गोड वर्षती ॥ धेनु तृण भक्षोनि देती ॥ क्षीर अमृतासारिखें ॥६९॥

इक्षुदंडासी घालिती खत ॥ तरी गोड होय रसभरित ॥ गंगा पाप जाळूनि पुण्य देत ॥ तैसे संत जाणावे ॥७०॥

परिस लोहकाळिमा झांकोन ॥ तत्काळचि करी सुवर्ण ॥ तैसेचि महाराज सज्जन ॥ परदोष लपविती ॥७१॥

जैसी कुळवंत कामिनी ॥ अवयव झांकी क्षणोक्षणीं ॥ तैसें आपुलें सुकृत झांकोनी ॥ सज्जन जन ठेविती ॥७२॥

असो सर्वलक्षणयुक्त ॥ बिभीषण परम भक्त ॥ तयासी विष्णुनाभ सत्य ॥ वर देता जाहला ॥७३॥

विरिंचि म्हणे साचार ॥ तुज भेटेल श्रीरघुवीर ॥ तो चिरंजीव करील निर्धार ॥ शशी-मित्र असती जों ॥७४॥

रावण कुंभकर्ण ते वेळे ॥ मेळवूनि राक्षसदळें ॥ प्रहस्त महोदर धांविन्नले ॥ प्रधान जाहले रावणाचे ॥७५॥

विद्युज्जिव्ह जंबुमाळी ॥ वज्रदंष्ट विरूपाक्ष बळी ॥ खर दूषण त्रिशिरा सकळी ॥ विद्युन्माली माल्यवंत ॥७६॥

मत्त महामत्त युद्धोन्मत्त ॥ शुक सारण दुर्धर समस्त ॥ बळ महाबळ धांवत ॥ रावणा वेष्टित सर्वही ॥७७॥

सकळ दळभार घेऊन ॥ लंकेवरी गेला रावण ॥ कदा नाटोपे वैश्रवण ॥ बहुदिन युद्ध करितां ॥७८॥

मग रावणें काय केलें ॥ पितयाचें पत्र आणिलें ॥ कुबेरासी पाठविलें ॥ येरें वंदिलें मस्तकीं ॥७९॥

उकलोनि वाची वैश्रवण ॥ आंत लिहिलें वर्तमान ॥ तुझा सापत्नबंधू रावण ॥ लंकाभुवन यास दीजे ॥८०॥

पितृआज्ञा ते वेदवचन ॥ मानोनि निघाला वैश्रवण ॥ सकळ संपत्ति पुष्पकीं घालोन ॥ विरिंचीपासीं गेला पै ॥८१॥

मग कनकाद्रीचे पाठारीं ॥ निर्मूनि अलकावती पुरी ॥ कुबेर तेथें ते अवसरीं ॥ विष्णुसुतें स्थापिला ॥८२॥

मयासुर मंदोदरी आणि शक्ती ॥ देता जाहला रावणाप्रती ॥ दीर्घज्वाळा बळीची पौत्री ॥ ते दीधली कुंभकर्णा ॥८३॥

सरमानामें गंधर्वकन्या ॥ ते दिधली बिभिषणा ॥ सकळ भूप शरण रावणा ॥ लंकेसी येती भेयेंचि ॥८४॥

रावणें सर्व देश जिंकिले ॥ गाईब्राह्मणांसी धरोनी बळें ॥ मुखीं घालोनियां सगळे ॥ दाढेखाली रगडित ॥८५॥

आकांतलें पृथ्वीचे जन ॥ कोठें लपावया नाहीं स्थान ॥ मग कुबेरें स्वर्गीहून ॥ सांगोनि पाठविलें रावणा ॥८६॥

कुबेरसेवक बोले वचन ॥ तुम्ही ऋषिपुत्र वेदसंपन्न ॥ टाकिली वेदांचीं खंडें करून ॥ शास्त्रज्ञान नसे तुम्हां ॥८७॥

आम्ही जाणते एक सृष्टीं ॥ ऐसा अभिमान वाहतां पोटीं ॥ गोब्राह्मण देखतां दृष्टीं ॥ मारितां कैसे अधर्मी हो ॥८८॥

समजोनियां शास्त्रार्थ ॥ मग कर्में करणें अनुचित ॥ त्यासी ऐहिक ना परमार्थ ॥ भोगील अनर्थ अनेक तो ॥८९॥

अवलक्षणी कुरूपी देख ॥ दर्पणीं न पाहे आपुलें मुख ॥ तोंवरीच अभिमान अधिक ॥ स्वस्वरूपाचा वाहतसे ॥९०॥

तैसे दोष आचरती ॥ मग धर्मशास्त्र विलोकिती ॥ परी वीट न मानिती चित्तीं ॥ नवलरीती हे वाटे ॥९१॥

ऐसें बोलतां कुबेरदूत ॥ रावण क्रोधावला अद्भुत ॥ व्याघ्रमुखीं मुष्टिघात ॥ ताडितां जेंवी खवळे पैं ॥।९२॥

पदीं ताडितां महाउरग ॥ कीं शुंडा पिळितां मातंग ॥ कीं घृतें शिंपितां सवेग ॥ पावक जैसा खवळे पैं ॥९३॥

ऐसा सक्रोध रावण ॥ सकळ दळभार सिद्ध करून ॥ रात्रीमाजी जाऊन ॥ घाला कुबेरावरी घातला ॥९४॥

संपदा आणि पुष्पक ॥ वस्तू हरिल्या सकळिक ॥ मग तो कुबेर यक्षनायक ॥ गेला शरण शक्रातें ॥९५॥

मग तो कुबेर ते वेळां ॥ शक्रें कोशगृहीं ठेविला ॥ असो रावणासी पुत्र जाहला ॥ मेघनाद प्रथमचि ॥९६॥

एक लक्ष पुत्रसंतति ॥ सवा लक्ष पौत्रोत्पति ॥ ऐशीं सहस्र युवती भोगितां रावण न धाये ॥९७॥

अठरा अक्षौहिणी वाजंत्रीं ॥ गर्जताती अहोरात्रीं ॥ पृथ्वीचे भूप महाद्वारीं ॥ कर जोडूनि उभे सदा ॥९८॥

अस्तां जातां दिनकर ॥ कर्पूरदीपिका अठरा सहस्र ॥ पाजळोनि सभेसमोर ॥ निशाचर तिष्ठती ॥९९॥

इंद्राचिया भयें पर्वत ॥ रावणासी शरण येत ॥ शक्र आमुचे पक्ष छेदित ॥ रक्षीं त्वरित आम्हांसी ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP