१ वरूथिनी एकादशी :
चैत्र व. एकादशीला 'वरूथिनी एकादशी ' म्हणतात. हे एकादशीचे व्रत केल्याने ऐश्‍वर्य प्राप्त होते. मांघाता, धुंधुमार इ. अनेक राजांनी हे व्रत करुन स्वर्ग मिळविला अशी कथा पद्मपुराणात आहे. तसेच , या व्रतामुळे मनुष्य सर्व पापतापातून मुक्त होतो, त्याला अनंत शांती मिळते व उत्त्मलोक प्राप्त होतात.
व्रत करणार्‍याने दशमी दिवशी एक वेळ हविष्यान्न घ्यावे. काशाचे भांडे, मांस, मसूरादी पदार्थ वर्ज्य करावेत. नंतर एकादशीस उपवास करावा. त्या दिवशी द्यूत, झोप आदींचा त्याग करावा. रात्री परमेश्‍वराचे नामस्मरण करीत जागरण करावे. द्वादशी दिवशी मांस, कास्यपात्र वगैरे सोडून पारणे करावे. (खरे तर, द्यूत, मद्यमांस, कासे आदींचा नेहमीच त्याग करावा)
कथा -
युधिष्ठिर म्हणाला, 'वासुदेवा, तुम्हाला नमस्कार असो. चैत्र वद्य एकादशीचे नाव काय व तिचा महिमा काय? ते मला सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, या एकादशीचे नाव वरूथिनी आहे. ती या लोकी आणि परलोकीसौभाग्य मिळवून देणारी आहे. या वरूथिनी एकदशीच्या व्रतामुळे निरंतर सुख मिळते. पाप नष्ट होते आणि सौभाग्यप्राप्ती होते. जी दुर्भागी स्त्री हे व्रत करील तिला सौभाग्य प्राप्त होईल. ही एकादशी सर्व लोकांना इष्टभोग व मुक्ती मिळवून देणारी आहे. या एकादशी व्रतामुळे मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि जन्ममरणाचा त्याचा फेरा बंद होऊन त्याची गर्भवासातून कायमची मुक्तता होते. वरूथिनीचे व्रत करूनच मांधता स्वर्गाला गेला. धुंदुमार वगैरे अनेक राजे हे व्रत करूनच मांधाता स्वर्गाला गेले. प्रत्यक्ष भगवान शंकरही या व्रतानेच ब्रह्मकपाला पासून मुक्त झाले मनुष्याला दहा हजार वर्षे तपश्चर्या करून जे फल मिळते तेच पुण्यफल वरूथिनी एकादशी केल्याने मिळते. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाचे वेळी आठ हजार तोळे सोने दान करून जे फळ मिळते, तेच फळ वरूथिनी एकादशीचे व्रत करणार्‍या मनुष्याला मिळते. जो श्रद्धावान मनुष्य वरूथिनी एकादशीचे व्रत करतो तो त्याला इच्छा असलेले फळ या लोकी व परलोकी मिळवतोच.
राजा, ही एकादशी पवित्र असुन पावन करणारी आहे. ती महापातकांचा नाश करते. आणि व्रतकर्त्याला ऐश्वर्य, भोग व मुक्ती मिळवून देते. राजा, अश्वदानापेक्षा गजदान श्रेष्ठ तर गजदानापेक्षा भुमिदान श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा तिलदान श्रेष्ठ, तिलदानापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ व सुवर्णदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान दुसरे झाले नाही व होणार नाही. कारण पितर, देव आणि मनुष्य यांची तृप्ती अन्नदानानेच होत असते. हे श्रेष्ठ राजा, अन्नदानाची बरोबरी कन्यादान करते असे कवी म्हणतात. तसेच कन्यादानाची बरोबरी करणारे गोदान आहे असे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे; पण या सर्वप्रकारच्या दानांपेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. वरूथिनी एकादशी केल्याने या विद्यादानाचे फळ मनुष्याला मिळते.
पापामुळे मोह होऊन जे लोक कन्येचे द्रव्य घेतात व त्यावर जगतात ते प्रलयकालपर्यंत नरकात जातात. म्हणून मनुष्याने कधीही कन्येचा मोबदला घेऊ नये. सर्व प्रयत्न करून हे टाळावे. राजा, जो मनुष्य लोभाने कन्याविक्रय करून धन घेतो; तो पुढच्या जन्मात निश्चितपणे मांजर होतो. पण जो मनुष्य कन्या अलंकृत करून कन्यादान करतो त्याला मिळणार्‍या पुण्याचे गणित करणे चित्रगुप्तालाही जमत नाही. असे जे कन्यादानाचे अगणित पुण्य आहे, तेच पुण्य वरूथिनी एकादशीचे व्रत करणार्‍या मनुष्याला मिळते.
काशाच्या भांड्यात भोजन करणे, मांस, मसूरा, चणे, कोद्रू, भाजी, मध, परान्न, दुसर्‍यांदा भोजन व मैथुन या दहा गोष्टी व्रत करणार्‍याने दशमीला वर्ज्य कराव्यात. द्यूतक्रीडा (सोंगट्या खेळणे), झोप, विडा. दंतधावन, दुसर्‍यावर दोषारोप करणे, कपट, पतिताबरोबर भाषण, रागावणे व खोटे बोलणे हे सर्व एकादशीला वर्ज्य करावे.
काशाचे भांडे, मांस, मसुरा, मध, व्यर्थ भाषण, व्यायाम, प्रवास, दुसर्‍यांदा भोजन,मैथुन, हजामत, तेल लावणे आणि परान्न या सर्व गोष्टी द्वादशीला वर्ज्य कराव्यात. राजा, हे सर्व नियम पाळून जो वरूथिनी एकादशीचे व्रत करतो त्याच्या सर्व पातकांचा क्षय ही एकादशी करते व अंती अक्षय मोक्ष मिळवून देते. एकादशीच्या दिवशी जे लोक जागरण करून जनार्दनाची पूजा करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन परमगती मिळवतात. म्हणून जे लोक पापभीरू आहेत आणि रात्रीचा शत्रू असलेल्या सूर्याचा पुत्र यम याची ज्यांना भिती वाटते त्या सर्व मनुष्यांनी खूप प्रयत्न करून वरूथिनी एकादशीचे व्रत करावे. वरूथिनी एकादशीचे हे माहात्म्य जो वाचेल आणि ऐकेल त्याला हजार गाई दान दिल्याचे पुण्य मिळेल आणि तो सर्व पापांतून मुक्त होऊन शेवटी विष्णुलोकाला जाईल.

॥याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील वरूथिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

N/A
Last Updated : January 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP