चैत्र शु. एकादशी

Chaitra shuddha Ekadashi


१ कामदा एकादशी :
हे व्रत शुद्ध एकादशीला करतात. पूर्वदिवशी म्हणजे दशमीला मध्यान्ही जव, गहू आणि मूग यांचा एकवेळ आहार करुन श्रिविष्णूचे स्मरण करावे. दुसर्‍या दिवशी एकादशीला प्रातःस्नान व नित्यकर्मे उरकल्यावर
'ममाखिलपापक्षयपूर्वक परमेश्‍वरप्रीतिकामनाय कामदैकादशीव्रतं करिष्ये ।
असा संकल्प करुन रात्री भगवान श्रीविष्णूची मूर्ती झोपाळ्यावर बसवुन तिच्यासमोर जागर करावा. दुसर्‍या दिवशी पारणे करावे. याने सर्व पापे दूर होतात. या एकादशीला पंढरीची वारी करतात. या वारिला 'चैत्रवारी' असे म्हणतात.
कथा
युधिष्ठिर म्हणाला, 'वासुदेवा, तुला नमस्कार असो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? ते मला सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, पूर्वी दिलिपाने विचारले असता, वसिष्ठ ऋषीने जी पुरातन कथा सांगितली, तीच कथा मी तुला सांगतो. मन एकाग्र करून ती ऐक.'
दिलीप राजाने विचारले, 'हे भगवन् चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय व तिचा पूजाविधी काय ते मला कृपा करून सांगा.'
वसिष्ठ म्हणाले, 'राजा, चांगले विचारलेस. मी तुला सर्व सांगतो. या एकादशीचे नाव कामदा आहे. ही एकादशी फार पुण्यकारक आहे आणि पापरूपी काष्ठांना ती वणव्याच्या अग्नीप्रमाणे जाळून टाकते. राजा, या एकादशीची कथा पाप नष्ट करणारी व पुत्र देणारी आहे. ऐक तर.'
पूर्वी पाताळात सुवर्णरत्‍ने जडवलेल्या रम्य भोगी नगरात मदोन्मत्त नाग राहत असत. राजा पुंडरीक त्यांचा पुढारी होता. तो त्या नगरात राज्य करीत असे. गंधर्व, अप्सरा व किन्नर त्या राजाची सेवा करीत असत.
त्यामध्येच श्रेष्ठ अप्सरा ललिता व ललित नावाचा गंधर्व होता. हे जोडपे कामपीडित झालेले होते. त्यांची एकमेकांवर फार प्रीती होती. ते स्वतःच्या धनधान्याने संपन्न असलेल्या सुंदर घरात आनंदाने क्रीडा करीत असत. ललितेच्या ह्रदयात तिच्या पतीचे वास्तव्य निरंतर होते. ललित गंधर्वाच्याही मनात फक्त त्याची प्रेयसी ललिता हिचाच निवास होता.
एकदा राजा पुंडरीक आपल्या नागांसह क्रीडा करीत सभेत बसला ओता. त्यावेळी ललित गंधर्व गायन करीत होता; पण त्याची प्रेयसी ललिता जवळ नव्हती. तिचे स्मरण केल्यामुळे गंधर्वाच्या गायनात चुका होऊ लागल्या.
त्याची ही गाण्यामधील पदे गाळण्याची चूक कर्कोटक नागाच्या लक्षात आली. ही चूक कोणत्या कारणामुळे होत आहे हेही त्याला समजले. त्याने गायनातील ही चूक पुंडरीक नागराजाला कळवली.
त्यामुळे पुंडलीक रागावला. त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले. मदनाने मन आतुर झालेल्या त्या ललित गंधर्वाला त्याने शाप दिला की 'हे दुर्बुद्धे, माझ्यासमोर गायन करताना पत्‍नीच्या चिंतनात तू चुका केल्यास म्हणून तू मांसभक्षण करणारा व मनुष्य खाणारा राक्षस हो.'
'राजा, त्याच्या या शापानुसार तो ललितगंधर्व राक्षस झाला. त्याचे तोंड भयंकर होते व नेत्र विक्राळ होते. त्याला पाहिल्या बरोबरच भीती वाटत असे. त्याचे हात चार कोस लांब होते. आणि मुख पर्वतावरील गुहेसारखे भयंकर होते. त्याचे नेत्र चंद्र-सूर्यासारखे प्रखर होते व मान पर्वतासारखी उंच होती. त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या भासू लागल्या आणि ओठ दोन कोस लांबीचे झाले होते. अशाप्रकारे त्याचे शरीर बत्तीस कोसांचे झाले. आपल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी तो ललित-गंधर्व असा विक्राळ राक्षस झाला. आपल्या पतीचे शरीर असे अक्राळ-विक्राळ झालेले पाहून अप्सरा ललितेला फार दुःख झाले. तिच्या मनात आले, 'माझा पती शापाने पीडित होऊन राक्षस झाला आहे. आता मी काय करू ? कोठे जाऊ?' असे विचार मनात येऊन तिला चैन पडेनासे झाले. आता ती ललिता आपल्या पतीसह गहन वनात फिरू लागली.
तो राक्षस, संचार करण्यास कठीण असलेल्या भयंकर वनात फिरत असे. विक्राळ रूपाचा तो राक्षस नित्य पापे करीत असे. आणि मनुष्ये मारून खात असे. पण त्यालाही दुःखपीडा होत असे व रात्रंदिवस शांती लाभत नसे. त्या गहन वनात आपल्या पतीबरोबर फिरताना दुःखी झालेली ती ललिता आपल्या पतीची ही अवस्था पाहून फार रडत असे.
अशाप्रकारे फिरत असता ती ललिता एकदा सहजच विंध्य पर्वताच्या विस्मयकारक शिखरावर येऊन पोहोचली. तेथे तिला ऋष्यशृंग मुनीचा मंगलदायक आश्रम दिसला. ती त्वरेने आश्रमात गेली आणि विनयाने नम्र होऊन ऋष्यशृंग ऋषीपुढे उभी राहिली. तिला पाहून ऋषी म्हणाला, 'हे कल्याणी, तू कोण आहेस? तू कुणाची कन्या ? येथे कशासाठी आली आहेस? मला सर्व काही सत्य सांग पाहू.'
ललिता म्हणाले,'वीरधन्वा नावाचा गंधर्व आहे. त्या माहात्म्याची मी कन्या आहे. माझ नाव ललिता. मी माझ्या पतीकरता येथे आले आहे. माझा पती शापाच्या दोषामुळे भयंकर रूपाचा व पापे करणारा राक्षस झाला आहे. त्याची ही अवस्था पाहून मला सुख लाभत नाही व चैन पडत नाही. हे ऋषीश्रेष्ठा, मी कोणते प्रायश्चित्त केले असता माझा पती राक्षसयोनीतून मुक्त होईल ? ते प्रायश्चित्त करण्याची मला आज्ञा करा म्हणजे मी ते करीन.'
ऋष्यशृंग ऋषी म्हणाला, 'हे सुंदर ललिते. सध्या चैत्र महिन्याचा शुक्ल पक्ष आहे. आता येणारी एकादशी कामदा एकादशी आहे. या एकादशीचे व्रत केले तर ती मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. म्हणून हे कल्याणी, मी सांगतो त्या विधीप्रमाणे तू या एकादशीचे व्रत कर. या व्रताचे पुण्य तू आपल्या पतीला दे. पुण्य दिल्याबरोबर एका क्षणातच त्याचा शापदोष नाहीसा होईल'
मुनींचे हे बोलणे ऐकून ललितेला फार आनंद झाला. राजा, तिने एकादशीच्या दिवशी उपवास केला. द्वादशीच्या दिवशी ती ऋष्यशृंग ऋषीच्या जवळ वासुदेवा समोर उभी राहिली. आपल्या पतीचा उद्धार व्हावा म्हणून ती म्हणाली, 'मी उपवास करून कामदा एकादशीचे जे व्रत केले त्याच्या पुण्यप्रभावाने माझ्या पतीचे पिशाच्चत्व नष्ट होऊ दे.'
ललिता असे म्हणताच त्याच क्षणी त्या गंधर्वाचे पाप नष्ट झाले व त्याला दिव्यदेह मिळाला. त्याचे राक्षसत्व गेले आणि तो पुन्हा गंधर्व झाला. त्याच्या अंगावर रत्नांचे व सुवर्णाचे अलंकार आले. तो पुन्हा ललितेसह क्रीडा करू लागला. मग ते जोडपे विमानात बसले. दोघांची रूपे पूर्वीपेक्षा फारच सुंदर झाली, व ते दोघे शोभून दिसू लागले. हे सर्व कामदा एकादशीच्या व्रतामुळे झाले.
राजा, ही कामदा एकादशी खूप प्रयत्न करून करावीच. ब्रह्महत्येसारखे पाप नष्ट करणारी व पिशाच्च योनीतून सोडवणारी ही कथा मी तुला लोकांच्या कल्याणाकरिता सांगितली. त्रैलोक्यात याहून श्रेष्ठ असे दुसरे व्रत नाही. या एकादशीचे माहात्म्य जो वाचेल किंवा ऐकेल त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळेल.

॥वराहपुराणातील कामदा नावाच्या एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

अधिकमासातल्या शु. एकादशीला हे व्रत करतात. या व्रताने विष्णुरुपता लाभते.

२ कृष्णदोलोत्सव :

चैत्र शु. एकादशीस लक्ष्मीस एका देव्हार्‍यात ठेवून तिची दवण्याने पूजा करतात. रात्री जागर करतात. या व्रताचा असा विधी आहे.

N/A

N/A
Last Updated : January 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP