* ऋषितपर्ण :

श्रावण शु. १५ ला सर्व ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी स्वाध्यायी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आदी कोणत्याही आश्रमाचे विद्यार्थी आपपल्या वेद, कार्य आणि क्रियेच्या अनुकूलतेप्रमाणे करीत असतात. त्याचा विधी थोडक्यात असा-

नदीच्या किनारी जाऊन यथाविधी स्नान करून कुशनिर्मित ऋषींची स्थापना करावी व त्यांचे पूजन, तर्पण, विसर्जन करून रक्षोपोटलिका करून त्याचे मार्जन करावे. त्यानंतर पुढील वर्षीचा अध्ययनक्रम निश्‍चित करून सायंकाळी व्रतसमाप्ती करावी. यामध्ये उपाकर्मपद्धतीनुसार अनेक कर्मे असतात. ती विद्वानांना विचारून करावीत. ही कृत्ये चातुर्मासात आचरावयाची असतात. या काळात नद्या रजस्वला असतात, असे मानतात. तरीही

'उपकर्मणी चोत्सर्गे प्रेतस्नाने तथैवच । चंद्रसूयग्रहेचैव रजोदोषो न विद्यते।'

या वसिष्ठवचनानुसार उपाकर्म दोष होत नाही.

* रक्षाबंधन :

हे व्रत पौर्णिमेला करतात. या दिवशी पराह् नव्यापिनी तिथी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर पूर्वी धरावी. जर त्या दिवशी भद्रा असेल तर ती वर्ज्य करावी. भद्रामध्ये श्रावणी व फाल्गुनी दोन्ही वर्ज्य ठरविल्या आहेत. कारण श्रावणीमुळे राजाचे व फाल्गुनीमुळे प्रजेचे अनहित होते. त्या दिवशी व्रत करणार्‍याने प्रात:स्नानादी नित्यकर्मे करून वेदोक्‍त मंत्राने रक्षाबंधन, पितृतर्पण, आणि ऋषिपूजन करावे. शूद्राने मंत्राशिवाय स्नानदानादी करावे. रक्षेसाठी चित्रविचित्र रंगीत वस्त्र अगर रेशीम वापरावे. त्यात तीळ, सुवर्ण, केशर, चंदन, अक्षता आणी दूर्वा घालून त्याला रंगीत दोरा गुंडाळावा आणि आपल्या घरातील पवित्र जागी (देवघरात) कलश स्थापन करून त्यावर त्याची यथाविधी पूजा करावी. नंतर राजा, मंत्री, वैश्‍य अगर शिष्ट शिष्यांच्या वगैरे उजव्या हातात

'येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महबल: । तेन त्वां अनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'

या मंत्राने बांधावा. या बंधनामुळे वर्षभर पुत्रपौत्रादी सर्व सुखी राहतात.

* श्रवणपूजन

श्रावण पौर्णिमे दिवशीच राजा दशरथाच्या हातून वन्यपशू समजून नेत्रहीन मातापित्यांचा एकुलत एक पुत्र श्रावण मारला गेला. त्यावेळी राजा दशरथाने त्यांचे सांत्वन केले व आपल्या हातून चुकीने झालेल्या हत्येचे परिमार्जन व्हावे म्हणून श्रावणी पौर्णिमे दिवशी 'श्रवणपूजे' चा सर्वत्र प्रसार केला. तेव्हापासून बहुतेक सर्व श्रद्धाळू जन त्या दिवशी 'श्रवणपूजा' करून त्यालाच रक्षा अर्पण करतात. (हे व्रत नाही.)

 

* श्रावणी :

श्रावण मासात श्रवणनक्षत्रयुक्त दिवशी, श्रावणी पौर्णिमेस, श्रावणमासाच्या पंचमीस हस्तयुक्त दिवशी हे उपाकर्म (श्रावणी) यथोक्‍त विधीने करावे.

N/A

N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP