१ अलक्ष्मीनाशक स्नान :

पौष पोर्णिमेस हे अलक्ष्मीनाशक स्नान करतात. या दिवशी पुष्यनक्षत्र असेल तर पुरुषाने पांढर्‍या मोहरीचा कल्क अंगाला लावून स्नान करावे व अलक्ष्मी म्हणजे दुर्भाग्याला घरातून हाकलून द्यावे. नंतर नारायण, इंद्र, चंद्र, बृहस्पती व पुष्य यांच्या मूर्तींना सर्वोषधियुक्त जलाने स्नान घालून त्यांची पूजा, होम करावा, असे विधान आहे.

२ माघस्नान

पौष पौर्णिमा. माघस्नानासंबंधी प्रारंभ आणि समाप्ती यांविषयी बरेच मतभेद आहेत. ब्रह्मपुराणात, पद्मपुराण यांच्या मते पौष शु. एकादशीला स्नानाला प्रारंभ करून माघ शु. द्वादशीला किंवा पौर्णिमेला त्याची समाप्ती करावी. तथापी पौषी पौर्णिमेला प्रारंभ करून माघी पौर्णिमेला याची समाप्ती करण्याचा प्रघात रूढ आहे.

महिनाभर स्नान करणे शक्य नसेल तर, निदान तीन, दोन किंवा एक दिवस तरी स्नान करावे.

ऊन पाण्याने स्नान करण्याचे फल निष्फळ ठरते. स्नान शक्यतो थंड पाण्याने करावे. अशक्त, आजारी माणसाने ऊन पाण्याने स्नान करण्यास हरकत नाही, असे शास्त्रवचन आहे. मात्र ज्या जलाशयात स्नानास आरंभ केला, त्याच जलाशयात ते समाप्तीपर्यंत करायला पाहिजे, असा निर्बंध आहे. सूर्योदयानंतर हे स्नान कनिष्ठ आहे. माघ, कार्तिक आणि वैशाख हे महिने पवित्र मानले गेले आहेत. या महिन्यांत तीर्थक्षेत्रांत अगर स्वतःच्या घरी राहून स्नानदानादी करण्याने महत्फल प्राप्त होते. स्नान सूर्योदयी उत्तम व पुढे जेवढा वेळ अधिक तेवढे निष्फळ मानले जाते. स्नानासाठी काशी, प्रयाग उत्तम मानले गेले आहेत. तेथे न जाता आल्यास त्यांचे स्मरण करून अथवा

'पुष्करादीनि तीर्थानि गंगाद्याः सरितस्तथा ।

आगच्छन्तु पवित्राणि स्नानकाले सदा मम ॥''

असे म्हणून स्नान करावे.

'हरिद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते ।

स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते ।'

'अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।

पुरी द्वारावती चैव सप्तै ते मोक्षदायिकाः ।'

'गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।

नर्मदे सिन्धु कावेरि जलेस्मिन् सन्निधिं कुरु ॥'

असे म्हणावे अथवा कोणत्याही वेगाने वाहणार्‍या प्रवाहात स्नान करावे, किंवा रात्रभर छतावर ठेवलेल्या घागरीतील पाण्याने स्नान करावे, किंवा दिवसभर उन्हाने तापलेल्या पाण्याने स्नान करावे. स्नानाच्या आरंभी

' आपत्वमसि देवेश ज्योतिषां पार्तरेव च ।

पापं नाशाय मे देव वाङ्‌मनः कर्मभिः कृतम् ॥'

या मंत्राने पाण्याची व

दुःखदारिद्र्यनाशाय श्रीविष्णोस्तोषणाय च ।

प्रातःस्नानं करोम्यद्य माघे पापविनाशनम् ॥ '

या मंत्राने ईश्‍वराची प्रार्थना करावी. स्नानानंतर

'सवित्रे प्रसवित्रे च परं धाम जले मम ।

त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्त्रधा ॥'

या मंत्राने सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावेत व प्रभूचे स्मरण आणि पूजन करावे. माघस्नानासाठी ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासी आणि वनवासी चारी आश्रमांतील, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आदी, तसेच बाल, युवा, वृद्ध या तीन्ही अवस्थांतले, आणि स्त्री, पुरूष वा नपुंसक या सर्वांना आज्ञा आहे. स्नानाची व्याप्ती एकतर पौष शु. ११ ते माघ शु. ११ अगर पौष शु. १५ ते माघ शु. १५ पर्यंत आहे, अथवा सूर्य मकर राशीला आल्यापासून ते कर्केला जाईपर्यंत नित्य स्नान करावे व त्यानंतर यथावकाश मौन पाळावे. परमेश्‍वराचे भजन-पूजन करावे. ब्राह्मणांना यथाशक्ती नित्य भोजन, कांबळे, हरणाचे कातडे, कपडे, चादर, रुमाल, सदरा, टोपी, पादत्राणे, पगडी, रत्‍न आदी दान द्यावे. एक किंवा एकतीस दंपतींस मिष्टान्न-भोजन घालून

सूर्यो मे प्रीयतां देवो विष्णुमूर्ति निरंजनः ।'

या मंत्राने सुर्याची प्रार्थना करावी व त्यांना सप्तधान्ये व ३० मोदक द्यावेत. स्वतः निराहार, शाकाहार, फलाहार किंवा दुग्धाहार व्रत किंवा एकभुक्त करावे. याप्रंमाणे षड्‌रिपूंचा त्याग करून भक्ती, श्रद्धा, विनय, नम्रता, स्वार्थत्याग आणि विश्‍वासभाव ठेवून व्रत करावे. याचे फल अश्‍वमेधयज्ञफलासमान आहे. सर्व प्रकारची दुःखे दूर होतात.

N/A

N/A
Last Updated : December 12, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP