१) नृसिंह-जयंतिव्रत

हे व्रत वैशाख शु. चतुर्दशीला करतात. ही चतुर्दशी प्रदोषव्यापिनी पाहिजे. जर दोन दिवशी अशी चतुर्दशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर ( मदनतिथी ) त्रयोदशीचा संसर्ग टाळण्यासाठी दुसर्‍या दिवशीचीच तिथी घ्यावी. उपवास करावा. जर सुदैवाने कधीतरी पूर्वविद्धा ( त्रयोदशीयुक्त ) तिथी शनिवार, स्वाती नक्षत्र , सिद्धियोग आणि वणिजकरण असेल तर त्याच दिवशी करावे. व्रताच्या दिवशी पहाटे सूर्याला व्रत करणार असल्याचे सांगुन तांब्याच्या कलशात पाणी भरावे व
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे । उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जित: ॥
या मंत्राने संकल्प सोडून मध्यान्ही नदीवर जाऊन तीळ, गाईचे शेण, माती आणि आवळे यांनी मर्दन करुन वेगवेगळे चार वेळा स्नान करावे. नंतर पुन्हा शुद्ध स्नान करुन तेथे नित्य आन्हिक करावे. नंतर घरी यावे व क्रोध, लोभ, मोह, असत्य भाषण , कुसंग व पापाचरण यांचा त्याग करावा. ब्रह्मचर्य पाळावे आणि उपवास करावा. संध्याकाळी चौरंगावर अष्टदल काढून त्यावर सिंह, नृसिंह आणि लक्ष्मी यांच्या सुवर्णप्रतिमा प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापन करून त्यांची षोडशोपचारपूर्वक पूजा करावी. ( किंवा पौराणिक मंत्रांनी पंचोपचारांनी पूजा करावी) . रात्री गायनवादन, पुराणश्रवण, हरिकीर्तन, जागरण करावे. दुसरे दिवशी ब्राह्मणभोजन घालून परिवारासह स्वत: भोजन करावे. या प्रमाणे प्रतिवर्षी करण्याने नृसिंह-भगवान त्याचे सर्व ठिकाणी रक्षण करतात व यथेच्छ धनधान्य देतात . नृसिंहपुराणात या व्रताची कथा आहे, ती अशी--
हीच नरसिंह चतुर्दशी स्वाती नक्षत्र , शनिवार, सिद्धयोग, वनिजकरण याच्या योगाने युक्त चतुर्दशी असेल , तर अशा योगावर हे व्रत करणार्‍यास सौभाग्य प्राप्त होते. जरी यातील एखादाही योग असेल तर तो दिवस पापनाशक आहे. हे व्रत जो कोणी न करील , तो सूर्यचंद्र असेतो नरकात जाईल.

२) शिवलिंगपूजा :

हे व्रत नृसिंहजयंती दिवशीच करतात. गव्हाच्या पिठाचे शिवलिंग करून त्याची स्थापना करतात व त्याची यथासांग पूजा करतात. काही ठिकाणी हे नृसिंहजयंतीच्या बरोबरच करतात. दोन्ही देवांची पूजा एकत्र करतात. या व्रताने मनुष्य भयापासून मुक्त होतो.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP