चैत्र शु. नवमी

Chaitra shuddha Navami


१ चंडिका नवमी :
हे व्रत चैत्र महिन्यातील दोन्ही पक्षांतील नवमीला करतात. त्या दिवशी प्रातःस्नान झाल्यावर तांबडे वस्त्र परिधान करावे आणि सुगंधी फुलांनी चंडिकादेवीचे पूजन करावे. पुष्पांजली अर्पण करून त्या दिवशी उपवास करावा. या व्रताचे विधियुक्त अनुष्ठान करणारा मनुष्य हंस, कुंद व चंद्राप्रमाणे गौरवर्ण व ध्रुवाप्रमाणे तेजस्वी दिव्यरुप धारण करुन उत्तम विमानारुढ होतो. त्याला देवलोकामध्ये आदर मिळतो.
२ रामनवमी :
या व्रताची चार जयंत्यांमध्ये गणना होते. हे व्रत चैत्र शु. नवमीला करतात. व्रतासाठी मध्याह् नव्यापिनी शु. नवमी घेतात. जर मध्यान्ह व्यापिनी नवमी दोन दिवस असेल तर किंवा दोन्ही दिवस असलेली नवमी मध्याह् नव्यापिनी नसेल तर हे व्रत पहिल्या नवमीस करावे. नवमीला अष्टमीचा वेध निषिद्ध नाही. दशमीचा वेध वर्ज्य समजावा.
या व्रताचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन प्रकार आहेत. नित्य व्रत करावयाचे असेल तेव्हा ते निष्काम भावनेने करावे म्हणजे अनंत अमिट फलाची प्राप्ती होते. काम्य व्रत केले असता कामनापूर्ती होते. भगवान श्रीरामचंद्राचा जन्म झाला त्या दिवशी त्या समयी चैत्र शु. नवमी, गुरुवार , पुष्यनक्षत्र (काहींच्या मते पुनर्वसू) मध्याह्‌न आणि कर्क लग्न असा योग होता. व्रतोत्सव दिनी नेहमीच हे सर्व जमून येतात, असे नाही. परंतु जन्माक्षं (जन्मनक्षत्र) अनेकदा येऊ शकते. ते असेल अशा वेळी हे व्रत अवश्य करावे.
जो कोणी श्रीरामनवमीचे व्रत शक्त्यनुसार विश्‍वासपूर्वक (श्रद्धायुक्त मनाने) करतो त्याला महाफल लाभते. व्रत करणाराने पूर्वदिवशी (चैत्र शु. अष्टमीला) प्रातःस्नानादी आन्हिक उरकून भगवान रामचंद्रांचे स्मरण करावे. दुसर्‍या दिवशी (नवमीला) शक्य तितक्या लवकर नित्यकर्मे उरकून
उपोष्य नवमीं त्वद्य यामेष्वष्टसु राघव ।
तेन प्रीतो भव त्वं भोसंसारात् त्राहि मां हरे ॥

असा मंत्र म्हणून आपली व्रताचरण करण्याची भावना श्रीरामचंद्रापाशी प्रकट करावी आणि 'मम भगवत्प्रीतिकामनया (वा अमुक फलप्राप्तिकामनया) रामजयन्तीव्रतमहं करिष्ये ।' असा संकल्प करुन काम-क्रोध-लोभ-मोहादीपांसून मुक्त राहून व्रत करावे.
तदनंतर श्रीराममंदिर अथवा आपले घर ध्वज-पताका, तोरणे आदींनी सुशोभित करावे. मंदिराच्या किंवा घराच्या उत्तरभागी रंगीत कपड्यांचा मंडप उभारावा. मंडपात अत्यंत  स्वच्छ व शुद्ध भागी मंडल करुन त्यावर मध्यभागी कलशाची यथाविधी स्थापना करावी. कलशावर सुवर्णाचे श्रीरामपंचायतन (राम, सीता, भरत शत्रुघ्न-मागे दोन बाजूंस -पाठीमागे लक्ष्मण आणि चरणापाशी हनुमान) स्थापून त्याची षोडशोपचारे पूजा करावी. व्रतराज, व्रतार्क, जयसिंहकल्पद्रुम आणि विष्णूपूजन यांत वैदिक आणि पौराणिक असे दोन प्रकारचे पूजाविधी सांगितलेले आहेत. त्यांस अनुसरुन पूजन करावे. तो सर्व दिवस भगवान श्रीरामचंद्राचे भजन-स्मरण, स्तोत्रपठन, दान-पुण्य, हवन , पितृश्राद्ध आणि उत्सव यात घालवावा. रात्री गायन-वादन-नर्तन (रामलीला), तसेच चरित्रश्रवण करुन काल व्यतीत करावा. दुसर्‍या दिवशी दशमीला पारणे करुन व्रतोद्यापन करावे. शक्य असेल तर सुवर्ण प्रतिमा दान द्यावी. ब्राह्मंणभोजन घालावे. याप्रमाणे प्रतिवर्षी करावे.
३ रामनाम लेखव्रत :
चैत्र शु. नवमीस हे व्रत सुरु करतात. स्नानादी कर्मे आटोपून शुद्ध झाल्यावर ' या रामनवमीच्या शुभ तिथीला या महिन्याच्या या पक्षात या संवत्सरात सर्व पापांचा नाश करुन मला विष्णुलोक मिळावा यासाठी श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी श्रीरामनामलेखन करीन', असा संकल्प करावा. लिखित रामनामाची नाममंत्राने षोडशोपचारे पूजा करावी. यायोगाने जो रामनाम लिहितो, त्याची सर्व पातके नष्ट होतात. सर्वप्रकारे सुख लाभते. या व्रताचे उद्यापन करावयाचे असते. घर गुढ्यातोरणांनी शृंगारावे. रामलक्ष्मणांची सुवर्ण प्रतिमा करावी. एकचतुर्थांश हिस्सा हनुमानाची प्रतिमा करावी. चांदीचे आसनावर पीत वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ पसरून तांब्याचा कुंभ पंचपल्लव घालून स्थापन करावा. त्यावर तांब्याचे ताम्हन ठेवून त्यावर प्रतिमा ठेवावी. गणपति-पूजन, पुण्य़ाहवाचन करून श्रीरामाची पूजा करावी. अग्नीची प्रतिष्ठापना करुन विष्णुसूक्ताने हवन करावे. १०८ वेळा राममंत्राने हवन करावे. ब्राह्मणास भोजन घालून यथाशक्ती दक्षिणा द्यावी व नंतर आपण भोजन करावे.
४ वर्षव्रत :
हे तिथिव्रत होय. चैत्र शु. नवमीला हे व्रत करतात. या दिवशी हिमवान, हेमकूट, शृंगवान, मेरू, माल्यवान आणि गंधमादन या पर्वतांची पूजा करुन उपवास करावा. हा या व्रताचा प्रमुख विधी आहे. शेवटी जंबुद्वीपाची चांदीची प्रतिमा करून ती ब्राह्मणास दान द्यावी. फल- इच्छापूर्ती व स्वर्गप्राप्ती.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP