शुकाष्टक - श्लोक ३

श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.


हेम्नः कार्य हुतवहगतं हेममेवेति यद्वत् ।

क्षीरे क्षीरं समरसगतं तोयमेवांबुमध्ये ।

एवं सर्व समरसतया त्वंपदं तत्पदार्थे ।

निस्त्रैगुण्ये पथि विचारतां को विधिः को निषेधः ॥३॥

एवं सर्व भूतव्यक्ती । आत्मपदी ऐक्या येती । तेंचि दृढ श्लोकार्थी । बोलेल शुक ॥५६॥

हेमअळंकारठसा । घातलिया हुताशा । नामरुप मोडुनी जैसा । हेमचि हेम ॥५७॥

तरी अळंकाररुपें असतां । काय हारपेली होती हेमता । की अग्निसंगें असतां । गोचर जाली ॥५८॥

तरी आटावें हें आटाटी । संकल्प सन्निपात उठी । एर्‍हवीं आटितां नाटितां दिठी । सोनेंचि असे ॥५९॥

तैसे अवेव आकारीं । आत्मेन परणीत चराचरी । तें नामरुपावरी । चोरिलें ह्नणती ॥१६०॥

जैसें हेम अळंकारकृती । तैसीं भूतें अद्वैतीं । येउनी आत्मस्थिती । एकरसें होतीं ॥६१॥

नातरी श्वेत कृष्ण गाई । दोहोनी क्षीर मेळवितां एके ठायीं । केलें तेथें भेदू नाही । वर्णावर्णाचा ॥६२॥

तैसे अद्वितीयेचा गांवीं । वर्णावर्ण पदवी । नसोनियां अनुभवी । सुखवस्ती वासु ॥६३॥

जैशा जळबळें सरितां । उदधी आलिया ठाकितां । ठाकिलियां समरसता । होउनी वसती ॥६४॥

त्या अंबुनिधी परुता । ठाकिलियां मार्गु नाहीं सरिता । तैसी पावोनी पूर्ण ऐक्यता । उपरमु नाहीं ॥६५॥

ऐसे सर्वही समरसें । आत्मपदींच असे । हें त्वंपद तत्पद सौरसें । बोलिलें निगमीं ॥६६॥

किंबहुना आपणासी । परिच्छिन्न एकदेशी । कर्ता भोक्ता मानसीं । सुखदुःख बहू ॥६७॥

नाना विषय चित्ता । अखंड वाहे चिंता । विदेही परी सर्वथा । ‘ देह मी ’ ह्नणे ॥६८॥

त्या त्वंपदाचा सोहळा । येऊन पडिला गळा । आणि उत्तम तो वेगळा । ह्नणती तत्त्वातीतु ॥६९॥

जो निर्गुण निःसंगु । निर्मळ निर्व्यंगु । निंदारहित अभंगु । निरुपाधिकु ॥१७०॥

जो सनातन शुद्ध । संत प्रबोध बुध । शाश्वत सिद्ध । सिद्धिरहितु ॥७१॥

जो आद्य अव्ययो । अलक्ष अद्वितीयो । अरुप अभिभवो । भावविहीनु ॥७२॥

जो अगम्य वेदवाचे । अगोचर सत्य साचें । ऐसें त्या तत्पदाचें । रुप ह्नणती ॥७३॥

तोचि तूं आलासी । त्वंपदी पाहे त्यासी । तरी तत्पदाचिये रासी । वरील सीग ॥७४॥

त्या त्वंपदाचा गोळा । सांग कोठें जाला वेगळा । चुकोनी व्यापका सकळा । याची खाणी के आहे ॥७५॥

अनादिप्रवाहयोगें । तन्मात्रविषयसंगें । मनाचेनि संकल्प वेगें । वेगळें मानिलें ॥७६॥

तरी विषयांचिये रसवृत्ती । रसस्वाद तोचि संभूती । भोग स्वादाचिये संभूती । निश्चित जाणता तोचि ॥७७॥

तोचि दृष्टीचा विवेकी । विषयरसातें पारखी । जो बुद्धीचा पूर्व कीं । पूर्वजू असे ॥७८॥

आणि पार्थिवांचा उभारा । जाला पंचभूतविकारा । तो विचारितां विचारा । परिवसान आत्मा ॥७९॥

तरी जीवन हे बोली । प्रतिबिंबाचिये भुली । बिंबवितया विसरली । ह्नणोनियां ॥१८०॥

प्रतिबिंबा मळिवट । चंदन लावणें चोखट । तरी दर्पणासी बरवंट । केलिया काय प्रतिबिंब चर्चे ॥८१॥

प्रतिबिंबा जेणें बिंबविजे । त्यासी सौरभ्यें जें चर्चिजें । तैं भोगिलें देखिजे । स्वभोग प्रतिमीं ॥८२॥

तैसे सर्व भोग आत्मा भोगी । अविद्या बिंबे जीवाचे आंगीं । ह्नणोनिया जगीं । भोक्ता मी ह्नणे ॥८३॥

तेथें आशंका उठी झणी । जें सुखदुःख भोग दोन्ही । भोगावया लागुनी । काय आत्मा जाला ॥८४॥

तरी उपाधीचेनि बिंबें । तेथ महदादि हें प्रतिबिंबे । तेथ उपाधी द्वंद्वभांवे । काय बिंबविता भोगी ॥८५॥

आदर्शा आंगीं अडळे मळ । निबिड बैसले सबळ । ते प्रतिबिंबाआंगीं केवळ । क्षेपले दिसती ॥८६॥

तो मळ जैं फेडावा । तैं आरिसा साहाणें जोडावा । परी बिंबला तो धरावा । काये लागेल साहाणे ॥८७॥

ह्नणोनी नाना साधनें । तें चित्तशुद्धीसी कारणें । जीवशिव तो ब्रह्मरुपपणें । स्वतः सिद्ध ज्ञाता ॥८८॥

यालागीं सुखदुःख दोन्ही । उपाधीसि लपोनी । गेली ज्या देखोनी । तोचि तूं आहेसी ॥८९॥

ऐक त्वंपदाचें शोधन । तेणें तत्पदीं समाधान । जेणें होय ऐक्यज्ञान । सर्वार्थी दृढ ॥१९०॥

एवं जें तत्पदार्थी । तें ये त्वंपदीं प्रतीति । ह्नणोनी तत्त्वमस्यादि अर्थी । गर्जे वेद ॥९१॥

ऐसे तत्पदप्राप्त श्रेष्ठ । त्यांसी त्रिगुणमाया - पट । जो विधिनिषेधरगट । विचित्र होता ॥९२॥

ज्या रंगाचिया बरवा । ब्रह्मा आणिला रजोगांवा । त्रिगुणाच्या वैभवा । घडमोडीलागी ॥९३॥

त्या त्रिगुणतांथुवाची पल्हे । त्याचेनि तेजें भूमी जळे । आणि विचित्रपटत्व सगळें । भस्म जालें ॥९४॥

तेधवां उघडवाघड ब्रह्म । निस्त्रिगुण उत्तम । त्याचिये दृष्टी सुगम । ठसावले लोक ॥९५॥

तेव्हां वाती लाउनी पाहतां । विधिनिषेध नलगे हाता । त्या राजयोग आत्मवंता । आपुलेपणा वेगळा ॥९६॥

त्यासी विधी कवणे ठाई । निषेध कैंचा काई । जैं आत्मराम स्वदेहीं । विश्वेंसी जाला ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP