मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३८

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

भीमातीरवासी रुक्मिणीपती । सच्चिदानंदा करुणामूर्ती ।

जगविख्यात तुझी कीर्ती । पंवाडे गर्जती पुराणीं ॥१॥

श्रुतिशास्त्रे वर्णिती गुण । त्यांसि न कळेचि तुझें महिमान ।

तेथें मी मूढमती अज्ञान । प्राकृत मतीनें काय वाणूं ॥२॥

नाहीं अंगीं चातुर्य कुशळता । नव्हे बहुश्रुत व्युत्पन्नता ।

वायांच उपजला धिंवसा चित्ता । तरी शेवटासी ग्रंथा पाववीं ॥३॥

तुझ्या आधारें चक्रपाणी । म्यां हातीं धरिलीं असे लेखणी ।

तरी सर्वदा हृदयस्थ राहोनी । आठव मनीं देयिजे ॥४॥

संत चरित्रें वदतां आतां । तरी सर्वथा हा भार तुझिया माथां ।

न्यून वचन पडिलें अवचितां । तरी संपूर्ण अनंता तूं करी ॥५॥

त्रितापाचें आवर्त पूर्ण । पुढें आलिया अनंत विघ्न ।

त्यावरी धाडोनि सुदर्शन । ग्रंथ निर्विघ्न सिद्धी न्यावा ॥६॥

हे अघटित आळ निश्चिती । घेतली असें म्यां रुक्मिणीपती ।

परीं शेवत करणें तुझ्या हातीं । म्हणोनि महीपती विनवीतसे ॥७॥

मागीले अध्यायीं कथा सुरस । तुकयासि नवतें सावकाश ।

मग लिखित पाठवितां देवास । पंढरीनिवास पातले ॥८॥

सगुण स्वरुपें देऊनि भेटी । तुकयासि आलिंगूनि धरिलें पोटीं ।

येरें चरणीं घातली मिठी । आनंद सृष्टीं न समाये ॥९॥

मग तुकयाचा घरोनियां करा । घरासि आलें सारंगधर ।

मोडकें खोपट असे जर्जर । प्रभंजन भरे दशदिशा ॥१०॥

तुकयासि म्हणे वैकुंठ विहारी । मी क्षुधातुर अंतरीं ।

भोजन इच्छितों पोटभरी । तरी साहित्य लवकरी करावें ॥११॥

अवलीसि विचारी त्या अवसरीं । देवाधिदेव आले घरीं ।

भाजी भोजन घाली सत्वरी । शुद्ध अंतर करोनी ॥१२॥

मग कण्या रांधोनि सत्वरी । आणिक कांहीं भाकरी ।

वाढोनियां पात्रावरी । बैसले हरी जेवावया ॥१३॥

महर्षियाग करितां जाण । तेथें न घे जो अवदान ।

तो निजभक्‍ताचें घरींचें कदन्न । अति आदरें जेवितसे ॥१४॥

यज्ञमुखीं काढीतसे खोडी । तो भिल्लटीची देखोनि आवडी ।

उच्छिष्ट बोरें अति तांतडी । लवड सवडी भक्षीतसे ॥१५॥

दुर्योधनें पक्वान्नें निर्मिलीं फार । तेथें न जायचि सारंगधर ।

धुंडोनि विदुराचें घर । कण्या सत्वर भक्षीतसे ॥१६॥

ऐसा भक्‍तीचा बांधिला देव । जाणती सर्वज्ञ भक्‍त वैष्णव ।

तो तुकयाचा देखोनि निष्काम भाव । कदान्नें पाहाहो जेवितसे ॥१७॥

भावाच्या उपचारें करुन । तृप्त जाहला जगज्जीवन ।

मग मुखशुद्धि तुळसी पान । निजप्रीतीनें अर्पिलें ॥१८॥

यापरी तुकयासि तोषवून । देव पावले अंतर्धान ।

कीं भक्‍त हृदय कमळ पूर्ण । तेथें मिलिंद होऊन बैसले ॥१९॥

आणिक कथा ऐका रसिक । एक ब्राह्मण होता आध्यात्मिक ।

तेणे विवेकसिंधु लेहोनि पुस्तक । वाचितसे देख निजप्रीतीं ॥२०॥

त्यानें तुकयाची कीर्ति ऐकोनि कानीं । धिकारुं लागे आपुलें मनीं ।

मग म्हणे हृदयस्थ देव असोनी । रानोरानीं कां जावें ॥२१॥

ऐसे म्हणवोनी द्विजवर । चित्तीं करीतसे विचार ।

म्हणे विवेकसिंधु ऐकिलियावर । समजले अंतर तुकयाचें ॥२२॥

मग देहुग्रामीं येऊन । तुकयासि पाहे तो ब्राह्मण ।

तो इंद्रायणीचे तीरीं वैष्णव जन । नामस्मरण करीतसे ॥२३॥

होतां तुकयाचें दर्शन । मग परस्परें केलें नमन ।

ब्राह्मण बोले विनीत वचन । निज प्रीतीनें तेधवां ॥२४॥

श्रीमुकुंदराज विरचित । विवेकसिंधु अध्याय ग्रंथ ।

मी पारायण करितों येथ । करा श्रवणार्थ निजप्रीतीं ॥२५॥

त्याचा रक्षावयास मान । प्रेमळ भक्‍त अवश्य म्हणे ।

मग गोदडी आंगावर घेऊन । सर्वांग तेणें झांकिलें ॥२६॥

ब्राह्मणाप्रती बोले वचन । चराचर पाहतां फांके मन ।

यास्तव आम्हीं झांकिले नयन । तुम्हीं पारायण करावें ॥२७॥

ऐकोनि तुक्याचें उत्तर । ग्रंथासि आरंभ करी तो द्विजवर ।

अर्थही सांगे नानाप्रकारें । परी कांहींच उत्तर न बोलती ॥२८॥

एक प्रहर लोटतां निश्चित । तोंपर्यंत वाचिला ग्रंथ ।

परी तुका न हाले न बोले मात । मग ब्राह्मण करित काय तेव्हां ॥१९॥

गोदडी उचलोनि पाहे नयनीं । तों तुकयानें विपरीत केली करणी ।

दोन्हीं बोटें घातलीं कानीं । नामस्मरणीं डुल्लत ॥३०॥

ब्राह्मण विरस चित्तांत । म्हणे दुरी आलों क्रमूनि पंथ ।

एक प्रहर वाचिला ग्रंथ । श्रम व्यर्थ म्यां केले ॥३१॥

तुमची संगती करोनि पाहीं । अर्थ अन्वय कळेल कांहीं ।

तों कान बुजोनि जाहला विदेही । आर्त नाहीं श्रवणार्थी ॥३२॥

ऐसें ऐकोनि वैष्णववीर । स्वमुखें बोले अभंग सत्वर ।

याजसाठीं त्यजूनि घर । वनांतर सेवितों ॥३३॥

नामरुपीं धरिला नेम । माझें दिठावेल प्रेम ।

बुद्धि होईल कीं निष्काम । अहंब्रह्म सम तोची ॥३४॥

याजकारणें अद्वैत वार्ता । कानीं न ऐकें मी सर्वथा ।

विक्षेप होईल देवभक्तां । तो श्रम वृथा करुं नये ॥३५॥

मुखें सांगती आत्मज्ञान । कीं ब्रह्मरुप अवघे जन ।

आणि कवडीसाठीं देतीं प्राण । करिती भांडण बाजारीं ॥३६॥

अवघे ब्रह्मरुप भासलें आहे । तरी गेल्या आल्याची हळहळ काय ।

निर्गुणीं कांहींच बोलूं नये । शब्द ठाय खुंटला ॥३७॥

यालागीं देव भक्तपण । खंडित होय अधःपतन ।

देवें मर्यादा लाविली जाण । त्याप्रमाणें चालिजे ॥३८॥

उदंड ब्रह्मनिष्ठ जाहला जर । तरी ईश्वरी सत्ता अनिवार ।

सृष्टि उत्पति आणि संहार । याचेनी साचार नव्हे कीं ॥३९॥

तिन्ही देव आपुलाल्या गुणें । जोंवरी असती कां सगुण ।

तोंवरी असावें मर्यादेनें । अद्वैत वचन बोलूं नये ॥४०॥

ऐसें सांगतां वैष्णवभक्त । ब्राह्मणा अनुभवें आली प्रचीत ।

सगुण भजनीं त्याचें चित्त । जडलें निश्चित ते समयीं ॥४१॥

करुणापर जें का भाषण । संत बोलिले पुरातन ।

तें गात ऐकत आवडी करुन । मग सर्वांगीं पूर्ण निवाला ॥४२॥

एके दिवसीं लोहगांवकर । गृहस्थ येऊनि थोर थोर ।

तुकयासि घेऊनि गेले सत्वर । कीर्तनगजर । ऐकावया ॥४३॥

पक्वान्नें निर्मोनियां नाना । घालिती विप्रांच्या समाराधना ।

रात्रीं प्रारंभ करिती कीर्तना । भवाब्धि तारणा लागोनी ॥४४॥

तों हुताशनीची लोटतां राती । तो उदयासि पातला गभस्ती ।

तेथें क्षार उदकाची वापिका होती । जीवन न घेती कोणी तिचें ॥४५॥

त्यामाजी येऊनि तुकयानें । अकस्मात केलें सचैल स्नान ।

तत्काळ गोड जाहलें जीवन । चमत्कार दारुण अद्यापि हा ॥४६॥

कांसारविहीर नाम तीस । लोहगांवी अद्यापि असे ।

निजभक्तांचा कीर्ति घोष । पंढरीनिवास वाढवी ॥४७॥

तेथें एक ब्राह्मण भक्तवैष्णव । तुकयाचे ठायीं त्याचा भाव ।

कीर्तनघोष ऐकतां अपूर्व । प्रपंच सर्व टाकूं पाहे ॥४८॥

स्वरुपें सुंदर त्याची कांता । द्वेष उपजला तिच्या चित्ता ।

म्हणे वेडा केला माझा भर्ता । कसूनि आतां यासि पाहूं ॥४९॥

भ्रतार गांवासि गेलिया जाण । कडू भोंपळे रांधिले तिणें ।

मग तुकयासि मंदिरीं आणून । म्हणे करावें भोजन ये ठायीं ॥५०॥

रसना जिंतोनि वैष्णव भक्त । इंद्रिय नेम केला निश्चित ।

कडू गोड न कळेचि त्यातें । विदेह स्थित म्हणवोनी ॥५१॥

बहुत गोड जाहली शाक । ऐसें म्हणतां वाढी आणिक ।

तुकयासि जेवूनि जातां देख । तों वैकुंठनायका क्षोभला ॥५२॥

तिच्या सर्वांगासि भलीं । आवळ्या ऐसीं गुल्में आलीं ।

तींन जातीच औषधें केली । गति फळली कर्माची ॥५३॥

देवाचा द्वेष करितां सदा । तेणें पावले मोक्षपदा ।

परी भक्तद्वेषियासि रौरव सदा । न चुके आपदा तयाची ॥५४॥

लोहगांवीं एक ब्राह्मण । परमभाविक असे पूर्ण ।

सोमवारव्रत त्याजकारणें । तुकयासि आमंत्रण दीधलें ॥५५॥

स्त्रीपुरुश दोघे उभयतां । तिसरें सात्यहि नसेचि देता ।

तों दिव्यांतील तेल सरलें जेवितां । म्हणवोनि चिंताक्रांत मनीं ॥५६॥

कोरडी पडली असे वात । आतां कोण जाईल बाजारांत ।

देखोनि तुका प्रेमळ भक्‍त । काय बोलत तयासी ॥५७॥

रिता बुधला घरांत । म्हणे तेल असेल पहा त्यांत ।

मग घरस्वामीण विलोकित । तों स्नेह आंत बहु दिसे ॥५८॥

तें दिव्यास आणूनि तत्काळ घालितां । हर्षे आनंदलीं उभयतां ।

जेथें देवभक्‍तांची आस्था । तरी सिद्धि समस्ता आंदण्या ॥५९॥

तीं उभयतां होतीं जोंवर । स्नेह सरलें नाहीं तोंवर ।

आणिक एक चमत्कार । ऐका सादर भाविकहो ॥६०॥

शिरळ होती पाटलाचें द्वारीं । तुकाराम बैसती तिजवरी ।

तों तुंबडीवाला घालितसे फेरी । तो नृत्य करी त्याजपुढें ॥६१॥

एक मासपर्यंत जाण । गांवांत फेरी घातली त्याणें ।

खात्याची घरें फिरोन । लोखंड घेऊन तो आला ॥६२॥

मग येऊनि तुक्या समोर । म्हणतसे माझी तुंबडी भर ।

तयासि म्हणे वैष्णववीर । मिळालें साचार काय आजी ॥६३॥

लोहाचे तुकडे होते जाण । ते शिळेवरी रिचविले त्याणें ।

त्यांचें तत्काळ जाहलें कांचन । म्हणती नेंयी भरोन तत्वर ॥६४॥

याचक संतोष पावोनि चित्तीं । कनक केलें सत्वरगतीं ।

कामनिक लोक आश्चर्य करिती । लोखंड घांसिती शिळेवरी ॥६५॥

परी तें सर्वथा न पालटे जाण । म्हणती परीस नव्हे हा पाषाण ।

तुंबडीवाला सभाग्य पूर्ण । लाधलें धन त्यालागीं ॥६६॥

तुकयाचे जे लागले पाय । ते शीळ अद्यापि तेथेंचि आहे ।

आणि चरित्र वर्तलें काय । ऐकतां तन्मय संतसाधु ॥६७॥

एके दिवशीं वैष्णवभक्‍त । लोहगांवांत कीर्तन करित ।

मंडप उभारिले बहुत । पताका फडकत सभोंवत्या ॥६८॥

तुकयाची सत्कीर्ति ऐकोनि थोर । यात्रा मिळाली दोन सहस्त्र ।

गांवींचे सकळ लहान थोर । श्रवणासि सादर बैसले ॥६९॥

तेथील जोशी भाविक पूर्ण । नित्य ऐके हरिकीर्तन ।

त्याच्या पुत्रासि व्यथा दारुण । होताति प्राण कासाविस ॥७०॥

घरीं टाकोनि त्याजकारणें । श्रवणासि आला तो ब्राह्मण ।

म्हणे होणार तें न चुके जाण । उदास होऊन बैसला ॥७१॥

एक प्रहर लोटतां रात । मुलासि नेती यमदूत ।

कांतेनें उचलोनि तें प्रेत । हरिकिर्तनांत आणिले ॥७२॥

तुकायासि म्हणे ते अवसरीं । यासि सत्वरी उठविशील जरी ।

तरीच विष्णुभक्‍त निर्धारीं । नाहीं तरी दांभिक ॥७३॥

भ्रतार लागला तुझे ध्यानीं । तें पासोनि होतसे हानी ।

आपुल्या संसारासि घातलें पाणी । तैशाच वाणी आम्हां केलें ॥७४॥

हें कीर्तनामाजी येतांचि विघ्न । विक्षेप पावलें सकळांचें मन ।

जैसें पात्रीं जेवितां पक्वान्न । त्यांत विष आणून कालविलें ॥७५॥

ऐसें संकट देखोनि जाण । नेत्र झांकिले तुकयानें ।

मांडिलें पांडुरंगाचें ध्यान । एकाग्र मन करुनियां ॥७६॥

म्हणे जयजयाजी पुराणपुरुषा । भक्तवत्सला वैकुंठाधीशा ।

विश्वव्यापका सर्वसाक्षा । पंढरीनिवासा श्रीविठ्ठला ॥७७॥

तुवां मागें पंवाडे केलें बहुत । ते सत्कीर्ति गाती वैष्णव भक्त ।

ते सत्य करोनि दाखवी येथ । अनुभवें प्रचीत दाखवूनी ॥७८॥

भजनांत विक्षेप जाहला पूर्ण । याहूनि आम्हांसि कोणतें मरण ।

हातीं घेऊनि आतां सुदर्शन । निवारीं विघ्न विठोबा ॥७९॥

जरी तूं न येशील येथ । तरी प्राण मी न ठेवीच सत्य ।

ऐसें म्हणवोनि प्रेमळ भक्‍त । अश्रू वाहत नेत्रांतुनी ॥८०॥

ऐसा धांवा करितांचि तेथ । तत्काळ आले पंढरीनाथ ।

तुकयासि सावध करोनि म्हणत । तूं चिंताक्रांत कासया ॥८१॥

तुजपासीं भक्‍त शिरोमणी । असे अमृत संजीवनी ।

ते उच्चारितां हरिकीर्तनीं । प्राण परतोनी येताल ॥८२॥

ऐसें अश्वासन देतां श्रीहरी । तुकयासि संतोष झाला अंतरीं ।

मग नेत्र उघडोनि ते अवसरीं । सावध करी श्रोतयां ॥८३॥

म्हणे टाळया चुटक्या वाजवोनि हातें । विठ्ठलनामें गर्जा समस्त ।

तेणें महा विघ्ने निवारत । संशय चित्तांत न धरावा ॥८४॥

आज्ञापितांचि वैष्णवभक्‍त । सकळ श्रोते भजन करित ।

नाद ब्रह्मचि मूर्तिमंत । अवतरलें निश्चित तें समयीं ॥८५॥

टाळविणे मृंदंग सुस्वर । विठ्ठलनामे, होतसे गजर ।

टाळ्या चुटक्या वाजती थोर । रंग अपार वोडवला ॥८६॥

एक प्रहर ऐशारीती । सकळ श्रोते भजन करिती ।

तेणेंचि विसरोनि देहभ्रांती । विदेह स्थिती तुकयाची ॥८७॥

कौतुक करी पंढरीनाथ । श्रोते परिसा भाग्यवंत ।

कीर्तनामाजी टाकिलें प्रेत । परतले निश्चित प्राण त्याचे ॥८८॥

उठोनि बैसे हरिकीर्तनीं । भजन करी प्रेमें करोनि ।

सन्निध होती त्याची जननी । ते लागली चरणीं तुकयाच्या ॥८९॥

जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्‍त मंडळी ।

हरिस्मरणीं वृत्ति वेधली । अधिकोत्तर तेधवां ॥९०॥

इतुकें चरित्र वर्तलियावर । रात्र जाहली दोन प्रहर ।

तों श्रीपाद संन्यासी येऊनि थोर । कीर्तनांत समोर बैसले ॥९१॥

नाम महिमा भक्‍तिपर । स्थापीत तेव्हां वैष्णववीर ।

नाम सकळ साधनांत सार । नाम परात्पर परब्रह्म ॥९२॥

कर्माप्रारंभ करितांचि पूर्ण । आधीं केशव नारायण ।

व्यंग पडतां ब्रह्मकर्म । विष्णुस्मरणें पूर्ण होय ॥९३॥

करितां वधूवरांचें लग्न । घटित पाहती छत्तीस गुण ।

शेवटीं लक्ष्मीकांताचें स्मरण । केल्या वांचोन सरेना ॥९५॥

पितृ श्राद्धें सांग आचरती । शेवटीं जनार्दन स्वरुपीं अर्पिती ।

हरिनामावांचोनि निश्चिती । सत्कर्मासि गती असेना ॥९६॥

ऐसें वदोनि प्रेमळ भक्‍त । विठ्ठल नामें गर्जना करित ।

तेथें संन्यासी खळ दोघे होते । ते बोलती कुत्सित एकमेकां ॥९७॥

शूद्र मुखींचें नामस्मरण । हें सर्वथा नायकावें आपण।

ऐसें म्हणवोनि ते दुर्जन । गेले उठोन सत्वर ॥९८॥

शिखा टाकिली बोडुनि । परी अहंता वाढली दशगुणी ।

भक्ताचा द्वेष धरितां मनीं । तरी अधःपतनीं ते जाती ॥९९॥

दादु कोंडदेव मोकासी । पुणियांत होता ते दिवसीं ।

फिर्याद गेले तयापासीं । दोघे संन्यासी श्रीपाद ॥१००॥

सक्रोध होऊनि तये क्षणीं । दंड कमंडलु टाकिला धरणीं ।

मस्तक पिटोनि तये क्षणीं । सांगती गार्‍हाणीं तीं ऐका ॥१॥

तुका शूद्र जातीचा वाणी । त्याणें विपरीत मांडिली करणी ।

भाविक जनांसि घालोनि मोहनी। नामस्मरणीं लाविलें ॥२॥

भक्ति महिमा वाढविला थोर । कर्म मार्ग बुडविला समग्र ।

जातीचा असोनियां शूद्र । करिती नमस्कार ब्राह्मण ॥३॥

तूं तरी देशींचा अधिकारी । यास्तव सांगावया आलों सत्वरी ।

तुम्हां वांचोनि निर्धारीं । आमुचा कैवारी कोण असे ॥४॥

तरी तुक्यासि बोलावूनि येथवर । शिक्षा करावी सत्वर ।

जरी आमुचें नायकशील उत्तर । तरी प्राण सत्वर त्यजूं आम्ही ॥५॥

ऐसा निग्रह देखोनि थोर । दादु कोंडदेव बोले उत्तर ।

तुम्हीं स्वस्थ असों द्या अंतर । तुक्‍यासि येथवर बोलवितों ॥६॥

तुमचा त्याचा प्रतिवाद झालिया । जो हरेल शिक्षा करीन तया ।

ऐसें श्रीपादासि बोलोनियां । दूत लवलाह्या पाठवित ॥७॥

लोहगांवच्या ब्राह्मणांला । पन्नास रुपये लिहिला मसाला ।

कीं संन्यासी आले सांगावयाला । पत्रीं लिहिला वृत्तांत ॥८॥

दादु कोंडदेवाचे भृत्य । लोहगांवासि आले त्वरित ।

ब्राह्मण गोळा करुनि समस्त । मग पत्र देत त्यां हातीं ॥९॥

ऐसें अरिष्ट देखोनि निश्चिती । अधीरासि भय उपजलें चित्तीं ।

म्हणती कैसी होईल गती । म्हणवोन कांपती थरथरां ॥११०॥

हा तुक्यासि कळतां वृत्तांत । सकळ ब्राह्मणासि अभय देत ।

शिरीं असतां पंढरीनाथ । चिंता किमर्थ करावी ॥११॥

विप्रांसि म्हणती किंकर । मसाला भरोनि द्यावा शीघ्र ।

तेथेंचि जाऊं चला सत्वर । अवघे द्विजवर बोलती ॥१२॥

निग्रह करावा जरी त्याणीं । तरी तुक्याची प्रतिष्ठा बहुत जनीं ।

राजा येतसे लोटांगणीं । हें सकळां लागुनी विदित ॥१३॥

मग टाळ विणें मृदंग दोन । सवें धृपदी चौघेजण ।

दिंडया पताका उभारुन । करीत कीर्तन चालिले ॥१४॥

गांवींचे ब्राह्मण सकळ लोक । पाहावयासि आले कौतुक ।

मग येऊनि पुणियाच्या सम्यक । संगमीं सकळिक उतरले ॥१५॥

स्नानें करुनि सकळिकांनीं । नित्य नेम सारिले कोणी ।

मग बैसोनि तुक्याचें कीर्तनीं । सादर श्रवणीं ऐकती ॥१६॥

घ्यावया तुकयाचें दर्शन । आणिक यात्रा आली दुरोन ।

समुदाय एकवट होतां जाण । दिसतसे सैन्य उतरलें ॥१७॥

कीर्तनगजर ऐकती प्रीती । गांवींचे लोक दर्शनासि येती।

पूजेचें साहित्य नानारीतीं । भाविक आणिती तबकांत ॥१८॥

केळें नारिकेळें खर्जुर । बुका तुळसी सुमनहार ।

पुढें ठेवूनियां सत्वर । करिती नमस्कार सद्भावें ॥१९॥

मोकासी जाऊनि उपरीवरी । बाहेर विलोकोनी पाहे सत्वरी ।

म्हणे कोणाचें सैन्य दिसतें दूरी । म्हणवोनि विचारी भृत्यातें ॥१२०॥

ते म्हणती लोहगांवकरी तुका विष्णुभक्त । संगमी येऊनि कीर्तन करित ।

गांवींचे लोक मिळोनि समस्त । दर्शना जात तयाच्या ॥२१॥

ऐसा वृत्तांत ऐकोनि । दादु कोंडदेव द्रवला मने ।

म्हणे आपणही पूजा घेऊनि त्वरेनें । घ्यावें दर्शन तुकयाचें ॥२२॥

ऐसें म्हणवोनि चित्तासी । चालिला गांवीचा मोकाशी ।

तों आडवे येऊनि संन्यासी । म्हणती हें काय करिसी अधिकारिया ॥२३॥

तूं सर्वस्व आमुचा कुंबसा । हा धरिला होता भरंवसा ।

आणि त्याच्या दर्शना जातेसि कैसा । तरी आमुची आशा व्यर्थ गेली ॥२४॥

ऐसें बोलतां संन्यासी । प्रतिउत्तर देत मोकाशी ।

जनांबरोबर दर्शनासी । जाणे आम्हांसी असत्य ॥२५॥

तुकयासि भेटोनि ये अवसरी । गांवांत घेऊनि येतों सत्वरी ।

तुम्हीं तयासी जिंतिलें जरी । तरी शिक्षा बरी त्यासि लावूं ॥२६॥

अथवा त्याणें तुम्हांसि जिंतिलें जरी । तरी मर्यादा न धरीं अणुमात्र ।

स्वस्थ असों आपुलें अंतर । बळकट विचार करोनि ॥२७॥

इतुकें श्रीपादासी बोलोनि उत्तर । पूजेचें साहित्य घेतलें सत्वर ।

सवें गृहस्थ थोर थोर । तुकयासि सत्वर भेटले ॥२८॥

टाळ विणे मृदंगघोष । कीर्तनीं ओतला प्रेमरस ।

नृत्य करिती विष्णुदास । परी त्या सुखास पार नाहीं ॥२९॥

श्रीहरि चरित्र नाना लीला । गातां सद्गदित होतसे गळा ।

आनंदें अश्रु येती गळा । पाझर खळा तत्काळ ॥१३०॥

तों कौतुक वर्तलें ते अवसरीं । सादर ऐकिजे भक्त चतुरीं ।

एक नग्न दिगंबर जटाधारी । कीर्तनाभीतरी प्रगटला ॥३१॥

तेजें लखलखीत दिव्य कांती । त्यावरी चर्चिली दिव्य विभूती ।

तुक्यासि आलिंगन देवोनि प्रीतीं । घातलें क्षितीं दंडवत ॥३२॥

तुक्याप्रती बोले उत्तर । दर्शनाची आस्था फार ।

मनोरथ पुरले समग्र । इतुकें उत्तर बोलिला ॥३३॥

ऐसें म्हणवोनि तुक्यासि । निराळ मार्गे जाय तापसी ।

लोक बैसले कीर्तनासी । ते कौतुक दृष्टीसीं पाहती ॥३४॥

एकमेकासीं बोलती काय । हा तरी कैलासवासी होय ।

एक म्हणती दत्तात्रेय । परी प्रत्यया न ये सर्वथा ॥३५॥

संन्यासी होते ते समयीं । त्यांणीं पुसावें जों कांहीं ।

हें चरित्र देखोनियां तिहीं । कुंठित सर्वही ते झाले ॥३६॥

ब्रह्मरस ओतला निखळ । राहिली सकळांची तळमळ ।

म्हणती धन्य तुका वैष्णव प्रेमळ । वैकुंठपाळ साह्य यासी ॥३७॥

विठ्ठलनामें गर्जोनि प्रीतीं । मग उजळिली मंगळारती ।

ओवाळूनि रुक्मिणीपती । खिरापती वांटिल्या ॥३८॥

खर्जूर केळें आणि साखर । वांटिल्या नानाप्रकार ।

म्हणती आजि धन्य सुदिन थोर । जाहला उद्धार सकळांचा ॥३९॥

दादु कोंडदेव सन्निध येऊन । तुक्यासि विनीत बोले वचन ।

आतां नगरामाजी येऊन । सनाथ करणें मजलागीं ॥१४०॥

देखोनि तयाचें आर्त । मान्य करीत वैष्णवभक्त ।

संन्यासी मनीं चिंताक्रांत । म्हणती प्रांत बरा नाहीं ॥४१॥

तुक्याचा व्हावया अपमान । यास्तव सांगीतलें गार्‍हाणें ।

तों अधिकचि कीर्ति वाढली जाण । उपाय कोण करावा ॥४२॥

असो आतां ते अवसरी । तुक्यासि नेलें नगरांतरीं ।

हवेली थोर पाहूनि बरी । ठाव सत्वरी दीधला ॥४३॥

लोहगांवकर ब्राह्मण । मसाला करोनि आणिले जाण ।

त्यांस बहुत सन्मानें । साहित्य आणून दीधलें ॥४४॥

नगरवासी सावकार । त्यानें साहित्य केलें फार ।

तुक्याच्या पंक्तीसि दोन सहस्त्र । जेविले द्विजवर ते दिवसीं ॥४५॥

तृतिय प्रहर येतां निश्चित । मग कीर्तनासि प्रारंभ करित ।

दादु कोंडदेव संन्याशांसि म्हणत । आतां घालिजे वादार्थ तुक्यासी ॥४६॥

जो हरीस येईल दोघांतुन । त्यासि मी रासभावरी बैसवीन ।

संन्यासी म्हणती न लागतां क्षण । त्याजकारणें जिंतूं आम्ही ॥४७॥

आणिक खळ कुटिल कोणी । त्यांसी आणिलें बोलावून ।

कावळ्याचा शब्द ऐकोनि कानीं । स्वयात धांवोनी येतसे ॥४८॥

कीं सारमेय शब्द करितां जाण । भुकों लागती गांवींचे श्वान ।

कां कीं विष्णु द्रोही दशानन । त्यासि कुंभकर्ण पाठिराखा ॥४९॥

कां दुर्योधनाचे प्राणसखे । शकुनि शिशुपाळ पाठिराखे ।

तैसे संन्याशांनीं साह्य देख । पंडित वादक मेळविले ॥१५०॥

एक्याचि मतें ते समयीं । कीर्तनांत येऊनि बैसले पाहीं ।

परी द्वेष वार्ता तुक्यासि नाहीं । नमन सर्वाही करितसे ॥५१॥

वक्‍त्यांच्या संमुख जाण । श्रीपाद बैसती प्रतिष्ठेनें ।

विष्णु भक्ताच्या द्वेषें जाण । पदरींचें पुण्य वेंचिती ॥५२॥

विठ्ठलनामें गर्जोनि हाका । कीर्तनासि प्रारंभ करी तुका ।

सावध करीत सकळ लोकां । वैकुंठ नायका भजावें ॥५३॥

प्रहर घटिका पळापळ । आयुष्य भक्षितो महाकाळ ।

जैसा उंदीर सांडोनि निघतां बिळ । बोका तत्काळ भक्षी तयां ॥५४॥

कां व्रतस्थ करितां एकादशी । राताळें घातलीं शिजावयासी ।

पाकासि येतां क्षुधित यासी । देहासी काळ जपे ॥५५॥

कां असावध जाळीं असतां मीन । परी बक सन्निध करितो ध्यान ।

केव्हां गिळील न कळे जाण । आकळ विंदान काळाचें ॥५६॥

जें जें भासतें सृष्टीसी । परिणामीं नाश असे त्यासी ।

याचें निवारण व्हावयासी । तरी श्रीहरीसी शरण जावें ॥५७॥

न करितां श्रीहरींची भक्ती । तरी सर्वथा जन्म मृत्यु न चुकती ।

साधनें केली नानारीतीं । परी पुनरावृत्ती चुकेना ॥५८॥

सकाम अथवा निष्काम । वाचेसि जपतां श्रीहरीचें नाम ।

तयासि गांजूं न शकेचि यम । पुरुषोत्तम पाठिराखा ॥५९॥

अजामिळ ब्राह्मणसुत । तो वृषलींसी जाहला रत ।

तेणें पापाचें पर्वत । जोडले बहुत संसारी ॥१६०॥

त्याचा स्पर्श व्हावया निश्चिती । महातीर्थे कांपती ।

सप्त नरक तेहीं भिती । प्रायश्चितीं मोकलिला ॥६१॥

तो अकस्मात ऋषि समर्थ । तयासि भेटले अवचित ।

मग अनुताप धरोनि मनांत । तयांसि वृत्तांत सांगितला ॥६२॥

ऐकोनि म्हणती साधुजन । पुत्रावरी ममता तुझी पूर्ण ।

याचें नाम नारायण । आळवीं ठेवून निजप्रीती ॥६३॥

ऐसें सांगोनि तयासी । साधु गेले तीर्थवासी ।

अंतकाळ येतांचि देहासी । अजामिळ पुत्रासी पाचारी ॥६४॥

नारायणा जवळ ये म्हणतां । करुणा आली वैकुंठनाथा ।

दिव्य विमान पाठवूनि तत्त्वतां । मुक्‍ति सायुज्यता भोगवी ॥६५॥

शुकमिषें राघो म्हणतां होंटीं । गणिकेसी नेलें वैकुंठीं ।

नक्रें गज्रेंद करितां कष्टी । त्यासि सोडवी जगजेठी निजांगें ॥६६॥

कढयींत घातलें मंडुक सान । तळीं पेटविला कृशान ।

मग संस्कारें स्मरे कृष्ण । तेणें उदक उष्ण नव्हेची ॥६७॥

अशरीरिणी वदतसे ते वेळ । कढयींतूनि काढा मंडूकबाळ ।

उदक तापेल तत्काळ । लोक सकळ ऐकती ॥६८॥

विष्णु विमान येऊनि सत्वर । दिव्यदेही केला दर्दुर ।

वैकुंठीं ठेविला निरंतर । विश्वोद्वारें तेधवां ॥६९॥

कळिकाळ हा दुर्धर देख । तेथें श्रीहरीचें नाम तारक ।

यावीण साधन श्रेष्ठ आणिक । म्हणे तो मूर्ख नाडला ॥१७०॥

ऐसें म्हणवोनि भक्‍त प्रेमळ । हांसोनि गर्जतसे वेळोवेळ ।

विठ्ठलनामें घोष प्रबळ । श्रोते सकळ करिताती ॥७१॥

टाळ्या चुटक्यांच्या नादें । घोष होतसे ब्रह्मानंदे ।

विसरोनि भेदाभेद द्वंद्व । दिसे गोविंद सर्वत्र ॥७२॥

तैसा आनंद कीर्तनीं होतां । तों अद्भुत नवल वर्तली कथा ।

संन्यासी उठोनि उभयतां । तुक्यासि तत्त्वतां नमस्कारिती ॥७३॥

दादु कोंडदेव म्हणतसे त्यांस । स्वामी हें अनुचित करितां कैसें ।

नमस्कार केला तुक्यास । शब्द ब्राह्मणांस ठेविता ॥७४॥

आणि तुम्हींच कैसे पाया पडता । तरी मी शिक्षा लावीन आतां ।

खोटेपण आलें तुमच्या माथां । न्याय विचारितां आम्हांसी ॥७५॥

संन्यासी तयासि उत्तर देती । नारायणस्वरुप तुक्याची कांती ।

प्रत्यक्ष देखिली चतुर्भूज मूर्ती । म्हणवोनि प्रीतीं नमस्कारिलें ॥७६॥

मोकासीस क्रोध अंतरीं । म्हणे तुझी दुर्बुद्धि वेषधारी ।

मसाला लेहविला माझे करीं। किमर्थ निर्धारीं मज सांगा ॥७७॥

म्हणवोनि दुराग्रह मांडिला त्यानें । बैसावयासि खर आणविले दोन ।

म्हणे शिरीं पांच पाट काढोन । यांसि हिंडवणें नगरांत ॥७८॥

ऐसा प्रसंग पाहोनियां । तुकयारामें वर्जिलें तया ।

म्हणे वेष विटंबूं नये वायां । हें पंढरीराया न माने ॥७९॥

ऐसें सांगतां तुका तयासी । मग निवांत राहिला मोकासी ।

येर्‍हवीं निग्रह करितां त्यासी । वर्जावयासी कोणी नसे ॥१८०॥

येच विषयीं एक आतां । दुष्टांतीं आली आड कथा ।

दादु कोंडदेव उपाहार करितां । गेली निजकांता बाहेरी ॥८१॥

लवणशाक सन्निध होती जाण । ती आपुल्या हातें घेतली त्यानें ।

कांता विनोदें येऊन म्हणे । अनुचित करणें हें केलें ॥८२॥

माझा अधिकार असतां येथ । तरी तुम्हीं कैसा घातला हात ।

आणिकांसि सांगत राजनीत । आणि तुम्हीं विपरीत का केलें ॥८३॥

ऐकोनि कांतेचिया बोला । पाईक तात्काळ पाचारिला ।

म्हणे हात तोडून टाका वहिला । अपराध केला थोर याणें ॥८४॥

तेव्हां श्रेष्ठ ब्राह्मण येऊनि पाहे । शास्त्रयुक्‍त सांगती काय ।

आंखूड करावी आंगडयाची बाहे । तरी तोडिला होय कर जाणा ॥८५॥

त्यांची आज्ञा वंदोनि शिरीं । तैसेंच केलें जन्मवरी ।

उणें पीथ भरतां एके अवसरीं । मोलकरीण सत्वरी आणविली ॥८६॥

ते म्हणे म्यां चोरिलें नाहीं । मग जातें उपडिलें ते समयीं ।

पावशेर दाणे निघतां धांवीं । शूळावर पाहीं देतसे ॥८७॥

खालील तळी आणूनि सत्वर । म्हणे सांपडला अन्यायी चोर ।

जातें घातलें शूळावर । लोक सर्वत्र पहाती ॥८८॥

ऐसा न्याय निडर करी सदा । तरी यासि नावडे खोटा धंदा ।

परी तुकयाच्या वचनासि मर्यादा । यास्तव आपदान केली ॥८९॥

असो संत चरित्रें वर्णितां । मध्येंच लागली आड कथा ।

यास्तव उबग न मानिजे श्रोता । नावेक दृष्टांता बोलिलों ॥१९०॥

मग जयजयकार करुनी तेथ । कीर्तनीं गर्जती वैष्णव भक्‍त ।

आरत्या उजळोनि त्वरित । रुक्मिणीकांत ओवाळीला ॥९१॥

नृत्य करितां तये क्षणीं । विठ्ठल नामाच्या उमटती ध्वनी ।

घागरीया मंजुळ वाजती चरणीं । नाद गगनीं कोंदला ॥९२॥

तुका श्रोतयांसि विलोकूनी पाहत । तों विठ्ठलरुपचि दिसती समस्त ।

भेदा भेद मावळला तेथ । श्रीहरि सर्वत्र जगीं भासे ॥९३॥

ऐसी होतां विदेह स्थिती । ध्यानांत आणिली सगुण मूर्ती ।

साष्टांग दंडवत घातलें प्रीतीं । मग खिरापती वांटिल्या ॥९४॥

संताचें रज लागलें क्षितीं । पायधुळी वंदीत महीपतीं ।

खिरापती वाटितां सांडिली क्षिती । ते वेंचोंनि प्रीतीं सेवितसे ॥१९५॥

स्वस्ति श्रीभक्‍तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत संत भक्‍त । अडतिसावा अध्याय गोड हा ॥१९६॥अ० ३८॥ओव्या १९६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP