मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय १९

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

जयजय अनंतशायी करुणाकरा । निजभक्त हृदयारविंद भ्रमरा ।

विश्वव्यापका गुणसमुद्रा । परात्परा जगदुद्धारका ॥१॥

तूं आपल्या दासाचें सगुण चरित्र । स्वयें वदविता राजीव नेत्र ।

मी तरी वक्ता नव्हें स्वतंत्र । असें परतंत्र तुज अधीन ॥२॥

प्रभंजनाच्या योगें जाण । डोले तृणाचें बुझावण ।

तेवीं आमुचे बुद्धिसी होय स्फुरण । तें तुझे सत्तेनें पांडुरंगा ॥३॥

पांवा वाजत नानारीतीं । ऐसें अज्ञान जन बोलती ।

परी वाजिवणारासि नोळखती । अविवेक मती करोनियां ॥४॥

वृक्षासि उर्वीचा आधार । भूमी ऐसे उमटती अंकुर ।

तेवीं मी बोललों उणे पुरें । परी निमित्त समग्र तुजवरी ॥५॥

जये ठायीं उगवला तरु । तेथूनि सर्वथा नयेचि सरुं ।

तेवीं आदिअंतीं आह्मांसि आधारुं । शार्ङगधरु तूं एक ॥६॥

श्रोता वक्ता तूंचि एक सर्व । आणिक पाहतां नसेची ठाव ।

आतां कृपादृष्टीनें पाहोनि देवें । भावार्णव उतरावा ॥७॥

मागिलें अध्यायीं कथा अद्भुत । पंढरीसि जाऊनि एकनाथ ।

भानुदासाचें चरित्र अद्भुत । गायिलें कीर्तनांत निजप्रीतीं ॥८॥

संत-महंत भाविकजन । ऐकोनि संतोष पावलें मन ।

म्हणती धन्य क्षेत्र प्रतिष्ठान । श्रीनाथ दर्शन त्यालागीं ॥९॥

मानवी नव्हेचि एकनाथ । पांडुरंग अवतरला साक्षात ।

कानीं ऐकतांचि आत्मस्तुत । मग सत्वर उठत तेथुनी ॥१०॥

मग देउळीं जाऊनी निजप्रीतीनें । पांडुरंगासि भेटती आपण ।

करोनि ब्राह्मण संतर्पण । देवासि पुसोन चालिले ॥११॥

पंढरीचा महिमा अति विशेष । नाथासि आठवे रात्रंदिवस ।

सत्कीर्ति सांगती लोकांस । मग प्रतिष्ठानास पावले ॥१२॥

नगरासमीप येतां जाण । उद्धवासि कळले वर्तमान ।

क्षेत्रवासी समस्त जन । सामोरे धांवोनि येतसे ॥१३॥

चित्तीं भावोनि पांडुरंगमूर्ती । श्रीनाथासि सद्भावें नमस्कार करिती ।

सप्रेम भावें आलिंगन देती । आनंद चित्तीं न समाये ॥१४॥

दिंडया पताका उभारुनि समस्त । कीर्तन करीत चालले नाथ ।

मार्गी मंडप घसनी होत । जन अद्भुत मिळाले ॥१५॥

ऐशा आनंद गजरें निश्चित्ती । एकनाथ मंदिरीं प्रवेशती ।

मग उजळोनि मंगळारती । रुक्मिणीपती वोवाळिला ॥१६॥

ऐशारीतीं तये वेळे । पंढरीची यात्रा जाहली सुफळ ।

उद्धव सद्गुरुभक्त प्रेमळ । बैसला जवळ ते समयीं ॥१७॥

विष्णु अर्चन पुराण श्रवण । सदावर्त हरिकीर्तन ।

हें सर्वदा चालतसे जाण । एकही न्यून पडेना ॥१८॥

तों प्रतिष्ठान क्षेत्रांत साचार । एक श्रीपाद संन्यासि होता थोर ।

जिंतोनि षड्‌वैरि विकार । परमहंस सत्वर मग झाला ॥१९॥

सर्वभूतीं भगवद्भावो । उणापुरा न दिसेचि ठावो ।

जयासि रंक आणि रावो । ठायांठाव दिसेना ॥२०॥

मशक आणि गज निश्चिती । श्वपच द्विपद सारिखे भासती ।

जे जे दृष्टीसि प्राणी पडती । दंडवत त्यांप्रती घालितसे ॥२१॥

गांवींचें ब्राह्मण परस्परें । म्हणती श्रीपाद हा असतां थोर ।

महंती न धरीच अणुमात्र । करितो नमस्कार सर्वांसी ॥२२॥

अंत्यज अथवा ब्राह्मण । धेनु मार्जार अथवा श्वान ।

सूकर पक्षीयांसि देखोन । सद्भावें नमन करीतसे ॥२३॥

उचनीच वर्ण यात । कांहीं नयेचि चित्तांत ।

मंत्र चळाला असेल सत्य । संचार निश्चित जाहला ॥२४॥

एक म्हणती ज्याचा तोचि जाण । आपुल्यासि काय प्रयोजन ।

परमहंसासि याति वर्ण । नलगे पाहुणें सर्वथा ॥२५॥

क्षेत्रवासी ऐशा रीतीं । कोणी निंदिती कोणी स्तविती ।

परी सुखदुःख सर्वथा नयेचि चित्तीं । विदेहस्थिती तयाची ॥२६॥

परी एक नेम धरीला त्याणें । एकनाथाचें घ्यावें दर्शन ।

एकाग्र करोनि चित्त जाण । ऐकावें कीर्तन निजप्रीतीं ॥२७॥

सर्वभूतीं दंडवत करित । आणि श्रीनाथदर्शन घेत ।

सर्वकाळ संतोष चित्त । स्वानंद भरित मानसीं ॥२८॥

ऐसे लोटतां दिवस बहुत । तों चरित्र वर्तलें एक अघटित ।

दंडवत स्वामी नमस्कारित । स्नानासि येत गंगातीरीं ॥२९॥

तो गंगेंत गाढव बुडालें जाण । तें वाहत आलें गतप्राण ।

पूर गेलिया वोहटून । पडिलें फुगोन वाळुवंटीं ॥३०॥

तंव दंडवतस्वामीं येऊनि तेथें । गर्दभ प्रेतासि नमस्कारित ।

देखोनि ब्राह्मण हांसती समस्त । चैतन्य यांत नसे कीं ॥३१॥

तुम्हीं स्वामी सर्वज्ञ मूर्ती । नमस्कार केला कवणाप्रती ।

ऐकोनि द्विजांची वचनोक्ती । मग ते पाहती विलोकुनी ॥३२॥

तों सत्यचि मारोनि पडिलें प्रेत । पोट फुगलें असें बहुत ।

ब्राह्मण म्हणती जरी उठवाल प्रेत । तरी सत्वभावार्थ तुमचा ॥३३॥

तुम्ही आत्मवत मानूनि हे जगती । नमस्कार करितां सर्वांभूतीं ।

गर्दभ उठवाल निश्चिती । तरी सत्यप्रतीती हे मानूं ॥३४॥

द्विजाचे वचन ऐकोनि ऐसें । मग काय बोलत परमहंस ।

चराचरीं आत्मा व्यापक असे । प्रार्थिले तयास तये वेळीं ॥३५॥

म्हणे देवाधिदेवा पंढरीराया । तुम्ही सांडिलें याचीया ठाया ।

प्रेतरुप दिसे गदर्भाची काया । तरी दंडवत वाया गेलें कीं ॥३६॥

इतुकें वचन बोलतां तेथें । तों चरित्र वर्तलें एक अघटित ।

गर्दभाचें प्रेत पडिलें होतें । तें झालें जिवंत ते समयीं ॥३७॥

फुरफुरोनि झाडिले नाक कान । उभें ठाकलें न लगतां क्षण ।

देखोनि आश्चर्य करिती ब्राह्मण । म्हणती हें विंदान अघटित ॥३८॥

अहंता टाकोनि द्विजवर । तयासि करिती नमस्कार ।

पहावया मिळाले लोक फार । भरलें समग्र वाळवंट ॥३९॥

दंडवत्याची सिद्धाई थोर । देखोनि विस्मित नारीनर ।

म्हणती याज ऐसा सत्पुरुष थोर । पृथ्वीवर दिसेना ॥४०॥

एकमेकासि ब्राह्मण बोलत । नाहीं तरी गांवींचा एकनाथ ।

नित्य कीर्तन प्राकृत । जन समस्त भोंदिले ॥४१॥

मृत प्रेत उठवावयासी । हें तों सामर्थ्य नसेचि त्यासी ।

कोरडेंच ज्ञान भाविकांसी । नित्य उपदेशी स्वमुखें ॥४२॥

ऐसी निंदा द्विज जल्पत । तों श्रीनाथ पातलें तेथ ।

ब्रह्मयज्ञ करावया निमित्त । सहज येत गोदातीरीं ॥४३॥

विप्र देखोनि त्यांजकारणें । कुटिळ शब्द बोलती पूर्ण ।

दंडवत्याचे करिती स्तवन । धन्य धन्य म्हणताती ॥४४॥

चमत्कारावीण निश्चित । सत्पुरुष म्हणवणें तें व्यर्थ ।

जिणें वागवितां जनांत । अश्लाघ्य निश्चित तें दिसें ॥४५॥

ऐसें बोलोनि द्विज समस्त । आपुल्या घरासि जात ।

तों दंडवतस्वामी येऊनि तेथ । लोटांगण घालित श्रीनाथा ॥४६॥

दृष्टीसि देखोनि यतीश्वर । सद्भावें करिती नमस्कार ।

मग एकनाथ तयासि बोलती उत्तर । आज उपाधि थोर वाढविली ॥४७॥

आधींच कलियुग अमंगळ जाण । विकल्प द्वेषें भरलें जन ।

त्याहीवरी राजा यवन । योगासि विघ्न दिसताहे ॥४८॥

तुमची सिद्धाई ऐकोनि कानीं । मग तो रक्षील बंदिखानीं ।

घरचें मनुष्य मरतां कोणी । जिवंत क्षणीं ते करवील ॥४९॥

कामनिक जन हे सर्वत्र । भूत-भविष्य पुसतील फार ।

तेणें तुमच्या स्थिती पडेल अंतर । यासि विचार कोणता ॥५०॥

ऐसें नाथाचें वचनामृत । दंडवत्यासि मानलें निश्चित ।

मग नाथासि विनवीत । समाधि त्वरित मज देई ॥५१॥

मग श्रीनाथ तयासि देती उत्तर । समाधि घेतां तरीच बरें ।

मग कामाठी बोलावूनि सत्वर । खाणविली गार त्यां हातीं ॥५२॥

त्यांत विदेही बैसतां निश्चिती । पूजा करोनि लोटिली माती ।

श्रीनाथें करोनि स्नान मागुतीं । स्वगृहाप्रती ते आले ॥५३॥

दंडवत जाहले समाधिस्त । हा क्षेत्रांत कळला वृत्तांत ।

ब्राह्मण मिळोनिया समस्त । काय बोलत परस्परें ॥५४॥

पंडित वैदिक धर्माधिकारी । नाथासि बोलाविती पिंपळेंश्वरीं ।

म्हणती आम्हासि नेणतां निर्धारीं । अघटित परी त्वां केली ॥५५॥

गंगेमाजीं खाणोनि गार । जितची पुरिला यतीश्वर ।

कोण बोलिलां तेथें मंत्र । अविधि साचार कर्म केलें ॥५६॥

बळेंचि समाधि घ्या म्हणतां । तो परमहंस पुरिला आतां ।

तरी तुजवरी निश्चित आली हत्त्या । बहिष्कार तत्वतां तुज आतां ॥५७॥

बळेंचि संन्यासी टाकावा पुरोन । हें कोणते शास्त्रीं लिहिलें वचन ।

तरी तें दाखवी आम्हाकारणें । सकळ ब्राह्मण बोलती ॥५८॥

त्याणें मृत गाढव उठविलें सहज । हें तों सिद्धाई न सोसवे तुज ।

म्हणोनि संन्यासी मारिला आज । हें अंतरगुज आम्हीं जाणों ॥५९॥

एक म्हणती धीट मोठा । भागवतधर्मीं अति गाढा ।

निषेधूनि सत्कर्म वाटा । सिद्धांत पेठा वसवितो ॥६०॥

एक म्हणती टाणींटोणीं । कांहीं जाणतो मंत्र मोहिनी ।

नुसतें कोरडें नाम गाउनी । भाविक भोंदुनी नागविले ॥६१॥

एक उद्धट बोलती स्पष्ट । हा तरी निश्चित कर्मभ्रष्ट ।

वेदाज्ञेची मोडूनि वाट । अकर्म अचाट करीतसे ॥६२॥

संन्यासी मारुनि केला खून । तरी उद्विग्न नव्हेचि याचें मन ।

आनंदयुक्‍त करितो भजन । कठीण पाषाण ज्यापरी ॥६३॥

आपुल्या आंगीं नसतां करणी । ज्ञान सांगतो लोकांलागुनी ।

दया उपजली नाहीं मनीं । संन्यासी मारुनि टाकिला ॥६४॥

ब्राह्मण म्हणती एकनाथा । ही हत्त्या पडिली तुझिया माथा ।

तरी चमत्कार दाखवूनि आतां । बहिष्कार परता निरसीं कां ॥६५॥

प्रत्यक्ष पाषाण नंदी तेथें । हा कडबा भक्षीला तुझिया हातें ।

तरी तुज दोष नसें किंचित । घातलें वाळींत तें काढूं ॥६६॥

ऐकूनि द्विजवरांची वाणी । विनित माथा ठेविला चरणीं ।

म्हणे स्वामीच्या निघालें मुखांतुनी । ते असत्य करणी कदा नव्हे ॥६७॥

पूर्वी वसिष्ठाचिया कृपादृष्टीं । सूर्यासमान तपलीकाठी ।

ब्राह्मणाची असत्य गोष्टी । कदापि जगजेठी करीना ॥६८॥

ब्राह्मण बोलती प्रत्युत्तर । लापणिका बोलतोसि फार ।

आम्हांसि दाखविसी चमत्कार । तरी सत्य उत्तर हें मानूं ॥६९॥

एकनाथाच्या पुढें त्वरेने । कडब्याची पेंढी ठेविली आणुन ।

ऐसा ब्राह्मणांचा आग्रह देखोन । नंदीसि वचन बोलती ॥७०॥

आम्हीं आजी आपुल्या मतें । संन्यासी बैसविला समाधींत ।

याचा दोष नसला किंचित । तरी भक्षी त्वरित करवडें ॥७१॥

ऐसीं श्रीनाथमुखींचीं अक्षरें । निघतांचि कौतुक वर्तलें थोर ।

पाषाण नंदीनें सत्वर । जिव्हा बाहेर काढिली ॥७२॥

कडब्याची पेंढी उचलोनि होंटीं । तत्काळ भक्षिली उठाउठी ।

सकळ ब्राह्मण देखोनि दृष्टीं । आश्चर्य पोटीं करिताती ॥७३॥

मग काय बोलती नाथजीला । बहिष्कार घातला होता तुजला ।

तो आजिपासूनि मुक्‍त जाहला । चमत्कार दाखविला म्हणोनि ॥७४॥

ऐकोनि द्विजवरांचें उत्तर । घातला साष्टांग नमस्कार ।

म्हणे मी मूढमति साचार । वेद-शास्त्र विचार तो नाहीं ॥७५॥

सेवूनि तुमचे चरणतीर्थ । तेणेंचि होतों पुनीत ।

तुमचे पायीं तीर्थ व्रतें । सिद्धि समस्त असती ॥७६॥

ब्राह्मण म्हणती तये वेळां । हे अघटित नाथें दाखविली लीला ।

अभ्यासें न साधे हे कळा । नवल सोहळा भक्‍तीचा ॥७७॥

मागें गुरुदास्य संत सेवन । सप्रेम केलें श्रीहरि भजन ।

तेणें पांडुरंग जाहला सुप्रसन्न । रक्षितो क्षणक्षणां यालागीं ॥७८॥

नेसें बोलोनि परस्परें । घरासि गेले अवघे द्विजवर ।

क्षेत्रांत कळतां समाचार । नवल साचार लोक करिती ॥७९॥

भाविक प्रेमळ जे निश्चिती । ते एकनाथाची करिती स्तुति ।

म्हणती विश्वोद्धार करावयाप्रतीं । वैकुंठपती अवतरला ॥८०॥

विकल्प द्वेषी जे कां नर । ते म्हणती असत्य उत्तर ।

क्षेत्रांत राहिले जे द्विजवर । ते आले सत्वर पिंपळेश्वरा ॥८१॥

नंदी पाहती विलोकून । तंव तो पूर्ववत पाषाण ।

म्हणतीं कैसा कडबा भक्षिला याणें । आम्हांकारणें न भासे ॥८२॥

मग एकनाथासि बोलावूनि त्यांणीं । म्हणती बहिष्कार असे तुजलागूनी ।

चरित्र दाखविले कालचे दिनी । तें आम्हीं सर्वांनीं न पाहिलें ॥८३॥

तूं प्रत्यक्ष असतां येथें निश्चितीं । आम्हीं नायको लोक म्हणती ।

मग पेंढीं आणोनि पुढें ठेविती । म्हणती नंदीप्रती हे चारी ॥८४॥

हें आम्हासि न दाखवीसी जर । तरी वादासि प्रवर्ते शास्त्राधार ।

जीत संन्यासी पुरला खरें । तो अभिशाप निर्धारीं तुजवरी ॥८५॥

ऐकोनि द्विजांची वचनोक्‍ती । नाथसि संकट पडलें चित्तीं ।

मग नंदीस प्रार्थना तेव्हां करिती । ते सादर श्रोतीं ऐकिजे ॥८६॥

आतां नित्य साचार । तूं कडबा भक्षिसी कोठवर ।

आणिक क्षेत्रवासी धरामर । गावांत फार राहिले ॥८७॥

तरी तेहि उदईक येऊनि तेथें । यांज ऐसेंचि म्हणतील मातें ।

तरी सकळांचा संशय निवृत्त । होय तो उपाय त्वरित योजावा ॥८८॥

ऐसीं नाथमुखींचीं उत्तरें । निघतांचि चरित्र वर्तलें थोर ।

दृष्टीसि पाहती धरामर । आणिकही इतर नरनारी ॥८९॥

पाषाण नंदी ते तमयीं । उठोनि चालिला लवलाहीं ।

उडी टाकिली गंगेचे डोहीं । अद्यापि ते ठायीं तो असे ॥९०॥

पूर्वी ऐसें कौतुक देखोनि थोर । आश्चर्य करिती धरामर ।

म्हणती याचा महिमा अगोचर । मानवी चरित्र हे नव्हे ॥९१॥

पूर्वी आमच्या वडिलींसाचार । तेथें देखिला ज्ञानेश्वर ।

त्याणें रेडया हातीं सविस्तर । श्रुति समग्र वदविल्या ॥९२॥

आणि चांगदेवसिद्ध भेटीसि येत । तेव्हां निर्जीव चालविली भिंत ।

तैसेंच केलें एकनाथें । चरित्र अद्भुत ये समयीं ॥९३॥

ऐसें बोलोनि परस्परें । एकनाथासि बोलती उत्तर ।

आतां तुज नसेचि बहिष्कार । जावें सत्वर निज मंदिरीं ॥९४॥

धन्य तुझा सप्रेमभाव । पाषाण नंदीसि आणिला जीव ।

तुजसी प्रसन्न देवाधिदेव । हा कळला अभिप्राव आम्हांसी ॥९५॥

ऐसी ऐकोनि त्यांची स्तुत । श्रीनाथ सद्भावे चरणीं लागत ।

म्हणे हें तो तुमच्या कृपेचें सामर्थ्य । मी शरणागत सर्वांत ॥९६॥

ऐसे एका जनार्दन । बोलतां द्विजांसि समाधान ।

पैठणींचे लोक थोर लहान । नंदी येऊन पाहती ॥९७॥

अद्यापि ते स्थळीं नंदी आहे । जेव्हां सिकता निघोनि आज ।

तेव्हां प्रत्यक्ष दिसताहे । चित्तीं संशय न धरावा ॥९८॥

श्रीनाथ घरासि गेलियावर । भाविकांसि संतोष वाटला फार ।

दिवसंदिवस अधिकोत्तर । सत्कीर्ति थोर प्रगटली ॥९९॥

तंव कोणे एके अवसरीं । श्रीनाथ चालिले अळंकापुरीं ।

सच्छिष्य उद्धव ठेविला घरीं । मग सहपरिवारीं निघाले ॥१००॥

सत्संगतीचेनि आधारें । सवें यात्रा निघाली फार ।

सप्रेम ऐकोनि कीर्तन गजर । मार्ग साचार क्रमिती ॥१॥

श्रीनाथ येऊनि आळंदी । उतरले इंद्रायणीचे तीरीं ।

तों ज्ञानदेव येवोनि स्वप्नांतरीं । काय रात्रीं सांगीतले ॥२॥

अजान वृक्षाची मुळी निश्चित । आली असे कंठपर्यंत ।

तरी एक सवें लाविजे तीतें । समाधि त्वरित उकरोनी ॥३॥

मग श्रीनाथें तैसेंचि केलें । तो ज्ञानदेवाचें दर्शन जाहलें ।

साष्टांग प्रणाम करोनि भले । मुळीसि लाविलें एकीकडे ॥४॥

मग समाधिसि बुजावोनि सत्वर । ते स्थळीं केला कीर्तनगजर ।

एकादशी हरि जागर । यात्रा समग्र करीतसे ॥५॥

तेव्हां अळंकापुरी उजाड बहुत । शिधासाहित्य न मिळे तेथें ।

मग कौतुक केलें पंढरीनाथें । तें ऐका निजभक्त भाविकहो ॥६॥

दीनदयाळ रुक्मिणीकांत । होतसे कानडा लिंगाईत ।

पाल देऊनि बैसले तेथ । सर्व साहित्य घेऊनियां ॥७॥

यात्रेकर्‍यांसि म्हणे ते समयीं । सर्व सामग्री घेऊनि जावी ।

द्रव्य आतांचि मागत नाहीं । जाणतसों पाहा एकनाथा ॥८॥

ऐसें म्हणोनि रुक्मिणीकांत । सर्व साहित्य मोजूनि देत ।

कणीक कडाळ तांदूळ घृत । शाकेसहित लवणांतें ॥९॥

ऐसे चार दिवस लोटतां निश्चित । अदृश्य जाहले जेथील तेथ ।

आपुल्या दासाचें कृपावंत । न्यून किंचित पडों नेदी ॥११०॥

मग एकनाथापासी येउनि । यात्रेकरी सांगती तयेक्षणीं ।

उचापत आणिली तों वाणी । आजि ये ठिकाणी दिसेना ॥११॥

ऐसें तयांनी पुसतां सहज । नाथासि कळलें अंतरगुज ।

म्हणें हें काय केलें गरुडध्वजें । जो राखितसे लाज भक्ताची ॥१२॥

ऐशारीतीं त्या अवसरा । यात्रा करोनि चालिले घरा ।

समीप येतां प्रतिष्ठान क्षेत्रा । उद्धव सामोरा येतसे ॥१३॥

क्षेत्रवासी नारीनर । भाविक लोक येऊनि फार ।

श्रीनाथासि करिती नमस्कार । सप्रेमभरें करोनियां ॥१४॥

गरुड टक्याचें भार । दिंडया-पताका उभारुनि समग्र ।

करीत चालिले कीर्तन गजर । ज्ञानदेव चरित्र वर्णिताती ॥१५॥

टाळवीणे मृदंग घोष । नादब्रह्मचि आले मुसे ।

आनंदें नाचती हरीचे दास । धन्य दिवस सुदिन तो ॥१६॥

ऐशारीती ते अवसरी । कीर्तन करीत आले घरीं ।

मग आरती गावोनि बरी । भावें श्रीहरी वोवळिला ॥१७॥

दुसरें दिवशीं जाण । केलें ब्राह्मण संतर्पण ।

नानापरी पक्वान्न भोजनें । द्विजांकारणें दीधली ॥१८॥

विडे दक्षिणा सकळां कारणें । देतांचि पावले समाधान ।

मग अळंकापुरीचें महिमान । स्वमुखें आपण सांगतीं ॥१९॥

एके दिवसी श्रीनाथ आपण । आनंद युक्त बैसोनि जाण ।

ज्ञानेश्वरी ग्रंथाचें शोधन । निजप्रीतीनें आरंभिलें ॥१२०॥

प्रीतीनें प्रत उतरितां लोकी । लेखकापासूनि पडतां चुकी ।

अर्थ अन्वय न कळतां शेखीं । प्रसिद्ध लोकी नोहे ग्रंथ ॥२१॥

या कार्यास्तव श्रीज्ञानेश्वर । प्रतिष्ठानी घेतला अवतार ।

एकनाथ रुपें साचार । ग्रंथ सविस्तर शोधिला ॥२२॥

मग उद्धवासि पाहूनि कृपादृष्टी । श्रीनाथ सांगता गुजगोष्टी ।

ज्ञानेश्वराची सखोल दृष्टी । गीता मर्‍हाटी पैं केली ॥२३॥

जनार्दनकृपें करोन । ग्रंथ शोधूनि ठेविला जाण ।

याचें करावें पारायण । भाविक जन मेळवूनियां ॥२४॥

ऐकोनि नाथमुखीचें उत्तर । उद्धवासि हर्ष वाटला थोर ।

केशवरुपें श्रीरुक्मिणीवर । श्रोता चतुर तो एक ॥२५॥

उभयतां संमुख निरंतरी । श्रीनाथ वाचिती ज्ञानेश्वरी ।

आणिक कांहीं भाविक नरनारी । येती सत्वरी ऐकावया ॥२६॥

ज्ञानेश्वरीचा सखोल अर्थ । श्रीनाथ मुखें प्रांजळ होत ।

आबाळ वृद्धांसि सर्व कळत । संशय किंचित न राहे ॥२७॥

तृतीय प्रहरी नित्यनित्य । वाचिती ज्ञानेश्वराचें कृत्य ।

केशव उद्धव उभयतां श्रोते । रंग बहुत ये तेथें ॥२८॥

समाप्त ग्रंथ झालिया निश्चिती । मग ते पूजिती सरस्वती ।

उजळूनियां मंगळारतीं । खिरापतीं वांटिल्या ॥२९॥

केशवरुप धरोनि निश्चित । द्वादश वर्षे क्रमिलीं येथ ।

आतां उदास जाहलें चित्त । तरी आज्ञा मागत एकनाथा ॥१३०॥

तुझ्या संगतीच्या सुखें निश्चित । द्वादश वर्षे क्रमिलीं येथ ।

आतां उदास जाहलें चित्त । तरी आज्ञा त्वरित मज द्यावी ॥३१॥

ऐसें पुसतां जगज्जीवनें । एकनाथ तयासि अवश्य म्हणे ।

मागुती पुनरपि द्यावें दर्शन । स्वइच्छेनें आपुल्या ॥३२॥

इतुकें वचन ऐकूनि प्रीतीं । अदृश्य जाहली केशवमूर्ती ।

मनांत म्हणे वैकुंठपती । यावे पुढती या ठायां ॥३३॥

हेत उपजला कमळाधवा । याची तो बहुत जाहली सेवा ।

तरी कृतोपकार कांहीं करावा । आवडी देवा हे बहू ॥३४॥

ऐसे वदोनि द्वारकानाथ । अंतर्धान पावले त्वरित ।

नाथासि सांगे उद्धव भक्त । सदोदित जवळी पैं ॥३५॥

कीर्तन करितां सप्रेम रंगें । ध्‍रुपद धरितसे मागें ।

ताल अवसान सांभाळीत आंगें । अद्भुत रंग येतसे ॥३६॥

आबाळ वृद्ध नारीनर । नित्य ऐकती कीर्तन गजर ।

तंव त्या क्षेत्रांत भाविक थोर । अत्यंज नर एक होता ॥३७॥

तो योगभ्रष्ट जन्मांतर । पूर्वीचा होता वैष्णववीर ।

कांहीं दोषास्तव साचार । जाहला महार हीनयाती ॥३८॥

त्याची कांता परम सती । तीस आवडे श्रीविष्णुमूर्ती ।

उभयतांही नामस्मरण करिती । सप्रेमगती करोनियां ॥३९॥

तों श्रीनाथ रात्रीं कीर्तन करिती । उभयतां येऊनि बाहेर बैसती ।

एकाग्र चित्तें श्रवण करिती । देहभाव विसरती ते समयीं ॥१४०॥

समाप्त झालिया हरिकीर्तन । लोक निघती वाडयांतून ।

मग एकनाथासि करुनि नमन । स्वगृहा तेथून मग जाती ॥४१॥

एकनाथ सेवा निश्चिती । त्यांणी केली कैशा रीतीं ।

गंगातीरीं स्नानासि जाती । तों मार्ग झाडिती नित्यकाळीं ॥४२॥

श्रीनाथ करावयासि येती स्नान । तेव्हांचि नित्यनेमें घेती दर्शन ।

साष्टांग नमस्कार घालिती दुरोन । साक्षाद्भावोन विष्णुमूर्ती ॥४३॥

तंव एके दिवसीं हरिदिनींत । एकनाथ आनंदें कीर्तन करीत ।

विश्वरुप दर्शन अर्जुनातें । श्रीकृष्णनाथें दीधलें ॥४४॥

तेंचि अनुसंधान साचार । सप्रेम गातसे वैष्णव वीर ।

जेटी केली ज्ञानेश्वरें । त्या ओव्या सुंदर म्हणताती ॥४५॥

राण्या महार अवसरीं । नाथासि स्वमुखें प्रश्न करी ।

जेव्हां विश्वरुप नटला श्रीहरी । चराचरीं व्यापक जो ॥४६॥

ते समयीं मी जातीचा हीन । कवणे स्थळीं होतों जाण ।

श्रीनाथ बोलती वचन । होता सलग्न कृष्णरुपीं ॥४७॥

ऐसें नाथमुखींचें वचनामृत । ऐकोनि जाहला समाधिस्थ ।

भेदाभेद निरसले समस्त । कल्पनाद्वैत मावळळें ॥४८॥

चराचर जें जें दिसे । त्यामाजी जाहला समरस ।

वर्णयाति भेद निःशेष । त्याच्या चित्तास नाठवे ॥४९॥

एकनाथ परब्रह्ममूर्ती । ऐसा तयाचा निश्चय चित्तीं ।

मग उगवोनि सर्व घराची गुंती । कासन्यांत राहती उभयतां ॥१५०॥

लक्ष्मी तीर्थासि स्नानास । श्रीनाथ येती त्या स्थळास ।

त्यांचें दर्शन अनायासें । होईल मानस तयाचे ॥५१॥

म्हणोनि तें स्थळ टाकुनि तत्त्वतां । गंगातीरीं राहिलीं उभयतां ।

एकदा अनामिकाची कांता । प्राणनाथा काय म्हणे ॥५२॥

एकनाथ पांडुरंग साक्षात । विश्वोद्धारार्थ सगुण होत ।

परी माझें चित्तीं उपजला हेत । भोजनास येथ आणावा ॥५३॥

तुम्ही जाऊनि स्वामीकारणें । पुसाल तरी साहित्य करीन ।

राण्या महार ऐकोनि वचन । अवश्य क्षणे कांतेप्रती ॥५४॥

एकांतीं सांपडोनि श्रीनाथ । सांगीतला जीवींचा गुह्यार्थ ।

कांतेचें मनीं उपजला हेत । भोजन स्वामींतें घालावें ॥५५॥

जरीं आज्ञा द्याल ये अवसरी । तरी साहित्य करीन आपुलें घरीं ।

त्याचा सद्भाव देखोनि अंतरीं । अवमान न करी श्रीनाथ ॥५६॥

म्हणती जनार्दनाचे कृपेंकरुन । तुझें मनोरथ होतील पूर्ण ।

ऐसें ऐकतां अभयवचन । समाधान पावला ॥५७॥

श्रीनाथें दीधलें आश्वासन । कांतेसि सांगितलें वर्तमान ।

दुर्बळ संसार बहुतांगुणें । साहित्य मेळवून ठेविती ॥५८॥

द्वारीं तुळसीवृंदावन । वस्त्रें पात्रें शुचिर्भूत जाण ।

नित्य नेमें उभयतां करिती स्नान । नामस्मरण सर्वदा ॥५९॥

कणीक डाळ तांदुळ घृत । शाखापत्रें मेळवूनि समस्त ।

हरिदिनीसि उभयतां भोजन न करीत । कीर्तन ऐकत एकनाथाचें ॥१६०॥

चारहीं प्रहर हरिजागर झाला । कीर्तन श्रवणें काळ क्रमिला ।

प्रभात समय होतांचि वेळा । आलीं तत्काळ मंदिरासी ॥६१॥

अनामिकाची निजकांता । परम भाविक पतिव्रता ।

म्हणे स्वामीसि आमंत्रण द्यावें आतां । प्राणनाथा म्हणतसे ॥६२॥

मी पाकनिष्पत्ति करितें घरीं । तुम्ही सत्वर ये अवसरीं ।

नाथाची प्रतिक्षा करीत बरी । गंगातीरीं बैसावें ॥६३॥

स्वामी स्नानासि येतील त्वरित । ते समयीं पाहूनि एकांत ।

तयांसि आमंत्रण द्यावें निश्चित । बहुत विनीत होऊनियां ॥६४॥

अवश्य म्हणोनि ते अवसरीं । येऊनि बैसला गंगातीरीं ।

श्रीनाथ पावले सत्वरी । मग नमस्कार करी सद्भावें ॥६५॥

देखोनि तयाची सप्रेम भक्ति । क्षणएक बैसले सहजस्थिती ।

तों अनामिक बोले निजप्रीतीं । म्हणे माझी विनंति एक असे ॥६६॥

परी हीन याति अधिकार नाहीं । यास्तव संकोच वाटतो जीवीं ।

भोजनासि यावें माझ्या गृहीं । म्हणोनि पायीं लागला ॥६७॥

यावरी श्रीनाथ काय बोलत । तूं तरी प्रेमळ वैष्णवभक्त ।

तुझा भावार्थ देखोनि निश्चित । श्रीकृष्णनाथ तुष्टला ॥६८॥

वेदशास्त्रीं निपुण ब्राह्मण । श्रीहरी भक्‍तीसि विमुख जाण ।

द्वादशगुणें अळंकृत पूर्ण । तरी अंत्यज वरिष्ठ त्याहूनि कीं ॥६९॥

यातीचा हीन असोनि निश्चित । परी तो देवासि मान्य बहुत ।

तो श्लोक बोलिले एकनाथ । महा भागवत जे म्हणती ॥१७०॥

श्लोक ॥ विप्राद्विषङगणयुतादर विंदनाभपादारविंद विमुखश्छूपचं वरिष्टं ।

मन्येत दर्पिमतनोवचने हितार्थ प्राणं पुनाति सततं नतुभूरिमानः ॥१॥

ओव्या ॥ अनामिकासीं निश्चित । इतुका श्लोक बोलिला तेथ ।

तों सन्निध ब्राह्मण कोणी होते । क्रोधयुक्‍त ते झाले ॥७१॥

मग अवघे ब्राह्मण तये वेळीं । आले एकनाथाच्या जवळीं ।

गवगवा करोनि सकळीं । भक्‍तप्रेमळ वेष्टिला ॥७२॥

नाथासि द्विजवर काय बोलती । भागवत नव्हे हे केवळ श्रुती ।

त्यांतील श्लोक अनामिकाप्रती । कैशारीतीं सांगितला ॥७३॥

जें सिद्धांत ज्ञान अमोघ पाहीं । अंत्यजासि अधिकार नाहीं ।

ऐसें असतां ये समयीं । अनुचित कायी हें केलें ॥७४॥

आजि श्वानासि क्षिप्र वाढिली जाण । गर्दभा आंगीं चर्चिला चंदन ।

कीं अंधळ्यासि दाविला दर्पण । तैसेंचि कारण हें दिसे ॥७५॥

ब्राह्मण म्हणती एकनाथा । अंत्यजासि ज्ञान बोलिलासि आतां ।

हा महादोष पडिला तुझिया माथा । तरी प्रायश्चित आतां तुज होय ॥७६॥

ऐकोनि द्विजांचें उत्तर । श्रीनाथें जोडिले दोन्ही कर ।

ब्राह्मणांसि घालोनि नमस्कार । मधुरोत्तर बोलती ॥७७॥

म्हणती राण्यामहार वैष्णवभक्‍त । श्रीहरि भजनीं जाहला रत ।

षडवैरी जिंतिले समस्त । तरी अत्यंज यातें म्हणो नये ॥७८॥

अनामिकाचें लक्षण पाहोनीं । एकही न दिसे याचे देहीं ।

भागवत धर्म बोलिले सर्वही । ते याचे ठायी असती ॥७९॥

हा सिद्धांतज्ञानाचा अधिकारी । ऐसा निश्चय मज अंतरी ।

परब्रह्मरुप साक्षात्कारी । भक्‍तिभावें श्रीहरी वश्य केला ॥१८०॥

याचें आर्त देखोनि बहुत । किंचित् अन्वय बोलिलों येथें ।

हा अपराध क्षमा कीजे समर्थे । मग पुढती दंडवत घातलें ॥८१॥

यावरी ब्राह्मण काय बोलत । मोठा धीट तूं गळघट ।

अनधिकारियासि उपदेशिलें स्पष्ट । सत्कर्मीं भ्रष्ट होऊनी ॥८२॥

व्हावया दोषाचा परिहार । तूं प्रायश्चित्त न घेसाले जर ।

तरी तुज घालूं बहिष्कार । सकळ द्विजवर बोलती ॥८३॥

श्रीनाथ परब्रह्म मूर्तिमंत । आग्रह न करीत किंचित ।

ब्राह्मण वचनासि मान देत । द्यावें प्रायश्चित म्हणतसे ॥८४॥

मग गंगेच्या डोहांत जावोनी । उभे राहिले तयेक्षणीं ।

गोमय भस्म आणोनि ब्राह्मणीं । मंत्रोक्‍त वाणी बोलती ॥८५॥

हें अनामिकें देखिलें त्या अवसरा । मौनेंचि गेला आपुल्या घरां ।

स्वयंपाक करीत होती दारा । पतीसि सत्वरा ते पुसतसे ॥८६॥

श्रीनाथासि दीधलें आमंत्रण । ऐसें बोलता तिजकारणें ।

येरु देतसे प्रतिवचन । फुटकें प्राक्‍तन आपुलें ॥८७॥

मजसी बोलिले एकनाथ । यास्तव ब्राह्मण क्षोभले समस्त ।

गंगेत उभा करोनिया नाथ । तयासि प्रायश्चित्त देताती ॥८८॥

आपुला पूर्व जन्मींचा ठेवा । कोठोनि घडेल संतसेवा ।

कांता सद्गदित होऊनि तेव्हां । प्राण द्यावा म्हणतसे ॥८९॥

ऐसें म्हणोनि तयेक्षणीं । आंग टाकोनि दीधलें धरणीं ।

ढळढळां अश्रु वाहती नयनीं । भिजतसे मेदिनीं त्या उदकें ॥१९०॥

ऐसी अवस्था देखोनि सत्वर । भ्रतार संबोखी निजकरें ।

म्हणे एकनाथ कृपेचा सागर । न करील अव्हेर दीनाचा ॥९१॥

मी एकदा तेथवर जाऊन । तयासि देतों आमंत्रण ।

न येतील जरी कासया जिणें । मग देऊं प्राण आपुला ॥९२॥

ऐसा निश्चय करोनि अंतरीं । मग सत्वर आला गंगातीरीं ।

नाथासि साष्टांग नमस्कार करी । म्हणे भोजनासि घरीं आजि यावें ॥९३॥

देखोनि तयाचा भावार्थ । लीला विग्रही एकनाथ ।

ब्राह्मण सन्निध असतां तेथ । अवश्य म्हणती त्यालागीं ॥९४॥

पाकनिष्पत्ति झालिया पाहीं । आम्हीं येऊं मध्यान्ह समयीं ।

अनामिक संतोष मानूनि जीवीं । आपुलें गृहीं तो आला ॥९५॥

ब्राह्मण बोलती परस्परें । यानें मांडिला भ्रष्टाकार ।

याचेनि योगे वर्णसंकर । होईल साचार आतांचि ॥९६॥

अनामिकांसि बोलतां मात । यास्तव दीधलें प्रायश्चित ।

आतां आमंत्रण घेऊनि भोजनासि जात । तरी कैसी मात करावी ॥९७॥

मग एकांतीं जाऊनि धरामर । परस्परें करिती विचार ।

आतां पाळती लावूनि साचार । समयावर धरावा ॥९८॥

तेव्हां विप्र मंडळी मिळोनि सर्वही । जपत बैसले ठायीं ठायीं ।

एकनाथाचें स्वरुप हृदयीं । अध्ययन तेहीं आरंभिलें ॥९९॥

कोणी बिदींत उभे असती । कोणीं द्वारापासी बैसती ।

कृतिम भाव धरोनि चित्तीं । गोष्टी बोलतीं परस्परें ॥२००॥

कोणी जप माळा धरोनि करी । जप करीत बैसले गंगातीरीं ।

कोणी अनामिकाचें घरीं । जाऊनि दारीं लपाले ॥१॥

घरचें कामकाज टाकोनि सहज । त्या नादासि अवघे प्रवर्तले द्विज ।

परि हा विष्णु अवतार महाराज । चित्तीं उमज न पडेची ॥२॥

एकमेकांसि बोलती ब्राह्मण । नाथासि कळो न द्यावी खूण ।

अनामिक नेईल बोलावून । करितां भोजन धरावा ॥३॥

इकडे एकनाथ मंदिरीं । देवार्चन सांग जाहलियावरी ।

पुराण सांगती आपुलें घरीं । तों मध्यान्हासि तमारी पातला ॥४॥

ब्राह्मण अतीत अभ्यागत । उद्धव तयाचें पूजन करीत ।

तीर्थगंध करोनि समस्त । पात्रें विप्रासी वाढिलीं ॥५॥

इकडे अनामिकाचिये घरीं । पाक निष्पत्ति जाहलियावरी ।

कांता तयासी आज्ञा करी । नाथासि सत्वरी घेऊनिया ॥६॥

योगभ्रष्ट तो वैष्णव वीर । सारवोनि सोज्वळ केलें मंदिर ।

रांगोळी घालोनि ठेवितां सुंदर । आपुल्या निजकरें तेधवां ॥७॥

गंध अक्षता सुमनहार । साहित्य पूजा उपचार ।

चित्तीं उल्हास मानोनि थोर । वाट सत्वर पाहतसे ॥८॥

इकडे अनामिक द्वारापासीं । येऊनि विनवी नाथासी ।

स्वामी चलावें भोजनासी । मग उत्तर तयासी काय देती ॥९॥

तुवां पुढें व्हावें सत्वर । आम्हीं मागोनि येतसों त्वरें ।

तों नेत्रकटाक्षें द्विजवर । खुणाविती एकमेकां ॥२१०॥

तों पांडुरंगें काय केलें । एकनाथाचें रुप धरिलें ।

अनामिकाचें घरीं प्रगटले । नवल वाटलें तयासी ॥११॥

कांतेसि म्हणे ते अवसरीं । श्रीनाथ आले घरीं ।

येरी संतोष मानूनि अंतरीं । नमस्कार करी सद्भावें ॥१२॥

आयुष्यही नासि अमृतपान । तैसेंचि वाटलें तिजकारणें ।

बैसावयासि पाट देऊन । चरण प्रीतीने धूतसे ॥१३॥

सप्रेमभावें उठाउठी । अंगुष्ठ लाविले नेत्र संपुटीं ।

स्वहस्तें देऊनि चन्दन उटी । तुळसिहार कंठीं घातले ॥१४॥

ललाटीं तिलक रेखिला सुंदर । बुका लाविला तयावर ।

तों ब्राह्मण बैसले होते हेर । त्यांणीं साचार देखिलें ॥१५॥

कोणी बैसले त्या ठिकाणीं । कोणी धांवत आले सदनीं ।

मार्गींचे म्हणती कोणीकडोनी । चुकवोनी तो गेला ॥१६॥

तों एक म्हणती द्विजवर । वेष पालटोनियां सत्वर ।

चुकवोनि गेला तस्कर । आम्हांसि विचार न कळतां ॥१७॥

एक म्हणती दृष्टीबंधन । आपुल्या नेत्रांसि केलें त्याणें ।

प्रातःकाळापासोनि जाण । मार्ग रोधोनं बैसले ॥१८॥

असो महारवाडियांत होते कोणी । ते गेले एकनाथाचें सदनीं ।

तो श्रीनाथ तेथें बैसले आसनीं । हातीं स्मरणी घेऊनियां ॥१९॥

ऐसें देखोनि विपरीत । ब्राह्मण चित्ती जाहले विस्मित ।

कोणी घरीं बैसले होते । तयांसि वृत्तांत जाणविला ॥२२०॥

म्हणती अघटित भ्रष्टाची नवायी । येथें तेथें दोहीं ठायीं ।

मग महारवाडियांत जाऊनि पाहीं । धांवत लवलाहीं एक गेले ॥२१॥

तों तेथेंही बैसले पाटावर । घवघवीत पूजा उपचार ।

येरझारा करिती द्विजवर । तों दिसे साचार दों ठायीं ॥२२॥

जैसें बिंब प्रतिबिंब दिसे । दोघांत भेद किंचित नसे ।

पांडुरंग आणि एकनाथास । द्वैत नसेचि सर्वथा ॥२३॥

तीर्थ जळ नामें दोन । परी ऐक्यतेसि नसती भिन्न ।

कीं वासरमणी आणि प्रकाश जाण । निवडील कोण तयासी ॥२४॥

नभीं नीळिमा जया रीतीं । पुष्पमकरंद एक असती ।

तेवीं एकनाथ आणि पांडुरंगमूर्ती । एकचि आकृती जाणिजे ॥२५॥

म्हणती येथें तेथें एकेसमयीं । कैसा दिसतो दों ठायीं ।

तृतीय प्रहरपर्यंत पाहीं । केल्यातीहीं येरझारा ॥२६॥

परी उणापुरा कोठेंचि नसे । दोंठायीं बैसला असें ।

अनामिकें पूजूनि नाथास । पात्रीं अन्नास विस्तारिलें ॥२७॥

नानापरीचीं पक्वान्नें । कांता वाढीत निजप्रीतीनें ।

भोक्ता जनार्दन म्हणोन । अपोशन मग केलें ॥२८॥

भावाचा भुकेला श्रीहरी । तृप्तीनें धाला ते अवसरीं ।

जें जें रुचे चित्तांतरीं । तें मागोनि पात्रीं घेतसे ॥२९॥

असो यापरी जाहलें भोजन । मग करशुद्धि घालिती प्रीतीनें ।

विडा दीधला स्वहस्तें करुन । मग समाधान वाटलें तयाला ॥२३०॥

प्रदक्षिणा करुनि उभयतां । साष्टांग नमस्कार घालिती नाथा ।

म्हणती आमुच्या पुरविलें आर्ता । धन्य समर्था जगद्गुरु ॥३१॥

आम्हीं भावहीन भक्तिहीन । मतिहीन यातिहीन ।

आमुचें आर्त पुरवोनि जाण । केलें पावन संसारीं ॥३२॥

तयासि आश्वासूनि श्रीनाथें । मग अंतर्धान पावले त्वरित ।

उच्छिष्ट पात्रीं जें राहिलें होतें । स्त्रीपुरुष घेती प्रसाद तो ॥३३॥

ब्राह्मण विस्मित होऊनि अंतरीं । स्नानासि गेले गंगातीरीं ।

पुढती नाथाचें जाऊनि घरीं । नेत्रद्वारीं विलोकिती ॥३४॥

तों उद्धवासहित एकनाथा । भोजन करोनि बैसले तेथ ।

म्हणती या कर्मभ्रष्टाचा अंत । नकळे निश्चित आम्हांसी ॥३५॥

वेरझारा करितां क्षीणलों पाहीं । परी एकचि जाहला दोंठायीं ।

एक कुतर्क करुनि जीवीं । बोलती कायी ते आइका ॥३६॥

नाना साबरीमंत्र शिकोन । झोटिंग वेताळ केला प्रसन्न ।

मदद्भुतमध्यें उभें करुन । अघटित विंदान दाखविलें ॥३७॥

ऐसें बोलोनि त्या अवसरा । ब्राह्मण गेले आपुल्या घरां ।

महीपति संतांचा भाट खरा । सत्कीर्ति डांगोरा पीटितसे ॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । एकोणिसावा अध्याय गोड हा ॥२३९॥

अध्याय । १८ ओ०॥२३९॥श्र्लोक ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP