मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय १६

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ॥

जय अनंतशायी अपरिमिता । अपारा अनामा त्रिगुणरहिता ।

अनंग दहनाच्या आराध्य दैवता । अनन्या भक्‍ता रक्षिसी तूं ॥१॥

पन्नागरि स्वामी क्लेशनाशना । पयोब्धि तनयेच्या प्राण जीवना ।

पयोनिधिवासा शेषशयना । पतित पावना करुणाब्धी ॥२॥

वैकुंठवासी अति उदारा । ब्रह्मांड भुवनीं तुझा थारा ।

ब्रह्मनामा तूं परमेश्वरा । ब्रह्म तूं बरा सदोदित ॥३॥

गोवर्धनधरा तूं गोपती । गोपीवल्लभा मदन मूर्ती ।

गोइंद्रियांत तुझी वस्ती । गोसावी म्हणती यास्तव तूतें ॥४॥

आतां हृदयीं बैसोनि सदोदित । चित्तीं आठव देईजे मातें ।

वदवी श्रीभक्‍तलीलामृत । तेणें प्रेम उचंबळत श्रोतयां ॥५॥

मागिले अध्यायाच्या शेवटीं कथा । जनार्दनें शिकविलें एकनाथा ।

गृहस्थाश्रम करोनि आतां । सुखें भक्‍तिपंथा प्रतिपादी ॥६॥

इतुकें सांगोनि त्याजकारण । आपण देवगिरीसि केलें गमन ।

पुढें चरित्र केलें गहन । ते ऐका सज्जन भाविक हो ॥७॥

आजाआजी वृद्ध उभयतां । रात्रंदिवस करिती चिंता ।

म्हणती वधू जरी मिळती एकनाथा । तरी आम्हां देखतां लग्न होतें ॥८॥

ऐसें बोलतां परस्पर । तंव भाविक बोलती उत्तर ।

तुमच्या कार्यासि साह्य ईश्वर । चिंता अणुमात्र न करावी ॥९॥

श्रीनाथ सर्वदा विरक्‍त चित्तीं । लग्न करिती कीं न करिती ।

ऐसीं चिंता आम्हासि होती । ते पुरविली आर्ती पांडुरंगें ॥१०॥

जनार्दनाचें वचन निश्चित । सर्वथा नुल्लंघी एकनाथ ।

लग्नाचे दिवस येतां निश्चित । यत्‍न बहुत करुं आम्ही ॥११॥

ऐसें भाविकांचें अभयवचन । ऐकोनि वडिलांसि समाधान ।

कांहीं दिवस लोटतांचि जाण । तों निघती लग्नें दिवस आले ॥१२॥

तंव एक गांवीचा द्विजवर । त्याची कन्या उपवर।

तो मुलीस पाहतसे भ्रतार । परी घटित विचार कोठें नये ॥१३॥

तो मनीं होऊनि चिंताक्रांत । निद्रित जाहला यामिनींत ।

तों स्वप्नीं येऊनि पंढरीनाथ । दृष्टांत सांगत काय त्यासी ॥१४॥

गंगातीरीं प्रतिष्ठानांत । विष्णुभक्त सुशीळ एकनाथ ।

तरी तुवां जाऊनि त्या स्थळांत । कन्या साळंकृत दे त्यासी ॥१५॥

ऐसा दृष्टांत रुक्मिणीकांतें । रात्रीं दाखविला द्विजातें ।

ब्राह्मण तत्काळ होऊनि जागृत । आश्चर्य करीत मानसीं ॥१६॥

कांतेसि सांगोनि दृष्टांत । मग प्रतिष्ठांनि स्वयें येत ।

लोकांसि स्वमुखें पुसत । कोठे एकनाथ मज सांगा ॥१७॥

त्यांणीं दाखवितां निजमंदिर । येऊनि भेटला तो द्विजवर ।

दृष्टांत दाखविला रुक्मिणीवरें । तोही सत्वर सांगीतला ॥१८॥

आजा आजी दोघेजण । तयांसि सद्भावें करी नमन ।

म्हणे तुमच्या पौत्राकारण । कन्यादान करितों मी ॥१९॥

ऐसें विनवितांचि तयांसि । वचन मानलें वडिलांसी।

मग बोलावूनि गणकजोशी । जन्मपत्रिकेसी दीधले ॥२०॥

राशि नक्षत्र पाहतां जाण । घटित लाधलें छत्तीस गुण ।

लग्नतिथि नेम करुन । समाधान उभयतां ॥२१॥

सुपारी देऊनि वरबापासी । म्हणे मी लागतों साहित्यासी ।

कन्या कुटुंब परिवारेंसी । प्रतिष्ठानासी येईन ॥२२॥

साळंकृत कन्यादान । ये स्थळीं करितां विशेष पुण्य ।

ऐसें वधूबाप बोलोन । गेला परतोन स्वगृहा ॥२३॥

आपल्या कांतेसि बोले उत्तर । कन्येसि अपूर्व मिळाला वर ।

परम भाविक वैष्णववीर । ईश्वरी अवतार दिसतसे ॥२४॥

ऐसा संतोष मानूनि अंतरी । साहित्य करितसे आपुलें घरीं ।

असो इकडे प्रतिष्ठान नगरी । वर्तली परी ते आयिका ॥२५॥

चक्रपाणीचे वंशीं देख । अवतार नाथ कुळदीप ।

त्याचा वाढतां थोर लौकिक । वाटे कौतुक वडिलांसी ॥२६॥

मग आजा-आजी बैसोनि घरीं । विचार करिती चित्तांतरीं ।

घरीं कृत्य निघालें परी । गोत्रज दुरीं राहिले ॥२७॥

विजयांपुर प्रांत साचार । सत्रा योजनें असे दूर ।

ते स्थळीं सोइरे इष्ट मित्र । तयांसि पत्र पाठवावें ॥२८॥

बंधूचा पुत्र जों उद्धव । तो परम भाविक होता वैष्णव ।

पत्रिका लिहिली त्याच्या नांवें । लग्नासि यावें म्हणवोनी ॥२९॥

आणिक इष्टमित्र आप्तविषयी देखा । त्यांच्याही नांवें लिहिल्या पत्रिका ।

कुंकूममंडित सुरेखा । अर्थही निका त्यांमाजी ॥३०॥

आमुची वृद्ध अवस्था निर्धारीं । शेवटी लयेंव मांडिला घरीं ।

तुम्हीं यावें सहपरिवारीं । वाट निर्धारीं पाहातसों ॥३१॥

मनुष्य करोनि महिनदार । तया हातीं दीधलें पत्र ।

प्रतिष्ठानींचे भाविक नर । साहित्यासि फार झोंबती ॥३२॥

जयासि सखा जोडला श्रीहरि । तरी विश्व त्यावरी कृपा करी ।

पत्रिका ऐकतां निश्चितीं । सर्व सिद्धि राबती घरीं ।

न्यून संसारीं पडेना ॥३३॥

गोत्रज सोइरे विजापुर प्रांतीं । मूळ पाठविलें तया प्रती ।

संतोष चित्तीं त्यांसि झाला ॥३४॥

उद्धव शहाणा वैष्णवपूर्ण । सर्व साहित्य घेतलें त्याणें ।

मग कुटुंबासह वर्तमान । प्रतिष्ठान पावला ॥३५॥

वडील वृद्धांसि भेटोनियां । परम संतोष वाटला तया ।

उद्धवनाथाच्या लागोनि पायां । भेटी सबाह्या उभारित ॥३६॥

क्षेम आलिंगन देताचि प्रीतीं । चित्तीं वाटली परम विश्रांती ।

सजळ नेत्र तयांचे होती । अद्भुतस्थिती देखोनियां ॥३७॥

इकडे वधूचा बाप होता दूर । त्याणें अन्न सामग्री केली फार ।

गोण्या घालोनि बैलावर । पुढें सत्वर पाठविल्या ॥३८॥

उभयपक्षी साचार । करोनि वस्त्रें अलंकार ।

लग्न घेऊनि बरोबर । प्रतिष्ठान क्षेत्र पावला ॥३९॥

विस्तीर्ण वाडा पाहोनि त्वरित । कुटुंबासहित राहिला तेथ ।

उदईक आहे लग्न तिथ । अक्षत नगरांत दीधली ॥४०॥

देव प्रतिष्ठा ब्राह्मणभोजन । आहेर वोपिती सोइरे पिशुन ।

मंगल वाद्यें वाजती जाण । हळदी उटणें वधूवरां ॥४१॥

दिव्य पक्वान्नें नानारीतीं । उभय मंडपीं स्वयंपाक होती ।

ब्राह्मण भोजनें यथास्थिती । अन्नशांती बहु केली ॥४२॥

वरबापाकडे निर्द्धारीं । उद्धव मुख्य कारभारी ।

सर्व साहित्य आंगें करी । उल्हास अंतरीं धरोनियां ॥४३॥

क्षेत्रवासी भाविकजन । त्याच्या वचनासि देती मान ।

उद्धवाची युक्ती ऐकोन । तैसीच वर्तणूक ते करिती ॥४४॥

सोईरे गृहस्थ द्विजवर । सर्व घेवोनि बरोबर ।

मंगळ वाद्यें वाजती गजरें । पूजावयासि वर चालिले ॥४५॥

रुखवताच्या पाटया भरोनि । सवें चालिल्या वर्‍हाडणी ।

वस्त्रें भूषणें वरासि देउनी । मिरवत सदनी आणिल्या ॥४६॥

मधुपर्क करोनि पूजन । मग अंतःपट धरिती ब्राह्मण ।

म्हणती सावधान सावधान । श्रीकृष्ण चिंतन करावें ॥४७॥

ऐसीं अष्टकें म्हणोनी । लग्न लाविलें ब्राह्मणीं ।

मंगळ वाद्याच्या लागल्या ध्वनी । घाव निशाणीं घातला ॥४८॥

प्रकृति पुरुषांची ऐक्यतां । होतांचि आनंद सकळांच्या चित्तां ।

लाजाहोम करोनि तत्त्वतां । दक्षिणा समस्तां वांटिली ॥४९॥

सन्मुख आणि तेलवण । ऐरणी पूजन धेडा नाचवणें ।

गृह प्रवेश लक्ष्मीपूजन । यथाविधीनें तें झालें ॥५०॥

पांच दिवसपर्यंत निश्चित । लग्न जाहलें यथास्थित ।

अहेर वस्त्रें सकळांसि अर्पित । न्यून किंचित पडेना ॥५१॥

यापरी वोहबापें कन्यादाना । करोनि गेला आपुल्या स्थाना ।

नातसुनेसि देखोनि नयना । वडिलांच्या मना समाधान ॥५२॥

विजापूर प्रांतींहून जाणा । वर्‍हाडी आले होते लग्ना ।

परमसंतोष पावोनि मना । आपुल्या स्थाना ते गेले ॥५३॥

श्रीनाथ सेवेचें धरोनि आर्त । एकला उद्धव राहिला तेथ ।

काया वाचा मनें निश्चित । सन्निध तिष्ठत सर्वदा ॥५४॥

कार्याकार्य मनोगत। न सांगतां जाणोनि करित ।

नाथासि चिंता नसे किंचित । प्रेमभरित सर्वदा ॥५५॥

पत्‍नी परम सुलक्षण । गिरिजाबाई नामाभिधान ।

श्रीनाथाच्या सेवे लागोन । सादर अनुदिन ते असे ॥५६॥

वय लहान असे पोर । परी घरिंची रीत जाणे समग्र ।

वडिलांची मर्यादा निरंतर । सांगितलें उत्तर ऐकावें ॥५७॥

नात सुनेचे देखोनि सद्‌गुण । वडील वृद्धांसि समाधान ।

म्हणती जनार्दनाचे निजकृपेनें । फिटलें पारणें नेत्राचें ॥५८॥

अयाचित वृत्ति करोनि जाण । उदंड येतसे वस्त्र अन्न ।

होतसे ब्राह्मण संतर्पण । क्षुधितांसि भोजन तेथें मिळे ॥५९॥

अन्नदानाविषयीं जाण । न विचारिती यातिवर्ण ।

विश्वीं भरला जनार्दन । दया संपूर्ण सर्वांभूतीं ॥६०॥

मागें भानुदासें निजप्रीतीं । देव्हारी स्थापिली पांडुरंग मूर्ती ।

निजांगें नाथ तयासि अर्चिती । सप्रेम भक्ती करोनियां ॥६१॥

दोन प्रहर होतांचि पूर्ण । होतसे ब्राह्मण संतर्पण ।

तृतीय प्रहरीं पुराण श्रवण । रात्रीं कीर्तन नित्य होय ॥६२॥

क्षेत्रवासी नारी नर । श्रवणासि येती प्रेमादरें ।

दिवसे दिवस अधिकोत्तर । महिमा थोर वाढला ॥६३॥

ऐसा सोहळा वडिलांनीं । बहुत दिवस देखिला नयनीं ।

देहाचें आयुष्य जातां सरोनी । मग वैकुंठ भुवनीं ते गेले ॥६४॥

श्रीनाथें स्वहस्तें करोनि क्रिया । सद्गतीसि लाविलें तयां ।

लोक संग्रहार्थ दाखवी चर्या । कर्माकर्म तया विरहित ॥६५॥

श्रीविठ्ठल विप्रवेष धरोनी । गाऊं लागतसे नित्य कीर्तनी ॥

जो ब्रह्मादिकांच्या नये ध्यानीं । तो ध्‍रुपदी होऊनी राहिलासे ॥६६॥

योगी करिती अष्टांग साधन । परी तयांसि नेदीच सगुण दर्शन ।

तो एकनाथाच्या भक्तीस्तव जाण । टाळ धरोन गाऊं लागे ॥६७॥

तों देवगिरीहून आले कोणी । नाथासि वार्ता जाणविली त्यांणीं ।

कीं जनार्दन स्वामी देह सांडुनी । वैकुंठ भुवनीं ते गेले ॥६८॥

सद्‌गुरु प्रयाण ऐकूनि मात । परी खेद न वाटे किंचित ।

जनी जनार्दन भरला निश्चित । अविनाश अव्यक्त परिपूर्ण जो ॥६९॥

मग उद्धवासि नेऊनि एकांतीं । निजमुखें तयासि आज्ञापिती ।

षष्टीचा उत्सव करणें निश्चिती । तरीं साहित्य निजप्रीतीं करावें ॥७०॥

उद्धवें माथा ठेवूनि पायीं । नाथासि पुसतसे ते समयीं ।

षष्ठीचा उत्सव करावयासि पाहीं । कारण कायी हें सांगा ॥७१॥

देखोनि तयाचा भावार्थ । मग स्वमुखें साकल्य सांगती मात ।

श्रीजनार्दन स्वामींची जन्मतीथ । षष्ठीच निश्चित उद्धवा ॥७२॥

फाल्गुन वद्य षष्ठीस जाण । जनार्दनासि दत्तात्रेय दर्शन ।

त्याच तिथीस आम्हां कारणें । अनुग्रह संपूर्ण दीधला ॥७३॥

आणि याच तिथीस जनार्दन । देह लोपोनी झाले निर्गुण ।

हीं तों चार घडलीं कारणें । पुढील होणें देखसील ॥७४॥

तरी ब्राह्मण संतर्पणाचें फार । साहित्य करावें तुवां सत्वर ।

अवश्य म्हणोनि बोले उत्तर । केला नमस्कार उद्धवें ॥७५॥

कांहीं मिळाले अयाचित । कांहीं घेतली उचापत ।

रौप्यमुद्रा सात शत । वाणियासि खत दीधलें ॥७६॥

एकनाथाचें लेहोनि नाव । रोखा लिहूनि देत उद्धव ।

वायदा मुदत बोलोनि सर्व । अंतर्भाव सांगितला ॥७७॥

साहित्य करोनि बरव्या रीतीं । षष्ठीस उत्सव मांडिला प्रीतीं ।

अवघ्या क्षेत्रासि आमंत्रण देती । पाकनिष्पत्ती करविली ॥७८॥

भाविक प्रेमळ जे का नर । निजांगें कष्ट करिती फार ।

कोणासि न वाटे जोजार । सप्रेम अंतर सकळांचें ॥७९॥

मग दिंडी घेऊनि बरोबरी । मिरवत नेली गंगातीरीं ।

टाळ विणे मृदंग सुस्वरीं । कीर्तन गजरीं होतसे ॥८०॥

गरुड टके निशाणभेरी । वाद्यें वाजती मंगळतुरीं ।

वैष्णव गर्जती जयजयकारीं । नाद अंबरीं कोंदला ॥८१॥

दिंडी मिरवोनि ऐशा रीतीं । मध्यान्हसमयीं गृहासि येती ।

तों ब्राह्मण स्नानें करोनि समस्ती । देव्हडया पंक्ती बैसल्या ॥८२॥

श्रीनाथें स्वयें आपण । केलें द्विजांचें चरण क्षाळण ।

तें तीर्थ करितांचि प्राशन । संतोष मन पावतसे ॥८३॥

ब्राह्मणभक्त एकनिष्ठ । नेत्रासि लावित अंगुष्ठ ।

त्याहूनि दैवत नसेचि श्रेष्ठ । भाव वरिष्ठ तयाचा ॥८४॥

स्वहस्तें अंगासि चर्चुनि चंदन । तुळसीपत्र बुका सुमन ।

यापरी द्विजांचें करोनि पूजन । पात्रीं मिष्टानें वाढिलीं ॥८५॥

घृत आदि करुनि निश्चिती । पात्रें सिद्ध वाढिली समस्तीं ।

भोक्ता जनार्दन सर्वांभूतीं । संकल्प प्रीतीं सोडिला ॥८६॥

मग अपोशनें करोनि सत्वर । भोजनासि बैसले द्विजवर ।

विठ्ठलनामें साचार । सर्वत्र गजर ते करिती ॥८७॥

जें जें जयासि रुचे जैसें । पात्रीं आणोनि वाढिती तैसें ।

श्रीनाथ प्रार्थना करितसे । भोजन सावकाशें करावें ॥८८॥

तृप्ति जाहलिया सकळांप्रती । मग करशुद्धीस उठिले प्रीती ।

विडे दक्षिणा सकळां देती । सदनाप्रती ते गेले ॥८९॥

विठ्ठल उद्धव एकनाथ । आणि साहित्य करणार गृहस्थ ।

मागिले पंक्तीसि जेविले समस्त । आनंद युक्त तेधवां ॥९०॥

श्रीनाथें रात्रीं केलें कीर्तन । श्रवणासि आले बहुत जन ।

प्रेमप्रभरित प्रसाद वचन । रंगासि उणें काय तेथें ॥९१॥

ऐशापरी क्रमिली निशी । तैसाच उत्सव सप्तमीसी ।

गोपाळकाला अष्टमीसी । समारंभेसी मांडिला ॥९२॥

दिंडी मिरवतसे अवसरीं । पातले तेव्हां गंगातीरीं ।

यात्रेचा समुदाय मिळाला भारी । जयजयकारी नामघोषें ॥९३॥

यथाविधि करोनि काला । अवघ्यांसि प्रसाद वांटिला ।

मग लळितासि रात्रीं प्रारंभ केला । वेध लागला सर्वांसी ॥९४॥

सोंग संपादणी यथास्थित । करुनि पहुडविला रुक्मिणीकांत ।

प्रातःकाळ होतांचि निश्चित । साधुसंत गौरविले ॥९५॥

यापरी षष्ठीचा उत्सव जाहला । सकळ जनांसि आनंद वाटला ।

म्हणती जगदुद्धारास्तव भला । येथें अवतरला श्रीनाथ ॥९६॥

प्रतिष्ठान ब्रह्मक्षेत्र पूर्ण । कर्मठ तेथिंचे सकळ ब्राह्मण ।

यांसि भक्‍तिमार्ग दावावया पूर्ण । जाहला सगुण अवतार ॥९७॥

परी वाणियाची घेऊनि उचापत । उद्धवें लेहूनि दीधलें खत ।

त्याचा वायदा भरतां समस्त । मग तो मागत द्रव्यासी ॥९८॥

उद्धव म्हणे ते अवसरीं । हातांसि लेख आलियावरी ।

आणूनि देऊं तुमच्या घरीं । विश्वास अंतरीं असों द्या ॥९९॥

ऐसें बोलिले नानापरी । परी तो नायकेचि दुराचारी ।

म्हणे आयाचित द्रव्य येतां पदरीं । संतर्पण घरीं करीतसां ॥१००॥

टाकूनि आपुला संसार । कीर्तनीं नाचतसां निर्भर ।

वेडे केले लोक समग्र । तें मज समोर चालेना ॥१॥

ऐसें बोलोनि उद्धवाप्रती । घरासि आला तो दुर्मती ।

एकनाथ स्नान संध्या करिती । तयांसि दुरुक्‍ती काय बोले ॥२॥

माझा पैका वारिल्याविण । तुम्ही भक्षाल जरी अन्न ।

तरी पांडुरंगाची शपथ पूर्ण । इतुकें वदोन तो गेला ॥३॥

नैवेद्य वैश्वदेव एकनाथ । करोनि ब्राह्मणांसि भोजन घालित ।

आपण तेव्हां उपवासी राहात । घातली शपथ म्हणोनियां ॥४॥

उद्धव आणि गिरीजासती । हे उभयतां न जेविती ।

अस्तमानासि गेला गभस्ती । द्रव्य तों निश्चिती मिळेना ॥५॥

उद्धवें प्रयत्‍न केला बहुत । परी द्रव्य कोठें न मिळे निश्चित ।

एक प्रहर लोटली रात । तोंपर्यंत उपवासी ॥६॥

ऐसी तयांची देखोनि अवस्था । संकट पडलें पंढरीनाथा ।

अभेद भक्‍त उपवासी राहतां । तें रुक्मिणीकांता न साहवे ॥७॥

मग उद्धवाचें रुप धरोनि श्रीहरी । गेले तेव्हां वाणियाचें घरीं ।

हांका मारीतसे द्वारीं । बाहेर सत्वरीं ये आतां ॥८॥

व्यवसायी कवाड उघडोनियां । निजमंदिरीं बोलवी तया ।

म्हणे येव्हडे रात्रीं आमुच्या ठायां । काय यावया कारण ॥९॥

उद्धव बोले प्रत्युत्तर । खत आणोनि द्यावें सत्वर ।

व्याजसुद्धां द्रव्य समग्र । घ्यावें सत्वर मोजुनी ॥११०॥

व्यवसायी उत्तर देत तयासी । रात्रीं पारख कळेल कैसी ।

वही आणि खत या समयासी । दुकानासी राहिलें ॥११॥

प्रातःकाळीं येऊनि निश्चित । आपुलें घेऊनि जावें खत ।

यावरी बोले वैकुंठनाथ । तें ऐका निजभक्‍त भाविकहो ॥१२॥

इतुकी सांड तुम्हांकारण । तरी नाथासि कां घातलि आण ।

त्याच्या उपवासें मी व्याकुळ पूर्ण । होताति प्राण कासाविस ॥१३॥

ऐसी ऐकतांचि वचनोक्‍ती । वाणियासि पश्चात्ताप जाहला चित्तीं ।

मग दुकानांसि नेऊनि तयाप्रती। हिशेब निश्चितीं पाहिला ॥१४॥

जितुकें द्रव्य जाहलें तत्त्वतां । तितुकेंची भरें मोजूनि घेतां ।

एकचि शिक्का सर्वासि असतां । विस्मित चित्ता मग होय ॥१५॥

खत देऊनिया सत्वरी । आपुल्या हातें फाडीतसे श्री ।

मग घरासि येऊनि श्रीहरी । पुस्तका भीतरी बांधिती ॥१६॥

तो वाणीयास चटपट लागली मनीं । निद्रा नयेची त्याज लागोनि ।

म्हणे म्यां नाथासि आण घालोनि । घरीं येऊनी जेविलों ॥१७॥

नाशवंताची आशा धरोन । सत्पुरुषाचें केलें छळण ।

ऐसी तळमळ लागली पूर्ण । तों उदयासि अरुण पातला ॥१८॥

मुख प्रक्षाळूनी त्वरित । गेला नाथाच्या वाडियांत ।

साष्टांग घालोनि दंडवत । म्हणे अपराधी निश्चित मी तुमचा ॥१९॥

श्रीनाथ तयासि उत्तर देती । व्यवहाराची ऐसीच रीती ।

द्रव्य वारिल्यावीण निश्चितीं । अन्न सर्वथा न सेवूं ॥१२०॥

ऐसें ऐकोनि तये क्षणीं । वाणी विस्मित जाहला मनीं ।

उद्धवासि म्हणे द्रव्य देऊनी । रोखा घेऊनी आलासि तूं ॥२१॥

तरी तें सांगिजे स्वामीसीं । अझूनि कां ठेविलें उपवासी ।

उद्धव म्हणे असत्यासी । सर्वथा तयासी न बोलें ॥२२॥

वाणी तात्काल वाहे शपथ । मग उद्धवनाथासि येऊनी सांगत ।

रोखा निघाला पुस्तकांत । कळला वृत्तांत मानसीं ॥२३॥

उद्धव म्हणे वाणियाप्रती । धन्य तुझी सप्रेम भक्‍ती ।

नाथासी व्यवहार करितां निश्चितीं । तुज रुक्मिणीपती भेटला ॥२४॥

आतां कोणापासीं निश्चित । सर्वथा न वदे हा गुह्यार्थ ।

व्यवसायी घालोनी दंडवत । गेला त्वरित घरासि ॥२५॥

श्रीनाथाचें झालिया देवतार्चन । ब्राह्मणपंक्‍तीसि करिती भोजन ।

गिरिजाबाई उद्धवा कारणें । जाहलें पारणें तेचि दिनीं ॥२६॥

विप्रवेष धरोनि निजांगें । ध्‍रुपद धरीतसे पांडुरंगे ।

कीर्तनीं अद्भुत येतसे रंग । वेधलें जग श्रवणार्थी ॥२७॥

वाढवावया एकनाथ महिमा । ऐसें वाटलें पुरुषोत्तमा ।

मग ब्राह्मण वेषें तो जगदात्मा । कीर्तनीं प्रेमा वाढवित ॥२८॥

द्वादश वर्षे लोटतां निश्चितीं । एक तप झालें ऐशा रीती ।

पुढे चरित्र वर्तलें कैशा रीतीं । तें सादर संतीं परिसिजे ॥२९॥

पंढरीक्षेत्र वैष्णवभक्‍त । अनुष्ठानीं बैसला निश्चित ।

तो साक्षात पांडुरंग दर्शन इच्छित । ऐसे बहुत दिवस गेले ॥१३०॥

मुखें करी नामस्मरण । आणिक कामनीं नसेचि मन ।

तों रात्रींमाजी रुक्मिणीरमण । स्वप्नीं येऊन काय सांगें ॥३१॥

तूं दर्शन इच्छितोसि साक्षात । परी मी गुंतलों प्रतिष्ठानांत ।

तेथें एकनाथ अभेद भक्‍त । मत्कीर्तनीं रत सर्वदा ॥३२॥

तेथें विप्रवेष घेऊनि निजांगें । मी धृपद घरीतसे पांडुरंग ।

त्यासि विठोबा नाम बोलती जग । जायी सवेग ते ठायीं ॥३३॥

प्रतिष्ठानीं एकनाथाचें घरीं । माझें दर्शन घे सत्वरीं ।

ऐसा दृष्टांत देखोनि रात्रीं । विस्मित अंतरीं तो झाला ॥३४॥

तैसाचि घेऊनि प्रतिष्ठानासी । पातला एकनाथ गृहासी ।

पुसोनि विठोबा ब्राह्मणासी । धांवोनि तयासी भेटतसे ॥३५॥

साष्टांग नमस्कार घालितां त्याणें । तों रुप पालटी रुक्मिणी रमण ।

धरिलें चतुर्भुज रुप सगुण । मुगुटीं रत्‍नें लखलखती ॥३६॥

श्रीमुख मनोहर आकृती । दिव्य कुंडलें कानीं तळपती ।

कंठीं कौस्तुभ वैजयंती । पीतांबर दीप्ती न समाये ॥३७॥

ठाण साजिरें सुकुमार । जघनीं शोभती दोन्ही कर ।

समपदीं साजिरें रुप सुंदर । देखिलें साचार तयानें ॥३८॥

तयासवेचि वैष्णवभक्‍त । आणिकही कोणी आले होते ।

तयांसही दर्शन साक्षात । जाहलें निश्चित ते समयीं ॥३९॥

ऐसें दर्शन त्यास देऊन । देव पावले अंतर्धान ।

जे कां आले पंढरीहून । ते करिती स्तवन नाथाचें ॥१४०॥

म्हणती धन्य तूं वैष्णवभक्त । विष्णु अवतार साक्षात ।

विप्रवेष धरुनि पंढरीनाथ । धरिलें ध्‍रुपद निजांगें ॥४१॥

विठोबा अदृश्य जाहला ब्राह्मण । मग एकनाथाचें विस्मित मन ।

म्हणे मजस्तव शीणले जगज्जीवन । बिरुदासि उणे येऊं नेदी ॥४२॥

प्रतिपाळ करावा दासाचा । ऐसा भावचि असे तयाचा ।

वेदासि पार नकळे ज्याचा । तो होय भक्तांचे साह्यकारी ॥४३॥

रीण वारिलें पंढरीनाथें । हेही जनांत जाहलें श्रुत ।

बारा वर्षे धरिले ध्‍रुपद । हाही चरितार्थ प्रगटला ॥४४॥

पुष्पकळिकेंत मकरंद निश्चिती । त्याची प्रभंजन सुटतां येतसे हृती ।

तैसी संतांचि चरित्र ख्याती । भाविक सांगती परस्परें ॥४५॥

अमानित्व अदंभित्व लक्षणें । हीं त्याचें आंगीं अक्षयीं लेणें ।

सत्कीर्ति जगीं प्रगट तेणें । वर्णिती गुण महाकवी ॥४६॥

सकळ ग्रंथामाजी श्रेष्ठ । संतचरित्र अति वरिष्ठ ।

दैवाथिले जे असतील स्पष्ट । त्यांसीच गोष्ट हे रुचे ॥४७॥

विकल्पी द्वेषीं जे सर्वदा । अविद्या तिमिरें वेष्टिले सदा ।

त्यासि रिकामपण नसेचि कदा । संसार धंदा करिताती ॥४८॥

तैसें न व्हा तुम्हीं सज्जन । अर्थ अन्वयीं विवरितां मन ।

जैसीं तैसीं आर्ष वचनें । गोड करुन ऐकता ॥४९॥

तुमचेनि आधारें साचार । प्रेमभरित माझें अंतर ।

येर्‍हवीं महीपती मूढ पामर । नसे साचार कविकर्ता ॥१५०॥

स्वस्तिश्री भक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्त । षोडशोध्याय रसाळ हा ॥१५१॥अ०१६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP