श्री दत्तप्रबोध - अध्याय तिसरा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


॥श्रीजगद्‌गुरुदत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो श्रीदत्ता ।

अखिल अभंगा कृपावंता । तुझे चरणीं ठेविला माथा । वदवी कथा तुझा तूंची ॥१॥

मी मतिमंद अज्ञान । अणुमात्र नाहीं मजसी ज्ञान । तूं विज्ञानरुप सघन । वदवी गुण आपुले ॥२॥

उदंड कवि ग्रंथ बोलिले । आधारसंमतें चालिले । आणि श्रीप्रसादातें पावले । मान्य जाले तव कृपें ॥३॥

मज दीनाचा आधार । तूंचि होसी दिगंबर । सांगसी तैसा विस्तार । पत्रीं सादर लिहीतसें ॥४॥

मी कर्ता नोव्हें ग्रंथासी । आळ मात्र धरिली मानसीं । कळवळोनी पुरविसी । आपंगिसि लडिवाळा ॥५॥

अवधूता तूं माझी माउली । दीनवत्साची गाउली । करी कृपेची साउली । पान्हा घाली कृपेचा ॥६॥

तुझा बोधकथामृतरस । तो मज पाजी गा विशेष । आणि श्रोतयां सज्जनांस । सुख संतोष होय जेणें ॥७॥

श्रोते भाविक संतज्ञानी । योगी अनुभवी चतुर गुणी । या कथालाभातें इच्छुनी । करोनी दाटणी बैसले ॥८॥

कथारसाची नव्हाळी । सेवूं इच्छिती हे आगळी । श्रवण नेत्राची न्यहाळी । ग्रंथकमळीं भ्रमरत्वें ॥९॥

अहो या सकळांचे मनोरथ । पूर्णकर्तां तूंची दत्त । म्हणोनिया प्रणिपात । करी विनीत तव पदां ॥१०॥

श्रोतीं ऐकिलें सावधान। मागील कथेचें निरुपण । अत्रीअनसूयावर्णन । अतिपावन षड्‌गुणी ते ॥११॥

पुढे वदविता सद्‌गुरु अनंत । श्रोतीं आदरें द्यावें चित्त । सिंहाद्रीतळीं विराजित । आश्रम शोभत अत्रीचा ॥१२॥

वृक्षछाया अतिसघन । लता विराजती दैदीप्यमान । फळें पुष्पें दाटलीं पूर्ण । जलस्थान पर्वतीं ॥१३॥

तें शोभायमान निर्मळ । तपाचरणीं दिव्य स्थळ । योजुनी उभयतां सुशीळ । पुण्यकाळ साधिती ॥१४॥

तंव तो महाराज नारद मुनी । अकस्मात पावला तये स्थानी । नेत्रीं अत्री विलोकुनी । संतोष मनीं वाटला ॥१५॥

उभय आलिंगिनीं पडली मिठी । तो आनंद न समायेचि पोटीं । दृष्टांत पहातां निकटीं । विष्णु धूर्जटी तेवि हे ॥१६॥

नारदाचें अर्चन केलें । पहातां वैष्णवाचें मन निवालें । आचरण अनसूयेचें देखिलें । धन्य बोले हे माता ॥१७॥

पतिसेवनीं अतितत्पर । सेवेसि पडों नेदी अंतर । सुख देवोनि तोषवी अंतर । मानी भ्रतार देव जैसा ॥१८॥

सेवा पाहोनि नारदऋषि । संतोषयुक्त जाला मानसीं । मग पुसोनि उभयतांसी । परम वेगेसीं निघाला ॥१९॥

मुखें कीर्तन नामस्मरण । त्रिलोकीं करीतसे गमन । तंव अकस्मात ब्रह्मभुवन । चालिला देखोन सन्निध पैं ॥२०॥

तवं सावित्री आणि ब्रह्मदेव । दैवतें देखिलीं अपूर्व । अनन्य प्रीति धरोनि भाव । जन्मठाव म्हणोनि नमी ॥२१॥

आशीर्वाद देती उभयतां । क्षेम आवडी देती सुता । आदरें पुसे विधाता । सांगे वार्ता अनुपम ॥२२॥

त्रिलोकीं तुझें असें गमन । तुज घडतें सर्व अवलोकन । सांगे नवलकथा निवडोन । जेणें श्रवण तृप्त हो ती ॥२३॥

नारद विनवी पिताजी । तुमचें आधिपत्य सर्व काजीं । नवल पुसतसां मज आजी । काय न कळे जी तुम्हांतें ॥२४॥

तूं तवं सर्व सुज्ञ होसी । सकळ वृत्त श्रुत तुजसी । निमित्तमात्रें पुससी मजसी । तरी पायांसि निवेदितों ॥२५॥

मी फिरलों सप्तपाताळ । आणि पाहिलें स्वर्गमंडळ । परी या मृत्युलोकिंचा खेळ । अद्‌भुत विशाळ रचिला त्वां ॥२६॥

नाना धर्मातें स्थापिलें । नाना वर्ण याती निवडिले । साधनालागीं निवेदिले । क्रम दाविले वेगळेची ॥२७॥

लाविली स्वधर्माची रहाटी । बहु मर्यादेची हातवटी । तप अनुष्ठानाच्या कोटी । विवेक गोष्टी ज्ञान चर्चा ॥२८॥

कर्मधर्म श्रेष्ठाचार । वेदाज्ञा सर्वांसी थोर । धर्मांतरींचे धर्मविचार । सारासार योजिले ॥२९॥

तरावयासी नरनारी । युक्ति दाविल्यासि संसारीं । आचरतां पावती स्वर्गपुरी । इहीं परत्रीं होय कीर्ति ॥३०॥

विधाता म्हणे त्या कोण । तुज आल्याति आढळोन । त्याचि सांगे बा निवडोन । माझें मन वेधलें ॥३१॥

नारद म्हणे स्वामिया । सहज प्रपंचीं नेमिली क्रिया । तेचि निवेदितों पायां । जवळी माया ऐकती ॥३२॥

सेवकासी स्वामी देव । अनन्योक्ति धरोनि भाव । निष्कपटें सेवा अपूर्व । सदा गौरव स्वामीचा ॥३३॥

स्वामीचरणीं सदा मन । त्याहोनि थोर नसेची आन । स्वामिकाजी वेचिती प्राण । तोचि धन्य मी जाणें ॥३४॥

निस्सीमत्वें सेवा ज्याची । मग तुम्हांवरी सत्ता त्याची । मूर्ती जे का विश्वेशाची । तोही लालची त्या भेटी ॥३५॥

तैसेंच गृहस्थाश्रमीं लोकां । देव तो अतिथि देखा । त्याचीच सेवा आवश्यका । करोनि सुखा पाविजे ॥३६॥

जेथें अतिथीचा सत्कार । तो मज भासे ईश्वर । त्याचे दर्शनेचि निर्धार । अधम नर उद्धरती ॥३७॥

जे या संसारीं जन्मदाता । ते पुत्रासि दैवत मातापिता । त्यांची आदरें सेवा करितां । धन्य पुत्रता तयाची ॥३८॥

सेवेपुरते साधन । नावडे कदा त्यालागुन । मातापितयांचें करी पूजन । आणि भजन अहर्निशीं ॥३९॥

मातापितयांच्या शरीरा । किंचित् दुःखाचा उबारा । देखतांचि प्राण घाबरा । औषधी बारा धुंडोनि दे ॥४०॥

उभयां वृद्धपण होतां प्राप्त । म्हणे हीं जगावीं दिवस बहुत । सेवा करितां न विटे मनांत । प्रीति अत्यंत त्या पुत्रा ॥४१॥

हा सर्व धर्मांत धर्म उत्तम । यासीच मानावें पुरुषोत्तम । हाही देखिला भूमिक्रम । अति सुगम साधकां ॥४२॥

चहुं वर्णाचे ठाईं । उत्तम सेवा नेमिली पाही । तेंचि परिसा लवलाही । लाविल्या सोई वेदमुखें ॥४३॥

मुख्य विश्वंभरी पावावया । तुम्हींच निर्मिल्या सर्व क्रिया । जाणोनि तया अभिप्राया । जन वर्ताया लागले ॥४४॥

तेंचि आतां निरुपण । गोद्विज आणि हुताशन । यां मुखीं करिती अन्नदान । अनेक सेवन नानापरी ॥४५॥

तो सांगतां विस्तार । ग्रंथ वाढेल अपार । म्हणोनिया संकेतसार । ध्वनिपर बोलिलों ॥४६॥

कोण्ही करिती जपध्यान । कोण्ही करिती अनुष्ठान । कोण्ही आहारविहार करुन । आसन मुद्रा चाळिती ॥४७॥

कोण्ही पंचाग्नि ध्रूमपान । कोण्ही शीत उष्ण पर्जन्य । कोण्ही फळमूळ पत्रांतें सेउन । मौनी टांगून राहिले ॥४८॥

कोण्ही दुग्धआहार सेविती । कोण्ही गलितपर्णें भक्षिती । वायुआहारें क्षुधासारिती । नाना गती योगाच्या ॥४९॥

कोण्ही हठातें प्रवर्तले । यमनियम करिते झाले । कोण्ही समाधि लावोनि बैसले । भगवे देखिले बहुतची ॥५०॥

नाना परीचीं विविध दानें । देतां पाहिलें सन्मानें । परि हें मनःसंकल्पाचे संधानें । घडे येणें कारण हें ॥५१॥

ऐसें बहुता परि देखिलें । सर्व मनःकामनेचें अंकिलें । निराश निर्विकारी नाहीं पाहिलें । नाहीं रुचलें मनातें ॥५२॥

नारद म्हणे ऐक ताता । सिंहाद्रि देखिला अवचिता । मग चढोनिया तया पर्वता । ऋषि समस्तां भेटलों ॥५३॥

तेथें ऋषिआश्रम पाहिले । कांहीं कमन विश्रामलें । चालता तीन श्रृंग देखिले । तरु वेष्टिलें सघन पैं ॥५४॥

तेथें वळंघोनि जातां । आश्रम देखिला अवचिता । भेटी झाली तुझिया सुता । झाला देखतां आनंद ॥५५॥

धन्यधन्य तो तपोधन । अत्रिनामें तुझा नंदन । निर्लोभ निर्विकार मन । स्वरुपीं निमग्न सर्वदा ॥५६॥

तेवीच त्याची कांता । अनसूया नामें पतिव्रता । ती तुमची स्नुषा समर्था । तिची साम्यता नये कोण्हा ॥५७॥

तिहीं लोकीं माझी गती । सर्वही पाहिल्या युवती । कोण्ही एक सरी न पावती । म्लान दिसती मजलागीं ॥५८॥

पतिसेवा तप निर्मळ । चित्त जिचे गंगाजळ । आतिथ्य आदरी कोमळ । धन्य सुशीळ अनूसया ॥५९॥

ऐकोनिया नारदवचन । विरंची झाला आनंदघन । तव सावित्री बोले वचन । तें सावधान परिसावें ॥६०॥

सावित्री पेटोनिया क्रोधा । म्हणे काय वर्णितो नारदा । एक वाढवोनिया प्रमदा । करिसी निंदा सकळांची ॥६१॥

कैसेनि अनूसया म्हणसी थोर । येर आम्ही काय झालोंति पामर । तिचे सामर्थ्याचा विचार । कळला साचार काय तुज ॥६२॥

तिच्या उपमेच्या योजनीं । नसती काय कोण्ही कामिनी । नारद बोले तये क्षणीं । माये मनीं न कोपावें ॥६३॥

माते जेथें शांती नाहीं । ते पतिव्रता नोव्हेचि कांहीं । उमा लक्ष्मी तूंही । दासी तीतें साजाल ॥६४॥

ऐकोनि नारदाचे उत्तरा । क्रोधें कांपतसे थरथरां । दांत खावोनि करकरां । शाप उच्चारा करुं पाहे ॥६५॥

नारद बोले तये वेळां । असत्य करिसी माझिया बोला । तईंच बाधेल शाप मजला । निष्फल बोला न बोलिजे ॥६६॥

मनीं म्हणे बरवें झालें । काळक्रमणेसी फावलें । आतां कैलासीं भलें । त्वरें गेलें पाहिजे ॥६७॥

करोनि मातापितयां नमन । नारद निघाला तेथून । त्वरें पावला कैलासभुवन । उमारमण देखिला ॥६८॥

आनंदमेळा शिवगौरी । उभयही खेळती सारी । नारदा पाहातांचि सत्वरी । शिव सत्कारी आदरें ॥६९॥

शिव बोले नारदासी । कोठोनि येणें झालें तुम्हांसी । विशेषाधिक आम्हांसी । करा कीर्तनासि निवेदा ॥७०॥

हिमनगजा देखोनि नयनीं । मनीं उल्हासला नारदमुनी । मागील कथा कथूं कथनीं । जे विरंचीलागोनि सांगितली ॥७१॥

नारद म्हणे जी शिवा । कैलासपते शंभवा । भवनाशका भवानीधवा । तूं विसावा सकळांचा ॥७२॥

हे पिनकपाणी अंबुधरा । पयःफेनधवला उदारा । तुज ठावें सर्व दातारा । सृष्टिव्यवहारा कर्ता तूं ॥७३॥

नारदा बोलसी तूं खरें । मीही जाणतों तें बरें । परि आपुल्याला विचारें । सकळ व्यवहारें वर्तती ॥७४॥

प्रदीप्त होतां जथराग्न । करेंचि घालावें अवदान । दांतें पिष्टवत् करोन । जिव्हें लोटून देइजे ॥७५॥

पाहतां अग्नीची सर्व शक्ति । तेवी मी चालक सर्वां भूतीं । परि ज्याचें कार्य त्या हातीं । नेमिल्या रीती घेइजे ॥७६॥

नारदा तूं मुनीश्वर । कीर्तनीं तुझाची अधिकार । तरी भुकेलेति श्रवणद्वार । आणि अंतर कथार्थी ॥७७॥

नारद म्हणे जी सर्वेश्वरा । पंचवदना गंगाधरा । दशभुजा पन्नगहारा । उमावरा परिसावे ॥७८॥

म्यां भुवनत्रय पाहिलें । धर्माधर्म विलोकिले । बहु पुण्य श्लोक देखिले । भूलोकीं भले नांदती ॥७९॥

योगी यागी जटिळ जोगी । संयोगी वियोगी बैरागी । भोगी त्यागी वितरागी । निःसंगी रंगी अनंत ॥८०॥

यमी दमी नेमी क्षमी । प्रेमी नामी स्वामी भ्रमी । कामी कर्मी आश्रमीं । कर्मी धर्मी आगळे ॥८१॥

सुशील सुंदर सारज्ञ । सुमति सुदाते प्राज्ञ । शूर सुखी सुरज्ञ । सुलक्षण राज्ञ विवेकी ॥८२॥

जितेंद्रिय आणि ज्ञानी । अर्थज्ञ जे वेदपुराणीं । शास्त्र श्रुती वाखाणी । वैद्य गुणी ज्योतिषि ॥८३॥

सेव्य सेवक सेवाधारी । हेही देखिले नानापरी । गृहस्थाश्रमी नरनारी । असता संसारी दक्ष जे ॥८४॥

परि आशालोभ विरहित । प्रपंचीं असोनी मायातीत । निर्विकार आणि शांत । ऐसा विरक्त अत्रिमुनी ॥८५॥

सिंहाद्रि पर्वतीं । वास करितसे निश्चिती । पत्‍नी अनसूया सति । तप आचरती उभयतां ॥८६॥

शांति वैराग्य औदार्य सदय । सदा सत्स्वरुपीं ज्याचें लय । अति सतेज उभय काय । धन्य होय ते जगीं ॥८७॥

अनसूया ती लावण्याखाणी । सदा तिष्ठे पतिसेवनीं । आन पदार्थ न रुचे मनीं । लक्ष चरणीं पतीच्या ॥८८॥

पतिवांचोनि नेणे देवता । वर्ते अनुसंघानें पतिव्रता । कंटाळा नाणी सेवाकरितां । अतिसौख्यता मानी जीवा ॥८९॥

खालीं पडों नेदीच वचन । अत्रीस राखी सदा सुप्रसन्न । करुं नेणेंचि भिन्नाभिन्न । जीवप्राण पतीपाई ॥९०॥

शिवा त्रिलोकीं माझी गती । बहुत धुंडिल्या युवती । क्वचित् पतिव्रताही असती । परी न पवति अनसूयेतें ॥९१॥

कोण्ही सेविती द्रव्यासाठीं । कोण्ही संतान इच्छिती पोटीं । कोण्ही लौकिकाचार रहाटीं । कोण्ही बाह्य दृष्टी पतिपुढें ॥९२॥

कोण्ही स्वरुपा भुलोन । कोण्ही चातुर्यकळा पाहोन । कोण्ही वृद्धाचार विलोकोन । सेवा सन्मान जाणविती ॥९३॥

कोण्ही धाकेंच राबती । कोण्ही आशालोभें वागती । कोण्ही परदेखणी आचरती । नाहीं प्रीती अंतरीं ॥९४॥

पतिधन माने अतिथोर । जिकडे तिकडे जयजयकार । तयापुढें जोडोनि कर । भाषण मधुर बोले लवे ॥९५॥

जो पति मूढहीन । जयापाशी नाहीं कांचन । नेणेची जो मानापमान । तयां धुडकोन टाकिती ॥९६॥

पति योगी वीतरागी । नावडे पति जाला जोगी । हीन क्षीण कुरुप अंगी । भंगी चंगी नावडे ॥९७॥

पति दरिद्री मलिन । पति न घडि जो भूषण । पति न करी मनोरथ पूर्ण । तेथें मन न घे तिचे ॥९८॥

असो ऐशा कामिनी पुष्कळ । देखतां मन झालें विकळ । परि अनसूया अतिनिर्मळ । साध्वी सुशीळ सर्वांहुनी ॥९९॥

देवा पाहिले स्वर्गलोक । पाताळ आणि भूलोक । धुंडिले सर्व लोकालोक । परी अनसूया एक निवडली ॥१००॥

सकळ युवतींमाजी उत्तम नारी । अति श्रेष्ठत्वें ज्या सुंदरी । त्या या अनसूयामंदिरी । दासीपरी साजती ॥१॥

ऐकोनी नारदाचें कीर्तन । शिव करी हास्य वदन । परी अपर्णा क्रोधायमान । होवोनि वचन बोलतसे ॥२॥

साधु आपणा म्हणविशी । आणि निंद्य भाषणें बोलसी । तुच्छ करुनी सकळांसी । बहु वानिसी अनसूयेतें ॥३॥

तीच काय जाली पतिव्रता । कोणें देखिली तिची योग्यता । वाढवोनि सांगसी मज पुढें कथा ।केवीं समता पावे आम्हां ॥४॥

नारद म्हणे आतांचि कळलें । खरें खोटें निवडोनि पडिलें । माते अज्ञानतमें वेष्टिलें । मज आढळलें भाषणीं ॥५॥

अंबा म्हणे बहु बोलसी । शापशस्त्रें ताडीन तुजसी । मुनी म्हणे असत्य करिसी । मम बोलासी तैं शाप ॥६॥

ऐसी परीक्षा करुन । नारद पावला अंतर्धान । मुखें करीत नामस्मरण । आनंदघन मानसीं ॥७॥

म्हणे ही काळक्रमणा आम्हांसी । बरवीच जाली निश्चयेसी । चमत्कार पडेल दृष्टीसी । हात शेंडीसी फिरवीत ॥८॥

आनंद न समायेची पोटीं । चालता पावला वैकुंठीं । रमारमण देखिला दृष्टीं । भद्रपीठीं साजिरा ॥९॥

श्याम चतुर्भुजमूर्ति । विशाळ नेत्र कमळाकृति । भ्रुकुटी सुनीळा विराजती । वक्रगती साजिर्‍या ॥१०॥

भाळीं मृगभद रेखिला । कबरीमार आकर्षिला । मस्तकीं मुगुट तेजागळा । दीप्ति कुंडलां अनुपम ॥११॥

कोटी सूर्यांचे उमाळे । त्याहोनि त्यांचें तेज आगळें । कर्णद्वयीं झल्लाळे । वरी कुंतलें नीलालक ॥१२॥

कटीं शोभती मुक्ताहार । पदक मणिमय सुंदर । एकावेळी अतिनागर । जडित प्रकार वैडूर्य ॥१३॥

कौस्तुभ आणि वैजयंती । आपादलंबिनी शोभती । हृदयावरी विराजती । वत्सलांछन भृगुलत्ता ॥१४॥

बाहु स्थानीं भूषणें । भुजबंद पेटया विलक्षणें । बिरुदें शोभती करकंकणें । मुद्रिका लेणें करांग्रीं ॥१५॥

करीं शंखचक्र आणि गदा । धरी अरिमर्दनाच्या भेदा । पद्मकमळ त्या मुकुंदा । दासपदा रक्षावया ॥१६॥

हृदय विशाळ घवघवीत । उदरतळीं नाभी शोभत । जया कमळीं जन्मत । विरंचीसुत हरीचा ॥१७॥

अतिशयेसी माजसान । तेथें वेष्टिलें पीतवसन । तें तडित्प्राय झळके पूर्ण । झांकती नयन पाहतां ॥१८॥

क्षुद्रघंटा कटिबंद । मंजुळ निघे तेथील शब्द । तो वर्णावया जपे वेद । न कळे भेद तयाचा ॥१९॥

जानुजंघा अति सरळ । घोटवे दिसती वर्तळ । सकुमार दोन्ही चरणकमल । वरी कल्लोळ ब्रीदाचा ॥२०॥

नुपुर आणि तोडर । सुघोष अंदुवाचा गजर । श्रुतिशब्दें झणत्कार । अति गंभीर होतसे ॥२१॥

चरणतळें दिसती आरक्त । ध्वज व्रजांकुशरेषा तळपत । झळके पद्मचिन्हांकित । पद्मा सेवित त्यां ठाया ॥२२॥

दशांगुलिया विराजमान । चंद्रांशें तें नखस्थान । पंच आरक्त स्थळें भिन्न । सुहास्य वदन देखिला ॥२३॥

नारदें केला नमस्कार । हें देखोनिया सर्वेश्वर । करी वैष्णवाचा सक्तार । माझे प्रियकर म्हणोनी ॥२४॥

सप्रेमें बोले नारायण । धन्य धन्य आजिचा सुदिन । नारदा तुझें जालें दर्शन । भाग शीण वारला ॥२५॥

तुम्ही माझे परम आप्त । जाणतां जीवीचें गुह्य गुप्त । तुमचे भक्तिभावें मी तृप्त । तुमचेनि प्राप्त सुख मज ॥२६॥

नारदा तुम्ही माझे प्राण । कायारुपें मी प्रावरण । ये‍र्‍हवीं पहा मी निर्गुण । तुम्हीं सगुण केलें मज ॥२७॥

नारदा मी तंव अरुपी । तुम्हीं आणिलें मज स्वरुपीं । स्वरुपीं परि सदा झोंपीं । जागृत अपीं मज केलें ॥२८॥

तुम्हीं जैं मज देतां आठवण । तैंच करी मी कार्याकारण । सर्वांपरि तुम्हां आधीन । वचन मान्य तुमचें ॥२९॥

तुम्हाविण माझेंपण । काय कळे कवणा लागुन । मम ज्ञानाचेंही तुम्ही ज्ञान । करा पालन माझें तुम्ही ॥३०॥

नारद म्हणे जी देवाधिदेवा । या दासपदातें किती वाढवा । आम्हीं तों स्मरावें तुझिया नांवा । आमुचा ठेवा पाय तुझे ॥३१॥

तूं सच्चिदानंद विलासी । पूर्ण ब्रह्म गा अविनाशी । अवीट तूं निरंजनवासी हिरण्यगर्भासी परौता ॥३२॥

तूं आकारविकाररहित । आगम अगोचर मायातीत । सकळ भेदाभेदरहित । तूं अप्रांत अनिर्वाच्य ॥३३॥

अबाधित तुझा महिमा । ठाव न लगे आगमनिगमा । तो तूं साकार पुरुषोत्तमा । झालासि आम्हांकारणें ॥३४॥

माय बाळासि म्हणे माय । पिता बाळा बाबा म्हणत जाय । तरी ते पदवी शोभे काय । आवडी होय वडिलांची ॥३५॥

तैसें तुम्ही आम्हां भूषवितां । परि ते आम्हां नसे योग्यता । सत्ताधारी तूं अनंता । पायीं माथा ठेवूं दे ॥३६॥

यापरि नारद नारायण । येरयेरातें गौरवून । देते झाले प्रेमालिंगन । समाधान समरसीं ॥३७॥

आलिंगन सारोनि अनंतें । क्षेम दिधलें नारदातें । म्हणे बा रे येणें तूतें । कोठोनि निरुतें सांग मज ॥३८॥

कांहीं अधिकोत्तर वार्ता । पाहिली ऐकिली श्रवणपंथा । तेचि निवडोनी सांगे मज आतां । ब्रह्मसुता ये वेळे ॥३९॥

तंव हां जी म्हणोनि पाणी । जोडोनि बोले मधुरवचनीं । लक्ष्मी देखोनि सन्निधानी । आनंद मनीं उदेला ॥४०॥

नारद म्हणे दीनदयाळा । मज तो हिंडावयाचा चाळा । देखिलें पाहिलें डोळां । तेंचि घननीळा सांगतों ॥४१॥

स्वर्ग मृत्यू पाताळ । स्वेच्छें फिरतों तिन्ही ताळ । परि धन्य हे भूमंडळ । जें कां सफल सर्व काजीं ॥४२॥

पाहतां भूलोकींची रचना । कोण्ही लोक न ये मना । तप अनुष्ठान योग नाना । करितां कामना पुरती ॥४३॥

नाना परिच्या अवतारमूर्ती । तेथें तुझ्या असती जगत्पती । अनेक तुझिया विभूती । सांगूं किती निवडोनी ॥४४॥

तपी तापसी दिगंबर । सिद्ध साधू योगेश्वर । ज्ञानी व्युत्पन्न विवेकसागर । अति सुंदर वेदवक्ते ॥४५॥

प्रपंचीं परमार्थी सघन । बोलके चतुर विचक्षण । बोलोन्मत्त पिशाचमौन । धारणा धरुनी असती ॥४६॥

तीर्थ देव आणि क्षेत्र । पुरें पट्टणें विचित्र । नरनारी जन पवित्र । पठति स्तोत्र मंत्रजप ॥४७॥

नाना भक्ति नाना देवता । नाना पुराणें नाना कथा । नाना धर्म देखिले आचरतां । नाना पंथा स्थापक जे ॥४८॥

नाना सेवेचे प्रकार । नाना साधनांचा विचार । नाना साधक अतितत्पर । नाना घोर घातकी ॥४९॥

नारद विनवी जगदुद्धारा । ऐसा भूलोकींचा पसारा । पाहोनिया मज दातारा । सुख अंतरा होतसे ॥५०॥

परि आशा लोभ मोहो । काम क्रोधें केला दाहो । मद मत्सराचा संमोहो । येणें कावो पुरविला ॥५१॥

येणें वेष्टिले प्राणी । जन्ममरणाची घेतली आवंतणी । स्वकरेंचि पडिले बंदीखानीं । नैराश्य करणी नसे कोठें ॥५२॥

यापरी सर्व धांडोळिलें । नैराश्य कोण्ही नाहीं देखिलें । मन कोठें न स्थिरावलें । परी शांतावलो एके ठाईं ॥५३॥

सिंहाद्रि पर्वतीं जातां । ऋषिदर्शन जालों घेता । तंव ब्रह्मसुत अवचिता । तप आचरतां देखिला ॥५४॥

अत्रि तयाचें नामाभिधान । शांतशील विरक्तपूर्ण । नैराश्यवृत्ति करोनि धारण । स्वानंदीं निमग्न देखिला ॥५५॥

त्याची कांता अनसूया । परम साध्वी गुणालया । सेवीतसे पतिपायां । झिजवी काया सत्कर्मीं ॥५६॥

निस्सीम पतिसेवनीं भाव । पतिच मानी जैसा देव । विषयीं विरक्त न करी लाघव । परम अपूर्व सेवा तिची ॥५७॥

पतिवांचोनि पदार्थ आन । तेथें न घालींच कदा मन । जैसी भ्रमरी कमळासि जाय लुब्धोन । जातां प्राण न सोडी ॥५८॥

तैसि पतिसेवनीं आवडी । मिठी जैसी मक्षिका गोडी । स्वप्नींही नोव्हे कदा कुडी । वृत्ति गाढी जडलीसे ॥५९॥

प्राणाहोनि पति आगळा । पतिचरणीं सतीचा डोळा । धन्य माऊली पुण्यशीळा । अंतरी जिव्हाळा सदयत्वें ॥६०॥

जैसा स्वशरीरीं झिजे चंदन। परि सकळां करवी भूषण । करी तापाचें हरण । आनंदघन मानसा ॥६१॥

तेवी अहोरात्रंदिवा । काया कष्टें करी सेवा । दुःख नेदीच पतिजीवा । संतोष बरवा वाढवी ॥६२॥

तैसीच अतिथीचे सन्मानीं । सुख देतसे आश्रमस्थानीं । अनुकूळ पदार्थांतें अर्पोनी । मृदुवचनी संतोषवी ॥६३॥

सप्रेम सदय कोमळ । परदुःखीं मन विव्हळ । परोपकारी निर्मळ । नये मळ द्वैताचा ॥६४॥

नारद म्हणे विश्वव्यापका । कोण्ही स्त्रिया न ये तितुका । या अनसूयेच्या साम्यका । कोण्ही देखा न दिसे मज ॥६५॥

रुपवती कुलवती नारी । देवा आहेति नाना परी । परी या अनसूयेची सरी । रजभरी नयेची ॥६६॥

अनसूया सद्‌गुणसंपन्न । न्यून नसे एकही गुण । सर्वांपरी सुलक्षण । धन्य धन्य हे सती ॥६७॥

परम पावन हे पतिव्रता । दुजी नसे उपमा देतां । सकळ पतिव्रतेची हे माता । की कुळदेवता सकळांची ॥६८॥

जया गांठीं महत् पुण्य । तोचि तिचें पावे दरुषण । तिचें वर्णावया महिमान । नसे अंगवण कवणातें ॥६९॥

अनंत ब्रह्मांडीच्या नितिंबिनी । यांनीं सेवा करावी तिचे सदनी । परिपात्र न होती मजलागुनी । चक्रपाणी दिसतसे ॥७०॥

ऐसी नारद वर्णितसे ख्याती । धन्य धन्य म्हणे तो श्रीपती । तंव क्रोध नावरे लक्ष्मीप्रती । जाली जल्पति नारदा ॥७१॥

म्हणे एकीसिच तुवां वाखाणिलें । इतर स्त्रियांसी निर्भर्त्सिलें । काय गुण तुज कैसे कळले । किंवा चावळल चित्त तुझे ॥७२॥

नारदा हें तुझें संतपण । आजि मज कळोन आलें पूर्ण । हे कोठोनि शिकलासि गुण । पापलक्षण निंदक ॥७३॥

सकल मेल्या काय पतिव्रता । एक उरली अनसूयाचि आतां । तुज कळों दे ब्रह्मसुता । कसनी कसितां केविं तगे ॥७४॥

पानामागोनि आली । तेचि केवीं तिखट जाली । त्वांच मुखीं वाखाणिली । कालची कोल्ही मजपुढें ॥७५॥

शोधितां हे ब्रह्मांडभर । कोण आम्हां तिघींहून थोर । नारदा तुज न कळेचि विचार । सर्व कारभार आमुचा ॥७६॥

नारद म्हणे वो माय । वृथा बोलसी तरी काय । अनसूयेचे वंदिसी पाय । कल्याण होय तें तुझें ॥७७॥

नारदाचे शब्द बाण । हृदयीं खडतरले दारुण । मग शापशस्त्र करीं घेऊन । करुं ताडन उठली ॥७८॥

लक्ष्मी पुन्हा वदे नारदासी । तूं मुखें जीतें वर्णिसी । तिजसमवेत मी तुजसी । अतिवेगेंसी श्रापीन ॥७९॥

नारद म्हणे तुमची खोडी । अविचारें करावी बोटमोडी । काकशापें पशुपडी । केवी रोकडी होईल ॥८०॥

तैच शाप बाधी आम्हांसी । बोलिले बोल वाया करिसी । नमोनि विष्णुचरणांसी । नारद वेगेंसि पै गेला ॥८१॥

नारद गेलिया पाठीं । वर्म बाणाचें दुःख पोटीं । आपुलाल्या ठायीं होतीं कष्टी । तिघी गोरटी बहुसाल ॥८२॥

तंव कोण्ही एके अवसरी । सावित्री आणि गौरी । दर्शना पातल्या वैकुंठपुरी । क्षेम परस्परीं पुसती ॥८३॥

येरयेरी देवोनि सन्मान । आनंदे करिती भाषण । लक्ष्मी सावित्रीलागुन । सहज वचन बोलत ॥८४॥

बाई नारद तुझा बाळक । साधु म्हणवी परिचाळक । कळिलावा असें देख । न राहे नावेक एक ठाई ॥८५॥

एके दिनी आला येथें । लाघवें मोहिलें मम स्वामीतें । त्यांनीं सहज विचारिलें त्यांते । अद्‌भुत वृत्तांत निवेदा ॥८६॥

मज सन्निध देखोनि नारदे । वंदोनियां दोघांचीं पदें । कुशलत्वाचीं भाषणें मैंदे । मधुर विविधें निरोपिलीं ॥८७॥

नाना लापनिका लावून । मोहिला तेव्हां जगज्जीवन । तेही ऐकती सावधान । गोड कथन म्हणोनी ॥८८॥

तैशा कथेमाजी कथा । अत्रि अनसूयेची झाला निरुपिता । धन्य धन्य ते पतिव्रता । वारंवार वर्णिता पैं होय ॥८९॥

म्हणे तिजऐसी सुंदरी । धुंडिता नसे ब्रह्मांडोदरी । ज्या पतिव्रता असती नारी । दासी तिचे घरीं साजति ॥९०॥

ऐसे ऐकोनि त्याचे वचन । मी परम झाले क्रोधायमान । शापशस्त्रें करितां ताडन । आणिक सरसावून बोलिला ॥९१॥

असत्य कराल माझिया बोला । तरीच तुमचा शाप बाधील मजला । ऐकोनी मम मनाला । चिंताग्नि झोंबला अनिवार ॥९२॥

तंव सावित्री विनवीत । काय वदूं पुत्राची मात । आमुचे गृहीं हाचि वृत्तांत । पतीसी सांगत मजदेखतां ॥९३॥

अनुसूयेचा बडिवार । तेथें वर्णिला बहु फार । हीनत्व वदला साचार । मज समोर मज लागी ॥९४॥

तंव सरसावली हिमनगबाळा । म्हणे तुझा पुत्र कळकुटा भला । चूड लावोनी परसदनाला । आपण वगळा राहतो ॥९५॥

आम्हीं उभय असतां एकांती । आपण प्रगटतो अवचितीं । गोष्टी सांगतो नाना रीती । मोहित होती चंद्रचूड ॥९६॥

बाई एके दिवशीं आला । तेणें हाचि वृत्तांत सांगितला । सेखी उणीं उत्तरें बोलिला । जिव्हारी झोंबला बाण मज ॥९७॥

मग मी बोलिलें शाप देईन । तंव म्हणे करा असत्य भाषण । न होतां मजकारण । शाप संलग्न नोव्हेची ॥९८॥

येरयेराचा ऐकोनि वृत्तांत । तिघींनी केले एकचित्त । विचार रचिती अद्‌भुत । नारदा असत्य करावया ॥९९॥

असो बाई ऐसें करावें । उत्तम युक्तीते योजावें । जेणे अनुसयेचें सत्व हरावें । यश मिळावें आपणातें ॥२००॥

तंव उमा म्हणे ऐका वचन । आधीं स्वपति करा प्रसन्न । मग तया घ्यावें वचनाधीन । गुह्य कारण कळवावें ॥१॥

न ऐकतां रुसणें फुगणें । अन्य युक्ती कार्य साधणें । सत्त्वहरणा पाठविणें । दीनपणें लीनत्वें ॥२॥

ती मानली तिघींसी मात । मग आपुलाले स्वस्थानीं जात । पतिसेवनीं झाल्या रत । अतिप्रीत दाविती ॥३॥

जैसा मैंद साधु होउनी । मार्गी बैसे ध्यान धरोनी । शब्दें तोषवी आलियालागोनी । धनहरणीं सावधान ॥४॥

कीं गंगातटी बैसे बक । एकचरणी ध्यानी देख । मीनपदी मिळतां चुबक । मारी अचूक ग्रास करी ॥५॥

तैशा दांभिक विचारें । अर्थसाधनीं सेवा आदरें । तिघी आचरती परस्परें । अतिसत्कारें नेमयुक्त ॥६॥

सेवा करितां निशिदिनीं । भ्रतार तोषले श्रम देखोनी । म्हणती कोण इच्छा असेल मनीं । आम्हांलागुनी सांगिजे ॥७॥

येरी म्हणती द्यावे वचन । दिल्या नोव्हें अप्रमाण । अवश्य म्हणोनी आश्वासन । प्रेमें करुन दीधलें ॥८॥

म्हणती स्वामी कृपासागरा । चरणीं विनवितें प्राणेश्वरा । नारदनिरुपणाच्या उत्तरा । तुम्ही दातारा ऐकिलें कीं ॥९॥

हीनत्व देवोनि आम्हांसी । वाखाणिलें त्या अनसूयेसी । असत्य करावें नारदवचनासी । हेंचि मानसीं वाटतें ॥१०॥

अहो जी कांहीं करोनि युक्ती । हरावी अनसूयेची सत्त्वशक्ती । मग सहजची अपकीर्ती । होईल जगतीं तियेची ॥११॥

आम्हां हा करवा जी आनंद । मग तो पाहूं कैसा नारदा भलतेंचि बोलिला विरुद्ध । करुं त्या भेद शापशास्त्रें ॥१२॥

तैं ब्रह्मा विष्णु महेश्वर । तिघे तिघींसी देती उत्तर । हें तो कार्य अनिवार । नीट विचार नोव्हे हा ॥१३॥

अनसूयेनें येऊन । नाहीं केलें तुम्हां भाषण । नाहीं दाविले थोरपण । किमर्थ भूषण योजितां ॥१४॥

अत्रि अनसूयाबाळक । याचें मानावें की कौतुक । धन्य जन्मले कुलोद्धारक । याचें सुख असावें ॥१५॥

रायें दीनातें दंडिलें । कोण थोरपण तें वाढलें । सिंहें बाळका निर्मर्त्सिलें । पुरुषार्थ झाले कैसेनी ॥१६॥

तैसें तुम्ही तयां योजितां । यणें नोव्हे तुम्हां योग्यता । विविकें विचार पुरता । मग अनर्थां संचरावें ॥१७॥

असो नारद बोलिला कुशल । पाहिल्या ऐसें निवेदिलें सकळ । तुम्हां कांहीं न बोलतां बोल । तापला प्रबळ तुम्हीच कीं ॥१८॥

पाहतां शब्द कैंचा त्याकडे । तुम्हींच मानोनि घेतलें वाकडें । आतां वृथा कां उचलां लाकडें । आम्हां साकडें घालितां ॥१९॥

ऐशा ऐकतां पतिवचना । रुसोनि गेल्या त्या अंगना । कांहीं न करिती भाषणा । दुर्मुख वदना झाल्या त्या ॥२०॥

त्यागिती निद्रा आसन आहार । मधुरोक्ति प्रपंच विचार । सुखशय्या पुष्पहार । अतिदूर भिरकाविती ॥२१॥

ऐसें देखोनिया विपरीत । कांत कांतेसी संबोखीत । येरी झिडकारोनि बोलत । भले वचनार्थ तुमचे ॥२२॥

आमुची तुम्हां कायसी प्रीती । बोल नारदाचे गोड लागती । तेची स्वीकारोनी दिबारातीं । काळगती सारिजे ॥२३॥

नारद म्हणजे कळचेटा । बहुतांच्या करी बारा वाटा । तो तुम्हांसि झाला वरवंटा । आम्हींच थोंटा वाटलों ॥२४॥

तुम्हांसन्निध उण बोलावें । भ्रतार तुम्हीं ऐकोनि सहावें । आम्हा दूषिता उगें रहावें । हें काय बरवें तुम्हांसी ॥२५॥

तुम्हीं काय कींजे या प्रती । आमुचेच प्रारब्धाची हे गती । म्हणोनी पालटली मती । तुमची पती येधवां ॥२६॥

बोलतां सद्गद जालें हृदय । नेत्रांतुनी जळ वाहत जाय । उकसाबुकसी स्फुंदत जाय । परम होय दुःखित ॥२७॥

पंचानन चतुरानन चतुर्भुज । मनीं मानिती अत्यंत चोज । म्हणती ओढवलें विपरीत काज । लागली भाज भाजावया ॥२८॥

यांचे मनोदयें न वर्तता । तरी गांठ घालिती अनर्था । जरी रक्षणें लौकिकपंथा । तरी अर्था पुरवावें ॥२९॥

असो आपुलाली कामिनी । घेते झाले अंकासनीं । नाना विनोद कौतुक भाषणीं । हर्ष मनीं वाढविला ॥३०॥

तंव त्या जोडोनि पाणी । भाळ ठेविती पतिचरणी । म्हणती स्वामी कृपा करोनी । इच्छिलें मनीं पुरवावें ॥३१॥

स्त्रीहट्टाचा विचार । देखोनिया अति अनिवार । देते झाले प्रत्युत्तर । जेणें अंतर सुखावें ॥३२॥

अनसूयेचें सत्त्व हरावें । या लागींच उपाय करावे । हें इच्छिलें तुमच्या जीवें । फार बरवें असें कीं ॥३३॥

चिंता न करावी मानसीं । करु वेगी प्रयाणासी । अंतर न घडे आतां यासी । अभय दानासी घेइजे ॥३४॥

येथोनि तिघांचा एकांत । करोनि लीला दावितील अद्‌भुत । ते पुढिले प्रसंगीं रसभरित । श्रोते संत अवधारा ॥३५॥

श्रीमत्‌ दत्तप्रसादवाणी । याचे भोक्ते संतशिरोमणी । अनंतसुत तयांचे चरणीं । भ्रमर होवोनी रुंजी घाली ॥३६॥

संत साधु आणि श्रोते । हे अनंत सुताचे पाळीते । त्याचे नि कृपे या ग्रंथाते । केले वदविले मज मुढा ॥२३७॥

अनंत सुत संतांचा सेवक । आनन्यत्वे आज्ञा पालक । तंस आधांरे धरोनी तवक । बोलतो निःशंक लडीवाळे ॥२३८॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । नारदपुराणाचें संमत । श्रोते परिसोत भाविक भक्त । तृतीयाध्याय गोड हा ॥२३९॥

॥ इति तृतियोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP