रुक्मिणी स्वयंवर - प्रसंग तिसरा

रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.

प्रसंग तिसरा

श्रीवासुदेवाय नम: ॥ आपुले आर्तीचे अंजन । शुद्धसत्वाचे पत्र जाण । बुद्धिबोधे लेखन । वर्णाक्षरीं अक्षर ॥ १ ॥

मनोवेगाचा पैं वारु । त्यावरी बैसविला द्विजवरू । कृष्णापासी सत्वरू । समूळ मूळ पाठविला ॥ २ ॥

माझे पूर्णपुण्ये तूं द्विजवरु । कृष्णप्राप्तीसी मज तूं गुरु । म्हणवोनि केला नमस्कारू । वेगी यदुवीरू आणावया ॥ ३ ॥

स्वामिचरणीं ठेविला माथा । द्वारकेसी जावें जी तत्त्वतां । प्राण वांचवा हो आतां । वेगीं कृष्णनाथा आणावें ॥ ४ ॥

द्विज पावला द्वारका । वैकुंठ कैलासांहूनि अधिका । जेथें निवास जगन्नायका । विश्वव्यापका श्रीकृष्णा ॥ ५ ॥

द्वारकाबाह्यप्रदेशीं । आराम रमवी जीवशिवांसी । वसंत विनवी सदा सुमनेंसी । संताप कोणासी असेना ॥ ६ ॥

प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध । रुंजी करिता कृष्ण षट्‌पद । ऎकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावले ॥ ७ ॥

प्रबोध पारवे घुमघुमती । तेणे वागेश्वरी चमके चित्ती । विस्मित जाहला बृहस्पती । आश्चर्य मानिती सुरवर ॥ ८ ॥

डोलतीं पैं द्राक्षांचे घड । मुक्त परिपाके अतिगोड । सकळ कामाचे पुरे कोड । गोडाही गोड ते गोडी ॥ ९ ॥

कोकिळा कृष्णवर्ण कूजती । शब्द नि:शब्द मधुर वृत्ती । तेणें सनकादिक सुख पावती । प्रजापती तटस्थ ॥ १० ॥

मयूर आनंदे नाचत । अप्सरानृत्य तेणें तटस्थ । तांडव विसरले उमाकांत । अतिअद्‌भुत हरिलीला ॥ ११ ॥

शुद्ध हंस द्वारकावासी । मुक्तमोतियें चारा त्यांसी । तें देखोनियां परमहंसी । निजमानसी लाळ घोटी ॥ १२ ॥

शुक पिंगळे अनुवादत । तेणें वेदान्त दचकत । अतिगुह्याचे गुह्यार्थ । पक्षी बोलत द्वारकेचे ॥ १३ ॥

इतर नगरांची उभवणी । तिखणावरी पांचखणी । त्यांहीमाजी अतिदुखणी । द्वारकापट्टणीं तें नाहीं ॥ १४ ॥

द्वारका पाहतां वाडेकोडें । विजू पिळूनि घातले सडे । मुक्त पताका चहूंकडे । मशक त्यांपुढे सत्यलोक ॥ १५ ॥

द्वारकेची नवलपरी । चिंतामणीची चिंता हरी । कल्पतरूची कल्पना वारी । परियेसाची निवारी । जडत्व काळीमा ॥ १६ ॥

दशेचें दैन्य निवडी । अमृताची साल काढी । स्वानंदाची उभवी गुढी । नांदे उघडी द्वारका ॥ १७ ॥

द्वारकेमाजी शुद्ध केणें । दों अक्षरांचें खरें नाणें । जैसें घेणें तैसें देणें । कोणासी उणें असेना ॥ १८ ॥

वैकुंठीचिया वैभवासी । कृष्णें आणिलें द्वारकेसी । देखतां ठक पडलें द्विजासी । ते द्वारका कैसी वर्णावी ॥ १९ ॥

द्विजासी सत्वरता मोठी । नगर न पाहावेचि दृष्टीं । भीतरी पातला उठाउठी । जेथें जगजेठी श्रीकृष्ण ॥ २० ॥

म्हणवुनी द्वारकावर्णन । रहावयाचें हेंचि कारण । द्विजासी देखिला श्रीकृष्ण । विस्मित मन तयांचें ॥ २१ ॥

हेमसिंहासनीं आदिमूर्ती । बैसला असे सहजस्थिती । द्विजासी देखोन श्रीपती । भाव चित्तीं जाणिला ॥ २२ ॥

याचिया आगमनविधी । थोर होईल कार्यसिद्धी । फावली एकांतांची संधी । होय सद्‍बुद्धि ब्राह्मण ॥ २३ ॥

सिंहासनाखालती उडी । घालूनि दोन्हीं कर जोडी । नमन साष्टांगपरवडी । पूजी आवडी द्विजातें ॥ २४ ॥

अमर करिती कृष्णपूजा । तैशियापरी पूजी द्विजा । ब्राह्मणदेव कृष्णराजा । ब्राह्मणपूजा तो जाणे ॥ २५ ॥

ब्राह्मणासी मंगलस्नान । देऊनि पीतांबर सुमन चंदन । सन्निध बैसोनि आपण । दिधलें भोजन यथारुचि ॥ २६ ॥

शय्या घालुनि एकांती । अरळ सुमनांची निगुती । विडिया देऊनि श्रीपती । शयन करविती द्विजातें ॥ २७ ॥

कृष्ण बैसोनियां शेजारी । ब्राह्मणाचे चरण चुरी । येरू म्हणे गा श्रीहरी । करीं धरी कृष्णातें ॥ २८ ॥

ऎकें स्वामी देवाधिदेवा । आम्हीं करावी तुझी सेवा । तूं पूजितोंसी भूदेवा । ब्राह्मण देव म्हणवूनिया ॥ २९ ॥

निजात्मभावें उचितें । ह्रदयीं साहिले लाथेतें । तें हित नव्हेचि आमुतें । विपरीतार्थ फळला असे ॥ ३० ॥

तुझिया पूजा पूज्य जाहलों । तेणें गर्वासी चढिन्नलों । कृष्णसेवेसी नाडलों । थोर वाढलों अभिमानें ॥ ३१ ॥

तूं यज्ञपुरुष नारायण । तुज याज्ञिक नेदिती अन्न । वृक्षा गेलें त्यांचें हवन । कर्मठपण कर्माचें ॥ ३२ ॥

सर्वांभूती भगवद्भावो । नपुजे तंव न भेटे देवो । तैसा मी ब्राह्मण नोहें पाहा हो । जाणसी भावो ह्रदयींचा ॥ ३३ ॥

कृष्णें पुशिलें स्वागत । वृत्ति आहे की निश्चित । चित्तीं चिंता ज्या वर्तत । ते दुश्चित सर्वदा ॥ ३४ ॥

जयाची चिंता निवर्तली । तयाची वृत्ति सुचित जाहली । त्यासीच स्वकर्मे फळलीं । निजात्मफळाचेनि फळें ॥ ३५ ॥

असोनि इंद्राची संपत्ती । तृप्ती नाहीं जयाचे चित्तीं । ते अतिशय दु:खी होती । विटंबिजेती संसारीं ॥ ३६ ॥

असोनिया अकिंचन जयाची वृत्ति समाधान । तेणें अजिता मातें जिंकिले जाण । बंदीजन मी तयाचा ॥ ३७ ॥

सर्वांभूती भगद्भावो । त्यावरी स्वधर्मनिष्ठ भूदेवो । त्याचिया पाऊलापाऊलीं पाहा वो । सर्वांग वोडवीं ॥ ३८ ॥

ऎसिये निष्ठेचे जे ब्राह्मण । ते मज सदा पूज्य जाण । त्यांचे नमस्कारीं मी चरण । वारंवार मस्तकीं ॥ ३९ ॥

कृष्णदर्शनें समाधान । ब्राह्मणासी पडिलें मौन । विसरला कार्याची आठवण । जाणोनि प्रश्न हरि करी ॥ ४० ॥

कोठोनि येणें झालें स्वामी । कवण ग्राम कवण भूमी । तुमचे देशींचा देशस्वामी । प्रजा स्वधर्मी पाळी कीं ॥ ४१ ॥

दुर्गम मार्ग अति संकटीं । क्रमूनि आलेति आमुचे भेटीं । कवण इच्छा आहे पोटीं । ते गुह्य गोष्टी सांगावी ॥ ४२ ॥

आम्ही केवळ ब्राह्मणभक्त । आज्ञा करणें हें उचित । काय अपेक्षित तुमचें चित्त । ते निश्चित मी करीन ॥ ४३ ॥

कवण कार्याचिये विधी । तुम्ही आलेति कृपानिधी । ते झाली कार्यसिद्धी । जाणा त्रिशुद्धी सर्वथा ॥ ४४ ॥

ऎकोनि कृष्णमुखींची गोष्टी । द्विजें बांधिली शकुनगाठी । हर्ष वोसंडला पोटीं । आनंद सृष्टी न समाये ॥ ४५ ॥

म्हणे वैदर्भदेशीचा राजा भीमक । जैसा वैराग्यामाजी विवेक । भागवतधर्मी अतिधार्मिक । शुद्ध सात्त्विक सत्त्वाचा ॥ ४६ ॥

त्याची कन्या चिद्रत्‍न । लावण्य गुणें गुणनिधान । सकळ भूषणांचे भूषण । तें मंडन तिन्हीं लोकी ॥ ४७ ॥

उदार धीर गुणगंभीर । सज्ञान ज्ञानें अतिचतुर । तुझ्या ठायीं अतितत्पर । कलत्रभावें विनटली ॥ ४८ ॥

पित्याने तुम्हांसी दिधली वधू । ऎकुनि हांसिन्नला गोविंदू । हरिखें न सांभाळे स्वानंदू । द्विजासी क्षेम दीधले ॥ ४९ ॥

जें होतें कृष्णाचे पोटीं । तेंचि द्विजें सांगितली गोष्टी । जीवी जीवा पडली मिठी । पाठी थोपटी द्विजाची ॥ ५० ॥

आणिक एक संवादू । तिचा ज्येष्ठ बंधू विरोधू । तेणें शिशुपाळा दिधला शब्दू । लग्न परवा धरिलेंसे ॥ ५१ ॥

येचिविषयीं यदुनायका । आहे भीमकीची पत्रिका । ते वाचूनियां सविवेका । कार्यसिद्धी करावी ॥ ५२ ॥

मग काढिली पत्रिका । कुममंडित सुरेखा । धीर न धरवेचि हरिखा । आवडी देखा चुंबिली ॥ ५३ ॥

पत्रिका देखोनि कृष्णनाथ । श्रवणार्थी आर्तभूत । एका जनार्दनी विनवीत । पत्रिकार्थ परिसावा॥ ५४ ॥

इति श्रीमद‌भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे पत्रिकावलोकनं नाम तृतीय: प्रसंग: ॥ ३ ॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

N/A
Last Updated : July 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP