मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह|

निवडक अभंग संग्रह १६

निवडक अभंग संग्रह १६


*
हेंचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंतें तैसेचि राहावें । चित्तीं असा द्यावें समाधान ॥२॥
वाहिल्या उद्वेग दु :खचि केवळ । भोगणॆं तें फ़ळ संचिताचें ॥३॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवापायीं ॥४॥
*
आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर तीं माईकें दु:खाचीं जनिती । नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥
अविनाश करी आपुलिया ऎसें । लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥
तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥
*
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥
देखवी ऎकवी एक नारायण । तयाचें भजन चुको नको ॥२॥
मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥
वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥
तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं ॥५॥
*
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥२॥
कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्‍वर पूजनाचें ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव भोग पावे ॥४॥
*
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्रही न खाती सर्प तया ॥१॥
विष तें अमृत आघात तें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥२॥
दु:ख तें देईल सर्व सुख फ़ळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥३॥
आवडेल जीवां जिवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥४॥
तुका म्हणॆ कृपा केली नारायणें । जाणिजे तें येणें अनुभवें ॥५॥
*
संतकृपा झाली । इमारत फ़ळा आली ॥१॥
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ॥३॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ॥४॥
भजन करा सावकाश । तुका झालासें कळस ॥५॥
बहिणी म्हणे पडकती ध्वजा । निरुपण केले वोजा ॥६॥
*
देखोनियां तुझ्या रुपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥
तेणें माझ्या चित्ता होय समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥२॥
मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥३॥
तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळही ॥४॥
*
मी अवगुणी अन्यायी । किती म्हणॊन सांगो काई । आतां मज पायी । ठाव देई विठ्ठले ॥१॥
पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्र्चळ ॥२॥
अनेक बुद्धिचे तरंग । क्षणक्षणां पालटती रंग । धरुं जातां संग । तंव तो होतो बाधक ॥३॥
तुका म्हणॆ आतां । अवघी तोडी माझी चिंता । येउनी पंढरीनाथा । वास करी ह्र्दयीं ॥४॥
*
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥
मग तो हाऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥२॥
नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळतीं विघ्नें ॥३॥
तुका म्हणॆ प्राण । करा देवीसी अर्पण ॥४॥
*
आनंदाच्या कोटी । सांठवल्या आम्हां पोटीं ॥१॥
प्रेम चालिला प्रवाहो । नाम ऒघ लवलाहो ॥२॥
अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥३॥
थडी आहिक्य परत्र । तुका म्हणे समतीर ॥४॥
*
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥२॥
आपुल्याच वैभवें । शृंगारावें निर्मळॆं ॥३॥
तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावे प्रीतीचें ॥४॥
*
देह तिहीं बळें धरिला सायासें । करुनियां नास उपाधीचा ॥१॥
पूर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन तेचि झाले ॥२॥
तुका म्हणॆ यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येईल कळों ॥३॥
*
ब्रह्मरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवी ॥२॥
भवरोगा ऎसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥३॥
तुका म्हणे नव्हे बाधा । आणीक कदा भूतांची ॥४॥
*
संसार तो कोण लेखे । आम्हां सखे हरिजन ॥१॥
काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥२॥
स्वप्नीं तेही नाहीं चिंता । रात्रीं जाता दिवस ॥३॥
तुका म्हणे ब्रह्मरसें । होय सरिसें भोजन ॥४॥
*
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य धर्म केला ॥१॥
हरिभजनें हें धवळिलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥२॥
कोणाहि नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥३॥
तुका म्हणे सुख समाधी हरिकथा । नेणें भवव्यथा गाईल तो ॥४॥

N/A

N/A
Last Updated : January 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP