बहार ४ था - काब्यात्म जीवन

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


साध्य साधले नाही तोंवर हृदयी तळमळ सारी,
पुढची आशा भावनेंतली वाढवि गोड खुमारी.
हीच माधुरी ध्येयप्रेरित करी मनाला फार,
तरुण तरी काव्यात्मे नादीं फिरती बेदरकार.
केवळ आशा आणि निराशा यांचा झगडा चाले,
भाग्यवान ते, अमृत यांतुनी ज्यांच्या नशिबा आलें.
भाग्यावान ते प्रेमरसाची ज्याच्या कायम गोडी,
भाग्यावान ते, कधी न ज्यांचे प्रेम निराशा तोडी.
मुरार होता खरा भाग्यवान आणिक तालेवार ,
त्यांत एकला आणि लाडका होता सकलां प्यार.
गतवर्षीच्या स्मॄती तरळती अजुनी नयनीं गोड,
वेडें मानस त्याच चिन्तनी पुरवी अपुले कोड.
केव्हा केव्हा गतकालावर डोळे त्याचे खिळती,
जागेपणिंच्या स्वप्रामध्ये आणि सगूशीं मिळती.
कमण्डलूचा ओढा त्याचें पवित्र तीर्थ जहाले,
दरडीवरती जाउन बसतां, चित्त तयाचें धालें.
संसाराच्या झळा लागल्या नव्हत्या अजुनी त्याला,
अलग राहिला कोमल गाभा नाजुक केळीमधला.
ऐहिक विभवें आज लोळती त्याच्या पायीं सारीं.
उणीव त्यला नव्हती कसली भरलेल्या संसारीं.
किति आईने प्रेम करावें ! किती राबवा पोटीं -
आतुर होती मुरारसाठी, आस धरोनी मोठी.
‘मुरार अपुला शेतीभाती करुन अम्भेरींत,
चालवील ही थोर कुळाची कीर्ती आणिक रीत.
मानमरातब करतिल सारे, लीन होउनी पायीं-
लवतिल मोठे मोठे !’ - ऐशीं तात स्वप्रें पाही.
सायड्‍काळी जरा लागतां उशीर त्याला याया,
हुरहुर लागुन हृदय कोवळें हो मातेचें जाया.
प्रेमळ आई गडीमाणसें शोधायातें धाडी,
तों आणावी दौडत त्याने दाराजवळी गाडी.
कधी सगूच्या मना चोरटी लागावी हुरहूर,
आणि तयाने पूर्ण असावें  मित्रसड‍गती चूर.
कधी रावबा उसन्या रागें शब्द बोलता चार,
बाइल त्यांना निजमायेने मोडुनि काढी पार.
थोर जिवावर त्यांच्या चाले स्वच्छंदाने चैन,
प्रेमळतेच्या सुखसिन्धूला उधाण आलें ऐन.
एककुटुम्बीं प्रेमें झिजणें एकामेकांसाठी,
भाग्य थोर हें त्यांना लाभे, पुण्य जयांच्या गांठीं.
रुपगुणांनी त्यांना भासे जणू बिजेची कोर.
कीर्त ऐकुनी ही कन्येची मनांत धाला बाप,
विसरुन गेला एकलकोण्डया संसाराचा ताप.
‘वेळ अमोशा ’ येतां जता ‘ब्रह्मपुरी’ ची भरली,
आणि मुराने खिलारजोडी सोडुन, गाडी जुपली.
आई , सगुणा, आयबाया बसल्या शेजारील,
रड्‍गुनि गेला उल्हासाने आज मुराचा दील.
किंवा अपुली सर्व करामत दावायाची वेळ -
आली म्हणुनी कौशल्याचा करुं लागला खेळ?
सर्वापुढती दौडत त्याने नेली अपुली गाडी,
आयाबाया भ्याल्या त्याची पाहुनि धीट धडाडी.
तोंच खदखदा हासत त्याने नजर फेकिली मागे,
सगुच्या नेत्रीं कौतुक दिसलें नटलेलें अनुरागें.
जोर दुहेरी येऊन त्याला सार्थक झालें वाटॆ,
अन्य जनांच्या चेष्टांनी मन खुशालुनी मुद दाटे.
हेमन्ताच्या ऐन थण्डिचा कडका पडला रानीं,
आम्बराईचीं काळवण्डलीं झाडें पानीं पानीं.
शिवारांतल्या जोंधळ्यावरी किरण रवीचे पडले,
आणि तयांनीं नवमोत्यांचें लेणें रानीं घडलें.
निळापाण्ढरा मधेच कोठे निघे पिकांतुन धूर,
साड्‍गत- ‘तरणीं पोरें झालीं हुरडयामाजी चूर’
असल्या एका रम्य सकाळी, सड्‍गे घेउनि सगळीं,
हुरडा खाया मळ्यांत जाई; कोणालाहि न वगळी.
ऊस, हरबरा, शेड्‍गा, केळीं आणि कोवळे दाणे -
रानदेविंनी दिले तयांना हेमन्ताचें खाणें.
आर पडे तों, गडी लागले कणसें भाजायाला,
मुरार लागे हौसेखातर आपण चोळायाला.
केव्हा चोळून हिरवे दाणे आईला तो देई,
आणि अकारण अन्य सयांना घास कोवळा देई.
तोंच जाणुनी कुणी तयाच्या खरा मनींचा हेत
घास सगूला पोचविला तो; हसला तोहि मनांत !
दिनभर राहुन तिथे, साज्जचे सर्व घरा मग आले,
खिल्लारांना खडया सुराने मुरारने रन्जविलें.
अम्भेरीच्या दर्‍यांत होतें जड्‍गल हिरवें दाट,
कोठे कोठे रविकिरणांसीह न मिळे जाया वाट.
मित्रांसड्‍गे परन्तु असल्या थोर जाऊनी रानीं,
शूरपणाने शिकार साधुनि सहज घरा तो आणी.
असाच गेला आणि एकदा झाली सायड्‍काळ.
हुरहुर लागे सर्व जिवांना, येतां नच वेल्हाळ.
सड्‍गे घेउन गडी म्हणोनी राव पहाया गेले,
तोंच शिवेवर, डुकर मारुनि आलेले, ते दिसले,.
शिकार त्याची पहावयाल धावुनी गेला गांव.
धाडस पाहुनि मुरारचें हें विस्मित झाले राव !
वसन्तऋतुला बहार आला पल्लवपुष्पें फुलुनी,
कोकिलगानीं आनन्दूनी दिसे वनश्री खुलुनी.
सगुणा आली माहेराला रहावयाला रानीं,
मुरार आला सगुणेसाठी मागुन दोन दिसांनी.
शुभ्र चान्दणें एके रात्री फुललें सुन्दर शान्त,
आम्बराइच्या रानीं होतें चहुकडेच निवान्त.
चन्द्र अम्बरीं चढला वरती हासुनिया पुनवेचा,
जीव लाजला कामरुपिणी कितीतरी तारेचा.
आम्वराइच्या झरोक्यांतुनी झरुनी किरणॆं खाली
पडलीं होतीं, ठायीं ठायी पसरुनि अपुलीं जाळीं.
तिथेच एका बान्धावरती दोघें बसली शान्त,
घुमवित होता कमण्डलूचे गानस्वर एकान्त.
हसुन, सगूला मुरार साड्‍गे एक म्हणाया गाणें,
लाजलाजुनी नकार देई सगुणा केविलवाणें.
अखेर धरुनी पदर सतीचा जरा ओढिला त्याने,
तोंच नादली अम्बेराई मधुर सगूच्या गानें -
गोड प्रतिकार
कृष्णा माझा पदर धरुं नको, सोड ॥ध्रु०॥
जाउनि साड्‍गेन मी यशोदेला
मोडिन चाड्‍गली खोड.
तू गुरराखी, मी गोरी राधा,
माझी तुझी नच जोड.
एकाजनार्दनि म्हणे मनमोहन -
नाम तुझें बहु गोड.
एकमनानें ऐकत होता मुरार मज्जुळ गान,
हवेंत भोंतीं आम्बराइच्या रानीं घुमली तान.
कुणबाऊ उच्चारीं ऐकुन सुन्दर नागर गाणें,
भोंवतालचीं शेतें डुललीं वाटे आनन्दाने.
माथ्यावरचा चन्द्र जरासा कलला मावळतीला,
आणि परतला सगुणेसड्‍गें मुरारही छपराला.
अशा परीनें पूर्ण सुखाचीं गेलीं दोन्हीं वर्षें ,
सग्यासोयर्‍यांसड्‍गें झाला दड्‍ग मुरारी हर्षे.
लग्रानन्तर आज उन्हाळा होता तिसरा आला,
वसन्त अपुल्या शृड्‍गाराने फुलवी सर्व जगाला.
तावत होतीं नांगरलेलीं माळावरलीं रानें,
डोलाने तरु डवरुन डुलती नूतन पानफुलाने.
अम्बेराई मोहरभारें बहरुन आता गेली,
छ्टा फळावर कोठें हिरवी, कुठे ताम्बडी ठेली.
मळण्या सम्पुन गांवठाणचीं रानें पडलीं ओस ,
कणगीमध्ये शेतकर्‍यांनी भरले पिवळे घोस.
देउनि टाकी कुणी धन्याला, वाटुन दाणागोटा ,
कुणी धन्याला बुडवुन पुरता झाला होता मोठा.
कुणिं व्याजाची, कुणिं कर्जाची चुकती केली बाकी,
पोटासाठी कुणिं भाडयाने गाडी जुंपुन हाकी.
जवान हौशी शेतकर्‍यांची तरणींताठीं पोरें,
फिरुं लागलीं कुस्त्यांसाठी टिपीत खेडेंखोरें.
शिपण्यापासून भरुं लागल्या जत्रा गांवोगांवीं,
लहानमोठीं तिथे माणसें मौज कराया जावीं.
कुणी कराया ‘देवदेव’ वा नवस कराया कोणी,
प्रवास करिती पायीं, लादुन पाठीवरती गोणी.
कुणि धान्याचा करुन पैका, कापड मिरची मीठ,
‘रहिमतपूर’ च्या बाजाराला ध्याया जाती नीट.
वधूवरांचे गरोबींतले बासन बान्धायाला -
कुणी चालले व्यापार्‍याच्या धावत थेट घराला.
लग्रासाठी शेतावरती करुनी कोणी देणें,
सोनाराच्या घरीं घडविती वधूवरांचे लेणें.
जत्रा, कुस्त्या आणि तमाशा यांची दंगल झाली,
लहानमोठीं पोरेंथोरें त्यांतच मोदें रमली.
मुरार होता मित्रासड्‍गे हिण्डत गांवोगांवी,
ओढ सगूची पतर घराला येण्याला परि लावी.
कोठे जावें, दोन दिसांनी अभ्भेरिस परतावें,
घरावांचुनी चित्त तयाचें परि कोठें न रमावें.
आज ‘जरण्डा’, उद्या ‘माहुली’ परवा ‘तान्दुळवाडी,’
अशापरीनें फिरु लागला मुरार खेडोपाडीं.
हौस कराया कधीं रावबा, कधि मायाळू आई-
वत्सलतेने पुरवित होती पैका प्रेमापायीं.
आईसाठी, संगुणेसाठी कधी कधी जिव ओढे,
स्वच्छन्दाने फिरावयाचें पडूं लागलें कोडें.
परन्तु तीही चेपुन गेली हळुहळु पुरती भीड,
कणसांवरती चढूं लागली भोवतालची कीड.
खण्डोब्राच्या आज पालिची जत्रा भरली खास,
पालदुकानें गर्दी पाहुन हो शहराचा भास.
जत्रा गेली फुलून, भरलें माणुस तेथ चिकार,
पोरेंथोरें कुस्तीवाले यांना नव्हता पार.
कुठे खरेदी चाले, कोठे होती भेटीगांठी,
कोठे गर्दी जमली हुन्नर नवीन बघण्यासाठी.
कुणी पाळण्यामधे बसोनी मजेंत घेती झोके,
धनार्थ फिरती बहुरुपांनी कुणि संन्यासी बोके.
‘निवेद’ करुनी कुणी ‘बान्धिती ‘मुण्डासें’ देवाला,
तारवाने कुठे आरडे मोहक जुगारवाला.
कुणि मुरळ्यांच्या गाननर्तनी इकडे झाले दड्‍ग,
बापुरावचा तिथे तमाशा उडवित होता रड्‍ग .
दोनबाजुंनी ओघ नदीचा फाटुन वाळूभोती,
मधेच बनलें बेट मनोहर, गर्दी तेथे होती.
गांवगांवचे जवान हौशी जमतां वाळवटींत,
क्षणांत पडला फड कुस्त्यांचा मधल्या मसणवटींत
हिरमा शमला वार्‍यावरतीं हा कोणाचा हाले?
तरुणगडयांचा पहा घोळका कुणामागुनी चाले !
उभारुनी तो छडी हातची चार जणांशी बोले,
तालिमबाजी दृष्टीने तो गडी गडयाशीं तोले.
पहा कुणावर खिळले तिथल्या जमलेल्यांचे डोळे,
जे ते पुसती नांव तयाचें लोक दूरचे भोळे.
ऐट दाण्डगी मुरारची ही आकर्षी जनतेला,
आनन्दाने, दिसला जोडया ठरवित तो असलेला.
कुस्त्या सरतां, पागोटयांची मुरार करी खैरात,
होय जनांच्या तोण्डीं त्याच्या औदार्याची मात?
कुस्त्या सम्पुन सायड्‍काळीं लोक घराला गेले.
शाहीरांनीं कुठे तमाशे सुरु आपुले केले.
हौशी मित्रासड्‍गे रमुनी मुरार झाला दड्‍ग,
पाटिल तिथले त्यात लागले भरावयाला रड्‍ग.
नामाडि‍कत शाहीरं पवाडे दावी गाउनि कोणी,
रमले सारे तिथेच ऐकुनि वीरश्रीचीं गाणीं.
बहार आली ! खुषीत त्याला दिली आड्गठी त्याने,
कळी फुलोनी शाहीराने मजा उडविली गाने.
कुणी साड्‍गती,‘बापुरावच्या’ नव्या तमाशासाठी -
खुल्या दिलाने द्रव्य ओतलें , होतें तितकें गांठीं,
रमला होता असाच दुसरे रात्रीं ऐकत गाणीं
तोच कांपरी पडे कुणाची मागुन कानीं वाणी -
‘लई ब्येस ह्ये, दादा ! न्हाई कळवुनश्यानी आला,
किति दिन्‍ तुमच्या ऐसाबाच्या लागे ध्वार जिवाला !
आनपानि बी न्हाइ घेतलं त्यांनी रातीपून:
बिगी बिगी तर चला, चालला जिव त्येंचा कर्पून !’
नव्या जीवनीं जरि गोडीचा भरला रड्‍ग अपार,
मुरार उठला घरास जाया, व्याकुळ होउनि फार !
हळवा होउन जीव, परतला मुरार रातोरात,
‘रहिमतपुर’ च्या ओढयाजवळी येतां होय पहाट.
आतं कशाची तरी टोचणी सुरु जाहाली वेगें,
उपदेशाचें वच खळखळलें जळांत धारेसड्‍गें;
परी मुराला अस्फुट वाणी त्यांतिल कळली नाही,
आणि कमण्डलु पुढे चालला घुमवित रानें, राई.

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP