चतुःश्लोकी भागवत - श्लोक ७

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
निशम्यतद्वक्तृदिदृक्षया विशो विलोक्य तत्रान्यदपश्यमानः ॥ स्वधिष्ण्यमास्थाय विमृश्य तद्धितं तपस्युपादिष्ट इवादधे मनः ॥७॥

॥ टीका ॥
तप तप ऐसे बोलिला ॥ तो प्रत्यक्ष नाहीं देखिला ॥ पाहतां अदृश्य जाहला ॥ तो पांगेला दशदिशा ॥९६॥
तप या अक्षरांचा उच्चारी ॥ पाहतां न दिसे देहधारी ॥ अवलोकितां दिशा चारी ॥ वक्ता शरीरी दिसेना ॥९७॥
तप या अक्षरांचा वक्ता ॥ नातुडे दृष्टीचिया पंथा ॥ मग तप या वचनार्था ॥ होय विचारिता निजहृदयीं ॥९८॥
ह्मणे दंतौष्ठपुटेंवीण ॥ नव्हे या अक्षराचें उच्चारण ॥ हो कां येथें बोलिला कोण ॥ देहधारी आंन दिसेना ॥९९॥
तप या नांवाची काय स्थिती ॥ तपें पाविजे कोण प्राप्ती ॥ ऐसें विधाता निजचितीं ॥ तपाची स्थिति गति विवंचीत ॥१००॥
तप ह्मणिजे परमसाधन ॥ येणें साधे निजात्मसाधन ॥ ऐकोनी ऐसें सावधान ॥ स्वहितस्फुरण हृदयीं स्फुरलें ॥१॥
तप ह्मणिजे माझें हित ॥ तपें एकाग्र होय चित्त ॥ तपें होइजे आनंदयुक्त ॥ ऐसा निश्चितार्थ पैं केला ॥२॥
जंव नाहीं केलें दृढ तप ॥ तंव नतके तपवक्त्याचें रूप ॥ आहाच कष्टतां अमूप ॥ तेणें स्वस्वरूप भेटेना ॥३॥
ऐसा दृढ निश्चय मानुनी ॥ विधाता बैसे कमलासनीं ॥ जैसा प्रत्यक्ष येउनी कोण्ही ॥ हितालागोनी बैसवी ॥४॥
एकांतीं शिष्यालागोनी ॥ जें गुरु उपदेशित कानीं ॥ मग तो प्रवर्ते अनुष्ठानीं ॥ तेवीं कमलासनीं विधातया ॥१०५॥
तप ह्मणिजे नव्हे स्नान ॥ तप ह्मणिजे नव्हे दान ॥ तप नव्हे शास्त्रव्याख्यान ॥ वेदाध्ययन नव्हे तप ॥६॥
तप ह्मणिजे नव्हे योग ॥ तप ह्मणिजे नव्हे याग ॥ तप ह्मणिजे वासनात्याग ॥ जेणें तुटे लाग कामक्रोधांचा ॥७॥
शरीरशोषणा नांव तप ॥ तें प्रारब्धभोगानुरूप ॥ हरि हृदयीं चिंतणें चिद्रूप ॥ तप सद्रूप त्या नांव पैं ॥८॥
जेणें दंभलोभ निःशेष आटे ॥ अहंममता समूळ तुटे ॥ यासचि नांव तप गोमटें ॥ मानी नेटेंपाटें विधाता ॥९॥
तीर्थोंतीर्थींचिया अनुष्ठाना ॥ क्षमा नुपजे सज्ञानघना ॥ तेथें कोप येउनी जाणा ॥ करी उगाणां तपाचा ॥११०॥
कोप तापसांचा वैरी ॥ केल्या तपाची बोहरी करी ॥ तो ज्म्व निर्दळेना जिव्हारीं ॥ तों तपाची थोरी मिरविती मूर्ख ॥११॥
जरी जाहला संन्यासी ॥ तरी कामक्रोध ज्यापासीं ॥ तो प्रपंचातें दिधला आंदणासी ॥ मां इतरांसी कोण पुसे ॥१२॥
जेथें कामक्रोधांचें निर्दाळण ॥ यानांव शुद्ध अनुष्टान ॥ हा निश्चय करूनि चतुरानन ॥ तपासी आपण सरसावला ॥१३॥
एवं तप मानूनियां हित ॥ बुद्धिनिश्चयें निश्चितार्थ ॥ ब्रह्म तपश्चर्या करित ॥ एकाग्रचित भावार्थें ॥१४॥      ॥  ॥  ॥  ॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP