मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|

श्रीकृष्णाचीं पदें - पदे २१ ते ३०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद २१ वें
मोठें अनिवार तुझें लहान श्रीधर पोर ॥ध्रु०॥
येक दिनीं माझ्या सदना आलें नाहीं कोणा भ्याले ॥ माझें संचित गोरस प्यालें ऐसें हें शिरजोर ॥१॥
प्रातःस्नाना यमुनातीरा गेल्या सगुणानारी ॥ कळंबावरि वेंघुन त्यांचे लपविले परकोर ॥२॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी गोपीमानसवचोर ॥ लाविल हें वो बोल कुळाला नंदाचें घर थोर ॥३॥

पद २२ वें
नाहीं अनिवार माझें तान्हें लहान बाळ ॥ध्रु०॥
निजघरीं याला काय उणें मग बाहेर करितो चोरी ॥ सगुण गुणाचा लटिका यावरि घालितां हा आळ ॥१॥
तलग्या तरण्या मिळुनी याचा करितां तंटपसारा ॥ गार्‍हाण्याची वेळ नव्हे हे जाला प्रातःकाळ ॥२॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी अभिनव करणी याची ॥ शाहाण्या गरती समजुनि याला उगबिती मायाजाळ ॥३॥

पद २३ वें
आहा वो आहा वो बाई आहा वो । अवघ्यांमध्ये शाहाणी तुम्ही आहा वो ॥ध्रु०॥
घडीचा नाहीं भरंवसा देवासाठीं सर्व साहा । यासी देती साक्ष चारी आणि साहा वो ॥१॥
इंद्रियें जिंतुनि दाहा सत्रावीचें क्षीर दुहा । तेनें निववा अंतरींचा दाहा वो ॥२॥
जो कां त्रैलोक्याचा बाहा तोचि येक अवलंबा हा । मध्वनाथहृदयभुवनीं बाहा वो ॥३॥

पद २४ वें
बोलूं नकक गे बायांनों उगल्या ॥ध्रु०॥
वर्मा ज्या चुकल्या । त्या सर्वस्वा मुकल्या ममता धरूनी देहीं । उगल्याच फुगल्या ॥१॥
वरपंगें सिकल्या त्या हरिरंगीं ठकल्या । मध्वनाथा नेणुनि संसारीं जगल्या ॥२॥

पद २५ वें
बोलूं नको जाय जाय मैंदा ऐसा काय विनोद रे ॥ध्रु०॥
अचपळ अगुणी नाम तुझें तें लटिकें कोण म्हणे रे ॥ खटपट करिती त्यांला ठकविसी करिसी त्यांसि विरोध रे ॥१॥
सासु अविद्या माझी मजवरी करील आपला नास ॥ अभिनव तुझ्या ऐशा गोष्टीनें जळती कामक्रोध रे ॥२॥
परवनितांच्या हृदया झोंबसी अधरामृतरस घेसी ॥ मुरलीनादें मोहित करिसी नकळे तुझा शोध रे ॥३॥
कुळवंताची क्कार मी भोळी नेणें कुड्या कपटा ॥ सद्गुरुकृपें मध्वनाथीं विपरीत अवघा बोध रे ॥४॥

पद २६ वें
जा जा जा जा वो जा जा करितां कां गाजावाजा । सोंडुनी दिल्ह्या तुम्हीं लाजा तारुण्यें माजा ॥ उदास गोळियांच्या हाजा गोकुळीं साजा । कांहीं केल्या हितगुज नुमजा अंतरीं समजा टाकुनि गमजा ॥१॥
हरिला आणुनि हरि म्हणतां हा अनिवारी ॥ तलग्या तरुण्या तुम्हीं नारी कलयुगींच्या क्कारी ॥ कैशा नांदाल घराचारीं प्रपंचभारीं ॥ नेणा बाळक हें अवतारी सकळां तारी बहु उपकारी ॥२॥
तुम्हीं बाळा आणिखां भाळा नसत्या घालितां आळा । गोष्टीस कांहीं नाहीं ताळा करितां चाळा ॥ देवें घातलें मायाजाळा नेणा या बाळा । जीवें भावें वोवाळा या मध्वमुनीश्वर दयाळा ॥३॥

पद २७ वें
अमलकमलदलराजसनेत्रारे ॥ध्रु०॥
कर्णीं कुंदलांची दाटी । माथां मोरपिसा वेठी । शोभे चंदनाची उटी । शामळ गात्रारे ॥१॥
मधुमुर झोडिसी । व्रजवदू वोढिसी । खासी दधि फोडिसी । गोरसपात्रा ॥२॥
चोर जरि शिरोमणि । ऐशा तुजलागुनी । ध्यातो मध्वनाथमुनी सज्जनमित्रारे ॥३॥

पद २८ वें  ( गौळणी )
जात होतें मथुरेच्या हाटा । तेथें आला यशोदेचा गाटा ॥ याचा यास नाहीं दिल्हा वाटा । चोरींपोरीं लुटिला दहिमाठा ॥१॥
कान्हो मोठा कपटी कानडा गे । गोकुळींचा गोवळ ठकडा गे ॥ घरीं नसतां लावितो झगडा गे । मध्यें होतो माझा रगडा गे ॥२॥
अहंकार माझा धरधणी । पापरूपी सदा अवगुणी ॥ त्याची गोष्टी सांगो काय उणी । न मानी देवाधर्मालागुनी ॥३॥
गांव जळे हनुमंत निराळा गे । आपण कौतुक पाहे वेगळा गे ॥ मध्वनाथस्वामी चांगला गे । कैसा मजभोंवता लागला गे ॥४॥

पद २९ वें
घरधणी गर्वनिधीताठा । येकायेकीं गेला धट्टाकट्टा ॥ करुनि संसाराच्या बारा वाटा । मग आला विश्रांतीच्या घाटा ॥१॥
सर परता गोवळा अळगटा । घननीळा कान्हो हिरवटा ॥ आम्ही गोपी आहों बळकटा । न गणूं चोरा काळ्या कुणबटा ॥२॥
ज्याचा हात अखंड खरकटा । तया कामा ठोकिलें मर्कटा ॥ तुझ्या नामें तोडी मणगटा । क्रोध देश दिल्हा देसवटा ॥३॥
घरधनी कुळवंता क्कारी बरवंटा । त्यांच्या वोढुनिया परवंटा ॥ मध्वनाथा स्वामी निगरंगटा । काय झोंबलासी माझ्या कंठा ॥४॥

अभंग ३० वा
गोकुळांत कुडें सर्व चालें । अवघे बाजेगिरिचे ते चाळे ॥ कोण शाहणी नावरूपा भाळे । जिचे पूर्ण मनोरथ जाले ॥१॥
कान्हो लागो नको माझें तोंडीं । मी तर नाहीं तुझी कानकोंडी ॥ असत्याची खाईल जे रोंडी । तिजवर पडो आकाशाची धोंडी ॥२॥
तुझी प्रीतिपात्र चंद्रावळी । वृंदावनें भोगी वनमाळी ॥ राधिकेचा लळा आधीं पाळी । तिच्या घरा जाय संध्याकाळीं ॥३॥
खेळ खेळुन न पडे जो डाईं । तोच उमजला आपल्या ठायीं ॥ मध्वनाथा नको करूं घाई । निरंजनीं वनीं चारी गाई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP