शाहीर हैबती - गजगौरीव्रत

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


गजगौरीचें आख्यान । करा श्रवण । चतुर सुज्ञान । निरोपतो आता । गांधारीनें वाण वाटलें । भारती लिहिलें । ऐक गुणवंता ॥ध्रु०॥
चांडाळ होता दुर्योधन । आणि दुश्यासन । तिसरा तो कर्ण । जमले एके ठाई । पाप बुद्धिचा सागर । कपटाचें घर । अंत्य त्या नाहीं । एक आगळे शंभर । भाऊ कसे घर घेऊं जसे बागुल बावू । करती नवलाई ॥
अहंकार होता मनीं । तशांत नारद मुनी । आले लवलाही । सिंहासनीं नारद बसवोनी । पुजा करोनी कर दोन्ही जोडोनी लागली पाईं । जन्मोजन्मी असें असावें । कमि नसावे । उपाय करूं काई ॥
तेव्हां बोलले नारदमुनी । सांगे वृत्तांत निवडुनी । तुम्हीं शंभर बंधु मिळोनी । माता गांधारी तुमची जननी । गज मृत्तिकेचा करोनी । माता गांधारी वर बसवोनी ।
मिळवणी -
सहज लाविली हो कळा । महान सबळ चढेल तुझ्या हता ॥
हेचि आहे स्वप्न एक वर्म । करी हेंचि कर्म । अंधाचे सुता । कळ लावुनी नारदमुनी । गेले निघुनी । बन्धु मिळुनी चिखल खुप केला । गाड्या परि हत्ती सजविला । खूप सजविला । जीव नाही त्याला लागला ॥
गांधारी वर बसविती । अंबर गर्जती । वाद्यें वाजती । निघाली वाणाला । नगरांत सार्‍या वाण दिलें । एक राहिलें । आतां म्हणे चला । वाड्यासमोर आली गांधारी । हाक एक मारी । यावें बाहेरी । जावुबाईला । हें वाण माझें उसनं । हत्तिवर बसून । देतें मे तुजला ॥
चाल -
डाव्या पायाच्या आंगठ्यानं । लाविला वाण गांधारीनं । बोले दुर्योधन मोठ्यानं । गज फिरविला खोट्यानं । हाका मारी कुंती मोठ्यानं । नका जाऊ बाई थाटानं ।
मिळवणी -
गेली निघून घरीं गांधारी । कुंती मंदीरीं । चितांभव करी । पांडव गेले शिकारीकरितां । येई येई द्वारकानाथा । करूं काय आतां लागली चिंता । पंचबंधु आले मिळोनी । ऐकले कानीं । गांधारी हत्तिवर बसोनी । बाण दिले येऊनी ॥
तसा हत्ति आम्ही एक करून । भीम खबर गेली यमुनेसी । यमुनेस पाडुन आट । माती लाट । महा प्रचंड दिले फेकुनी । तीन योजनें गांव त्रासला । सांगि धर्माला ब्राह्मण येऊन । केला विचार धर्मानं । भीमास बोलावून । वीर अर्जुन पत्र लिहून । इंद्रास पत्र पाठवा । तुमचा गज द्यावा । आम्हांला पाठवून । पत्र कसें लिहिलें होतें । ज्ञानी सकळ ऐका तें ॥ द्वारकानाथ हृदयांत । त्याचे चरण आम्ही वंदत । बाणासी पत्र बसवित । वर शिका प्रभुचा कर । गजगौरीचें आख्यान करा श्रवण ॥
सोडी बाण तेव्हां अर्जुन । प्रभुस स्मरून । मोठे गर्जुन ऐसे पाहता । ब्रहस्पती देवाचा गुरु । नारदमुनी । धरून पत्र सत्वर वाचुन पाहती । पत्राखाली उत्तर लिहिली । परत बाण देती । गर्व आला चित्तीं ॥
बाण आला हस्तिनापुरीं । अर्जुन क्षेत्री घेवुनी करीं । धर्मा दाविती । हत्ति आणणार कोण जावुन घेवुनी । खेद फार चित्ता । धर्म बोले तया घडीं । बाणाची शिडी करून तातडी । लावावी आकाशाप्रती । भीम बन्धु आहे बलवान । येईल घेऊन । इंद्राचा हत्ती ॥
चाल -
बन्धुच्या आज्ञेपमाणें । शिडी करतां आला अर्जुन । भीम गेला वर चढून । मुखी कृष्ण कृष्ण गान ॥
द्वारपाळ होते द्वारीं भिडुनी । बोले भिमास चढून ॥
मिळवणी -
तूं आहेस कोणाचा कोणा । देतों जिवदान । जावें येथून निघून चालता । भीम हसला आपले मनीं । द्वारपाळ दोन्ही घाली पालथा ॥
चाल -
भीम गेला इंद्राजवळी । पाहती सकळी । देव मंडळी । धन्य त्याला म्हणती । शिरीं कृपेचें छत्र कृष्ण मुख स्मरून । शस्त्र म्हणून आला वरती । सहा हात सुंभळे अंदले ।भीमास तेथें नेले । गज दाविले । घेवुन जा म्हणती । एक बुक्की त्यास मारीली । मस्ती त्याची गेली । पडता खालती । चारी पाय सोंड शेपुट । करून झटपट । बांधुन बळकट । भीम उचलून हो हत्ती ॥ घ्याया घुंगुर साग । बांधून भारा द्यावा मजप्रती ॥
चाल -
हत्ती आडकविला गदेशीं । साज मारीला खाकेशी । भीम आला हस्तिनापुराशीं । आनंद झाला धर्माशीं ॥ केला सनिगार ( शृंगार ) हत्तीशीं । वर बसविलें मातेशीं । दिले वाण सार्‍या नगराशीं । मग गेले कौरववाड्याशीं । जिचे उसने दिले तिसी । नर लाजली आपेसी ॥
मिळवणी -
ग्रंथीं आहे बहू विस्तार । म्हणून सारासार । हैबती कविश्वर । नाथहि स्मरता । तिथी मास सांगी काढून । बैसे ठासून कवित्व गाता ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP