मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|

करुणासागर - पदे ६०१ ते ६५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


शरण आलों समर्थासी । आतां कोठें हांकूनि देसी ॥ दीनदयाळा परदेशीं । कोठें हिंडूं सांग मी ॥१॥
सद्गुरूराया कोठें जावें । जाऊनि तरी काय करावें ॥ कैसें रहावें वांचावें । दत्तदेवा सद्गुरो ॥२॥
जैसें पक्षहीन पांखरूं । तैसा तुजविणें झालों सद्गुरू ॥ सांग आतां कैसें करूं । न सुचे कांहीं मज देवा ॥३॥
आतां कसाबाचें कर्म । करूं नको जाणसी धर्म ॥ मानवी मांस अस्थी चर्म । कामा नये सर्वथा ॥४॥
जरी माझा प्राण गेला । तुझा खर्च काय उणा झाला ॥ किंवा भार उतरला । कांहीं मस्तकींचा ॥५॥
तुझें होतें क्रीडन । माझा जाऊं पाहे प्राण ॥ ऐसा कैसा नारायण । दयाळू तूं ॥६॥
आतां बधिर होऊं नको । माझा अंत पाहूं नको ॥ देवा विलंब लावूं नको । नमन करितों दयाळा ॥७॥
नमस्कारेंचि प्रसन्न होईं । आतांचि येऊनि दर्शन देईं ॥ कृपा करोनि आपुले पायीं । ठेवीं मजला सद्गुरो ॥८॥
अनंतसूर्यांच्या कोटी । लोपती प्रकाशाचे पोटी ॥ ज्याचे लावण्यें कंदर्पकोटी । लाजोनि दडती ॥९॥
सौम्यपणें अनंत - शशी । अनादि तमताप नाशी ॥ शरणागताचे हृल्लोचनासी । ब्रह्मानंददायक जो ॥६१०॥
मस्तकीं बांधोनि जटाजूट । तयावरी रत्नमुगुट ॥ ज्याची प्रभा करी घोट । अंधकाराचे ॥११॥
वरी मौक्तिकांचे घोंस । तुरा शोभे विशेष ॥ ज्यातें पाहतां दुःखनाश । निःशेष होये ॥१२॥
कर्णीं कुंडलें तळपती । कपाळावरी ज्यांची दीप्ती ॥ नेत्रीं पाहतां आनंद देती । मकराकार कुंडलें ॥१३॥
कृपापूरितं नेत्रकमळें । आकर्णीत विशाळें ॥ त्रैलोक्यदर्शनीं सोज्वळें । आनंद देती ॥१४॥
शोभायमान विशाळ । मनोहर जयाचें भाळ ॥केशरी चंदन सोज्वळ । अत्यंत शोभे ॥१५॥
मध्यें कस्तूरीतिलक । शोभे आनंददायक ॥ ज्यातें पाहतां तहानभूक । हारपे दासाची ॥१६॥
अत्यंत चारू बिंबाधर । शोभा देती मनोहर ॥ नासिका पाहतां सुंदर । लज्जा वाटे शुकातें ॥१७॥
दाडिंबीबीजापरी । दंतपंक्ती मुखाभीतरीं ॥ कौतुकें हास्य करी । वदनकमळ ॥१८॥
तांबूलरंग अधरपुटीं । शोभायमान हनुवटी ॥ कौस्तुभमणी शोभे कंठीं । तेजोमय ॥१९॥
उन्नत शोभती स्कंद । हृदयचारू स्तनद्वंद्व ॥ वक्षस्थळीं ब्रह्मानंद । दायक जयाचे ॥६२०॥
जेथें शोभे वैजयंती माळा । जलदवर्ण शोभे सांवळा ॥ अंगीं वागती अनंतकळा । दासां आनंददायक ॥२१॥
यक्षस्थळीं श्रीवत्सलांच्छन । शोभे त्रैलोक्यभूषण ॥ मुक्ताहार गळां संपूर्ण । शोभती हृदयीं ॥२२॥
आवर्त नाभी गंभीर । त्रिवळीमंडित शोभे उदर ॥ कुक्षीभाग मनोहर । वर्णितां न येती ॥२३॥
सरळ शोभती बाहूदंड । सामर्थ्यवंत उदंड ॥ केयूर भूषणें तेजप्रचंड । अत्यंत शोभती ॥२४॥
करीं रत्नकंकणें शोभती । मुद्रिकांची अत्यंत दीप्ती ॥ पद्म शोभे एक हस्तीं । एके हातीं सुदर्शन ॥२५॥
पीतांबरावरी कंठी सुंदर । कटी मेखळा मनोहर ॥ मांड्या जानू पोटरिया सुंदर । चरणीं शोभती नेपुरें ॥२६॥
चिन्हें पद्मवज्रांकुश । कोमल आरक्त विशेष ॥ तत्काळ करिती संसारनाश । पादकमळें जयाचीं ॥२७॥
रत्नखचित सिंहासन । वरी मृदुतर अस्तरण ॥ त्यावरी करावें आरोहण । ब्रह्मानंदें ॥२८॥
वामजानुवरी दक्षिणपाद । शोभा देती भक्ताऽभयद ॥ सेवा करिती सुरमुनीसिद्ध । स्तवन करिती योगींद्र ॥२९॥
सहस्रफणामंडित । शेष शिरीं छाया करित ॥ वेद उभे मूर्तिमन्त । हात जोडोनी ॥६३०॥
जें परब्रह्म अनामरूप । अनादि सर्वज्ञ आपेआप ॥ दत्तात्रेय ऐसें नामरूप । भक्तांसाठीं धरिलेंसे ॥३१॥
परब्रह्म चैतन्यकळा । आदिशक्ति भक्तवत्सला ॥ अनादिरूपा आनंदकळा । जननी त्रैलोक्याची ॥३२॥
दिव्यालंकारभूषित । दिव्यांबरें परिधानयुक्त ॥ वाम अंकीं शोभत । महालक्ष्मी चित्कळा ॥३३॥
जें परब्रह्म शाश्वत । तोचि दत्तात्रेय मूर्तिमंत ॥ युक्तप्रकारें विराजित । आदी दयाळू समदर्शी ॥३४॥
ऐसें आपुलें वरदरूप । आतांचि दावीं आपेआप ॥ आलिंगूनि माझा संताप । दूर करावा गुरुराया ॥३५॥
आक्रोशोनि भाकितों करुणा । आतां न करीं माझी विटंबना ॥ पाव आतां लागतों चरणा । सर्वज्ञ समर्था सद्गुरु ॥३६॥
मी तों अन्याय केले फार । तूतें घालितों नमस्कार ॥ आतां माझा विसर । पडों न देईं ॥३७॥
चिंत्ताग्रस्त वाट पाहें । फार कष्टी होत आहें ॥ धांव देवा लवलाहें । दयासिंधों समदर्शी ॥३८॥
फार छळूनि दाविसी पाय । यांत तूतें लाभ काय ॥ मातें झाली हायहाय । आतांच पावें मज देवा ॥३९॥
आतां कांहीं दोष गुण । नको पाहूं करुणाघन ॥ आतां मातें रानोरान कष्टी न करीं गोविंदा ॥६४०॥
आतां कांहीं राहवेना । राहूनि कांहीं करवेना ॥ कोठेंही यातना सोसवेना । न सुचे कांहीं साधन ॥४१॥
दत्तात्रेया संकटीं पडलों । चिन्ताडोहीं बुडालों ॥ दुःखसागरीं वाहवलों । काढीं वेगें समर्था ॥४२॥
नाशिवंत काया आमुची । क्षणभंगुण दों दिवसांची । ऐसें असतां कासयाची । मार्गप्रतीक्षा करितोसी ॥४३॥
काया शेवटीं जायाची । म्हणोनि धरिली कांस तूमची ॥ नमस्कार घालितों याची । लज्जा शंका सद्गुरू तूतें ॥४४॥
चरणीं घालितों लोटांगण । आतांच करीं समाधान ॥ सद्गुरूराया आनंदघन । दत्तात्रेया दयाळा ॥४५॥
येईं आतां तांतडी । सद्गुरूराया घालीं उडी ॥ शरण आलों म्हणोनि काढीं । दुःखसागरापासोनी ॥४६॥
चरणीं ठेविला माथा । धांव आतां सद्गुरूनाथा ॥ कृपासिंधू समर्था । सर्वज्ञ देवा दयाळा ॥४७॥
माझें हृदय स्वामी जाणसी । विनंती करितों ती ऐकसी ॥ समर्थ असतां अंत पाहसी । हें सर्वज्ञासी अनुचित ॥४८॥
देवा माझे हृदयीं अससी । मज देशोदेशीं हिंडविसी ॥ सर्वत्र असतां दडोनि राहसी । जेथें तेथें ॥४९॥
आम्हीं कैसें पहावें । कोठें कोठें फिरावें ॥ कोणतें साधन करावें । सांग देवा ॥६५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP