भगवान गोपालकृष्ण - अध्याय १९ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । श्रीसद्गुरु केशवदत्त । भागवत धर्म प्रचारार्थ । फिरत राहिले अखंडित । गांवो गांवी मराठी ॥१॥
कार्याविण विवक्षित । न राहती गुरु केशवदत्त । एकाच गांवीं कधींही स्थित । तीन चार दिसावरी ॥२॥
शिष्यवर्ग तयांचा बहुत । माय मराठी देशांत । घेऊन तयांचे अनुयायीत्व । विखुरला होता अपार ॥३॥
ज्या ज्या ठिकानी धार्मिक । राहती भक्त भाविक । ते स्थळ तयांना आत्यंतिक । प्रिय वाटे सदाचे ॥४॥
गांवीच्या अनेक उत्सवाना । श्रीगुरु केशवांना । निमंत्रणे आदरे नाना । येती बहु आग्रहे ॥५॥
स्वीकारावी ही निमंत्रणे । अति आनंदे माऊलीनें । हजर राहावे अगत्याने । साजरा करावा उत्सव ॥६॥
महाराजांचे समकालीन । संत एक होते महान । राम मारुती जयांचे नाम । कायस्थ प्रभु ज्ञातीचे ॥७॥
महाराजांचा आणि तयांचा । स्नेह होता निकटचा । तेणे नित्य गांठीभेटीचा । योग येई उभयता ॥८॥
याच संताची पुण्यतिथी । साजरी होते प्रतिवर्षी । भाद्रपदाच्या कृष्णपक्षी । कल्याण भिवंडी मुक्कामीं ॥९॥
पुण्यतिथीच्या या अवसरी । प्रभु केशवांची हजेरी । लागतसे साजिरी । न चुकता कदाही ॥१०॥
उत्सवाच्या या निमित्ताने । ज्ञानेश्वरीची प्रवचने । ऐकती भक्त बहुसंख्येने । प्रतिवर्षी केशवांची ॥११॥
सर्वश्री भाऊ जयवंत । गुप्ते खोपकरादि कार्यवंत । बहु आग्रहे माऊलीप्रत । ठेवोनी घेती उत्सवाची ॥१२॥
गुजराथी भाषेंतही केशवदत्त । प्रवचने करीत अस्खलीत । तेणे गुर्जर समाजांत । लौकिक होता तयांचा ॥१३॥
सुरत मुंबई घोलवड । वैतरणा डहाणु बलसाड । पार्डी भिवाड कोसाड । ठिकाणें ऐशा भक्तांची ॥१४॥
येणें रिती जरी केशवदत्त । गांवोगांवी राहती फिरत । तरी सोनगीरीस येती परत । उत्सवास गुरु गोविंदाच्या ॥१५॥
ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस । आरंभ होई उत्सवास । काल्याचे कीर्तन सप्तमीस । सांगता करी उत्सवाची ॥१६॥
जैसा मोहरावा आम्रवृक्ष । वा बहरांसी यावा गुलबक्ष । तेवी पुण्यतिथीच्या सोहळयास जनसमुह लोटे सोनगीरी ॥१७॥
जातीनें श्रीकेशवदत्त । व्यग्र राहती या उत्सवांत । आल्या गेल्याच आदरातिथ्यं । करिती अगत्ये ॥१८॥
या वेळीं सोनगीर । कृष्णभक्तांचे होई माहेरघर । राधे गोविंद नामाचा गजर । अंबरी भिडे रात्रंदिन ॥१९॥
भजने कीर्तने नामघोष । प्रवचने व्याख्यानें अभिषेक । नानाविध कार्यक्रम विशेष । मनमुराद होती आनंदे ॥२०॥
मुंबई नासिक नगर । पुणें वर्‍हाड सोलापूर । नाना ठिकाणाचे भक्तवर । येती उत्सवास गर्दीने ॥२१॥
या सकल जनांची । सोय राहण्या जेवण्याची । व्हावी उत्तम सुखाची । कटाक्ष असे माऊलीचा ॥२२॥
स्वाहाकाराचे शुभदिनी । भक्त भाविकादिकांनी । आनंदवन जाई भरोनी । यात्रा जेवी पंढरीची ॥२३॥
बंदोबस्त उत्सवाचा । पोलीस ठेविती साचा । अधिकारीही धुळ्याचा । स्वयें लक्ष देत असे ॥२४॥
विद्वत जनांचा सन्मान । ब्रह्मवृंदासी उचित दान । इतरे जनांसी सुग्रास भोजन । सांगता होई उत्सवाची ॥२५॥
केशवांच्या विचाराची बैठक । नव्हती केवळ आध्यात्मिक । होती पुरोगामी सामाजिक । कालौघाप्रमाणें ॥२६॥
दीन दुबळ्या बहुजनांस । करावा नित्य सदुपदेश । लावावे तया सन्मार्गास । हेतु माऊलीच्या कार्याचा ॥२७॥
समाजाच्या खालच्या थरांत । भिल्ल, कातोडी गोंड गाबीत । आदिवासी कुळंबी खेडुत ।
अज्ञान पंकीं होते रुतलेले ॥२८॥
या जमातीची सुधारणा । हर प्रयत्नें केल्याविना । उन्नति कैसी होईल जाणा । म्हणती केशव राष्ट्राची ॥२९॥
बहुसंख्य ही जमात । दारिद्य्रांत होती पिचत । चतकोर तुकडयाची भ्रांत । रोजच असे तयांना ॥३०॥
कर्जराशी नशिबाला । होत्या तयांच्या लागलेल्या । पिढानपिढ्या घराण्याला । जळू जैश्या चिकटोनी ॥३१॥
जादुटोणा देवदेवस्की । तंटे बखेडे भाऊबंदकी । व्यसनें नाना आत्मघातकी । साथीस होती अखंड ॥३२॥
पश्चिम खानदेशांत । अशीच होती पिडीत । वस्ती भिल्लांची बहुत । विखुरलेली खेडोपाडी ॥३३॥
जात तयांची दुर्वर्तनी । अधंश्रध्द, दुर्बल, अडाणी । तेणे परधर्मियांनी । फायदा घ्यावा तयांचा ॥३४॥
दारू आणि देवचार । उध्वस्त करी संसार । घरामाजी सदा अंधेर । दिवा न लागे तयांच्या ॥३५॥
पुरुषांचे दुबळेपण । विकी बाईल-बहिण । अविंधाचे घरीं नेऊन । व्यसनापायी अभद्र ॥३६॥
मुलाबाळासी लालूच । दाखवूनी अविंध हे हळूच । उचलती तयांना अचूक । धर्मभ्रष्ट करावया ॥३७॥
भिल्लांचा हा अध:पात । थांबविणें आतां क्रमप्राप्त । म्हणाले श्रीकेशवदत्त । अन्यथा धर्मसंकट हिंदुचें ॥३८॥
मग सद्गुरु केशवांनी । कार्याची या आखणी । तर्कशुध्द करोनी । प्रचार मोहिम आरंभिली ॥३९॥
दु:खितांचे दु:ख हरावे । प्रेमे तया जवळी घ्यावे । सुखी सकलां करावे । बाणा असे संतांचा ॥४०॥
मग भिल्लांच्या वस्तीवर । केशवदत्त गुरुवर । जाऊ लागले निरंतर । सेवा दुरितांची करावया ॥४१॥
जात जरी ही सालस । धाडसी विश्वासू कामस । परि सर्वार्थी उपेक्षित । होती बहु गांजलेली ॥४२॥
पोटासाठी रानीवनीं । फिरावे वणवण तयांनी । शिकार एकादी साधोनी । खळगी भरावी पोटाची ॥४३॥
करावी गोळा लाकडे । विकावी नेवोनी गांवाकडे । मोल मजुरीने बापुडे । जीवन कंठावे अर्धपोटी ॥४४॥
बाळकासी न मिळावे दूध । तापक‍र्‍यासी औषध । बाळंतणीस ना उचित । मदत मिळे कदाही ॥४५॥
स्वच्छास्वच्छतेचे महत्व । नव्हते तयांना माहित । शिळेपाके दुर्गंधीयुक्त । अन्न सेविती नित्यही ॥४६॥
कासेस केवळ लंगोटी । पुरुषांच्या असे अंगावरती । स्त्रीयांसी लाज राखण्यापुरती । पटकूर फाटके कुंचुकीविना ॥४७॥
दारिद्र्याच्या गर्तेतून । काढावे हे पिडीत जन । आपदा तयांच्या निरसून । सुखी करावे तयांसी ॥४८॥
यासाठी केशवदत्त । राहिले अखंड कार्यरत । रात्रंदिन तयांच्या सान्निध । क्षेम करण्या दुबळ्यांचे ॥४९॥
उपाय योजूनी नाना । करावी लागली सुधारणा । श्रीसद्गुरु केशवांना । मूढ या जनांची ॥५०॥
स्नान कां आणि कैसे करावे । अन्न कां शिजवून खावे । धूत वस्त्र कां नेसावे । शिकविले केशवांनी तयांना ॥५१॥
सांगाव्या तयांच्या बोलीत । रामायणादि कथा नित्य । रमवावे तयांचे चित्त । श्रीकृष्णलीला गाऊनी ॥५२॥
दारु, तमाखू, ताडीमाडी । चोरी शिंदळकी शिविगाळी । संवयी, व्यसनें ही सगळी । घातक महाभयंकर ॥५३॥
दुष्परिणाम या सगळ्य़ांचे । बिंबविले केशवांनी साचे । ह्रदयी भिल्ल समाजाचे । जादू-इ-दिप वापरोनी ॥५४॥
धर्म आणि नीतीमत्ता । सत्व आणि निर्भयता । रुजविली केशवांनी तत्वता । अंतर्यामी भिल्लांच्या ॥५५॥
विद्याभ्यासाचा प्रचार । करोनी केशवांनी घरोघर । पोशाखादि आचारविचार । बदलले संपूर्ण तयांचे ॥५६॥
स्वधर्माचे पालन । निष्ठेने व्हावे म्हणून । देवपूजादि नित्यनेम । शिकविले केशवांनी तयांना ॥५७॥
रोगराईचे निवारण ।  औषधी उपचार करून । कसें करावे, हे शिक्षण । दिले केशवांनी कांहीना ॥५८॥
सेवातत्पर तरुण । या कामासाठी निवडून । स्वखर्चे औषधी-पेटया देऊन । नियुक्त केले गावोगावीं ॥५९॥
कार्य ऐसे विधायक । सामाजिक आणि धार्मिक । केले प्रभुंनी व्यापक । अखेरपर्यंत जीवनाच्या ॥६०॥
संगे एका भिल्लासी। गेले घेऊनही यात्रेसी । केशवदत्त कृपाराशी । तीर्थस्थळे दाखविण्या ॥६२॥
पुढे हा भिल्ल तरुण । श्रींचा पूर्ण भक्त होऊन । ब्राह्मणासारखे वर्तून । जीवन कंठूनी राहिला ॥६३॥
स्वजातीच्या अभ्युदयार्थ । वेंचून आपुले जीवन सार्थ । झाला हा भिल्ल कृतार्थ । केशवांच्या कृपेनें ॥६४॥
जगदाध्दोराची ही कामगिरी । श्रीकेशवांनी ऐशापरी । सेवा पताका खांद्यावरी । घेऊन केली अनित्य ॥६५॥
नारायणपूर कोटली । भाग्यवान ही गांवे भली । जेथें कार्यक्रम प्रतिसाली । भजनाचा करिती केशव ॥६६॥
धर्म नीति संवर्धक । कार्यक्रम ऐसे आवश्यक । समाजान्नोती साधक । आयोजिती प्रभु सर्वत्र ॥६७॥
शके अठराशें चौपन्न पंचावन्न आणि छपन्न । लागोलाग वर्षे तीन । धर्मोत्सव झाला पद्मालयी ॥६८॥
श्रीगणेशाचे हे प्रख्यात । देवस्थान जळगांव जिल्ह्यात । एरंडोलपासून योजने सात ।आहे रमणीय आणि जागृत ॥६९॥
ऐशा या पवित्र ठिकाणी । श्रीकेशवदत्त प्रभुंनी । समारंभ धार्मिक आयोजूनी । धर्म जागृती साधिली ॥७०॥
मंदिराचा परिसर । आहे विलक्षण मनोहर । पूर्वाभमुख एक कासार । दिसेल पद्मपुष्पें परिलुप्त ॥७१॥
याच पवित्र ठिकाणीं । आख्यायिका सांगती कोणी । कुंतिसूत भीमानी । बकासुरासी मारिले ॥७२॥
पद्मालयाच्या या मंदिरात । दिसतील एकाच गाभार्‍यांत । दोन स्वयंभू मूर्ति अधिष्ठीत ।ऋध्दिसिध्दि गणेशाच्या ॥७३॥
याच प्रसिध्द मंदिरांत । धर्मोत्सव मोठया थाटांत । करीते झाले केशवदत्त । सातत्यानें तीन वर्षे ॥७४॥
पारोळा पाचोरे सोनगीर । धुळे एरंडोल अमळनेर । नाना गांवीचे अपार । ब्रह्मवृंद आले उत्सवासी ॥७५॥
कथा किर्तनें प्रवचने । धर्मजागृती व्याख्यानें । सुस्वर गाणी भजने । रात्रंदिन चालावी ॥७६॥
विष्णुसहस्त्रनामाचे विष्णुसहस्त्रनामाचे पठण । अथर्वशीर्षाचे आवर्तन । नानाविध कार्यक्रम ॥७७॥
वेदघोष मंत्रोच्चार । सहस्त्र मोदकांचा स्वाहाकार । अखंड हरीनाम गजर । दुमदुमला पद्मालयीं ॥७८॥
या समारंभास नामवंत । पाहुणे मंडळी विख्यात । उद्योगपती शास्त्री पंडित । आली होती अगत्ये ॥७९॥
सर्वश्री गिरड गुलाबचंद । कालीदास शर्मा ज्योतिष्मंत । दाढे आणि पुरुषोत्तमपंत । जळगांव, रावेरची मंडळीं ॥८०॥
बाबासाहेब चिकेरूर । दादामहाराज सावदेकर । राजारामशेठ पारोळेकर । सहकारी मित्र केशवांचे ॥८१॥
हरीभाऊ पिळोदेकर । तात्या जोशी धरणगांवकर । चाळिसगांवचे करंदीकर (वकील) ।होते सहाय्यास केशवांच्या ॥८२॥
आजुबाजूच्या खेडयातली । कासार, तेली, तांबोळी । वाणी देहाती नाना मंडळीस । समारंभास आली असंख्य ॥८३॥
या सकल मेळाव्याचा । हेतु होता एकच साचा । साधावा उत्कर्ष समष्ठीचा । धर्मजागृती करोनी ॥८४॥
अज्ञान तिमिर घालवावे । ईश-श्रध्देचे दिप पाजळावे । शांती सुखाचे मार्ग दाखवावे । नीतिधर्म सांगोनी ॥८५॥
उत्सवाच्या एका व्याख्यानांत । साक्षरतेचे सांगतां महत्व । आर्जवे म्हणाले केशवदत्त ।
निरक्षरता काढा निपटोनी ॥८६॥
जे जे असतील अशिक्षित । करा तयांना प्रबोधित । तरुणांनो व्हा कार्यरत । आवाहन केले केशवांनी ॥८७॥
चोरी आळस लांडी लबाडी । चरस गांजा ताडी माडी । व्यसनें सर्व नाशक रोकडी । त्यागा म्हणती केशव ॥८८॥
सुखशांतीचे विध्वंसक । राक्षस हे भयानक । करोनी लवलाही विवेक । धाडा त्यांना देशोधडी ॥८९॥
संपूर्ण दारुबंदीचे । प्रयोजन बहु मोलाचे प्रतिपादले केशवांनी साचे । त्याही काळी जनतेला ॥९०॥
लग्नकार्यातील अनिष्ठ रिती । कर्जबाजारी खर्चिक वृत्ती । सामाजिक ह्या आपत्ती । दूर ठेवा सावधे ॥९१॥
भूतखेते जारण मारण । जादुटोणा पिशाच्च बंधन । रांगडे रानटी हे अज्ञान । डोहांत बुडवा झडकरी ॥९२॥
असावी मनी निर्भयता । स्वकर्मी न पराङमुखता । जपावे अखंड देशहिता । उपदेश मौलिक केशवांचा ॥९३॥
पद्मालायाच्या तिन्ही उत्सवांत । व्याख्यानें प्रवचनें नामांकित । विदवत जनांची झाली बहुत ।
विचारशील आणि उद्बोधक ॥९४॥
वैदिक संस्कृतीचे महत्व । गीतातत्वाचे श्रेष्ठत्व । हिंदुधर्माचे आदितत्व । गाईले एकमुखें सर्वांनी ॥९५॥
संतवाङमयाचे दर्शन । लळीते, भारुडे आयोजून । साधिले माऊलीनें लोकशिक्षण । उत्सव प्रसंगीं पद्मालयीं ॥९६॥
ज्ञानेशाची ओवी सुभग । वा तुकयाचा गोड अभंग । वागवोनी हृदयीं दंग। वर्ता निशिदिनी म्हणाली माऊली ॥९७॥
उत्सव, सभा, संमेलने । यज्ञ, याग, कथा कीर्तने । प्रबोधनाची ही साधने । मुक्तपणे अनुसरली प्रभूंनी ॥९८॥
पद्मालयाचे हे उत्सवदिन । सोनियाचे जणू मौलिक क्षण । ज्याची सुमधुर आठवण । आजही असेल अनेकां ॥९९॥
अपूर्व हे तिन्ही उत्सव । वाढविती खानदेशीचे वैभव । जेणें केशवगुरुंचे नांव सर्वांमुखीं जाहले ॥१००॥
माऊलीच्या या कार्याची । पाऊले उमटलेली साची । दिसतील आजही तेजाची । पद्मलयाच्या परिसरी ॥१०१॥
असे हे अभिनव समारंभ । पार पडले यथा सांग । ठेऊनी मधु सुगंध । शांती सुखाचा माघारी ॥१०२॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवचरित । होवो सकलां सुखद । अध्याय एकोणीसावा संपूर्ण ॥१०३॥
॥ इति एकोणदशो:ध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 03, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP