भगवान गोपालकृष्ण - अध्याय १६ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । सगुण साक्षात्कार योग । केशवांचा ग्रंथ सुभग । प्रास्ताविक जयाचे शुभद । कथिले रसिका गताध्यायी ॥१॥
आतां ग्रंथाबुज मकरंद । सेवा तुम्ही श्रोतवृंद । केशवदत्तांचे ज्ञानामृत । या अध्यायी कवतुके ॥२॥
वृंदावन चंद्र भगवान । हेच आनंद जीवन । ज्योतीही जीवनाची प्रसन्न । गोकुलेंद्र केवळ ॥३॥
प्रेमरस ऐसा उदित । वाहतो अंतरी सतत । तेव्हांच अपुले चित्त । चैतन्य स्वरुप होत असे ॥४॥
हे अनुभवाचे बोल । बोलले संत सकल । अनवरत ते निखिल । ज्ञानदेवही सांगती ॥५॥
भक्तजनांचा वेणूनाद । ऐकोनी त आनंदकंद । भोजे होऊन धुंदसुंद । कृतार्थ करितो भक्तासी ॥६॥
प्रभुकृपा हिच शांति । शांतीत मिसळली आनंद ज्योति । जी आत्मसुखाची परिणती । भेदाभेद विरहीत ॥७॥
पंचपंच उष:काली । सुवर्णांकित चित्रावली । प्राचिवर पाहुनी धाली । वृत्ती त्या नांव जागृती ॥८॥
झालिया अंत:करण निर्मळ । पवित्र जैसे गंगाजळ । विराम ते वेल्हाळ । पावते तेज:प्रकाशी ॥९॥
आत्मतृप्ती ही जीवनाची । मधुरता दिव्य सुखाची । लाभावया भगवंताची । कृपादृष्टी पाहिजे ॥१०॥
जेव्हां बुध्दि आत्मस्वरुपांत । लीन होते नितांत । तेव्हांच हा भगवंत । कृपाप्रसादा पावतो ॥११॥
उत्कट भक्तीचा सदय । अंतरी होतां उदय । भगवंताचा सगुण प्रत्यय । अनुभवा येतो आपैसे ॥१२॥
जाणीव कांही न उरणे । वा जाणीवेची जाणीव नसणे । हे आत्मस्वरूपाचे जाणणें । कल्लोळ अक्षय आनंदाचा ॥१३॥
हा आनंद अभ्यासे । सगोचर होतो सौरसे । मोद प्रमोद भावसरिसे । उद्गम पावती हृदयांत ॥१४॥
याच परमोच्च उर्मीत । साकार होतो भगवंत । वांच्छिल्या सगुणरुपांत । खेव देण्या भक्तांसी ॥१५॥
साक्षात्काराचा हा सिध्दांत । श्रीगुरु केशवदत्त । विशद करिती साद्यंत । सिध्द हस्त लेखणीनें ॥१६॥
अंतरीचे तेज उत्स्फूर्त । प्रेमभक्तीच्या मंदिरात । उभे ठाकते संतत । शामसुंदर होवोनी ॥१७॥
चिन्तन-चित्प्रवाह संतत । देही वाहतो अनिर्बंध । भक्त्यात्म्यास तेव्हां सर्वत्र । भगवंत दिसतो सर्वव्यापी ॥१८॥
लतावेली पल्लवांत । नदी कांसारी सागरांत । चंद्रसूर्यादि नक्षत्रांत । तोच होतो साकार ॥१९॥
सुकृताच्या संपन्न । प्रात:काली करूनी मंथन । गोपी ठेविती राखून । प्रेमनवनीत गोपाळा ॥२०॥
अतुल हें तयाचें प्रेम । पाहुन भुलतो मेघ:श्याम । हृदयेंच तयासी विश्राम । करितो निरंतर आपुले ॥२१॥
अनाहत नाद मोहनाचा । होतो विषय कर्णांचा । तेव्हां श्रवण साक्षात्काराचा । येतो प्रत्यय भक्तांसी ॥२२॥
अंतरात्म्याच्या साक्षीत्वाची । नेत्र हीच जागा साची । तिथेच दिव्यभाव तेजाची । ज्योत प्रकटते भक्तांच्या ॥२३॥
नेत्री हा दिव्यभाव । प्रकटतो जेव्हां सावयव । परम परमात्मा अव्यय । नेत्र साक्षात्कार तो जाणा ॥२४॥
कथा कीर्तन नामस्मरण । संत सेवा धर्मानुष्ठान । अंतरी होतो निर्माण । भक्ती अंकुर पालवतो ॥२५॥
मग प्रभुप्रीती सनातन । शुक्लेंदवत होते वर्धामान । अनुभूती द्यावया अनन्य । सगुण साक्षात्काराची ॥२६॥
जो आत्मसुखाचा प्रेममय । सोहळा मधुर अनुपमेय । शांती सौख्याचा चंद्रोदय । साक्षात्कार प्रत्यय तो जाणा ॥२७॥
अव्यभिचारी भक्ति अनन्य । चित्त ईश्वर प्रणिधान । अखंड ध्यास अनुसंधान । मार्ग साक्षात्काराचा सुलभ ॥२८॥
आकाश मंडपा खाली । बैसोनी शात तरुतळी । हृदयीं कोंडून वनमाळी । नामघोष करावा तयाचा ॥२९॥
नामगंगाही माधुर्याची । प्रेम सरिता सुखाची । चैतन्य सागरा मिळते साची । शांति प्रसाद द्यावया ॥३०॥
मग भक्तांच्या हृदयांत । सापेक्ष प्रकटतो भगवंत । स्थिरावून तयांच्या नेत्रांत । नृत्य करी वैखरी ॥३१॥
भक्तानुभव हा जयानी । सुकृते देखिला स्वनयनी । ऐसे सौभाग्य संतमणी । अमूप झाले भारती ॥३२॥
भगवंत भक्तिचा     उमाळा । अंतरी उपजे त्या निर्मळा । शामसुंदर घननीळा । सगुणरूपे भेटतो ॥३३॥
भक्त प्रल्हादासाठी । स्तंभी प्रकटतो जगजेठी । द्रौपदीच्या मायेपोटी । धांव घेतो हांकेला ॥३४॥
मीराबाईच्या भक्तीस्तव । स्वये हा मुकुंदमाधव । पेला विषाचा अहीव । ओठीं लावतो स्वत:च्या ॥३५॥
देव्हार्‍यातील यदुभूषण । नीलकांत झालेला पाहून । मीरा गेली बावरून । प्रभुलीला ही साक्षात्काराची ॥३६॥
रासक्रिडेचे अवसरी । व्याकूळ प्रेमें अंतरी । गोपी पाहून श्रीहरी । प्रकटला सन्निध तयांच्या ॥३७॥
साक्षात्काराची ही प्रचिती । भक्ता येईल निश्चितीं । होईल जो प्रभुपदारविंदी । अनन्य शरण निष्काम ॥३८॥
रानीच्या धेनु आतुर । भेटण्या होऊन अनिवार । वत्सा आपुल्या सत्वर । येती घरा तिन्ही सांजा ॥३९॥
वात्सल्याची ही लगबग । भक्ताहृदयी सुभग । उपजते तेव्हांच सवर्ग । धांव घेतो भेटावया ॥४०॥
निसर्ग रम्य गंगातीरी । हाच मुकुंद मुरारी । होऊन अधीर अंतरी । आलिंगन देतो रामतीर्था ॥४१॥
देवाने द्यावे आलिंगन । पोटी धरावे कुरवाळून । पाहावे त्यास डोळे भरून । आस मनी असावी नित्याची ॥४२॥
चिंतनी गुंतता चित्त ऐसे । विराम पावते हे साक्षेपे । चैतन्य शक्तींत सौरसे । अदृश्य वातावरणाच्या ॥४३॥
मग तो तेजोमय भगवान । रूपे घेऊन सगुण । हात कटीवर ठेवून । राहतो उभा युगे युगे ॥४४॥
भक्ताचिया काजासाठी । प्रीतीने हा जगजेठी । धांव घेतो तयाच्या पाठी । सोडून वैकुंठ आपुले ॥४५॥
उत्तर यात्रेचे मावंदे नामदेवे घातले आनंदे । तव ज्ञानदेवादि संतासंगे । प्रभुही होते जेवावया ॥४६॥
एकदां मरुभूमींत । श्रीनामदेव महासंत । फिरत असतां यात्रेनिमित्त । तृषाक्रांत जाहले ॥४७॥
क्रूप होता एक जवळ । परी कोरडा निर्जळ । तृषार्ताची तळमळ । केवि निमेल तयानें ॥४८॥
तव तो पितांबरधारी । “जीवन” होऊन सत्वरी । धावला प्रत्यक्ष कूपाभितरी । श्रांत कराया भक्तासी ॥४९॥
“तव गडगडीत कूप उदके उचंबळला । कल्पांती खवळला सिंधु जैसा ”॥
नामदेवे प्रभुपाशी । बोलावे, हंसावे सौरसी । जेवूं घालावे पाषाण मूर्तीसी । अविष्कार हा सगुण भक्तीचा ॥५०॥
गुरुकृपेचा प्रसाद । होतो जेव्हां शिष्याप्रत । साक्षात्काराचा आमोद । गवसे सहज तयासी ॥५१॥
नरेंद्रासी रामकृष्णांचा । हस्तस्पर्श झाला अमृताचा । तेव्हां उचंबळा कैवल्याचा । सागर हृदयीं तयाच्या ॥५२॥
आनंदाच्या भरांत । होऊन नाचला संमोहीत । दिव्य तेजाची लक्ष ज्योत । पाहिली त्यानें अंतरी ॥५३॥
संत कृपा साक्षात्कारी । चैतन्यानंदा भितरी । घेऊन जाते सत्वरी । परम वैष्णवी दयेने ॥५४॥
निरामय प्रभु चिंतन । करितात जे भक्तजन । ते देही सूक्ष्म वा कारण । प्रवेशती लिलया ॥५५॥
तेणे तयांच्या मनोवृत्ति । अवघ्या चैतन्यमह होती । सत्ता पंचतत्वा वरती । निरंकुश मिळते तयांना ॥५६॥
हीच सत्ता अंतरप्राणानें । विश्वप्राणासी समरस होणें । हे त्या जगन्नियंत्यासी जाणणें ।साक्षात्काराचे आदितत्व ॥५७॥
परी भक्तांच्या संकल्पात । आग्रहे विविध रूपांत । अवतरती अनिर्बंध । लीला नाटकी नटधारी ॥५८॥
दिव्यदर्शन, प्रेमदर्शन । भावदर्शन श्रवणदर्शन । साक्षात्काराचे सगुण । तरंग एकाच लहरीचे ॥५९॥
साक्षात्कार हे सुरम्य । होतात साधका सुगम्य । जे स्नेह भक्तीचे वर्म । निर्मनस्क जाणती ॥६०॥
काष्ठामाजी सर्वत्र । अग्नि रहातो सुषुप्त । परी घर्षणे अवच्छेद । होतो प्रज्वलीत तयाचा ॥६१॥
तेवीच चिंतनाच्या घर्षणे । आत्मज्योत तेवते तेजाने । मग वनमाळी सहजपणें ॥६२॥
तुकयाची गाथा अभंग । उदकी बुडविता मदांध । परी तो प्रभू स्वयंभ । रक्षिता झाला इंद्रायणी ॥६३॥
पाहुन ह अघटित । देहुचे जन समस्त । झाले बहु चकित । धावले दर्शना तुकयाच्या ॥६४॥
लोक म्हणती संतवर । तरले अभंग पाण्यावर । मूढ आम्ही पामर । क्षमा करा दीनांसी ॥६५॥
तुळसी वृंदावनापाशी । बैसले होते अनुष्ठानासी । दिवस तेरा उपाशी । संत श्रेष्ठी तुकोबा ॥६६॥
गाथा तरती देखून । हरखले तयांचे मन । साक्षात्कार हा सगुण । विठठले घडविला तयांना ॥६७॥
स्वानंदे भरले ओतप्रोत । हृदय तयांचे नितांत । विठठलाच्या भजनांत । मन रंगी रंगले ॥६८॥
“आनंदले मन । प्रेमे पाझरती लोचन” ॥तुकाराम॥
हिंदवी राज्य संस्थापक । गोब्राह्मण प्रतिपालक । राजे शिवाजी कुलदिपक । आले कीर्तनासी तुकोबांच्या ॥६९॥
महाराजांची अभंगवाणी । ऐकोनी तयांच्या नयनीं । स्वानंदे पाझरले पाणी । विसरोनी गेले देहभान ॥७०॥
तो काय जाहली मात । अविंधांचा अकस्मात । घाला आला राऊळांत । पकडण्या रायासी ॥७१॥
परी भक्ताच्या भक्तासी । घालावया पाठिशी । स्वयें वैकुंठ निवासी । धाऊन आला निमिषांत ॥७२॥
तैं एकाच शिवाजी ऐवजी । दिसूं लागले राऊळामाजी । अनंत अनंत शिवाजी । भजनांदि रंगलेले ॥७३॥
पाहोनी दृश्य हें विलक्षण । भांबावले मुसलमान । खरा शिवाजी यांत कोण । संभ्रम पडला तयासी ॥७४॥
पाहुन ही भुलावण । शिपाई चाकणचे पठाण । निराश पुरते होऊन । फिरले माघारी रिक्त हस्तें ॥७५॥
भक्ती-प्रीतीचा सुरम्य । साक्षात्कार हा अगम्य । तुकया संगे सुगम । अनुभवा आला इतरांशी ॥७६॥
गौरांग प्रभुनीं असाच । अनुभव अति उदात्त । दिला आपुल्या भक्ताप्रत । प्रत्यक्ष प्रभुदर्शनाचा ॥७७॥
दिव्य भाव तयाचा सहज । उद्बोधुनी आत्मतेज । साक्षांत परब्रह्म चतुर्भुज । ठाके सामोरी तयांच्या ॥७८॥
एकदां जगन्नाथाचे यात्रेसी । गौरांग निघाले जावयासी । घेऊन संगे भक्तवृंदासी । माता पत्नीसहीत ॥७९॥
प्रात:समयी प्रशांत । टाळ मृदुंगाच्या तालांत । भक्तगण स्वानंदात । मार्ग होता चालत ॥८०॥
सुपुष्पांचा परिमल । सुखद पसरला निर्मळ । अरुणप्रभेची किरणे कोमल । होती पसरली भूवरी ॥८१॥
गौरांग होऊन चिन्मय । नामसंकीर्तनी तन्मय । वातावरणी आनंदमय । चालत होते अग्रभागी ॥८२॥
तव नदीकाठी प्रवाहांत । गावची वस्त्रें धुवीत । परिट आपुल्या भार्येसहित । होता नित्याप्रमाणें ॥८३॥
ईशभक्तांची ही मंदियाळी । शुभद पाहून सकाळी । परीटाच्या हृतकमळी । भक्ती प्रेम उदेले ॥८४॥
अंतरी तयाच्या दाटून । आले भक्तीचे उधाण । मग प्रभूस करोनी वंदन । परीट मिसळला दिंडीत ॥८५॥
नामोच्चारांत संपूर्ण । परीट गेला हरवून । विसरला सकल देहभान । नाचू लागला स्वच्छंदे ॥८६॥
पाहून हें विपरीत । पत्नी तयाची झाली भयभीत । लागले वेड खचित । म्हणाली माझ्या पतीला ॥८७॥
आवेशे पुढे होऊन । हातास तयाच्या धरून । “माघारी चला फिरून”। म्हणाली ती काकुळती ॥८८॥
पतीच्या हातास हात । लागता तिचेही चित्त । गेले उन्मनी अवस्थेत । भान न राहिले कशाचे ॥८९॥
मुलें तयाची जवळच । होती स्वच्छंदे खेळत । घाबरून ती त्वरीत । येऊन बिलगली तयांना ॥९०॥
परंतु तीही नामानंदात । नाचू लागली स्वच्छंद । भजनीं झाली धुंदसुंद । राधे गोविंदु जय राधे गोविंदु ॥९१॥
भक्त मंडळी ही सकल । आली पुरीस वेल्हाळ । मग गौरांग प्रभुनी ब्रिजलाल । प्रत्यक्ष दाविला तयांना ॥९२॥
किंबहुना निराकार निर्गुण । विश्वचैतन्य आनंद घन । परी जयाचे सगुण दर्शन । घडले ते परम भाग्याचे ॥९३॥
रासक्रिडेचे दर्शन । कालींदी तटी नेऊन । दावितो तो व्रजभूषण । नरसी प्रेमा मोहुनी ॥९४॥
कंठातुन तयाच्या केदार । राग ऐकोनी शारंगधर । वक्ष:स्थळीचा रत्नहार । स्वहस्ते देतो तयासी ॥९५॥
काश्मीर प्रातांचे महासंत । नाम जयांचे “गोविंदभक्त” । होते बहु विख्यात । कृष्ण भक्त म्हणोनी ॥९६॥
एकदां घनदाट अरण्यांत । प्रवास असतां करीत । चुकोनी वाट अकस्मात । बैसले एका वृक्षाखाली ॥९७॥
झाले होते अतिश्रांत । तृषाही लागली अत्यंत । व्याकुळ होवोनी मूर्च्छित । पडले भूमीवर निश्चेष्ट ॥९८॥
तव शिष्योत्तम तयांचा । शोध करावया पाण्याचा । गेला एका जवळच्या । टेकडी सन्निध ॥९९॥
टेकडीच्या नजिक । दिसला तयाला एक । तलाव पाण्याचा स्वच्छ । बनही तुळशीचे कांठावरी ॥१००॥
तेथेंच एक गवळीनुसार । वाजवित पावा सुस्वर । बैसलेला शिलेवर । पाहिला त्या शिष्यानें ॥१०१॥
लगबगीनें तो शिष्यवर । कमंडलू पाण्याचा बरोबर । परतला घेऊन सत्वर । गुरुपाशीं आपुल्या ॥१०२॥
डोळ्यास लाविता पाणी । उतरली तयांची ग्लानी । बैसले मग ते उठोनी । प्रफुल्लीत होऊन ॥१०३॥
मग तयांच्या पुढयांत । भरून ठेवले दुग्धपात्र । घालूनी एक तुळशीपत्र । क्षुधा शांती कारणें ॥१०४॥
दूध करून ते प्राशन । म्हणाले गुरु शिष्या लागुन । आणलेस हे सारे कुठून । स्थळी ऐशा निर्जन ॥१०५॥
दूध जे प्राशिले आपण । ग्वा बालाने दिले मज आणून । तुळशीपत्र आणि जीवन । मिळाली टेकडी संनिध ॥१०६॥
मग शिष्यासमवेत । श्रीसंत गोविंद भक्त । म्हणाले जाऊ त्या स्थळाप्रत । पाहू तलाव आणि गुराखी ॥१०७॥
टेकडी पाशी येताच । गुरु शिष्य झाले चकित । नव्हते तेथें अस्तित्व । गुराखी वा अन्य कशाचे ॥१०८॥
अर्थ या घटनेचा तत्क्षणीं । आला गोविंद भक्तांच्या ध्यानीं । नव्हते इथे अन्य कोणी ।भगवंता वांचोनी केवळ ॥१०९॥
चित्त करोनी एकाग्र । लाविली मुद्रा नासिकाग्र । तव क्षणांतच गोकुलेंद्र । शंपा जैसा प्रगटला ॥११०॥
दर्शन सुखाचा अतुल । लाभला आनंद उज्ज्वल । सहजे शिष्यासही विमल । अनुग्रह होता गुरुचा ॥१११॥
जनार्दन स्वामींचा प्रसाद । एकनाथासी होता सुखद । श्रीदत्तप्रभुनीं साक्षात । दर्शन दिले तयांना ॥११२॥
असो मी या अध्यायांत । केले विचार तुम्हां विशद । केशवदत्तांचे प्रज्ञावंत । साक्षात्कार मिमांसेचे ॥११३॥
सगुण साक्षात्कार योग ग्रंथ । जणू भक्ती-प्रीतीचे अमृत । पिऊनी एकदां तरी आकंठ । कृतार्थ व्हा भाविक हो ॥११४॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । सोळावा अध्याय संपूर्ण ॥११५॥
॥ इति षोडशोऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP