मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|

दासोपंताची पदे - पद २२१ ते २४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


२२१
[ गौडी दखिण साळ ]
सासू, सासुरें, दूरदेषु, दुःखद माये !
बापु, सद्गुरू, अवधुतु, कैसेनि पाहे ?
आठवे वो ! प्रतिक्षणीं; मज वियोगून न साहे. ॥१॥धृ॥
एकदां तर्‍हीं येउंनि मुख दाखवावें; श्रीमुख मज दाखवावें;
ते मुख मज दाखवावें; स्वमुख मज दाखवावें. ॥छ॥
काम - क्रोध - द्वेषादिक न बाधक माये !
आशा मन माया मज तोडिती सोये.
दिगंबरा ! तुजविण मज माझें कोण आहे ? ॥२॥

२२२
बोलू बोलतां, नेणों, काये कठीण जालें ?
ऐसें दूरदेशीं कां मज सांगे, दीधलें ?
बोलवितां न बोलसी; ऐसें म्या वो ! काये केले ? ॥१॥धृ॥
माये ! तरी तें मन कैसें वो ! धरावें ? तुझें मन कां वो ! धरावे ?
माह्मी मन कां वो ! धरावे ? तें मन कैसें वो ! धरावे ? ॥छ॥
प्राणू देयीन; तुजविण न सवे माये !
कंठ दाटला; नयनीं जळपूरू वाहे.
दिगंबरे ! तूतें कळवळ कैसी न ये ? ॥२॥

२२३
धिग्य जीणे हें ! बहु दिन जाले गे ! माये !
भेटी न दीसे ! पुढें तर्‍ही करूं मीं काये ?
कंठू दाटला; माझें हियें फूटताहे. ॥१॥धृ॥
काये करूं ? का मज केलें वो ! निदान ?
माये ! मज केलें वो ! निदान ?
तुवां कां केलें वो ! निदान ? ॥छ॥
बापुमाये तूं; तुजविण कोण्हीचि नायीं.
जन पारिखे; याप्रति बोलोनि कायी ?
दिगंबरी ! येकुवेळ येईं; भेटी देयीं. ॥२॥

२२४
सप्तसागर क्षीतितळगतजळ माये !
ने घे चातकु; गगन विचरतु आहे.
तैसा सद्गुरूराया ! तुझी वास पाहे. ॥१॥धृ॥
मेघू तूं; तरी जीवन माझें मज देयीं;
तें मुख० ॥तें पद०॥
अमृत माझें मज देयीं ०॥छ॥
काळें वोळला जळधरू अगणीत धारा;
तैसा सद्गरूराया पाव येक सरा.
दिगंबरा ! तुजवीण मज नाहीं रे ! दूसरा. ॥२॥

२२५
शब्द श्रवणीं खरतर लागती बाण.
रूप नयनी तुजवीण तैसेंचि आन.
पोळी, चांदणें चंपकु नाव्डे सुमन. ॥१॥धृ॥
हें मीपण मारूंनी मज भेटि देयीं;
आतां भेटी देयीं;
मारूनी मज भेटि देयीं. ॥छ॥
धन यौवन जन जनवन करूं मीं काये ?
आत्मा श्रीदत्तु पाहिन हृदयीं माये !
दिगंबरेंवीण माझे मनस न राहे. ॥२॥

२२६
योगीं न थरें; मन माझें चंचळ; माये !
आत्मा श्रीदत्तु जाणोंनि तेथेंचि राहे.
नुमजे वो ! गुणमति! आंगिं मनत्व न साहे. ॥१॥धृ॥
तु मी; तरी साधन कवणें करावे ?
मनन, प्रलपन, मनक्षीण, साधन, ॥छ॥
ध्यानधारणा, जपु, मज नावडे; माये !
ज्ञानविज्ञानप्रलपन तेही न साहे.
दिगंबरा ! आत्मा तुं; तरि पुरे; येर काये ? ॥२॥

२२७
कार्य जाहालें; आतां येथें राहोनि काई ?
दत्ता ! स्वपुराप्रति मज घेउंनि जायीं.
पाहीन मी तुझें रूप; येकुवेळ भेटि देयीं. ॥१॥धृ॥
तो मी; तरी तें पद माझें मज द्यावे.
दासत्व०; शिवपदें०.
तें पद माझें मज द्यावें. ॥छ॥
कैसा भेटसी अरे ! मज निदान काळीं ?
रूप सावळें पाहिन मी अती जवळी.
दिगंबरा ! कवळीन तुज हृदयकमळीं. ॥२॥

२२८
नित्य करितां गुणश्रवण आनंदली आनंदकंदें.
बाइ - ये वो ! सखिपे वो ! ॥०॥
अपपर हे ठेली वासना;
अनुरंजनें छेदली द्वंद्वें; माझी वो ! ॥०॥ माये वो ! ॥०॥
येणे जाणें हें; विकुंठली अविकारिता;
सुटली भेदें; येणे वो ! ॥०॥ त्रीवीधे ! ॥०॥
गुणीं गुंपले माये मानस परतेचिना वीषयबोधें. ॥१॥धृ॥
काये करूं ? संसारिं कीं मन माझे वो !
काजासी नये, बाईये वो ! गोरिये वो !
क्रीया न कळे मज केवळ संदर्शन - रूप वो ! माये ! हा वो !
शब्दसुख वो दुःखदायक. संबोधनें
खेदूचि होये. अचळकरण मज राहिलें.
वीचेतन करणें काये ? ॥छ॥
नित्य करितां रूपसेवन संकोचली
मती वो माझी. गुणी अगुणगुण आटले,
संस्पंदने, माजीची माजी. चेत्य चेतन.
येक रसलें. तेथें कुंठली भावना दूजी.
दिगंबरीं भेदु मालवे; दीपकळिका जैसी वो ! तेजीं. ॥२॥
वाट पाहतां दीन लागले; सादु घालीन; येइ वो ! माये !
नयन सजळ जळधर हें संश्रमती; वीनउं काये ?
शब्द न फुटे; हियें दाटले; आक्रंदने मोकली धाये.
देह पडले वाणवाग्नी; वो ! कयी वोळसी ? श्रमती आहे. ॥१॥धृ॥
चांदु - चंदनें माये ! चंपक - चेतनें मूळीं लागती बाण.
श्रमु श्रवणीं; सुखकर ही अनुरंजन नेघे वो ! मन.
जन, स्वजन, वन, वेसिये, धन, धनद, कनक, आन
तुजवांचुनि पढिये ना; वो ! काये पाहासी ? वेचती प्राण. ॥छ॥
प्राणेंसीं मज वैर पडलें; काळ काळ जें आंतीं हें व्याळ.
माझी मज हे बाधी कामना; कर्मकल्पना दुःखासी मूळ.
स्वगुण - करण - गण पारिखे; पापास्तव जाहाले काळ.
दिगंबरा ! मन माझें मीनु हा; तया पडलें प्रपंच जाळ. ॥२॥

२२९
लक्ष ठेउंनि तव चरणी म्या सांडिली सकळ चिंता.
मन सगुणगुणी गोविलें; अवधूता रे ! ते निघे आतां.
हृदयकमळ तुझें मंदिर, नित्य राहातें, मानलें चित्ता.
चाड न दिसे येर साधनें; योग - सेवया होयील वेथा. ॥१॥धृ॥
दुःख - दुःखददोष - दमना ! दमु आवडे ऐसा हा मातें.
सकळ वीषय मनीं नाठवीं रूप सावळें धरूनि चित्तें.
योगविरुद्ध जनी होयील; तरि हो सुखें नमनो तूतें.
मन मातलें माये ! आवडी; कायेकरणें येणेची पंथे ? ॥छ॥
देह देउंनी भक्ति घेइन; आत्मया रे ! तुं माझे धन.
रात्रि दिवसु तुतें आठवीं, हेचि मागणें; नेघे मी ज्ञान.
येणें अवेदनें मुक्ति पाहिजे; प्रेमसागरीं बुडो हें मन.
दिगंबरा ! निजसुखसागरा ! कां दुरावीसी ? कळली खूण. ॥२॥

२३०
विकारी, चंचळ, मन भारी विषयपर,
न धरी परति माये ! सीणली मी फार. ॥१॥धृ॥
काये करूं ? गेले वय विफळचि, माये !
सांग कैसेनि जोडती मज अवधूते पाये ? ॥छ॥
संगु घडला बाधकु वैरभावें.
न सूटे मज; निवारी कवण माझें समळ केवळ ?
भेटवा माउली माझी देॐ दिगंबरु.
बहु वो ! श्रमला; आतां न करावा उसीरु. ॥२॥

२३१
आतां तया न सोडीं येथून; ॥०॥
न सोडीं; न सोडीं येथून.
बहु श्रमीत जालें मन. अवधूतरायाचे चरण,
हे चरण, मी नविसंबे. ॥१॥धृ॥
माये ! मी वो ! जाइन येकली.
वो ! तया रातली.
पंकजनयनें हरीली मती. नावडे तो विण येर चित्तीं.
आतां मी नयें मागुती. बहुदिन तुटी पडली होती. ॥छ॥
तपस जाहालें सुफळ. रूप सावळें देखिलें माये !
श्री दिगंबरा यया वांचून दैवत आन न भजें मी वो ! ॥२॥

२३२
आतां तया धरि जा धावोन. अतिक्षिण जाले नयन.
सद्गुरुरायाचें ध्यान, ते ध्यान, ते ध्यान करी हे मन. ॥१॥धृ॥
मी पाहिन नयनी त्या वो प्रिया साजणी !
विकळपणें न धरे धीरु. त्यावीण मी वो न मनी परु.
आतां मी तेणेंवांचून श्रमद हे साधन न करी आन. ॥छ॥
दिगंबरु आला वो धावोन, भुजा साहि पसरुनि,
सुरपती वोळगोनि, हा वोळगोनी वोळला. ॥२॥

२३३
( गौडी )
अगुणी गूणु माये ! कैसी मी धरूं ?
आत्मा निगूर्णु; ध्यान कैसें मी करूं ? ॥१॥धृ॥
त्रिविध भेदु माझा हरला गे ! माये !
स्वरूपें स्वरूप सिद्ध नीवळत आहे. ॥छ॥
स्वजन जन सर्व बीज न माये.
मननाची वृत्ति मन न साहे. ॥२॥
चंचळ मन माये ! नीश्चळ जालें.
अवस्था - जनीत - भान नाशोनि गेले. ॥३॥
दिगंबरु अवृत्ती मी मज पाहे.
पाहतां पाहातेपण पाहाणें न सांहे. ॥४॥

२३४
मननीं मनन मन मरें निमालें.
मंत्रसाधन मज कांहीं न कळे. ॥१॥धृ॥
आपुली खूण मि वो ! आपण जाणें.
नेणती नेणती मज ह्मण तु अज्ञानें. ॥छ॥
आपुलें पारिखें मज कांहींचि नाहीं.
सांडणें मांडणें तें करीं मी कांहीं. ॥२॥
योग सेवा मज न कळे गे ! माये !
अवस्थारहित सहजचि आहे. ॥३॥
शास्त्रश्रवणीं हा वो ! भाॐ न राहे.
दिगंबरु कळे तया कळणें न साहे. ॥४॥

२३५
आपुली तूटि मी वो ! आपण साहें.
मींचि पारिखें आंगीं मज मी न साहे. ॥१॥धृ॥
बाइये ! वो ! काये पुससील खूण ?
शून्य उडालें, तेथें माझें पूर्णपण. ॥छ॥
अपरमीत ते मी कासेन धरूं ?
धरणें, सोडणें तेथें कुंठला वीचारू. ॥२॥
सगुण ह्मणो कीं मी वो ! निर्गूण माये !
गुणेंसीं सहीत गुणकरण न सहे. ॥३॥
आत्मा निर्गुणु मायेचे न साक्षी.
दिगंबरु अवृत्ती मज मीचि लक्षी. ॥४॥

२३६
चंचळ हें मन कैसेनि धरूं ?
सकळ साधन नेणें; न कळे आधारू. ॥१॥धृ॥
सद्गुरू मज भेटवा वो ! माये !
सकळ साधन मज ययाचे पाये. ॥छ॥
विषयकामभ्रमें चित्त विकारी.
हित स्वहित तें कांहीं न विचारी. ॥२॥
लक्षलाभु तो ही काये मीं करूं ?
भवसागरीं येणें पविजे पारू. ॥३॥
स्वप्रधन मृषा प्रपंचभान.
दिगंबरु सखिये ! सत्य निधान. ॥४॥

२३७
येणेंसीं दूरिपण; कैसें मीं धरूं ?
जीवी जिवनु दत्तु; प्राणा आधारू. ॥१॥धृ॥
हें माझे पण सांडीन माये !
पाये पाहीन; भेदू तेणेसीं न साहे. ॥छ॥
येणेसीं येकपण कैसें मीं साधूं ?
साध्यसाधनवृत्तिविलयें अभेदु. ॥२॥
कैसा हा ? भक्ति भाॐ भजन करूं.
आत्मा विषयो नव्हे; न पवें मी पारू. ॥३॥
गुणीकवर्म तें वो ! यया न साहे.
दिगंबरु गुणहीनु आपणूचि आहे. ॥४॥

२३८
योगियांचें योगधन; ज्ञेय ज्ञानीयांचें ज्ञान; ॥१॥धृ॥
रे ! आत्मयां ! दत्तात्रेया ! न कळे हे तुझी माया. ॥छ॥
दिगंबरा ! तूं चिन्मात्र. नाहीं तुजहुनि पर. ॥२॥

२३९
सकळही मृषाभान. परब्रह्म तूं सगूण. ॥१॥धृ॥
रे ! आत्मयां ! दत्तराया ! सन्मयी तुझी काया. ॥छ॥
दिगंबरा ! तुझांठांयीं दृश्य निमांलें सर्वही. ॥२॥

२४०
अनुमानें व्यक्ति न ये. उपमानातें न साहे. ॥१॥धृ॥
रे ! अवधूता ! तुझें रूप परब्रह्म विर्विकल्प. ॥छ॥
दिगंबरा ! तूं अमेय, शिवरूप, सुखमय. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP