गजेंद्रमोक्ष

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


श्रीनिजमूर्ति तुझे पदसेवन जीवन देउनि नीववि काया ।
जे भवतारक,तापनिवारक, लावि गिरा तव नाम वदाया ॥
मानस मीपण टाकुनि निश्चळ सत्स्वरुपी रत छेदुनि माया ।
रंग अभंग करी नलगे मज इंद्रपदादिकही गुरुराया ॥१॥
पार अपार हरादिक नेणति तो गुरुराज सखा मजला ।
बोलियला मुनिमानसमोहन मागसि ते दिधले तुजला ॥
बोल सुखावह डोलति सज्जन सांग गजेंद्र कसा तरला ? ।
तो वर लाहूनियां शिरसा मग रंग सुखानुभवी भरला ॥२॥
एक मनोरम तो गिरि उत्तम, ज्या त्रिकुटाचल नाम विराजे ।
दीर्घ शते शतयोजनमंडित त्या तुळणे सम मेरुचि साजे ॥
वृक्ष लता बहुतपरि डोलति कोकिळशूकसुखारव वाजे ।
खेळति पक्षिकुळे विविधाकृति शार्दुल गर्जति अंबर गाजे ॥३॥
किन्नरगायन नाद सुधारस ऐकति सिध्द मुनीद्र सुखे ।
योगलिळेप्रति साधक साधिति ते सुख वानिल कोण मुखे ॥
एक निवृत्त परावरशोधक डोलति ऐक्यपणे हरिखे ।
त्या अनुपम्य पदाप्रति दाविल श्रीगुरुवांचूनि कोण सखे ॥४॥
अमृततुल्य सरोवरीचे निर सेवुनिया क्रिडती वनगाई ।
हेममया कमळी रत षटपद मज्जन पान अती सुखदाई ॥
पादष पुष्पफळांकित उत्तम तेथिल वानिल कोण नवाई ।
मानुनियां सुखभोज विराजतसे गजराज मदोन्मत ठाई ॥५॥
भीमपराक्रम काळ तुळे सम दिग्गज नामभये दुरि जाती ।
निर्जरनायकवाहनही भयभीत धरातळिचे गज किती ॥
मेघसुखाहुनि घोष विशेष भये क्षिति लक्षिति श्वापदयाती ।
कोण गणी अगणीत बळा ? गज राज्य करी समवेत स्वजाती ॥६॥
यापरि हिंडतसे वन धुंडित सेवित कोमल पल्लवचारा ।
कामसुखे विचरे विधि टाकुनि बोधित कोण तया अविचारा ॥
क्रोध कदा न शमे अघदायक मोह सदां स्रवती मदधारा ।
मत्सर दंभ निरंतर गर्व अनावर सर्व अनर्थ पसारा ॥७॥
एक दिनी फळ  पल्लव सेवुनि व्याकुळ प्राण तृषा सकळांसी ।
उत्तम तीर निरीक्षुनियां निर देउनि तृप्त करी सहवासी ॥
तोय सुखी जंव घालितसे तंव वोढवले बहु अद्भुत त्यासी ।
नक्र जळी पद वोढित जेविं दिवाकरबिंब बळें ग्रह ग्रासी ॥८॥
रोवुनि दंत पदी पद ओढितसे गज ताडित त्यासि बळे ।
थाप जळावरि मारितसे परि नक्रपराक्रम तो न ढळे ॥
गोवियला गजराज निरीक्षुनियां परिवार समूळ पळे ।
युध्दवशे तनु जर्जर होऊनि व्याकुळ तो गज शक्ति गळे ॥९॥
चिंतितसे गज संकट हे मज बंधु सुता सुत निष्ठुर पाहा ।
प्रीय कलत्र सगोत्रज मित्र तयांप्रति तो उचितार्थ नव्हे हा ॥
वैभव तो सुखसंभ्रम दाविति कृत्रिम लाघव लाविति मोहा ।
व्यर्थ अनर्थकरे प्रतिपाळुनि शेवट येकट येकट आहा ॥१०॥
कामविलास सुखावह मानुनि अचितसे मजलागुनि जाया ।
बंधु वदे धनसंग्रह दे मज याविण तो स्नेह दाविसि वाया ॥
पुत्र सभाग्यपणी अनुकूल उपेक्षिति जे दिनि जर्जर काया ।
पामर मी भुललों मृगतृष्णिक भूलविलों ममता मोह माया ॥११॥
खेद करी अनुताप धरी अवलोकित काय उपाय करावा ।
आठवला सुखदायक मंत्र दयानिधि तो जगदीश वरावा ॥
वारिल संकट तो सुखसागर भावबळे भवसिंधु तरावा ।
याविण आणिक मित्र नसे कळले गुज हा मज लोक परावा ॥१२॥
अंबुज एक करी अवलंबुनि भक्तिपुरस्पर डोलतसे ।
ह्रत्कमळी कमळापति चिंतुनि मंद गिरा मग बोलतसे ॥
ह्रद्रत तूं निजमूर्ति सखा तुजवीण दुजे मज कोण असे ।
पाव अपाय निवारुनि मी मज दावुनि वारि समूळ पिसे ॥१३॥
तूं अज अव्यय नित्य निरामय तूं सच्चिन्मय सौख्यनिधाना ।
हा जगडंबर भासत तद्वत वोघतरंग जळावरी नाना ॥
कुंडल किंकिणि नूपुर ककंण कांचन एक बहू अभिधाना ।
वेद वदे जगदंतर एक निरंतर नातळसी भवभावना ॥१४॥
विश्वरुपा ! अरुपा ! अविकार ! अनाम ! असंग ! अनंत ! अपारा !
शास्त्र पुराण विवाद सदां करिती परि निश्चिति नेणति पारा ॥
विश्व तुझ्या स्वरुपी परिकल्पित विद्वत वानिति विश्वअधारा ।
नेति वदोन सरे श्रुतिवादन वाच्य अवाच्य वृथा श्रम सारा ॥१५॥
साच नसे मृगतोय सुनिश्चित आश्रय भानु तयाप्रति पाहे ।
लोह चळे परि चुंबक अक्रिय निष्क्रिय तेविं विलासत आहे ॥
दृश्य नसे घन चिद्रुप तद्रुप तंतु पटत्त्वरुपे दिसताहे ।
हे निज गुह्य अलौकिक जाणति संत अनंत सुखे  रमताहे ॥१६॥
निर्गुण जे रुप यापरिचे विणभेद सगूणहि त्या वदती ।
ते सुखदायक मानुनि एक विराग धरुनि मने भजती ॥
भक्तिसुखे तुज अर्चिति उत्तम ते पर मी तर हीन किती ।
त्या करुणाकार श्रीचरणांप्रति मी शरणागत आर्तमती ॥१७॥
उध्दरिला अजमीळ अहंकृति तारियली गणिका अघराशी ।
हिंसक व्याध अगाध जिवांप्रति विंधुनियां शर भक्षिति त्यांसी ॥
चोज कसे ? गुज सांग तयाहुनि पातक काय असे मजपाशी ।
दीनदयाकर हे बिरुदवळि वनिति वेद निरंतर कैसी ॥१८॥
पीडितसे ग्रह वारुनि यासि अनुग्रह दे मज पूर्ण सुखा ।
कीर्ति करी निज भूषण तारुनि दुष्कृतराशि पशू विमुखा ॥
मी तृणभक्षक मंदमती महिमान अगोचर शेषमुखा ।
जाणसि अंतरिचे अति संकट आन नसे तुजवीण सखा ॥१९॥
अंतरिचा अनुताप विलोकुनि तो करुणाघन येऊनि नेटे ।
नक्र जळी जंव वोढितसे तंव हाणितला निजचक्रचपटे ॥
फोडुनियां मुख काढित बाहिर नक्रगजां अति अद्भुत मोठे ।
पद्मकरे अभयंकर देउनि सोडविली पशुदेह सुनाटे ॥२०॥
अमृतहस्तक ठेवुनियां कुरवांळित मस्तक तो सुखदानी ।
वाजति मंगळ घोष सुकीर्ति सुभाषित बोलति देव विमानी ॥
भक्तिसुखाहुनि थोर नसे सुखकारक वेद वदे गुज कानी ।
मायिक ती लटकी अघदायक जानकिनायक एक निदानी ॥२१॥
भक्तिसुखे प्रर्‍हाद तरे मुनि नारद भक्तिसुखे विचरे ।
भक्तिसुखे सनकादिक पावन भक्तिसुखे उपमन्यु सरे ॥
भक्तिसुखे ध्रुवबाळ सुखावह व्यासमुखे जगताप हरे ।
वाल्मिकि अंबऋषी बळि भीष्म शुक्रादिक तन्मय भक्तिभरे ॥२२॥
उध्दव अर्जुन धर्म बिभीषण रामपदी रत चित्त जयाचे ।
अक्रुर वैष्णव भक्त कपी हनुमंत सभाग्य जिणे विदुराचे ॥
भानुकुळी रुखुमांगद भक्त सुधाकरवंशि परीक्षिति साचे ।
ऐक्य निरंतर चित्स्वरुपी निजभक्त वदे श्रुति नाम तयाचे ॥२३॥
भक्तिसुपानसुखी मन होऊनि उन्मन भेदअभेदविना ते ।
भोगिति भोग अतीद्रिय देखति एकपणेचि जनां विजनांते ॥
सारुनि मीपण भाविति आपण अक्रिय निश्चित ज्ञानघनाते ।
रंगविना निज वस्तु सदोदित प्रत्यय निश्चय साधुजनांते ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP