अध्याय सातवा

हा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.
मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.


चांगेश बुधे थोर सिध्द झाला । संजीवनी विद्येला साधियेले ॥१॥
ऐसे वर्तमान ऐकूनि जंगमाने । उभयतां श्वान घरचे होती ॥२॥
चांगायाचे नाम ठेविले श्वानांसि । त्या नामे तयासि पाचारीत ॥३॥
म्हणूनि चांगदेव चालिले मठावरुनि । गर्वाची झाडणी करावया ॥४॥
दिंडीसी पताका देखती दुरुन । ह्मणे मल्लिकार्जुन काय येते ॥५॥
शिष्य सांगताति आले चांगदेव । ह्मणे कवतुक बरवे करु आता ॥६॥
बोलतां चालता आले मठापाशी । शरणागत अयासि बोलीयले ॥७॥
मल्लिकार्जुने वरुनि टाकिले आसन । म्हणे हे घेऊन बसावे तुह्मी ॥८॥
आसन अंतरिक्ष राहिलेसे जाण । केले टाने टोने जंगमाने ॥९॥
चांगदेवे ऐसे देखिले लोचनी । विभूति मंत्रूनि फुंकियेली ॥१०॥
विभूत प्रोक्षिता लागलासे अग्न । वरच्यावरि आसन जळत असे ॥११॥
न पडे भूमीसि देखूनि आसन । जंगम धांवून पायी लागे ॥१२॥
बळकट पायी धरिले तेणे । म्हणे हे आसन गुरुचे असे ॥१३॥
सत्वर करणे याचे संरक्षण । तुज मी शरण आले असे ॥१४॥
करुणावचन ऐकूनि तेही । पाडिले लवलाही भूमीवरि ॥१५॥
जंगमाने शिष्यसि इशारत केली । श्वाने लपविली तळघरांत ॥१६॥
केलासे जंगमाने तयासि पाहुणेर । पाक हा सत्वर सिध्द झाला ॥१७॥
म्हणती चांगदेव मठीचे सर्व जीव । अन्न हे बरवे द्यावे त्यांते ॥१८॥
पशु पक्षी माशी मुंगीसि ये जाण । वाढियेले अन्न पात्रामध्ये ॥१९॥
विस्तारुनि पात्रे शिव पूजा म्हणत । कंठीचे वस्त्र सोडियले ॥२०॥
वस्त्रे सोडूनिया लिंग पहाताती । परस्परे बोलती न दिसे लिंग ॥२१॥
अवघे मिळूनियां आले गुरुपाशी । सर्व वर्तमानासि सांगितले ॥२२॥
गुरुने पाहिला आपलाही देव । तंव न दिसे शिव ऐसे झाले ॥२३॥
म्हणती चांगदेव सत्वर पूजा शिव । आम्ही आपुला देव पूजियेला ॥२४॥
ऐकूनि मल्लिकार्जुन वचन बोले । म्हणे शिव गेला कैलासासि ॥२५॥
तुमची भोजने होऊं द्यावी आता । आम्हां उमाकांत क्षोभलासे ॥२६॥
हांसूनि चांगदेव म्हणती श्वान आणा । लिंगासि प्राशना केले त्याने ॥२७॥
आणूनिया श्वान पुढे उभे केले । तयांसि बोलिले चांगदेव ॥२८॥
चांगादेवा देई लिंग पूजनाला । बहु भोजनाला उशीर झाला ॥२९॥
ऐकूनि वचन मुख केले वरुते । सर्वाचिया लिंगाते वमीतसे ॥३०॥
ढीग केला मोठा लिंगाते वमूनि । आपुले ओळखूनि घ्यावे आता ॥३१॥
आपुलाली लिंगे घेतली ओळखूनि । गर्व होतां मनी गळित झाला ॥३२॥
चांगदेवे आज्ञा केलीसे सर्वासि । लिंग पूजनासि मुखी धरा ॥३३॥
तैं पासूनि लिंगे मुखांत घालिती । ऐशी हे पध्दति चाले आता ॥३४॥
सर्व मंडळीचे झालेसे भोजन । मग मल्लिकार्जुन बोलियेले ॥३५॥
शरण असें तुमचे पायांसि । कृपा अनाथसि असो द्यावी ॥३६॥
ऐसा चमत्कार दाखविला त्यासि । पुढे बेदरासि जाते झाले ॥३७॥
माध्यान्ह झालासे बेदरा पावले । स्नाना उतरले तळ्या पाळी ॥३८॥
तंव राजगृहीचा आलासे ब्राह्मण । जोशी तो निपुण राजापाशी ॥३९॥
पुसतसे शिष्यांसि हे कोण ब्राह्मण । यांचे नाम काय ? कोठे असती ॥४०॥
बोलणे ऐकून शिष्य देती उत्तर । चांगाटेश्वर आले येथे ॥४१॥
साष्टांग नमन करितसे । वर्तमान सर्वं सांगितले ॥४२॥
राजा बहु असे दुष्ट या स्थळीचा । देखेल तुमचा समारंभ ॥४३॥
देखूनि समारंभ छळील तुम्हांसि । वर्जावे तयासि तरि दु:खी असे ॥४४॥
पुसती चांगदेव दु:ख त्या कशाचे । वर्तमान तयाचे सांगा मज ॥४५॥
ऐकूनि ब्राह्मण सांगे समाचार । ऐका सविस्तर स्वामी तुम्ही ॥४६॥
बहू प्रीतिपात्र राजयाची पत्नी । पावली मरण सर्पदंशे ॥४७॥
बहु धन्वंतरी केला प्रयत्न तिचा । न चले कवणाच्या उपायासि ॥४८॥
जीव गेला तिचा पावली मरण । दु:ख हे दारुण राजा करी ॥४९॥
तीन दिवस झाले तियेच्या प्रेतासि । चिरुनि उदरासि रक्षियेले ॥५०॥
उदईक प्रेत पाठवितो रोजा । दु:ख बहु राजा करितसे ॥५१॥
एसे वर्तमान ऐकूनि चांगायाने । म्हणे सजीव प्राण होईल ती ॥५२॥
ऐसा विठ्ठलाचा आहे चमत्कार । निर्जीव शरीर सजीव होय ॥५३॥
ऐकूनि ब्राह्मण मनी आनंदला । सत्वर तो गेला नगरामध्ये ॥५४॥
सर्व वर्तमाने सांगे रायपाशी । मृत्यमनुष्यासि उठविती ॥५५॥
चवदाशे वर्षाचे सिध्द येथे आले । आश्वासन दिधले तेही मज ॥५६॥
ऐकूनिया ऐसे राजा बोले वचन । तयांसि घेऊन यावे आता ॥५७॥
राजयाचे वचन ऐकूनि ब्राह्मण । तयांसि घेऊन गृहा आला ॥५८॥
आपुल्या गृहा तयांसि आणिले । रायासि सांगितले वर्तमान ॥५९॥
राजा म्हणे तया करुनी विनंति । आणा सभेप्रति करा कार्य ॥६०॥
आलासे ब्राह्मण चांगदेवापाशी । बोलवितो तुह्मांसि राजा सभे ॥६१॥
पाचारितां विप्रे सत्वर उठिले । राजद्वारा गेले समारंभे ॥६२॥
राजद्वारा येतां सन्मानिले राये । परि येक संशय चित्ती असे ॥६३॥
कैसे होईल कार्य ? हे तो दिसे सोंग । बहुत उद्वेग मनी वाटे ॥६४॥
चांगदेवे मनी केलेसे दृढाते । ह्मणे अघटित करणी करुं ॥६५॥
आधारीची विभूत घेतली ते काळी । आपुली मंडळी प्रोक्षियली ॥६६॥
प्रोक्षितां विभूति द्विधा रुप दिसे । ज्याचे तया दिसे दर्शन ॥६७॥
हिंदूसि दिसती ब्राह्मण हे थोर । पीर पैगंबर यवनदृष्टी ॥६८॥
एक रुप द्विधा भासतसे तेथे । राजा दोही हाते नमितसे ॥६९॥
राजा म्हणे माझे असे हे दैवत । ब्राह्मण म्हणत कोण यासि ॥७०॥
म्हणे चांगदेव आह्मी हरीचे दास । तुझिया कार्यास सांगे आता ॥७१॥
ऐकूनि राजा बोले तयांप्रति । माझी हे विनंति परिसावी ॥७२॥
मरण पावली माझी ज्येष्ठ पत्नी । सजीव करुन उठवावे तीसि ॥७३॥
विभूति मंत्रूनि दिधली राजाकरी । ह्मणे झडकरी लावी तीसि ॥७४॥
विभूति घेऊनि गेला मंदिरांत । पुढे हा वृत्तांत कैसा झाला ॥७५॥
लाविली विभूती तियेचे कपाळी । तंव तिने आरोळी दिधलीसे ॥७६॥
हांक मारुनिया उठलीसे बळे । केशाते मोकळे डोलतसे ॥७७॥
देखोनिया राजा झालासे घाबरा । पूर्ण समाचारा पुसतसे ॥७८॥
तंव तियेप्रति नसे देहभान । रांजियाचे मन चिंतावले ॥७९॥
येऊनिया चांगयासि सांगे वर्तमान । फिरुनि आला प्राण परि भ्रम देही ॥८०॥
फिरुनिया दुजी विभूति दिधली । ह्मणती ऐसी बोली बोल तिशी ॥८१॥
तुझे जे मनी असेल इच्छित । पुरवीन आर्त भाक माझी ॥८२॥
ऐसे बोलूनि लावावी विभूति । तुमच्या कार्यासि सिध्दि पावे ॥८३॥
विभूति आणूनि पुन्हा लावियेली । भाषाही दिधली तयेप्रति ॥८४॥
तुझे जे मनीची आहे अपेक्षा । पुरवीन इच्छा सर्व जाण ॥८५॥
ऐकूनि वचन बोले राजपत्नी । जेही मज प्रयत्नी फिरविले ॥८६॥
तयांची ते आज्ञा करा तुम्ही मान्य । झाले देहभान स्वस्थ माझे ॥८७॥
ऐकूनि रायाचे वचन केले मान्य । झाले देहभान यथास्थित ॥८८॥
राजा विचारित वर्तमान पूर्व । दिले प्रत्युत्तर यथास्थित ॥८९॥
संतोषला राजा, आलासे बाहेरि । सर्व समाचार सांगितला ॥९०॥
रत्ने मुक्ताभरणे पुढे ठेवी द्रव्य । देखूनि चांगदेव बोलताती ॥९१॥
आम्हा इच्छा नसे तुमच्या द्रव्याची । ऐकावी आमुची गोष्ट तुम्ही ॥९२॥
पुरातन स्थळ आमुचे पंढरपुर । मोडून महाद्वार मशीद केली ॥९३॥
मोडून मशीद देऊळ स्थापावे । पहिले होते बरवे जैसे तैसे ॥९४॥
ऐसे करावे पत्रासि लेखन । देऊनिया आज्ञा लेखकासि ॥९५॥
ऐकूनिया राजा बोलावी लेखका । कोर्‍या पत्री देखा मुद्रा केली ॥९६॥
ह्मणे पत्र लिहा जैशी यांची आज्ञा । दिलीसे राजाज्ञा हेचि तुम्हा ॥९७॥
घेऊनि राजाज्ञा पत्र सिध्द केले । पत्रांत लिहिले शपथेसि ॥९८॥
पुढे कोणी यवन येऊनि पंढरी । उपद्रव न करी ऐसे केले ॥९९॥
घेऊनि पत्र राजाज्ञा घेतली । कांही कळा केली अकळ ते ॥१००॥
बेलदार सात शते सवे घेती । विभूति लाविती सर्वाप्रति ॥१॥
विहंगमगाति साधूनि चालिले । पंढरी पावले माध्यान्हकाळी ॥२॥
मोडूनि मशीद केले महाद्वार । चांगावटेश्वर बोलताती ॥३॥
आज व्रत असे कार्तिकी दशमी । मूर्ति सिंहासनी स्थापवया ॥४॥
ऐकूनि ब्राह्मणवचन वंदिती ।मूर्ति स्थापिताती चांगदेव ॥५॥
दशमी स्थापन केले चांगयाने । एकादशी दिन उगवला ॥६॥
पांडुरंगे आज्ञा दिली चांगयासि । कार्तिकी यात्रेसि दिले तुह्मा ॥७॥
कीर्तन करावे तुम्ही एकादशी । करावी द्वादशी अन्नशांति ॥८॥
चांगदेवे ऐशा वरासि घेतले । शिष्य बोलविले उभयतां ॥९॥
आपण आसनी स्वस्थ बसताती । कीर्तन करिती निरंतर ॥११०॥
भातलवंडे करिती बरवी अन्नशांति । ऐशी हे पध्दति स्थापियेली ॥११॥
मरुद्गण गुरु शिष्य उभयतां । संगम स्थापिता त्रिवेणीचा ॥१२॥
स्वर्गी मरुद्गण तोचि भागीरथी । कीर्तनी सरस्वती निरंतर ॥१३॥
भातलवंडे यमुना करिती अन्नशांति । ऐशी ही पध्दति त्रिवेणीची ॥१४॥
राउळाची पोंवळी सर्व करुनियां सिध्द । केलीसे प्रसिध्द कार्तिकी ॥१५॥
कार्तिकी पौर्णिमा केली पंढरीसि । मग समाधीसि पुसती आज्ञा ॥१६॥
मस्तक ठेविला विठ्ठलचरणी । सजळ नयन स्रवताती ॥१७॥
शरीरी रोमांच कंठ सद्गदित । देखूनि पंढरिनाथ बोलियेले ॥१८॥
ऐक चांगदेवा माझिया वचना । होय सर्व जनां उपकार ॥१९॥
षडाक्षरी मंत्राचा न करावा लोप । बहुत साक्षेप ईचा करी ॥१२०॥
पुत्रासि उपदेश करी परंपरा । ते परोपकार्या करितील ॥२१॥
मृत्युसंजीवनी नोहे याउपरी । संबंध दुरित्वाचे हस्ते ॥२२॥
मंत्राचे पुरश्चरणे करावी विभूति । लावितां प्रचिती सत्य घडे ॥२३॥
दुसरे वरदान तूं ऐक माझे । जेणे होय चित्त स्वस्थ ॥२४॥
आषाढ मासीची शुध्द एकादशी । तुझे समाधीस वंदीन मी ॥२५॥
पुण्यस्तंभी महिमा घडे पंढरीचा । बोलतों त्रिवाचा भाक माझी ॥२६॥
दिंडी दशमीसि कीर्तन एकादशी । खिरापत द्वादशी करीन तेथे ॥२७॥
ऐसे वरदान दिधले तुजशी । आपुले स्थळासि जावे आतां ॥२८॥
ऐसा निरोप देवाचा घेतला । रुक्मिणीस केला नमस्कार ॥२९॥
राधा सत्यभामा समस्तां वंदिले । राउळांतूनि आले चंद्रभागे ॥१३०॥
चंद्रभागे आणि पुंडलिका नमिले । सकळ संता केले दंडवत ॥३१॥
घेऊनि क्षेत्रा सव्य तेथूनि चालिले । बोळवीत आले पंढरिराव ॥३२॥
उतरुनि भीमा उत्तरतीरा आले । पांडुरंगा गेले राउळांत ॥३३॥
आले चांगदेव आपुल्या स्वस्थाना । विठ्ठलवरदाना घेऊनियां ॥३४॥
लाधलेती वरा आषाढी, कार्तिकी, । येऊनि सर्वासि भेटलेती ॥३५॥
ज्येष्ठ पुत्रा केला अनुग्रह मंत्राचा । हवाला कनिष्ठाचा दिधला त्यासि ॥३६॥
पुढे तुम्ही यासि करा उपदेश । सर्व पध्दतीस सांगूनिया ॥३७॥
पांडुरंगाचरणी ठेवा दृढ भाव । चालवील सर्व विठ्ठल हा ॥३८॥
केशवराजाची सेवा ही करणे, । देव तो जाणणे आपुले वंशी ॥३९॥
ऐसे व्रत पुत्रासि सांगूनि । मुहूर्त समाधीसि विचारिले ॥१४०॥
शके बाराशे ( १२०० ) असती सत्तावीस । संवत्सरनाम क्रोधन असे ॥४१॥
ज्येष्ठ शुध्द सप्तमी रविवार असे । नक्षत्र पुष्य योग सिध्दि असे ॥४२॥
भानुसप्तमीचे पर्व थोर असे । चालिले समाधीसि ग्रामांतूनि ॥४३॥
केशवराजासि केला नमस्कार । समारंभ सर्व संगे घेती ॥४४॥
दिंडी, पताका मृदंग टाळ विणे । करित कीर्तन चालिलेती ॥४५॥
वाजताति वाद्ये, होतसे गजर । समारंभे थोर चालिलेती ॥४६॥
याज्ञिक, वैदिक अग्निहोत्री पंडित । कीर्तन करिती हरिदास ॥४७॥
सर्वही मंडळीसहित निघती । ग्रामांतूनि जाती सोमतीर्था ॥४८॥
नमूनि सोमनाथा गौतमी नमिली । दंडवत केले सर्वजनां ॥४९॥
देखूनि सर्वानी नमिले चांगदेवा । म्हणती असो द्यावा लोभ आता ॥१५०॥
अश्वात्थातळवटी पद्मासन घातले । चांगदेवे केले प्राणायाम ॥५१॥
पांडूरंगमूर्ति आणूनि ध्यानासि । आत्मा ब्रह्मांडासि नेते झाले ॥५२॥
लागलीसे टाळी झाले समाधिस्थ । विठ्ठलनामाचा घोष करिती सर्व ॥५३॥
चांगावटेश्वर झाले समाधिस्त । जगी हे विख्यात कीर्ति झाली ॥५४॥
नित्योत्सव आणि दिंडी जागरण । पुराणपठण होत असे ॥५५॥
आषाढीची यात्रा भरे प्रतिवर्षी । जैसा पंढरीसि समारंभ ॥५६॥
समाधि घेतल्या झाली वर्षे बारा । समाचार बरवा पुढे ऐका ॥५७॥
चांगयाचा पुत्र कनिष्ठ विठ्ठल असे । विनवी बंधूसि ते काळी ॥५८॥
उपदेश सांगा विद्या षडाक्षरी । पध्दति बरवी दाखवावी ॥५९॥
ऐकूनिया वचन कनिष्ठाचे । बोलतसे वाचे प्रत्युत्तर ॥१६०॥
नाही स्नानसंध्या सत्कर्म करणे । उपदेश जाण न करी मी ॥६१॥
बहुत छळणा केली विठ्ठलाची । उदासीन त्याची वृत्ति झाली ॥६२॥
सर्वही त्यजूनि बैसलासे स्वस्थ । जेथे समाधीस तीर्थरुप ॥६३॥
ऐसे तीन रात्र केलेसे निदान । तंव त्यासि दर्शन झाले तेथे ॥६४॥
चांगदेव उभे हाती वेत कुंचा । तुझिये मनीचा हेत सांग ॥६५॥
देखूनियां केले साष्टांग नमन । उपदेश करणे म्हणे मज ॥६६॥
ग्रामांत येऊनि उपदेश करणे । पुनरपि होणे समाधिस्त ॥६७॥
अवश्य ह्मणूनि बालिले स्वामी । सूर्योदयी दशमी दुसरे दिवशी ॥६८॥
दिंडी घेऊनियां गेले देउळासि । तंव चांगयासि देखियेले ॥६९॥
बारा वरुषां झाले पुन्हां दर्शन । करिती नमन सर्व लोक ॥१७०॥
दिंडीसमागमे आलेती गृहासि । अनुग्रह विठ्ठलासि केला नाही ॥७१॥
ज्येष्ठ पुत्रावरे बहुत क्रोध केला । ह्मणती बाळकाला छळियेले ॥७२॥
तुझा हा निर्वश होईल पुढे जाण । शाप दारुण देते झाले ॥१७३॥
म्हणती विठ्ठलासि घेई वरदान । वंशी अवतरण करीन मी ॥१७४॥
तुझे वंशी षष्ठपुरुषपर्यत । चालेल हे व्रत सर्व माझे ॥१७५॥
सातवे पुरुषी लोपेल हे व्रत । ऐसे हे भासत ज्ञानी मज ॥१७६॥
समाधि अश्वत्थ होतील समाप्त । कार्तिकीची यात्रा न करी कोणी ॥१७७॥
केशवराजाचे न करिती पूजन । समाधि छिन्नभिन्न होईल माझी ॥१७८॥
याउपरी ऐक साचार । सर्व जीर्णोध्दार करीन मी ॥१७९॥
पुढती गजरे घेईन अवतार । सर्व जीर्णोध्दार करावया ॥१८०॥
ऐसा हा वर देऊनि विठ्ठलासि । पुन्हा समाधीसि स्वीकारिले ॥१८१॥
विठ्ठलासि पुत्र एक झाला असे । चांगया नामस ठेवियले ॥१८२॥
चांगयाचा पुत्र पिलोबा गोसावी । संतति बरवी जाली त्यासि ॥१८३॥
नरहरि गोसावी म्हणती तयाच्या पुत्रा । वंशपरंपरा पुढे ऐका ॥१८४॥
जनार्दन पुत्र जाला नरहरीसि । पुढे झाले पुत्र त्यासि सप्त ॥१८५॥
तयांमध्ये एक मुधेश नामक । त्यासि झाले पुत्र पांच देख ॥१८६॥
पांचामध्ये श्रेष्ठ पुत्र हा गोपाळ । असे पुण्यशीळ थोर भाग्य ॥१८७॥
जीर्णोध्दारालागी तयाचे उदरी । पुढती गजरी अवतरलेती ॥१८८॥
नाम ज्यासि म्हणती काणेर गोसावी । ऐसी हे पदवी दिधली देवे ॥१८९॥
सर्व व्रत चांगायाचे जीर्णोध्दार । केलासे सर्व जेणे देखा ॥१९०॥
समाधि सिध्द केली अश्वत्थ लाविले । वृक्ष आरोपिले देवालयी ॥१९१॥
देवालये केले सिध्द चांगायाचे । व्रत हें दिंडीचे चालविले ॥१९२॥
कार्तिकीची यात्रा करिती प्रसिध्द । म्हणती हा सिध्द अवतरला ॥१९३॥
केशवराजाचे पूर्व अनुसंधान । सर्व जीर्णोध्दार केला असे ॥१९४॥
विठ्ठली विश्वास दृढ असे ज्याचा । पुढती चांगयाचा अवतार हा ॥१९५॥
श्याम मरुद्गण पुत्र हा त्याचा ।दास हा संताचा, रंक असे ॥१९६॥
चांगदेवे केला स्वप्नी चमत्कार । चरित्र हे सर्व वदविले ॥१९७॥
चांगयाची आदि करिता श्रवण । संतांच्या चरित्रा ऐकता ॥१९८॥
धर्मार्थ काम, मोक्ष, घडे चवथा । संतांच्या चरित्रा ऐकता ॥१९९॥
संतांचे चरित्र करितां श्रवण । मनोरथ पूर्ण होतील ते ॥२००॥
शामजी गोसावी वदत चरित्र । भावें शरणागत संतांपायी ॥२०१॥
शके सोळाशे असती सदुसष्ट । संवत्सर स्पष्ट क्रोधन असे ॥२०२॥
अश्विन शुध्द विजयादशमीस । ग्रंथ समाप्तीस झाला असे ॥२०३॥
चांगदेवे पूर्ण कृपा करोनिया । वदविले स्वचरित्रासि ॥२०४॥
ओवीमध्ये न्यून पूर्ण ते करणे । संतांचे चरण वंदितसे ॥२०५॥
शामजी गोसावी चरित्र वदत । भावे शरणांगत संतांपायी. ॥२०६॥
इति श्रीचांगदेवप्रकरणे सप्तमोsध्याय:
समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 06, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP