मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|

बृहत्संहिता - अध्याय ५

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


॥ अथ राहुचार: ॥

सैहिंकेय दैत्याचे शिर भगवंताने छेदन केले; ते अमृतभक्षणाच्या योगाने जिवंत राहून ग्रह झाले. तो राहु असे कोणी म्हणतात ॥१॥

तोराहु चंद्रसूर्यबिंबासारख्या आकृतीचा आहे; परंतु ब्रम्हादेवाच्या वरप्रदानास्तव पर्वकाला (ग्रहणा) वाचून कृष्णवर्णास्तव आकाशामध्ये द्दष्टिगोचर होत नाही ॥२॥

मुख व पुच्छ या दोनच अवयवांनी विभक्त असा राहु आहे असे कोणी म्हणतात. सर्पाकार राहू आहे असे अन्य म्हणतात. कोणी देहरहित अंधकाररूप राहु आहे असे म्हणतात ॥३॥

जर राहू मूर्तिमान (देहधारी) नक्षत्री गमन करणारा, मस्तकरूप, मंदलवान, असा आहे तर निश्चित (३१।११) अशी एकच गति होऊन सहा राशींनी अंतर असता, चंद्रसूर्याचे ग्रहण कसे करितो ॥४॥

जर हा राहु अनियमितगति केत्वादिकांसारखा आहे तर त्याची गणिताने उपलब्धि (प्राप्ति) कशी होईल. (या राशीस राहु आहे असे कसे समजेल !) पुच्छ व मुख असा विभक्तावयव आहे तर जसा सहाराशींच्या अंतराने सूर्यचंद्रांचे ग्रहण करतो, तसा एक दोन इत्यादि राश्यंतराने का ग्रहण करीत नाही ॥५॥

आता जर सर्पाकार राहु आहे. व तो पुच्छाने व मुखाने राशिषटकांतरित सूर्यचंद्रांचे ग्रहण करितो. तर मधील ६ राशीस चंद्रसूर्य असता, का आच्छादन करीत नाही ॥६॥

एक नियमित गति व दुसरा अनियमित गति असे दोन राहु जर असतील तर, चंद्राच्या ग्रस्तोदयी किंवा ग्रस्तास्ती ग्रासणार्‍या राहूच्या बरोबर आहे गति ज्याची,  अशा दुसर्‍या राहूचे षडराश्यंतरितास्तव सूर्यासहि ग्रहण लागलेले दिसेल. तसे दिसत नाहीं. तेव्हा दोन राहू नाहीत ॥७॥

(जर राहूच सूर्यचंद्राचे ग्रहण करतो तर चंद्रास प्रथम ग्रहण लागने नंतर सुर्यास ग्रहण लागते. हे एक राहु असून कसे होते. त्याविषयी सांगतात.) चंद्र आपल्या ग्रहणी भूछायेप्रति प्रवेश करितो. वर सूर्यग्रहणी सूर्याप्रति प्रवेश करितो. भूछाया सूर्यापासून सप्तमराशीस असत्ये व पौर्णिमेस चंद्रही तेथेच असतो. म्हणून तो चंद्र शीघ्रगतित्वास्तव पूर्वाभिमुख भूछायेत प्रवेश करितो. यास्तव त्याचे ग्रहण पूर्वार्धाकडून होते. सूर्यग्रहणी सूर्यचंद्र एकराशिस्थ होतात. तेथे चंद्र शीघ्रगतित्वास्तव पश्चिमेकडून य़ेऊन अमावास्थांती सूर्यमंडलाप्रति प्रवेश करितो. यास्तव अध:स्थचंद्र, सूर्याचे आच्छादन करितो. या कारणास्तव चंद्राचे ग्रहण पश्चिमार्धाकडून होत नाही. व सूर्याचे ग्रहण पूर्वार्धाकडून होत नाही ॥८॥

जशी वृक्षाची छाया एक बाजूस होते व दीर्घ (लांब) ही होते. तशी रात्रिरात्रीच्याठाई (प्रत्येक रात्रीस) सूर्याच्या आच्छादनाने भूमीची छाया पार्श्वभागी (एका अंगास) होते, असे आहे तर प्रतिमासास चंद्रग्रहण का होत नाही. या शंकेचे निवारण पुढे आहे ॥९॥

जेव्हा चंद्र सूर्यापासून सप्तमराशिस्थित होऊन भूछायेत उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून येतो. तेव्हा पूर्वाभिमुख जात असता, भूछायेप्रति प्रवेश करितो (यास्तव दिसेनासा होतोअ ते चंद्रग्रहण) ॥१०॥

सूर्याच्या खाली राहाणारा चंद्र पश्चिमेकडून येऊन, अभ्रासारखा सूर्याते आच्छादितो. यास्तव देशोदेशात ते सूर्यग्रहण द्दष्टिवशास्तव (पाहण्यास) नानाप्रकारचे (कोठे सर्वग्रास, कोठे अर्धग्रास, कोठे ग्रास नाही) असे दिसते ॥११॥

चंद्रास मोठे आच्छादन होते, यास्तव अर्धग्रस्त चंद्र कुंठविषाण (भग्नशृंग) होतो. सूर्यास स्वल्प आच्छादन होते. यास्तव अर्धग्रस्त सूर्य तीक्ष्णविषाण होतो ॥१२॥

या पूर्वोक्त प्रकारे ज्ञानसंयुक्त द्दष्टि आचार्यांनी ग्रहणाचे कारण सांगितले. या ग्रहणाविषयी राहुकारण असा शास्त्रसद्भाव (परमार्थ) सांगितला ॥ (त्याप्रमाणे पुढील श्लोकात सांगतात) ॥१३॥

जो हा सैंहिके यनामक राहु त्यास ब्रम्हादेवाने, ग्रहणामध्ये जे दान दिले किंवा अग्नीत हवन केले त्याच्या भागाने तुझे आप्यायन (पुष्टता) होईल हा वर दिला ॥१४॥

यास्तव ग्रहणकाली राहूचे सान्निध्य होते. यावरून राहु ग्रासतो असा व्यवहार होतो. गणितामध्ये दक्षिणोत्तर चंद्रगति पातवशास्त्रव होते. त्या चंद्रपातासच राहु असे म्हणतात. (चंद्रविक्षेपाच्या ज्ञानार्थ चंद्रपात कल्पिला आहे. त्यासच राहु असे लोकांमध्ये म्हणतात) ॥१५॥

उत्पातरूप निमित्तांनी ग्रहणाचे कधीही ज्ञान होणार नाही. कारण ते उत्पात अन्यकाली (गणितावाचूनही) होतात. (यास्तव गर्गादिकांनी उत्पातांमध्ये ग्रहणाची गणना केली ते योग्य नव्हे) ॥१६॥

अमावास्या पौर्णिमा यास जर पंच ग्रहांचा योग असेल तर ग्रहण होत नाही व अष्टमीस पात्रात जल घालून त्यात तेल घातले असता, ज्या दिशेकडे जाणार नाही तिकडे ग्रहण होईल. इत्यादि जे वृद्ध गर्गादि विद्वांनाचे मत, त्याचाही विचार करू नये ॥१७॥

नतीने (स्पष्ट विक्षेपाने) सूर्यग्रहणी ग्रास जाणावा व वलन आणि नति यांवरून दिशा जाणावी. तिथिसमाप्तीवरून ग्रहणाची वेळ जाणावी. ती सर्व कारणे मी (पंचसित्धांतिकेमध्ये) सांगितली ॥१८॥

(आता पर्वेश सांगावयाचे ते आणण्याचा अन्यग्रंथांतील सुलभ प्रकार प्रथम सांगतो. शक १२ नी गुणून त्यात चैत्रादि मास मिळवून ४२ सानी भागावे जे लब्ध तो भगण होतो. व जे शेष राहिल ते ७ नी भागावे म्ह. पर्वेश येतात. त्यांचा अनुक्रम पुढील श्लोकाप्रमाणे जाणावा) ॥

कल्पापासून आरंभ करून सहा सहा महिन्यांचे ब्रम्हादि सात देवता अनुक्रमाने पर्वेश होतात. ते - ब्रम्हा १ चंद्र २ इंद्र ३ कुबेर ४ वरुण ५ अग्नि ६ यम ७ हे जाणावे ॥१९॥

ब्रम्हा पर्वेश असता ब्राम्हाण व पशु यांची वृद्धि, क्षेम (लब्धपालन) आरोग्य व धान्य, संपत्ति ही होतात. चंद्र असता पूर्वोक्त सर्व व विद्वानांस पीडा व अवर्षण ही होतात ॥२०॥

इंद्र पर्वेश असता, राजांचे वैर व शरदऋतूत उत्पन्न होणार्‍या धान्याचा नाश, लोकांचे अकल्याण होते ॥
कुबेर असता, धनवानांच्या धनाचा नाश व सुभिक्ष होते ॥२१॥

वारुणपर्व, राजांस अशुभकर होय. अन्यांस क्षेमकरणारे व धान्यवृद्धि करणारे होय. आग्नेयपर्व त्यासच मित्रनाम होय ते पर्व असता धान्य, आरोग्य, अभय व उदक याचे करणारे होय ॥२२॥

याम्यपर्व अनावृष्टि, दुर्भिक्ष व धान्यांचा नाश करितो. या पर्वाहून पुढे जे पर्व कदाचित होते ते अशुभ, दुर्भिक्ष, मृत्यु, अवर्षण करणारे होय ॥२३॥

गणितागतवेळेच्या पूर्वी जर ग्रहण लागेल तर गर्भनाश व शस्त्रभय होईल. गणितागतवेळेच्या पुढे ग्रहण होईल तर पुष्पे, फले यांचा नाश, लोकांस भय व धान्यनाश होईल ॥२४॥

गणितागतकालाच्या मागे पुढे ग्रहण झाल्याचे फल जे मी सांगितले, ते पूर्व गर्गादिकांच्या ग्रंथांवरून सांगितले. स्वमताने सांगितले नाही. कारण चांगले गणित जाणणाराने सांगितलेला काल कधीही फिरणार नाही ॥२५॥

एक महिन्यात सूर्यचंद्राची ग्रहणे होतील तर राजे आपल्या सैन्याच्या क्षोभाने नाशाप्रत पावतील व बहुत युद्धेही होतील ॥२६॥

ग्रस्तोदित व ग्रस्तास्तमित चंद्र शारदीय ध्यान्याचा नाश करितो. तसाच सूर्य राजांचा नाश करितो. सर्वग्रस्त चंद्र, सूर्य, पापग्रहद्दष्ट असता, दुर्भिक्ष व मृत्यु करणारे होत ॥२७॥

चंद्र, सूर्य अर्धोदित असता ग्रहण लागेल तर निषादजातीचे लोकांचा व संपूर्ण यज्ञांचा नाश होईल. आकाशाच्या प्रथम सप्तमांशी ग्रहण लागेल किंवा सप्तमांशाच्या मध्येच लागेल तर सुवर्णकारादिक अग्नीवर जीविका करणारांचा व गुणवानांचा व ब्राम्हाणांचा व चतुर्थाश्रमी (संन्यासी) यांचा नाश होतो ॥२८॥

द्वितीय आकाशांशी ग्रहण झाले असता शेती लोक, नास्तिक, व्यापारी, राजे व सेनापति यांचा नाश होतो. तृतीय आकाशभागी ग्र. झाले अ. शिल्पी, शूद्र, म्लेच्छ व प्रधानमंडळी यांचा नाश होतो ॥२९॥

मध्यान्ही (चतुर्थखांशी) ग्र. असता राजांचा व मध्यदेशाचा नाश व समर्घ धान्य होते. पंचम आकाशांशी तृणभक्षक, प्रधान, राजस्त्रिया व वैश्यजातीय यांचा नाश होतो. अस्तमानकाळी (सप्तमखांशी) ग्रहण झाले असता, चोर व अरण्यवासी लोक यांचा नाश होतो. ज्या आकाशभागी मोक्ष होईल, त्याच आकाशभागी ग्रहण स्पर्स झाला असेल तर तत्संबंधी सांगितलेली अशुभफले शुभ होत ॥३०॥

दिनमानाचे सात भाग करावे. तेच आकाशाचे भाग समजावे ॥३१॥

उत्तरायणी ग्रहण झाले असता, ब्राम्हाण व क्षत्रिय यांचा नाश होतो. दक्षिणायनी ग्रहण झाले असता वैश्य व शूद्र यांचा नाश होतो. ग्रहणाचा स्पर्श उत्तरेस झाला तर ब्राम्हाणांचा, पूर्वेस झाला तर क्षत्रियांचा, दक्षिणेस झाला तर वैश्यांचा व पश्चिमेस झाला तर शूद्रांचा नाश होतो ॥३२॥

ईशानी, आग्नेय, निऋति व वायव्य या विदिशांस ग्रहण झाले तर, म्लेच्छजाती यांचा, मार्गस्थांचा व अग्निहोत्र्यांचा नाश होतो. (पुन: दक्षिणेचे व उत्तरेचे फल) दक्षिणेस स्पर्श झाला तर, जलचरांचा व गजांचा नाश. उत्तरेस झाला तर, गाईंचा नाश होतो ३३ (पुन:  पूर्व व पश्चिमेचे फल) पूर्वेकडून स्पर्श झाला तर, उदकाणे पूर्ण पृथ्वी होईल (बहुत जलवृष्टि होईल.) पश्चिमेकडून झाला तर शेती लोक, सेवक व बीज यांचा नाश होईल ॥३४॥

मेषराशिस्थित चंद्र सूर्य असता ग्रहण होईल तर, पांचाल, कलिंग, शूरसेन, कांबोज, उड्र, किरात या देशांत राहणारे लोकांस व शस्त्रजीवी (शूर); सुवर्णकार, लोहकार इत्यादि अग्निजीवी यांस पीडा होते ॥३५॥

वृषभराशिस्थित चंद्र सूर्य असता, ग्रहण होईल तर, गोरक्षक, पशु गाई बाळगणारे, व श्रेष्ठ (पूज्य) मनुष्य यास पीडा होते ॥३६॥

मिथुनराशिस्थित चंद्र सूर्य असता, ग्रहण होईल तर, मुख्यस्त्रिया, राजे, नृपसद्दश (प्रधान) बलिष्ठ प्राणी, कलाविद (चित्रे, नृत्य, गयन, व वाद्ये यांचे जाणणारे;) यमुनातीरस्थ लोक, बाल्हिक, मत्स्य, सुहम या देशांतील लोक या सर्वांस पीडा होते ॥३७॥

कर्कस्थित चंद्र सूर्य असता, ग्रहण झाले तर आभीर (गवळीलोक,) शबर (भिल्ल,) पल्हाव (परसियन लोक,) मल्ल (बाहुयुद्ध करणारे,) मत्स्य, कुरु व शक व पांचाल या देशांतील लोक, अंगहीन (विकलांग,) यास पीडा होते व धान्यनाशही होतो ॥३८॥

सिंहस्थित चंद्र सूर्य असता, ग्रहण झाले तर म्लेच्छसमुदाय, मेकलपर्वतस्थ लोक, प्रधान, राजतुल्य, राजे, अरण्यवासी, यांचा नाश होतो. कन्यास्थित चंद्र सूर्य असता, ग्र. तर धान्य, कवि, लेखक, गायक, अश्मक लोक, त्रिपुरनगरामध्ये राहाणारे लोक, बहुतधान्ययुक्त देश, यांचा नाश होतो ॥३९॥

तुलस्थित चंद्र सूर्य असता ग्र. तर, अंवति (उज्जनी,) अपरांत्य, या देशांतील लोक, साधु, व्यापारी, दशार्ण व भरूकच्छप (भरोच्छ) या देशांतील लोक; यांचा नाश होतो. वृश्चिकस्थित चंद्र सूर्य असता ग्र. तर, उदुंबर, मद्र, चोल या देशांतील लोक; वृक्ष, युद्ध करणारे लोक, विषायुधलोक यांचा नाश होतो ॥४०॥

धनराशीस चंद्र सूर्य असता ग्रहण झाले तर अमात्यश्रेष्ठ, अश्व, विदेह (जनकराजाची मिथिलानगरी) यातील लोक, मल्ल, पांचालदेशस्थ लोक, वैद्य, व्यापारी, क्रूर आयुध जाणणारे यांचा नाश होतो. मकरराशीस चंद्र सूर्य असता ग्र. तर मत्स्य, प्रधान कुले, निंद्यकर्म करणारे, मंत्र व औषधांमध्ये कुशल, वृद्ध, शस्त्रजीवी यांचा नाश होतो ॥४१॥

कुंभस्थित चंद्र सूर्य असता ग्र. तर पर्वतांमधील लोक, पश्चिम दिशेकडचे लोक, ओझी बाहणारे लोक चोर, गवळी, विष देणारे, श्रेष्ठजन, सिंहपुरस्थ लोक, बर्बर (म्लेच्छ्देश) यात रहाणारे लोक या सर्वांचा नाश होतो. मीनस्थ चंद्र सूर्य असता ग्र. तर समुद्रतीरस्थ लोक, समुद्राच्या पाण्याने उत्पन्न झालेली रन्ते (पोवळी, मोते इ.,) पूज्य लोक, बुद्धिमान लोक, पाण्याच्या व्यापाराने वांचणारे यांचा नाश होतो. ही सर्व नक्षत्रराशिफले कूर्मविभाग फलांवरून पाहून सांगावी ॥४२॥

सव्य, अपसव्य, लेह, ग्रसन, निरोध, अवमर्दन, आरोह, आघ्रात, मध्यतम, तमोत्य, असे दहाप्रकारचे ग्रास आहेत ॥४३॥

सूर्य चंद्रांच्या ग्रहणांचे सव्य भ्रमण झाले असता, पृथ्वीवर जलवृष्टि बहुत लोईल. व सर्व जगत आनंदित व भयरहित होईल. अपसव्य भ्रमण झले असता राजे व चोर यांच्या पीडेने लोकांचा नाश होईल ॥४४॥

चंद्र किंवा सूर्य यांचे बिंब आसमंताद्भागी जिव्हेने चाटल्यासारखे दिसते त्यास लेहसंज्ञक ग्रास असे म्हणतात. तसा ग्रास झाला असता, आनंदित सर्व लोक व बहुत उदक यांनी पृथ्वी युक्त होते ॥४५॥

अर्धग्रास किंवा तृतीयांश ग्रास किंवा चतुर्थांश ग्रास जेव्हा होतो, तेव्हा त्यास ग्रसन असे म्हणावे. ते झाले असता, बहुत द्रव्ययुक्त राजांच्या द्रव्याचा नाश व सधन देशांचा नाश होतो ॥४६॥

राहु, सूर्यचंद्रांची बिंबे आसमंताद्भागी (सर्व) ग्रासून मध्ये पिंडीकृत राहील ते ग्रहण निरोधसंज्ञक होय. तसे झाले तर सर्व प्राणिमात्रांस आनंद होईल ॥४७॥

चंद्र्सूर्यांचे बिंब सर्व ग्रासून, बहुत वेळ राहुराहील तर, तो अवमर्दनसंज्ञक ग्रास होतो. तो झाला तर मुख्य देश व मुख्य राजे यांचा नाश होतो ॥४८॥

ग्रहणकाली ग्रहण लागून सुटले; नंतर पुन: लागलेले दिसेल तर, तो आरोहण संज्ञक ग्रास होय. तो झाला तर परस्पर युद्धांनी राजांस भय करणारा होय ॥४९॥

चंद्रसूर्यांचे बिंब उष्ण नि:श्वास वायूने उपहत (ताडित) होत्साते आरशासारखे दिसते. ते आघ्रातसंज्ञक ग्रसन होय. ते झाले तर देशांमध्ये सुभिक्ष व वृद्धि करणारे होय ॥५०॥

राहु जर चंद्र सूर्यांच्या बिंबामध्ये प्रवेश करील आणि सभोवते बिंब स्वच्छ दिसेल तर, मध्यतमसंज्ञक ग्रास होतो. त्या ग्रासी मध्यदेशाचा नाश होतो व कुक्षिरोगाची भय होते ॥५१॥

चंद्रसूर्यबिंबांच्या परिध्यंतभागी (सभोवती) फार काळे व मध्यभागी अल्पकाळे ग्रहण दिसेल तर तो तमोत्यनामक ग्रास होतो. तो झाला असता, धान्याला टोळ इत्यादिकांचे भय व चोरभय होते ॥५२॥

रहु (ग्रहण) शुभ्रवर्ण दिसेल तर क्षेम, सुभिक्ष, ब्राम्हाणांस पीडा होईल. अग्निवर्ण ग्रहण असेल तर अग्निभय, सुवर्णकारादिकांस पीडा होते. ॥५३॥

हरितवर्ण (पोपटी) दिसेल तर बहुत रोग, धान्यांचा टोळ इत्यादिकांनी नाश होईल. कपिलवर्ण असता शीघ्रगमन करणारे प्राणी (उष्ट्रादि) यांचा व म्लेच्छ यांचा नाश व दुर्भिक्ष होते ॥५४॥

स्वल्पलोहितवर्ण राहु असता दुर्भिक्ष, अवृष्टि व पक्ष्यांस पीडा होते. धूम्रवर्ण राहु असता क्षेम, सुभिक्ष व स्वल्पवृष्टि होते ॥५५॥

कपोतवर्ण, अरुणम  मिश्रवर्ण, श्यामकांति राहु असता दुर्भिक्षभय होते. कपोतवर्ण व कृष्णवर्ण राहु असता, शूद्रास पीडा होते ॥५६॥

नीलवर्ण राहु असता वैश्यांचा नाश व सुभिक्ष होते. ज्वालासहित राहु असता अग्निभय होते. गैरिकसद्दश तांबडा राहु असता युद्धे होतात ॥५७॥

दूर्वाकांडासारखा श्याम व पीतवर्ण राहु असता, मृत्युभय होते. पाटलिपुष्प सद्दश (श्वेतलोहित) वर्ण राहु, अशनि भय देणारा होतो ॥५८॥

पांसु (धूळ) वर्ण व मिश्रवर्ण राहु, क्षत्रिय व वृष्टि यांचा नाश करितो. बालसूर्य, कमल व इंद्रधनुष्य यांच्या सारख्या वर्णाचा राहु, शस्त्रकोप (युद्ध) कारक होतो ॥५९॥

राहुग्रस्त चंद्रसूर्याते, बुध पाहील (बुधाची द्दष्टि असेल) तर घृत, मध, तेल, व राजे यांचा नाश होईल. भौमपाहील तर युद्धे, अग्निभय व चोरभय होईल ॥६०॥

शुक्र पाहील तर धान्यनाश व भूमीवर नानाप्रकारची दु:खे होतील. शनि पाहील तर अवर्षण, दुर्भिक्ष व चोरभय होईल ॥६१॥

बुधादि द्दष्टिनी सांगितलेलेजे चंद्रसूर्य ग्रहणी किंवा मोक्षी अशुभ, ते बृहस्पतीची द्दष्टि ग्रहणी (ग्रस्तचंद्रसूर्यांवर) असेल तर, जसा प्रदीप्त अग्नि जलसिंचनाने नाहीसा होतो तसे नाहीसे होते ॥६२॥

चंद्र सूर्य यांची ग्रहणे असता, ही पुढील निमित्ते होतील तर सहा महिन्यांनी अनुक्रमाने ग्रहणे होतील. ग्रहणामध्ये वायु सुटेल तर, सहा महिन्यांनी, उल्का (तारा) पात होईल तर १२ महिन्यांनी, रज (धुरळा) होईल तर १८ महिन्यांनी, भूमिकंप होईल तर २४ महिन्यांनी, अंधकार होईल तर ३० महिन्यांनी, अशनि (वीज) पात होईल तर ३६ महिन्यांनी पुन: ग्रहण होईल असे जाणावे ॥६३॥

जो ग्रह चंद्रसूर्याबरोबर (फारच जवळ) एक राशीस असतो तो चंद्रसूर्यांचे ग्रहणाने आच्छादित होतो. तेव्हा, त्याला ग्रस्त म्हणावे. तसा भौम ग्रस्त असता, अवंतिदेशोद्भव लोक, कावेरी व नर्मदा या नद्यांच्या तीरी राहणारे लोक, व गर्वित मनुष्य पति (राजे) यास पीडा होते ॥६४॥

बुध ग्रस्त असता, गंगा व युमुना यांचे मध्यभागी राहणारांस, नेपाल, पूर्वसमुद्र, शोणनद, याप्रत राहणारे लोकांस, स्त्रिया, राजे, युद्धकुशल, बाल (प्रथमवयस्क) यांचा नाश होतो ॥६५॥

गुरू ग्रस्त असता, पंडित, राजे, प्रधान, गज, अश्व यांचा नाश व सिंधुनदीच्या तीरी राहणारे लोक व उत्तरदिशेस राहणारे यांचा नाश होतो ॥६६॥

शुक्र ग्रस्त असता कोळी लोक, केकयराजाच्या देशांतील लोक, योद्धे, सातपुडा व हिमालय या दोन पर्वतांमध्ये राहणरे लोक, शिविराजाच्या देशांतील लोक, स्त्रिया, प्रधान व समुदाय यांस पीडा होते ॥६४॥

शनि ग्रस्त असता, मरुदेशोत्पन्नलोक, पुष्करद्वीपस्थ अथवा पुष्करतीर्थस्थ लोक, काठेवाड प्रांतातील लोक, सुवर्णादि धातुपदार्थ, अर्बुदनामक पर्वतवासी लोक, कनिष्ठजातीचे लोक, पुष्कळ गाईचे धनी, पारियात्रपर्वताश्रित लोक, या सर्वांचा नाश होतो ॥६८॥

कार्तिकी पौर्णिमेस किंवा अमावास्येस ग्रहण झाले तर सुवर्णकारादि अग्निजीवी, मगधदेशस्थव प्राच्यदेशस्थ राजे, कोसलदेशस्थ लोक, कल्माष (कृष्णवर्ण लोक,)

शूरसेनदेशस्थ लोक, काशीस्थ लोक यांस दु:ख होते. प्रधान व सेवक यांहीसहित कलिंग देशाच्या राजाचा तत्काल नाश होतो व क्षत्रियांस दु:ख होते. सुभिक्षसहित कल्याणही होते ॥६९॥

मार्गशीर्षमासी चंद्रसूर्यग्रहण झाले तर काश्मीर, पुंड्र या देशांतील लोक; आरण्यपशु, अपरांतक लोक, पोमपान करणारे (दिक्षित) यांचा नाश होतो व उत्तमवृष्टि, कल्याण व सुभिक्ष होते ॥७०॥

पौषमासी ग्रहण झले तर ब्राम्हाण, क्षत्रियलोक यांस उपद्रव होतो. सैधंव, कुकुर व विदेह या देशीचे लोक नाश पावतात. अल्पवृष्टि व दुर्भिक्षयुक्त भयही होते ॥७१॥

माघमासी ग्रहण झाले तर, मातृपितृभक्त, वसिष्ठगोत्रोत्पन्न, अध्ययन व धर्म यांचा ठाई तत्पर; हत्ती, अश्व, वंग, अंग, काशी या देशी रहाणारे लोक, या सर्वांस पीडा (दु:ख) होते व शेतीलोकांच्या मनाप्रमाणे वृष्टिही होते ॥७२॥

फाल्गुनमासी ग्रहण शाले तर वंग, अश्मक, अवंत, मेकल या देशांतील लोकांस पीडा होते. नृत्य जाणणारे, धान्ये, श्रेष्ठांच्या स्त्रिय, धनुष्ये करणारे, क्षत्रिय, तपस्वी या सर्वांस पीडा होते ॥७३॥

चैत्रमासी ग्रहण झाले तर, चित्रे करणारे, लेखक, गायक, वेश्या, वेदपाठक, सुवर्णाचा विक्रय (व्यापार) करणारे; पौंड्र, उग्र, कैकय य देशांचे लोक; अश्मक लोक, या सर्वांस दु:ख होते व इंद्र कोठे कोठे वृष्टि करील ॥७४॥

वैशाखमासी ग्रहण झाले तर, कापूस, तीळ, मूग, इक्ष्वाकु, यौधेय, शक, कलिंग यादेशी रहाणारे लोक हे सर्व दु:खाने युक्त होतील; परंतु या ग्रहणी सुभिक्ष होते ॥७५॥

ज्येष्ठ महिन्यामध्ये ग्रहण झाले तर, राजे, ब्राम्हाण, राजांच्या स्त्रिया, धान्ये, वृष्टि, मोठे समुदाय, सुंदर पुरुष अथवा उत्तर दिशेस रहाणारे पुरुष, साल्वदेशस्थलोक व कोळी लोकांचा समूह यांचा नाश होतो ॥७६॥

आषाढमासी ग्रहण झाले तर जलाधार (वापीकूपादि) व त्यांचे तट (तीर,) नद्यांचे प्रवाह, फले मूले यांवर जीविका करणारे, गांधार, काश्मीर, पुलिंद, चीन या देशांतील लोक यांचा नाश होतो व क्वचित्क्वचित वृष्टि होईल ॥७७॥

श्रावणमासी ग्रहण झाले तर, काश्मीर, पुलिंद, चीन यवन, कुरुक्षेत्र, गांधार, मध्यदेश, या देशांतील लोक; कांबोज देशस्थलोक; एकशफ (गर्दभादिक) शरद्दतूंतील धान्य या सर्वांचा नाश होईल. हू पूर्वोक्त काश्मीरादिक सोडून इतर देशी बहुत धान्य व आनंदित लोकांनी पृथ्वी व्याप्त होईल ॥७८॥

भाद्रपदमासी ग्रहण झाले तर, कालिंग, वंग, मगध, सुराष्ट्र, म्लेच्छ, सुवीर, दरद, शक या देशांतील लोक; व स्त्रियांचे गर्भ यांचा नाश होतो आणि सुभिक्षही होते ॥७९॥

आश्विनमासी ग्रहण झाले तर कांबोज, चीन, यवन, या देशांतील लोक; व्रणचिकित्सक (जखमांचे वैद्य,) बाल्हीक देशांतील लोक, सिंधुनदीच्या तीरी रहाणारे लोक व आनर्त, पौंड्र, किरात या देशांतील लोक; वैद्य या सर्वांचा नाश होतो आणि बहुत सुभिक्ष होते ॥८०॥

१ दक्षिणहनु २ वामहनु ३ दक्षिणकुक्षि ४ वामकुक्षि ५ दक्षिणपायु ६ वामपायु (यांचे भेद) ७ संछर्दन ८ जरण ९ मध्यविदरण १० अंत्यविदरण या प्रकारचे दहा चंद्रसूर्यग्रहणाचे मोक्ष आहेत यांची लक्षणे व फले पुढील श्लोकापासून सांगतो. ॥८१॥

आग्नेयी दिशेस जर चंद्रग्रहणमोक्ष होईल तर, तो दक्षिणहनुभेदसंज्ञक मोक्ष होय. अशा मोक्षी धान्यनाश, मुखरोग, राजांस पीडा, ही होतात व सुवृष्टिही होते ॥८२॥

ईशानीस जर चंद्रग्रहण सुटेल तर, वामहनुभेदसंज्ञक मोक्ष होतो. त्या मोक्षी राजपुत्रांस भय होते व मुखरोग,  शस्त्रभय व सुभिक्षही होते ॥८३॥

दक्षिणभागाने चंद्रग्रहणाचा मोक्ष होईल तर दक्षिणकुक्षिभेदसंज्ञक मोक्ष होतो.  त्या मोक्षी राजपुत्रांस पीडा होते व दक्षिणदिशेस राहणार्‍या शत्रूंवर स्वारीचा उद्योग होईल ॥८४॥

उत्तरेकडे ग्रहणमोक्ष होईल तर वामकुक्षिभेदसंज्ञक मोक्ष होतो. तो झाला तर स्त्रियांचे गर्भांचा नाश होईल व धान्येही मध्यम होतील ॥८५॥

नैऋति दिशेस ग्रहणमोक्ष झाला तर, दक्षिणपायुभेद व वायव्येस झाला तर वामपायुभेद या नावांचा मोक्ष होतो. त्या दोहांच्याठाई गुहय (लिंग) यास रोग व अल्पवृष्टि होईल. वामपायु (गुद) भेदी राजस्त्रियांचा नाश होतो ॥८६॥

ग्रहणाचा पूर्वेस स्पर्श होऊन पूर्वेसच मोक्ष होईल तर तो संछर्दनसंज्ञक मोक्ष होय. तो मोक्ष लोकांस क्षेम, (कल्याण) ध्यान्य व संतोष देणारा होतो ॥८७॥

ज्या ग्रहणी पूर्वेस स्पर्श होऊन पश्चिमेस मोक्ष होतो तो जरणसंज्ञक मोक्ष होय. तो झाला तर क्षुधा (दुर्भिक्ष) व शस्त्रभय (युद्धभय) यानी दु:खित झालेले लोक कोणास शरण जातील (त्यांस कोणीही त्राता मिळणार नाही) ॥८८॥

चंद्रबिंबाच्या मध्यभागी प्रथमत: प्रकाश होईल तर तो मध्यविदरणनामक मोक्ष होतो. तसा झाला तर, राजगृहामध्ये सैन्याचा क्षोभ होतो, सुभिक्ष होते व फार वृष्टि होत नाही ॥८९॥

जर बिंबाच्या अंत्यभागी निर्मलत्व (स्वच्छ) होईल आणि मध्यभागी बहुत काळे राहील तर तो अंत्यविदारणनामक मोक्ष होतो. तो झाला असता, मध्यदेशाचा नाश होतो, व शरद्दतूंतील धान्यांचाही नाश होतो ॥९०॥

हे पूर्वोक्त सर्व दक्षिणहनुभेदादि मोक्ष, सूर्याचे ग्रहणीही समजावे; परंतु चंद्राच्या ग्रहणमोक्षी जेथे पूर्वदिशा आहे; तेथे सूर्यग्रहणमोक्षी पश्चिम कल्पावी (घ्यावी) याचप्रमाणे इतरही दिशा विपरीत घ्याव्या ॥९१॥

चंद्रसूर्यग्रहण सुटल्यावर सात दिवसांमध्ये पांशु (रज:करण) धूळीची वृष्टि होईल तर अन्ननाश (दुर्भिक्ष,) बर्फ पडेल तर रोगभय, भूमिकंप होईल तर श्रेष्ठराजास मृत्यु, उल्का (आकाशांतून तारा पडतो तो) पडेल तर प्रधानाचा नाश, नानाप्रकारच्या रंगाचे मेघ दिसतील तर बहुत भय, मेघगर्जना होतील तर गर्भनाश, वीज चमकेल तर राजे व दष्ट्री (सूकर इत्यादि) यांस पीडा, परिवेष (खळे) होईल तर रोगांपासून पीडा,  दिग्दाह (दिशेचे ठाई ज्वाळा दिसणे) झाला तर राजभय व अग्निभय, रूक्ष (कठीण) मोठा वारा सुटला तर चोरांपासून भय, निर्घात (तुफानीवार्‍याचा शब्द) व इंद्रधनुष्य व दंड (सूर्य किरण, मेघ आणि वायु यांचा संघात) यातून एकादे झाले तर दुर्भिक्ष व शत्रुभय, ग्रहांचे युद्ध झाले किंवा केतूचे (शेंडय नक्षत्राचे) दर्शन झाले तर राजांचे युद्ध, ही फले होतात ॥९५॥

सात दिवसांमध्ये सतत जलवृष्टि होईल तर सुभिक्ष होईल असे सांगावे व जे ग्रहणाचे अशुभ फल तेही सर्व नाहीसे होते ॥९६॥

चंद्रग्रहण झाल्यावर पंधरा दिवसांनी सूर्यग्रहण होईल तर लोकांमध्ये अनीती व स्त्रीपुरुषांमध्ये परस्पर वैर (द्वेष) ही होतील ॥९७॥

सूर्यग्रहणानंतर पंधरा दिवसांनी चंद्रग्रहण होईल तर ब्राम्हाण एकयज्ञाचे फल भोगणारे असे होणार नाहीत (बहुत यज्ञ करतील) व सर्व लोक आनंदित होतील ॥९८॥


॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांराहुचार:पंचमोध्याय: ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP