मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|

श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र.

'श्रीविठ्ठलभक्त सद्गुरु विठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांचे स्तुति काव्य'

‘शैले शैलेन माणिक्यं मौक्तिक्यं न गजे गजे ॥
हया प्रसिद्ध पुरुषाचें जन्म बेंदरें उपनामक एका सत्कुलांत झालें. मोंगलाईंत कलबुर्ग्याच्या सन्निध व लढाईमुळें इतिहासप्रसिद्ध असें, खडें याच्या जवळ बेंदर नांवाचें एक छोटेसें गांव आहे. तेथें या पुरुषाचें पूर्वज राहत असत: व त्या गांवावरूनच त्यांच्या वंशास बेंदरे हें उपनाम पडलें.
अण्णांचे आजे बाळाजीपंत हे शांडिल्य गोत्री देशस्थ ब्राम्हाण. सुमारें सव्वाशें वर्षां - पूर्वीं यांनीं आपल्या हुषारीनें पेशवे सरकारांकडून कर्‍हाड तालुक्यांत वंशपरंपरेची द्प्तरदारीची सनद मिळविली. त्या वेळीं थोरलें माधवराव पेशवे यांची कारकीर्द चालूं होती. सनद मिळतांच बाळाजीपंत मंडळीसह कर्‍हाड येथेंच राहूं लागलें. बाळाजीपंतास महादाजी आणि त्र्यंबक असे दोन पुत्र झाले. बाळाजीपंताच्यामागें महादाजी बल्लाळ यांनीं प्रसिद्ध मुत्सद्दी नाना फडणीस यांचे मार्फत, सनदेप्रमाणें दप्तरदारीची जागा आपणास मिळावी म्हणून, खटपट करून, पेशवे सरकाराकडून, ती मिळविली. हया वेळी त्यांचें वय अवघें १५ वर्षांचें होते. व त्यांनीं आपलें काम उत्तम करून थोडयाच दिवसांत चांगला लौकिक मिळविला. हयांना सर्व लोक तात्या असें म्हणत.
तात्या हे मोठे सुशील व कर्मनिष्ट होते. हयांना रामचंद्र नांवाचा एक हुषार मुलगा होता, पण तो अल्पवयातच वारल्यानें त्यांना फार दु:ख झालें. हयानंतर पुढें पुष्कळ मुलें झालीं पण त्यांतून एकही जगलें नाहीं. शेवटीं ईश्वरकृपेनें पौष कृष्ण अमावस्या शके १७३५ हया दिवशीं हया सत्पुरुषांचा जन्म झाला. नवसा सायासानें मूल झालें असल्यानें पुत्रोत्सव मोठया थाटाचा होऊन, विठ्ठल असें नांव ठेवण्यांत आलें. हयांनीं आपला संसार उत्कृष्ट करून मोठा लौकिक मिळविला. अण्णा हे लहानपणीं फारच खेळकर होते. एकुलतें एक मूल व तेंही नवनवसाचें म्हणून आईबापही बोलत नसत. एकदां दसर्‍याचे दिवशीं ताल्या हे त्यांना वाडयांत घेऊन गेले. त्यावेळीं सुभेदारीच्या जाग्यावर बाळाजीराव लिमये नांवाचे चांगले सज्जन गृहस्थ होते. त्यांनीं अण्णांस जवळ बोलावून कांहीं  प्रश्न विचारिले व त्यांचीं योग्य उत्तरेंही दिलीं. सुभेदारांनीं ‘तूं शाळेंत कय शिकतोस  ?’ असा प्रश्र केल्यावर अण्णांचें तोंड खरकन  उतरलें. तेव्हां सुभेदारांनीं त्यांस योग्य उपदेश केला. तेव्हांपासून त्यांनीं विद्याभ्यास करण्याचा द्दढनिश्चय करून सहा महिन्यांत वहुतेक प्राथमिक शिक्षण पुरें करून बाळबोध व मोडी अक्षरें चांगलीं वळविलीं. फार काय, त्या शाळेंत त्यांचींच वळणें घालून देत, असें म्हणतात. हया वेळीं त्यांचें वय अवघे १० वर्षांचें होतें. असो. एके दिवशीं तात्याबरोबर अण्णांही वाडयांत गेले. आणि तेथें सुभेदारांना झालेली सर्व तयारी दाखवितांच त्यांच्या हुषारीबद्दल त्यांना मोठा अचंवा वाटून त्यांनीं त्यांचें कौतुक केलें. याप्रमाणें कांहीं दिवस चालल्यावर मुलगा मार्गास लागला असें पाहून तात्यांनीं त्यांच्या विवाहाचा बेल केला. सदाशिवगड येथें चिमणाजीपंत विरमाडकर नांवाचे गृहस्थ राहत असत. त्यांची कन्या गयाबाई ही बधू नेमस्त करुन लग्न सोहाळा मोठया कडाक्यानें केला. हयावेळीं अण्णांचें वय १२ वर्षांचें होतें. पुढें थोडयाच दिवसांनी अण्णांला तालमीचा नाद लागला. त्याच गांवांत राघोपंत आपटे नांवाचा एक तालीमबाज ब्राम्हाण गृहस्थ होता. त्याला पोहण्याचाही नाद होता हे दोन्ही गुण अण्णांनीं त्याजकडून प्राप्त करून घेतलें. एके दिवशीं हया दोघांनीं स्वहस्तें एक मारुतीचें दगडी देवालय कृष्णातटाकीं बांधण्याचा निश्चय करून तें हळुं हळूं बांधून पुरेंही केलें. यास आपठयाचा मारूती म्हणत असत. हल्लीं त्याचे भोवतीं स्मशानभूमी असल्यानें तो मढया मारुती या नांवाने प्रसिद्ध आहे. असो. त्यावेळीं रामशास्त्रीं अण्णा हे शास्त्राध्ययन करण्यासाठी राहिले> केदारपंत नामें कोणा एका साधूचा कृष्णा केदार या नांवाचा मुलगा यांचा सहाध्यायी होता. थोडयाच दिवसांत अण्णांनीं रूपावळीं, समासचक, रघुवश वगैरेची चांगली तयारी करून आपल्या सहाय्यास मागें टाकिलें. तेणेंकरून सर्वांस फार आनंद होऊन, तात्यांनीं बुवांस आपल्या घरी राहण्याची सोय करून दिली. बुवांनीं तेव्हांपासून अण्णा असा हांक मारण्याचा परिपाठ ठेविला. त्यामुळें त्यांना विठोबाअण्णा असें सर्व लोक म्हणूं लागलें.व ते हयाच नांवानें अखेरपर्यंत प्रसिद्ध होते.
हे शास्त्रीबुवा चांगले व्युत्पन्न, अण्णाही चांगले बुद्धिमान, यामुळें त्याजपासून अण्णांनीं थोडयाच दिवसांत पंचमहाकाव्यें उत्तम तयार केलीं. हे शास्त्रीबुवा पुढें निघून गेल्यानें अण्णांचा व्याकरणाचा अभ्यास तसाच राहिला. त्याच वेळीं श्रीकृष्णाबाईच उत्सव सुरूं झाला. त्यांत अण्णा कीर्तन करीत, व गोविंदबुवा कुरवलीकर हे मागें रहात. अण्णा शीघ्र कवि असल्यामुळें कीर्तनांत म्हणण्याची कविता आपण स्वत:च करीत असत. बाबा जोशी म्हणूनकोणी एक सद्भक्त व प्रसिद्ध हरिदास होते. त्यांच्या कीर्तनांत एकास सर्पदंश झाला असतां त्यांनीं कालियामर्दन आख्यान लावून तें विष उतरविलें: अशी त्यांची  अख्यायिका होती, ते एकदां मुद्दाम अण्णांच्या कीर्तनास आले होतें.  त्यांना ध्रुवाख्यान फार प्रिय; म्हणून अण्णांनीं त्या दिवशी तेंच आख्यान लाविलें, व भक्तवत्सल प्रभूनें ध्रुवास जें दर्शन दिलें, त्या स्वरूपाचें ‘हरि हा आनंदाचा कंद’ या सुसंस्कृत शुद्ध वाणीनें योग्य वर्णन करून कथेस मोठा रंग आणिला, आणि सर्वांस डुलवावयास लाविलें. अण्णांनीं गोविंदस्वामीपाशीं गायनाचा अभ्यास केला व आबाचार्य घळसासी, याजपाशीं कौमुदी म्हणत होते. पण ते लवकर वारल्यानें अण्णांनीं उत्तरार्ध स्वत:च संपविला. कांहीं पूर्व मिमांसेचा अभ्यास भिकुशास्त्री पाध्ये व बाकीचा नारायणाचार्य गजेंद्रगडकर यांजपाशीं केला. वैद्यकीचा अभ्यासही भाऊशास्त्री मालखेडकर याजपाशीं केला. असो.
एकदां कानड मुलखांतील कोणी एक मनुष्य ताडपत्रावर कोरलेले कांहीं ग्रंथ घेऊन विकावयास आला. हे ग्रंथ कानडी भाषेंत असून ‘हया माझ्या पूर्व जन्मांतील कविता आहेत,’ असें अण्णांनीं म्हणून त्या सर्व विकत घेतल्य हा कानडी कवि ‘पुरंदर विठ्ठल’ नांवानें प्रसिद्ध असून त्याची कविता त्या प्रांतीं आबालवृद्ध मोठया भक्तीनें गात असतात.

पेशव्याचें राज्य बुडालें असल्यानें सातारच्या महाराजांकडे दुय्यम कारकुनाचें काम अण्णा आपल्या वडिलाच्या मागें करीत होते. वडील वारल्यावेळीं अण्णांचें वय २८ वर्षांचें होतें. अण्णांच्या तिसाव्या वर्षींच त्यांना आपल्या प्रियपत्नीचा विरह कोसण्याची पाळी आली. त्यावेळीं अण्णांस सीतारामपंत ऊर्फ बापूसाहेब व रघुवीरराव ऊर्फ भाऊसाहेव हे दोन मुलगे व भवानीबाई नांवाची एक कन्या, अशीं तीन अपत्यें होतीं. या वेळीं थोरल्या पुत्राचें वय १२ वर्षांचें होतें. अण्णांच्या मनांत अग्निहोत्र घ्यावयाचें होतें, पण तो योगायोग आला नाहीं. द्वितीय संबंध करावा असा पुष्कळ मंडळीनीं अण्णांस आग्रह केला पण त्यास त्यांनीं रुकार दिला नाहीं. पुढें दोन वर्षांनीं अण्णांच्या मातोश्री वाराणशी ऊर्फ गीताबाई हया वारल्या. त्यानंतर अण्णांनीं पागोटें घालण्याचें सोडून दिलें. ते धोतर अथवा शालजोडी बांधीत असत. अण्णांचें मन उत्तरोत्तर भक्तीवर स्थिर होऊं लागलें. रात्रंदिवस श्रीरामनामाचा छंद लागला. पुढें लवकरच त्यांस अर्धांग वायूचा विकार जडला हा विकार थोडया अधिक प्रमाणानें पुढें सुमारें पंचवीस वर्षें होता. राजगुरु बाबामहाराज यांचे वडील चिरंजीव आबा महाराज यांचेजवळ त्यांनीं वेदांतशास्त्राचा अभ्यास करून त्याजपासून मंत्रोपदेशही घेतला आणि पुढें पुराण सांगण्यास प्रारंभ केला. अण्णांचे कनिष्ठ पुत्र भाऊसाहेब हे सर्वदा जवळ असत. अण्णांनीं त्यांस शास्त्राचा चांगला परिचय करून देऊन भागवतांतील रहस्य उत्तम समजावून दिलें होतें पक्षघात वायूनें शरीर व्यंग झाल्यानें लवकरच अण्णांनीं आपल्या कामाचा राजीनामा दिला. नंतर सर्व वेळ भजनपूजन, काव्यरचना इत्यादि आवडीच्या विषयांत घालवूं लागले.
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. काळे नांवाच्या गृहस्थांनीं कर्‍याडास प्रथम यज्ञ केला. त्या यज्ञास कण्वशाखीय चंदावरकर दीक्षित व प्रख्यात गजेंद्रगडकर वगैरे विद्वान मंडळी जमली असून काशीतूनही विद्वान मंडळी आली होती.यज्ञकुंडें पहाण्यासाठीं काळ्यांनीं आदरपूर्वक अण्णांस नेऊन तीं सर्व दाखविलीं. त्यांत चुक आहे असें अण्णांनीं सांगतांच यज्ञकुंडें तयार करविणार्‍या शास्त्र्यांस फार  वाईट वाटलें पण काळ्यांणीं अण्णांची योग्यता त्यांना सांगून त्यांचे समाधान केलें; व दुसरें दिवशीं अण्णांकडून यथोक्त यज्ञकुंडें तयार करवून घेतलीं. ही वार्ता अर्थातच काशीकर मंडळीकडून काशींत कळतांच हरएक खेपेस काशींत कोणताही याग असो अण्णांना आमंत्रण यावयाचेंच. अशी अण्णांची वास्तविक मोठी योग्यता होती. शके १७८५ त दुसरा याग शिदुभाऊ गरुड यांनीं केला त्यांतही अण्णांकडेसच धुरीणत्व होतें, १८६८ सालीं विष्णुशास्त्री पंडित यांनीं मुंबईंत स्त्रीपुनर्विवाह सशास्त्र आहे असा वाद उपस्थित केल्यानें, त्याचें निराकरण करणें जगद्रुरूंस भाग पडलें. सर्व शास्त्रीमंडळाच्या अत्याग्रहवरून गोविंद धोंडदेव लिमये ऊर्फ रावसाहेब वकील राहणार अष्टे, यांचे घरीं संस्कृत ग्रंथाचा मोठा भरणा असल्यानें, त्यांचे येथें दोन महिने राहून, अण्णांनीं नानाग्रंथाच्या आधारानें ‘विवाहतत्व’ नांवाचा ग्रंथ लिहिला. अण्णांला या सर्व खटपटीस सुमारें दीड हजार रुयये कर्ज झालें. पुढें अण्णा पुणें मुक्कामीं वाद करण्याचा निश्चय झाल्यानें  जगद्रुरु संकेश्वर स्वामी यांचे स्वारोबरोबर पुणें मुक्कामीं गेले. नारायणाचार्य गजेंद्रगडकर हे मुख्य वाद करणारे होते. त्यांस हयांनीं पुष्कळ साहय केलें. हा वाद सतत आठ दिवस चालला होता. इकडे पुण्यांत अण्णांचीं पुराणें चाललीं, तीं ऐकण्यास मंडळींची अति गर्दी होत असे. नित्य अण्णांची संभावना चांगल्या प्रकारें होई. वादाचें काम संपल्यावर अण्णा कांहीं दिवस मुंबईस गेले. तेथेंही त्यांचा गौरव फार चांगल्या रीतीनें झाला. नंतर ते कोल्हापूर, जमखंडी, फुरुदवाड, इचलकरंजी वगैरे ठिकाणीं लोकांच्या आमंत्रणावरून गेले असतां तेथें त्यांची संभावना योग्य प्रकारें होऊन त्यांना वादासंबंधीं झालेलें सर्व कर्जही फिटलें.
एकदां काळ्यांच्या येथें सप्ताह चालला असतां अण्णांस पक्षघाताचा झटका आला. मुखानें ‘राम राम’ एवढीच कायतीं अक्षरें कशींबशीं निघत. मग मोठया प्रयासांनीं त्यांत बरे होऊन अण्णा आणखी १ वर्ष वांचले. पुढें प्रतिवार्षिक श्रीरामनवमीचा उत्सव आला, त्यास पुष्कळ मंडळी आली होती. त्याचवेळीं, गणेश सीताराम शास्त्री गोळवलकर सुभेसाहेब इंदुर हे कांहीं कामानिमित्त विलायतेस गेले होते, ते शुद्ध होण्याच्या शास्त्रार्थासाठीं दोन दिवस राहिले होते. त्यांना योग्य शास्त्रार्थ, सुद्ध होण्याबद्दल, अण्णांनीं काढून दिल्यावर त्यांनीं अण्णांस १०० रूपये संतोषपूर्वक देऊन प्रयाण केलें. दशमीच्या दिवशीं मध्यरात्रीं अण्णांच्या पाठींत एकाएकीं कळा मारूं लागल्या. विष्णुपंत भागवत नांवाचे एक घरोब्याचे स्त्रेही होते, त्यांना बोलावून आणिलें व त्यांना ‘माझा आतां भरंवसा नाहीं, माझ्या मागें श्रीरामनवमीचा उत्सव चालावा, मुलांनीं चाकरी नोकरी करूमं नये. इ०’ सर्व हेतु कळविले नंतर नित्याप्रमाणें ‘श्रीरंगा दे मजला सत्संगा’ ‘उत्तम जन्मा जन्मा येउनि रामा,’ इत्यादि पदें ‘अहं शैशवे क्रीडनासक्तचेता:’ इत्यादि स्तोत्रें म्हणूं लागले. पाठीची कळ अमळ कमी वाटली. उजाडल्यानंतर म्हणजे शके १७९५ चैत्र व० एकादशी दिवशीं प्रात:काळीं प्रात:स्नान करून, संध्या, देवपूजा वगैरे आटोपून श्रीरामास खारकांच्या क्षिरीचा नैवेद्य दाखविला. ‘अहं शैशवे’ हें अपराधस्तोत्र म्हणून तीर्थ व तुलसीप्रसादाचा स्वीकार केला. अतीशय तहान लागली होती म्हणून थोडीसी खारकांचीक्शीर सेवन केली व पाणी प्यावें म्हणून पंचपात्री हातीं घेऊन नित्य क्रमाप्रमाणें ‘श्रीराम’ म्हणून थोडेसें पाणी तोंडांत घातलें. तोंच त्यांचें प्राणोत्क्रमण होऊन त्यांची शुद्ध जीवज्योति स्वात्मारामीं रममाण झाली. हातांतील पंचपात्री खालीं पडून क्लेश वगैरे कांहीं न होतां पवित्र हरिदिनीं दिवशीं ईश्वरनामस्मरणयुक्त त्यांचें प्रयाण झालें. असो. घरांतील मंडळी येऊन पाहते तों विपरीत प्रकार. बापूसाहेब व भाऊसाहेब हे औंध येथें होते. त्यांना सत्वर आणवून अण्णांचें देहसार्थक सर्वांनीं केलें. अण्णांच्या मागें कर्‍हाडास श्रीरामनवमीचा उत्सव अद्याप चालूं आहे. अण्णांच्या हेतूप्रमाणें वडील मुलगे वडिलामागें घर संभाळून होते. हल्लीं चौकशी करितां असें समजतें कीं, अण्णांचे घरचीं बहुतेक माणसें प्लेगनें मेलीं असून, एक नातू मात्र आहे. त्यांची थोरले मुलाची मुलगी बझर्डे गांवीं दिली आहे. असो.
सत्पुरुषाला कोणी एका चतुर कवीनें चंदनाची उपमा दिली आहे. पण चंदनापेक्षांही सत्पुरूषाची योग्यता खरोखर मोठी आहे. चंदन असें पावेतों व पश्चात कांहीं वेळ त्याचा सुगंध राहील. पण सत्पुरुषांच्या सत्कीर्तीचा परिमल अखंड असतो. असो. असे सत्पुरुष या भरतभूमींत वेळोवेळीं अवतार घेवोत अशी त्या जगन्नियंत्यास प्रार्थना करून हें अत्यल्प चरित्र पुरें करितों.
अण्णांनीं केलेले ग्रंथ.
अण्णांनीं आपल्या २५ व्या वर्षीं गजेंद्रचंपू म्हणून गजेंद्राच्या ध्यानावर काव्य केलें. त्यांचें उपास्य दैवत श्रीराम. त्यावार त्यांनीं “सुश्लोक लाघव” नामक द्यर्थी ग्रंथ रचिला आहे. अंतकाळीं श्रीरामस्मरण व्हावें  म्हणून “हेतु रामायण” नामक ग्रंथ लिहिला. पुनर्विवाह वादाचे वेळीं ‘विवाहतत्व’ नामक सुंदर ग्रंथ केला. भाटेशास्त्री हे, संधि करून वेद कसा म्हणावा ? याविषयीं जयपत्रें घेत आले होते. त्यांच्या समजुतीस्तव, त्यांस तीन वर्षें ठेवून घेऊन ‘साधुपार्षद लाघव’ म्हणून ग्रंथ तयार  केला. याशिवाय त्यांनीं प्रबोधोत्सवलावघ, प्रयोगलाघव, नित्यक्रमलाघव, इ. बरेच ग्रंथ केले आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : July 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP