आरती - आरती महालक्ष्मीची

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : आरति भुवन. )
जय जय नदिपति प्रिय तनये । भवानी, महालक्ष्मि, माये ॥ध्रु०॥
आदि क्षिरसागररहिवासी । जय जय कोल्हापुरवासी
अंबे भुवनत्रयिं भ्रमसी । सदा निजवैकुंठीं वससी
दुर्लभ दर्शन अमरांसी । पावसि कशि मग इतरांसी
( चाल ) करुणालये मोक्षदानीं
भक्त जे परम - जाणती वर्म - सदा पदिं नरम
कृपेनें त्यांसी सदुपायें । संकटीं रक्षिसि लवलाहे ॥१॥
अमरेश्वर विधिहरिहर । मिळाले असुरांचे भार
मंदाचल नग रवि थोर । केला वासुकिचा दोर
ढवळिला सागर गर - गर । रगडिले जलचर मीन मगर
( चाल ) लाजती कोटि काम पोटीं
तुझें सौंदर्य - गळालें धैर्य - म्हणती सुर आर्य
जाळितो रतिपति सोसुं नये । होतां जन्म तुझा सुनये ॥२॥
त्रिभुवनस्वरुपें तूं आगळी । वरिलासी त्वां वनमाळी
तुजसम न मिळे वेल्हाळी । शंकर मकरध्वज जाळी
न मिळे स्पर्शहि पदकमळीं । पदरज लागो तरि भाळीं
( चाल ) पितांबर शोभतसे पिवळा
बहारजरतार - हरिभरतार - तरि मज तार
स्तवितां तुज जरि गुणग्रहे । दशशतवदनांही भ्रम ये ॥३॥
सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण तुझे ध्यानीं
दृढासन घालुनि निर्वाणीं । बैसले महामुनि तपिं - ध्यानीं
तरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुण वर्णुं कसे वदनीं
( चाल ) जरी हा विष्णुदास तूझा
बहु अपात्र - करी सुपात्र - कृपा तिळमात्र
करोनी मोक्षपदीं वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP