मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|

श्यामची आई - रात्र अकरावी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


" राम ! तो दिवा बाजूला कर . माझ्या डोळ्यांवर उजेड नको . " श्याम म्हणाला . आज बाहेर जरा पाऊस पडत होता . गार वारा वाहत होता . म्हणून मंडळी आतच बसली होती . रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचे होई , श्यामला दिव्याचा त्रास होत असे . राम दिवा बाजूस करू लागला ; परंतु भिका कसचा ऐकतो ! " इथे दिवा असला , म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हांला दिसतात . कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो . तुमच्या शब्दांचा परिणाम होतो . त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो . केवळ ऐकण्याने काम होत असते . तर नाटक अंधारातही करता आले असते . " भिका म्हणाला .

" मी काही नाटक नाही करीत ; माझ्या ह्यदयातील बोल तुम्हांस सांगत आहे . " श्याम म्हणाला .

" आम्ही नाटक नाही ; म्हणत . परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो . रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत ; परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्याने ऐकावयास जात . रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत . " नामदेव म्हणाला .

" बरे असू दे दिवा . तुम्हांला ज्यात आनंद , त्यातच मला , " असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरूवात केली :

एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो . तुळशीचे अंगण भले मोठे लांब रूंद होते . तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहेळ्याचे झाड होते . एकाएकी टप असा आवाज झाला . मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला , ते पाहू लागलो . काहीतरी पडले होते खास . आम्ही सर्वत्र शोधू लागलो . शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले . त्याची छाती धडधडत होती . फारच उंचावरून ते पडले होते . त्याची फारच पिल्लू आढळ्ले . त्याची झाला होता . अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते . डोळेसुध्दा ते नीट उघडीत नव्हते . लोहाराचा भाता जसा हलत असतो , त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एक्सारखे हलत होते , त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाणे ओरडे . या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरविले . त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो . मी व माझा लहान भाऊ दोघे होतो . मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेविले . आम्हीही लहान होतो . आम्ही तरी काय करणार ? बालबुध्दीला जे जे सुचेल , ते ते करू लागलो . त्या पिलाला दाणापाणी देऊ लागलो . तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो . त्या पिलाला खाता येत होते , की नाही , त्या आमच्या काळजीनेच , आमच्या चोचीत पाणी घातल्याने दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना , याचा आम्ही विचारच केला नाही .

या जगात नुसते प्रेम , केवळ दया असून भागत नाही . जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरूरी असते . पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती . प्रेम , ज्ञान , व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत , त्याला जगात कृतार्थ होता येईल . प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ ; ज्ञानहीन प्रेम तेही फुकट ; प्रेमज्ञानहीन शक्ति व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच . माझ्या अंगात शक्ती असली ; परंतु दुसर्‍यावर प्रेम नसेल , तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसर्‍यास

भूतदया

देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल , तर ते प्रेमही अपाय करील . एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे ; परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी , याचे ज्ञान जर तिला नसेल , तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये , तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल ! समजा , आईजवळ प्रेम आहे . ज्ञानही आहे ; परंतु ती जर स्वत : अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही . प्रेम , ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा . प्रेम म्हणजे ह्यदयाचा विकास ; ज्ञान म्हणजे बुध्दीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास . शरीर , मन व बुध्दी या तिहिंची वाढ जीवनात हवी .

आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो . परंतु आम्हांला ज्ञान नव्हते . त्याच्या चोचीत पीठ , कण्या , नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले ! गरीब बिचारे ! आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते . त्याने शेवटी मान टाकली ! मी त्याला म्हटले , " आम्ही तुला पिंजार्‍यात कोंडून नाही हो ठेवणार !

तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा . आम्ही दुष्ट नाही हो , तुझ्या आईसाठी तरी नको , रे मरू ! ती केविलवाणी ओरडत असेल . घिरट्या घालीत असेल . "

आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते . मी आईला म्हटले , " आई ! हे पिलू बघ ग कसे करते आहे ! अगदी मान वर करीत नाही . त्याला काय खावयाला देऊ ?"

आई बाहेर आली , तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली , " श्याम ! हे जगणार नाही , हो . त्याला सुखाने मरू दे . त्याला एकसारखे हात लावू नका . त्याला वेदना होतात . फारच उंचावरून पडले ; गरीब बिचारे !" असे म्हणून आईला ते पिलू खाली कापसावर ठेविले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली . आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो . शेवटी चोच वासून ते मरून पडले . गेले , त्याचे प्राण गेले ! त्याचे आईबाप भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते . आम्हांला फार वाईट वाटले . त्याला नीट पुरावयाचे , असे आम्ही ठरविले .

आईला जाऊन विचारले ," आई ! या पिलाला आम्ही कोठे पुरू ? चांगलीशी जागा सांग ." आई म्हणाली . " त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगर्‍याजवळ पुरा . शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील , मोगर्‍याची फुले अधिकच तजेलदार दिसतील . कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे . ते प्रेम ते पिलू विसरणार नाही . त्या फुलांत तुमच्यासाठी ते येईल व तुम्हांला गोड वास देईल ."

मी म्हटले , " त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं , होय ना ? सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले , त्यावर डाळिंबाचे झाड लाविले ; परंतु सोनसाखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली . तसेच हे पिलू येईल , ? मग शेवंतीची फुले किती छान दिसतील ? फारच वास येईल , नाही का ग आई ?"

आई म्हणाली , " जा लौकर पुरा त्याला . मेलेले फार वेळ ठेवू नये ."

" त्याला गुंडाळावयास आम्हांला चांगलेसे फडके दे ना ." मी म्हटले . आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती . त्या चोळीचा एक तुकडा फाडून दिला . त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले . जेथे फुलझाडे होती , तेथे गेलो . शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो . आमच्या डोळ्यांतून पाणी गळत होते . अश्रूंनी जमीन पवित्र होत होती . खळगी खणली . त्या खळगीत फुले घातली . त्या फुलावर पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेविला ; परंतु त्यावर माती ढक्लवेना ! लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना . शेवटी डोळे मिटून माती लोटली . मांजराने खळगी उकरु नये , म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो . माजघरात बाजूला बसलो व रडत होतो .

" का , रे बाजूला बसलास ? " आईने विचारले .

" आई ! मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे ! मी म्हटले .

आई हसली व म्हणाली , " अरे वेड्या , सुतक नको हो धरावयाला ."

मी म्हटले , " आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो , ते ?"

आई म्हणाली , " माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो , यासाठी त्याच्या जवळ असणार्‍या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे ; म्हणजे साथीचे रोग असतात , त्यांचे जंतू फैलावत नाहीत . म्हणून सुतक पाळीत असतात . त्या पाखराला का रोग होता ! बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले !"

आईचे शब्द ऐकून मला आश्र्चर्य वाटले . " आई ! तुला कोणी हे सांगितले ?" मी विचारले . आई म्हणाली , " मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते , ते नव्हते का बोलत ? मी ऐकले होते व ते मला खरे वाटले . जा , हातपाय धुऊन ये , म्हणजे झाले . वाईट नको वाटून घेऊ . तुम्ही त्याला प्रेम दिलेत , चांगले केलेत . देवही तुमच्यावर प्रेम करील . तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली , तरी दुसर्‍या मित्रास उभे करील . देवाच्या लेकरास , कीड - मुंगी , पशुपक्षी , यांना जे द्याल , ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो . पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो . श्याम ! तुम्ही पाखरावर प्रेम केलेत , तसेस पुढे एकमेकांवर तुम्ही करा . नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल ; परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल . तसे नका हो करू . तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका . तुमची एकच बहीण आहे , तिला कधी अंतर देऊ नका ; तिला भरपूर प्रेम द्या ."

आई हे सांगत असता गहिवरुन आली होती . माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले , हे का तिच्या डोळ्यांसमोर होते ? का ती नेहमी आजारी असे , तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही , म्हणून तिला वाईट वाटत होते ? तिच्या भावना काही असोत ; परंतु ती बोलली ते सत्य होते . मुंग्यांना साखर घालतात ; परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात ! मांजरे , पोपट यांवर प्रेम करतात ; परंतु शेजारच्या भावावर , मनुष्यावर प्रेम करीत नाहीत , हे आपण पाहत नाही का ?

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP