भागीरथीबाई - अभंग संग्रह १ ते १०

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


पद १ ले प्रभाती

उठा सद्गुरुराजसमर्था उघडा ज्ञानलोचन ॥

बोध - भानु हा उदय जाहला पसरी आद्वय - किरणां ॥धृ०॥

रम्य उशा ही द्वारि पातली करी तव स्वरुपी वंदना ॥

पंच स्वर हे पक्षी गाती आळविती तव कृपाधना ॥१॥

फुलली कमळे सरोवरी ही भृंग गुंतले रसपाना ॥

चक्रवाक हे एक जळी दुजेपणाते सारुन ॥२॥

मुक्तमाळ ही शीत जाहली तव स्वरुपाच्या स्पर्शाने ॥

दृष्टतांबुल विटोनी गेला टाकीला निसारपणे ॥३॥

त्रिगुण काकडा पंच आरती घेऊनि तिष्ठति भक्तजना ॥

कृपा करुनिया दर्शन द्यावे भागिरथी करि पदिं वंदना ॥४॥

 

पद २ रे काकड आरती

चाल - मायाविद्या

प्रातःकाळ होतां काकड आरती ओवाळूं ,

अन्यन्यभावे लीन होउनी चरणांवरि लोळूं ॥धृ०॥

जीवदशा अज्ञानाचा काकडा केला ,

ओंवाळितां तल्लिन झाले पाहतां मुखकमळा ॥१॥

जिकडे पाहे तिकडे एकच सद्गुरु भरला ,

अवघा घनानंद माझा मीच पाहिला ॥२॥

पाहतां पाहतां एकचि झाला नाही दुजेपण ,

सद्गुरुनाथें कृपा करोनी दाखविली खूण ॥३॥

बलभीमराये दया करोनी धरिले करकमळां ,

दास भागिरथी प्रेमे दिधलासे थारा ॥४॥

पद ३ रे काकडा झाला

काकडा झाला आतां कोजळी काढा ॥धृ०॥

ज्ञानगंगा आणोनिया , भावे झारी भरोनिया ,

चौ - देहाचा चवरंग करोनी , त्यावरी बसवा सद्गुरुला ,

प्रभुचे मुख प्रक्षाळा ॥१॥

नामरुपाची करुनी राखुंडी , एक बोटाने दंतमंजन करा ,

करुनि शुद्ध तिथें भाव भक्ति - रुमालाने पुसा ,

दास्यत्वासी तनु ही लावा ॥२॥

मनबुद्धीचे पाटचि मांडा , अष्टभावांचे आसन घाला ,

चित्तवाटि नवनीताने भरुनिया ठेवा , अष्ट आंग बल -

भीमचरणी लावा , भागिरथी म्हणे आतां प्रेमे न्याहाळा ॥३॥

पद ४ थे दूध

दूध घेइं सद्गुरुराया , लागतसे दासी पाया ॥धृ०॥

वासना शेगडी करोनी , षडरिपु - कोळसे घालुनी ,

प्रेम वरी दूध तापउनि , अर्पितसे तंव चरणा या ॥१॥

शांतीची बशी करोनी , साद्विचार - भांडे भरोनी ,

विवेकाचा चमचा करोनी , लावितसे मुखकमळा या ॥२॥

घालुनी निवृत्ती - शरकरा , शुद्ध सत्त्वाचा वेलदोडा ,

ध्यानी बसवी सगुण सुंदरा , तृप्त करी या इच्छेला ॥३॥

नाथ बलभीमराज समर्थ , पूर्ण करी मनोरथ ,

दावीत सर्वांचा अर्थ , सुखी केले भागिरथीला ॥४॥

पद ५ वे जेवण

तूं रे भोजन करी माझ्या भावा , भक्ति विनवीतसे देवा ॥धृ०॥

शुद्ध सत्ताचा भात केला , र्‍हस्व मीचे मेतकुट वाढिले ,

दीर्घ मीचा घांस घ्यावा ॥१॥

बोधप्रबोधांचे घुसळण केले , ज्ञान नवनीत वरती आले ,

गुरुवचनांनी कढविले ॥२॥

ठकू हे भांडे अधिकारी केले , निजबोधाने गाळीयेले ,

मीठची होउनी तोंडी लावा ॥३॥

बलभीमराये कुरवाळिले , भागिरथीसी जेवविले ,

एकानंदे होउनि ठेविले ॥४॥

पद ६ वे मुखप्रक्षालन

श्रीसद्गुरुचे मुख प्रक्षाळूं , ज्ञान उदक हे घेऊं ॥धृ०॥

भावभक्तिचा तांब्या करुनी , ज्ञान - गंगा जल ठेवूं ॥१॥

शुद्ध सत्त्वाचा रुमाल घेउनि , वरदहस्त की देऊं ॥२॥

बलभीमराय समर्थ या जगिं , ठकू म्हणे चरणी राहूं ॥३॥

पद ७ वे विडा

घ्या विडा सद्गुरुराया ॥धृ०॥

वासनेचे पान घेउनि , मीपण लावूनि चुना ॥१॥

अविद्येचा कात घालुनि , फोडिं विकल्प - सुपारीला ॥२॥

जाणे - येणे जायपत्रि घालुनी , लवण लवंगहि पानाला ॥३॥

बलभीमराज समर्थ या जगिं , ठकूस दावि निजरंगाला ॥४॥

पद ८ वे

चाल - चक्षु दरपणी

मौज गुरुसदनी अहाहा ॥ गुरुभक्तांसी दिसे लोचनी अहाहा ॥धृ०॥

किती दयाळू गुरुमाउली हो । खटनटासि घे पदरी हो ॥

बोध करुनी सर्वांसी सोडी अहाहा ॥१॥

कसे नाथाने नवल केले हो । दोष दृष्टिरुप सर्व दाविले हो ।

मज स्वयंसच्चिदानंद केले अहाहा ॥२॥

बलभीमराज ज्ञान - मुळी हो । भागिरथी अमरवेली हो ॥

चिदाकाशी पसरली अहाहा ॥३॥

पद ९ वे नमस्कार

कसे हंसराये आपणचि केले ।

स्वयंप्रकाश होऊनि पाहे ।

माया तनु ही घेऊनि कैसी ।

नमस्कार करितों आपाआपणांसी ॥१॥

तया हंसादेवास ब्रम्ही नमिले ।

वरिष्ठासि मानोनि पुढेचि ठेले ।

तया बोध देवोनि संतोषवीला ।

नमस्कार माझा तया हंसदेवा ! ॥२॥

भवभ्रांति सर्व हरायास माझी ।

करी चरणसेवा प्रेमेसि तूझी ।

भावेसि अत्री अखंड पद पहाया ।

नमस्कार करितो हो ब्रह्मदेवा ! ॥३॥

प्रबोधाची शक्ति असे बहुत युक्ति ।

कशी दाविली त्वांहि जगोत्पत्ती ।

म्हणुनी शरण दत्त जयाला ।

नमस्कार अत्रिदेवासि केला ॥४॥

निजबोधसरणी तुझी कोण वाणी ।

नेऊनि करसी निरंजनी मिळणी ।

नारायण गिरनारी भेटे गुरुला ।

नमस्कार करितो दत्तदेवा दयाळा ॥५॥

वैराग्य कैसे अंतरंगी झळाळी ।

प्रपंचात राहूनि परमार्थ पाळी ।

लक्ष्मण सेवी गुरुवचनाला ।

नमस्कार नारायण सद्गुरुला ॥६॥

परमात्मप्राप्तीचि आस्थाहि भारी ।

देव दावि ऐसा कधिं भेटे कैवारी ।

त्या बलभिमासी स्वयंदेव केला ।

नमस्कार त्या लक्ष्मण देवदेवा ! ॥७॥

जपतप अनुष्ठान बहुत केले ।

पुढे संत साधूसि मी कोण पुसिले ।

मी दाउनी ठकुसी परब्रह्म केले ।

बलभीमचरणी नमुनि ऐक्यत्व झाले ॥८॥

पद १० वे

प्रीति जडो तव पदिं गुरुराया ।

भजन घडो इंद्रिय - समुदाया ॥धृ०॥

रसना रंगो गुणगानरसी ।

यथार्थसार ज्ञान व्हावया ॥१॥

करणद्वय मम पवित्र होवो ।

झटुनि विमल विभुयश ऐकाया ॥२॥

नयन प्रेमे असोत उत्सुक ।

रम्य जगी तव दर्शन घ्याया ॥३॥

भक्तिद्वय हे भान विसरुनी ।

लागो द्वय चरण नाचाया ॥४॥

वाद्यांच्या गजरे कर टाळी ।

सिद्ध होत मम तुजसि वाहाया ॥५॥

नाम असे ज्या उत्तम अंग ते ।

नित्य लवो शिर तुजसि नमाया ॥६॥

दास भागिर्थी लीन सदाही ।

प्रार्थितसे बलभिमचरणा या ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP