अध्याय पाचवा - श्लोक १५१ ते १९५

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


तूं श्रीरामाचा महिमा नेणसी ॥ हा अवतरला वैकुंठासी ॥ वृत्तांत पुसे वसिष्ठासी ॥ साच कीं मिथ्या असे तो ॥५१॥

जो काळासी शासनकर्ता ॥ जो आदिमायेचा निजभर्ता ॥ जो कमलोद्भवाचा पिता ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५२॥

जें नीलग्रीवाचें ध्यान ॥ जें सनकादिकांचें गुह्य ज्ञान ॥ ज्यासी शरण सहस्रनयन ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५३॥

वेदांतशास्त्रें सर्व निसरून ॥ स्थापिती परब्रह्म निर्गुण ॥ तो हा श्रीराम परिपूर्ण ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५४॥

मीमांसक कर्ममार्ग ॥ ज्याकारणें आचरती सांग ॥ तो हा भक्तहृदयारविंदभृगं ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५५॥

नैयायिक म्हणती जीव अनित्य ॥ ईश्र्वर कर्ता एक सत्य ॥ तो हा जगद्वंद्य रघुनाथ ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५६॥

व्याकरणकार साधिती शब्दार्थ ॥ ज्याच्या नामाचे करिती अनेक अर्थ ॥ तो हा अवतारला वैकुंठनाथ ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५७॥

प्रकृतिपुरुषविभाग ॥ सांख्यशास्त्रीं ज्ञानयोग ॥ तो हा राम अक्षय अभंग ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५८॥

पातंजलशास्त्रीं योगसाधन ॥ तो अष्टांगयोग आचरून ॥ ज्याचें पद पावती निर्वाण ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५९॥

आतां कल्याण असो श्रीरामा ॥ मी जातों आपुल्या आश्रमा ॥ उल्लंघोन महाद्वारसीमा ॥ बाहेर गेला गाधिसुत ॥१६०॥

घाबरा जाहला नृपवर ॥ गृहांत जावोनि सत्वर ॥ वसिष्ठासी सांगे समाचार ॥ नमस्कार करोनियां ॥६१॥

म्हणे कोपला कीं गाधिसुत ॥ नेईन म्हणतो रघुनाथ ॥ महाराज तूं गुरु समर्थ ॥ सांग यथार्थ काय करूं ॥६२॥

तुझिया अनुग्रहाचें फळ ॥ महाराज राम तमालनीळ ॥ हा विश्र्वामित्र नव्हे काळ ॥ नेऊं आला राघवातें ॥६३॥

जें मागेल तें यास देईं ॥ समाधान करीं ये समयीं ॥ रामासी जीवदान लवलाहीं ॥ देई आतां गुरुराजा ॥६४॥

मग वसिष्ठ बोले गोष्टी ॥ हा विश्र्वामित्र महाहठी ॥ येणें केली प्रतिसुष्टी ॥ परमेष्ठीस जिंकावया ॥६५॥

येणें लोहपिष्ट भक्षून ॥ साठ सहस्र वर्षें पुरश्र्चरण ॥ केलें गायत्रीचें आराधन ॥ त्रिभुवन भीतसे तयातें ॥६६॥

सदा जवळी धनुष्यबाण ॥ महायोद्धा गाधिनंदन ॥ तात्काळ उग्र शाप देऊन ॥ भस्म करील कुळातें ॥६७॥

तुज सांगतों यथार्थ वचन ॥ त्यास देईं रामलक्ष्मण ॥ भरत आणि शत्रुघ्न ॥ तुजपाशीं असों दे ॥६८॥

ऐसें बोलता गुरुनाथ ॥ दीर्घस्वरें दशरथ रडत ॥ मग हृदयीं धरी ब्रह्मसुत ॥ दशरथासी उठवोनि ॥६९॥

रायाचे मस्तकीं हात हस्त ठेवून ॥ म्हणे रामाकडे पाहें विलोकून ॥ तों शंखचक्रगदामांडित पूर्ण ॥ आदिनारायण देखिला ॥१७०॥

सांगे कानीं मूळ काव्यार्थ ॥ हा अवतरला वैकुंठनाथ ॥ विश्र्वामित्र बोलिला जो जो अर्थ ॥ तो तो यथार्थ दशरथा ॥७१॥

सौमित्र तो भोगींद्रनाथ ॥ ऐकोनि तोषला दशरथ ॥ गुरु म्हणे हे मानव सत्य ॥ सर्वथा नव्हेत राजेंद्रा ॥७२॥

यालागीं रामलक्ष्मण ॥ देईं त्यास पाचारून ॥ शिरीं वंदोनि गुरुचरण ॥ गेला धांवोन तयापाशीं ॥७३॥

करूनि साष्टांग नमन ॥ म्हणे न्या जी रामलक्ष्मण ॥ ऐकोनि आनंदला गाधिनंदन ॥ काय वचन बोलत ॥७४॥

म्हणे मी मागत होतों रघुनंदन ॥ त्वां सवें दीधला लक्ष्मण ॥ माझें भाग्य परिपूर्ण ॥ लाभ द्विगुणित जाहला ॥७५॥

माझे पुण्याचे गिरिवर ॥ मेरूहून वाढले अपार ॥ ते आज फळा आले साचार ॥ रघुवीर प्राप्त जाहला ॥७६॥

विश्र्वामित्र आला वसिष्ठमुनी ॥ सभास्थानीं बैसला ॥७७॥

सभेसी बैसले थोर महंत ॥ आनंदमय जाहला दशरथ ॥ विश्र्वामित्र म्हणे रघुनाथ ॥ मज आतांचि दाविजे ॥७८॥

आजि धन्य माझे नयन ॥ पाहीन श्रीरामाचें वदन ॥ ज्यावरोनि मीनकेतन ॥ कोट्यावधि ओंवाळिजे ॥७९॥

नृप सांगोनि पाठवी रामासी ॥ विश्र्वामित्र आला न्यावयासी ॥ आपण यावें सभेसी ॥ सर्वांसी सुख द्यावया ॥१८०॥

ऐसें ऐकतां त्रिभुवनसुंदर ॥ सभेसी चालिला रघुवीर ॥ विद्युत्प्राय प्रावरण चीर ॥ रुळती पदर मुक्तलग ॥८१॥

निशा संपतां तात्काळ ॥ उदयाचळावरी ये रविमंडळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ सभेमाजीं पातला ॥८२॥

कौसल्याहृदयारविंदभ्रमर ॥ दृष्टीं देखोनि विश्र्वामित्र ॥ करोनियां जयजयकार ॥ भेटावया पुढारला ॥८३॥

विश्र्वामित्राचे चरण ॥ प्रेमें वंदितां रघुनंदन ॥ तों ऋषीनें हस्त धरून ॥ आलिंगनासीं मिसळला ॥८४॥

नीलजीमृतवर्ण रघुवीर ॥ प्रेमें हृदयीं धरी विश्र्वामित्र ॥ म्हणे जन्माचें सार्थक समग्र ॥ आजि जाहलें संपूर्ण ॥८५॥

विश्र्वामित्रासी आलिंगुनी ॥ वसिष्ठा नमी चापपाणी ॥ मग श्रीराम बैसला निजआसनीं ॥ वेदपुराणीं वंद्य जो ॥८६॥

मग श्रीरामासी म्हणे विश्र्वामित्र ॥ माझा क्रतु विध्वंसिती असुर ॥ तुजविण कोण रक्षणार ॥ दुजा न दिसे त्रिभुवनीं ॥८७॥

ऐकोनि विश्र्वामित्राचें वचन ॥ कमळ विकासे मित्र देखोन ॥ तैसा रघुवीर सुहास्यवदन ॥ बोलता झाला ते वेळीं ॥८८॥

ते कौतुककथा सुरस बहुत ॥ ऐकोत आतां साधुसंत ॥ जे कथा ऐकतां समस्त ॥ महापातकें नासती ॥८९॥

जैसें महावेदांतशास्त्र ॥ सर्वांसी मान्य करी पवित्र ॥ तैसा सहावे अध्यायीं साचार ॥ रस अपार ओतिला ॥१९०॥

केवळ जें वेदांतज्ञान ॥ रामासी उपदेशील ब्रह्मनंदन ॥ तें ऐकोत संत सज्जन ॥ आत्मज्ञान सुरस तें ॥९१॥

पुसेल आतां रघुवीर ॥ षष्ठाध्यायीं परम सुंदर ॥ वसिष्ठ ज्ञानाचा सागर ॥ वर्षेल उदार मेघे जैसा ॥९२॥

त्या वसिष्ठगोत्रीं उद्भवला पूर्ण ॥ ब्रह्मानंद स्वामी ज्ञानसंपन्न ॥ कीं वसिष्ठचि आपण ॥ कुळीं आपुल्या अवतरला ॥९३॥

ऐसा महाराज ब्रह्मानंद ॥ तयाचें जें चरणाविंद ॥ तेथें श्रीधर होऊनि मिलिंद ॥ दिव्य आमोद सेवितसे ॥९४॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

॥पंचमोध्याय गोड हा ॥१९५॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP